(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

रोजगार/ स्वयंरोजगार क्षेत्रातील बदल

कोरोना विषाणू प्रादुर्भाव हा पूर्णपणे जाणार नाही हे आता तज्ज्ञ सांगत आहेत. याचा  परिणाम विविध क्षेत्रावर पडणार हे निश्चित. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडतील याकडे नॅशलन स्किल डेव्हलमेंट कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनीष कुमार यांनी पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्याच विषयात प्रावीण्य मिळवून चालणारे नाही, तर त्याला विविध प्रकारची कौशल्ये प्राप्त करावी लागतील. या कौशल्याचे सतत उन्नतीकरण म्हणजेच अपग्रेडेशन करावे लागेल, तरच यापुढील काळात विद्यार्थी रोजगारक्षम होईल आणि त्याला स