राष्ट्रीय मिलिटरी स्कूल
राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये देशातील सामान्य नागरिक व सैन्यातील अधिकारी आणि जवानांच्या मुलांना दरवर्षी स्पर्धा परीक्षेद्वारे वर्ग ६ आणि वर्ग ९ मध्ये प्रवेश दिला जातो. या शाळा बेंगळुरु, बेळगाव (कर्नाटक), अजमेर, धोलपूर (राजस्थान) आणि छैल (हिमाचल प्रदेश) येथे आहेत. या शैक्षणिक संस्था संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहेत. लष्करातील भरतीच्या दृष्टिने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरतो. याठिकाणी ऑल इंडिया सिनिअर स्कूल सर्टिफिकेट परीक्षा आणि लष्कर भरतीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी करुन दिली जाते. अभ्यासक्रम हिंदी आणि इंग्रजीमधून शिकवला जातो.
सीबीएसइ (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन)च्या धोरणानुसार अभ्यासक्रम शिकवला जातो व विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक मूल्यमापन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास प्रभावीरीत्या होतो. हा पूर्णपणे निवासी अभ्यासक्रम आहे.
याशाळांची प्रशासकीय जबाबदारी डायरेक्टोरेट जनरल ऑफ मिलिटरी ट्रेनिंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या शाळांच्या केंद्रीय प्रशासन मंडळाचे प्रमुख संरक्षण खात्याचे सचिव असतात.
प्रवेश प्रकिया
या शाळांमधील वर्ग ६ आणि ९ मधील प्रवेशासाठी सामायिक परीक्षा- कॉमन एंट्रस टेस्ट (सीइटी) दरवर्षी डिसेंबर महिन्यात घेतली जाते. ही परीक्षा देशभरातील विविध केंद्रावर घेण्यात येते. ही परीक्षा स्वयंचलित ऑप्टिकल मार्क रिक्गनिशन म्हणजेच संगणकआधारित आहे. वर्ग ६ च्या प्रवेश चाळणी परीक्षेत बुध्दीमत्ता चाचणी (गुण- ५०), सामान्य ज्ञान (गुण- ५०), गणित (गुण- ५०), आणि इंग्रजी (गुण- ५०), यावर आधारित असते. एकूण दोनशे गुणांचे बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीचे हे प्रश्न असतात. हे प्रश्न ५ व्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर विचारले जातात. (३) मुलाखत- २० गुण.
शासकीय किंवा शासनमान्य संस्थेतून वर्ग ५ किंवा वर्ग ६ ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यीच या चाळणी परीक्षेला बसू शकतात. तथापी ५ व्या वर्गात शिकणारे विद्यार्थ्यीसुध्दा या चाळणी परीक्षेस बसू शकतात.
९ व्या वर्गाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी परीक्षा ८ व्या वर्गाच्या दर्जाची असते. या परीक्षेत दोन पेपर असतात. (१) पेपर एक- हिंदी (गुण- २०), सामाजिक शास्त्रे (गुण- ३०) आणि इंग्रजी (गुण- ५०) , (२) पेपर दोन- गणित (गुण- ५०) आणि विज्ञान (गुण- ५०), या विषयांचे प्रश्न विचारले जातील. (३) मुलाखत- ५० गुण. ९ व्या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनमान्य शाळेतून ८ वी इयत्ता उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यंदा ८ वीत असलेले विद्यार्थी प्रवेश परीक्षेसाठी बसू शकतात.
चाळणी परीक्षेत उतीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावरच अंतिम निवड केली जाते. ही वैद्यकीय चाचणी लष्कराच्या अखत्यारितील रुग्णालयातूनच करावी लागते.
हा निकाल आर्मी इंट्रानेट होम पेजवर आणि (१) www.indianarmy.nic.in, (२) www.rashtriyamilitaryschools.in या संकेतस्थळांवर घोषित केला जातो.
११ व्या वर्गातील प्रवेशासाठी दहावीतील गुणांचा आधार घेतला जातो. वर्ग ९ आणि वर्ग १० मधील प्रवेश हा उपलब्ध जागांनुसार केला जातो. वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठीच हा प्रवेश मर्यादित आहे.
अर्ज व माहितीपत्रक
अर्ज आणि माहितीपत्रक दोन पध्दतीने प्राप्त करता येतात – (१) कोणत्याही राष्ट्रीय मिलिटरी स्कूल येथे जाऊन प्रत्यक्ष मिळवता येतो.
(२) पोस्टाद्वारे- अर्ज आणि माहितीपत्रक मागवता येते.
वयोमर्यादा-
वर्ग ६ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांचे वय १ जुलै रोजी १० वर्षापेक्षा कमी आणि ११ वर्षापेक्षा जास्त नसावे. वर्ग ९ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुलांचे वय १ जुलै रोजी १५ वर्षापेक्षा कमी आणि १६ वर्षापेक्षा जास्त नसावे. शहीद झालेल्या जवान/ अधिकारांच्या पाल्यांसाठी ६ महिन्यांची सूट दिली जाते.
राखीव जागा
(१) कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या पाल्यांसाठी ५० जागा राखीव ठेवण्यात येतात. (२) ३० टक्के जागा भूदल, नौदल आणि वायूदलातील अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाल्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. यामध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या पाल्यांचाही समावेश आहे. (३) ७० टक्के जागा या भूदल, नौदल आणि वायूदलातील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर्स किंवा अदर रँक्स यांच्या पाल्यांसाठी राखीव असतात. यामध्ये निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाल्यांचाही समावेश आहे. प्रत्येक संवर्गामध्ये १५ टक्के जागा अनुसूचित जाती आणि ७.५ टक्के जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात येतात.
प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच मूळ प्रमाणपत्रे तपासली जातात. त्यात काही त्रुटी आढळल्यास प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
बेंगळुरू मिलिटरी स्कूल
या शाळेत २० क्रीडांगणे आहते. अशी ही बेंगळुरु शहरातील एकमेव शाळा आहे. कॅडेट मेसमध्ये घरगुती वातावरणातील सुनिश्चित पोषण मूल्य असलेले जेवण दिले जाते.
निश्चय हॉल
निश्चय, असे नाव असलेला प्रेरणादायी हॉल विशेषत्वाने या शाळेत उभारण्यात आला आहे. त्यामध्ये गतकाळातील मौल्यवान बाबींचा समावेश आहे. प्रेरणादायी प्रदर्शन साहित्य आणि छायाचित्रे आहेत. याठिकाणी ११० खोल्या असलेले वसतिगृह आहे. विविध भाषा, प्रकार आणि विषयांशी संबंधित असे ग्रंथालय आहे. सुसज्ज असे सभागृह असून या ठिकाणी विद्यार्थी स्वविकासासाठी विविध कला कौशल्य प्राप्त करु शकतात. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, कला, काष्टशिल्प कला, संगणक आणि इंग्रजीभाषेशी निगडित प्रयोगशाळा आहेत. (साधारणत: अशाच प्रकारची व्यवस्था/सुविधा इतर मिलिटरी स्कूलमध्ये असतात.)
शुल्क-
विविध संवर्गांसाठी पुढीलप्रमाणे शुल्क आकारले जाते. (१) अदर रँक ऑफिसर – वार्षिक शुल्क १२,००० रुपये, (२) ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर – वार्षिक शुल्क १८,००० रुपये, (३) ऑफिसर – वार्षिक शुल्क ३२,००० रुपये, (४) इतर नागरिक – वार्षिक शुल्क ५१,००० रुपये. अनुसूचित जाती आणि सवंर्गातील उमेदवारांना यापैकी एक चतुर्थांश शुल्क भरावे लागते.
संपर्क-
(२) राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया छैल, सिमला हिल्स, हिमाचल प्रदेश- १७३२१२, दूरध्वनी- ०१७९२–२४८३२६, ईमेल- chail@rashtriyamilitaryschools.in
(२) राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया, अजमेर राजस्थान, ३०५००१, दूरध्वनी- ०१४५–२६२४१०५, ईमेल- ajmer@rashtriyamilitaryschools.in
(३) राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया बेळगाव, कर्नाटक-५९०००९, दूरध्वनी- ०८३१–२४०७५२४०, ईमेल- princirmsbgm@gmail.com
(४) राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया, पोस्ट बॉक्स-२५०४० म्युझियम रोड, बेंगळुरु कर्नाटक- ५६००२५, दूरध्वनी- ०८०-२५५४९७२,फॅक्स-२५३०८१९१ संकेतस्थळ- http://www.rashtriyamilitaryschools.in, ईमेल- rmsbengaluru@gmail.com
(५) राष्ट्रीय मिलिटरी स्कूल ऑफ इंडिया, धोलपूर, राजस्थान- ३२८०२८, दूरध्वनी-०५६४२-२२०७४९, ईमेल- principalrmsd@gmail.com
०००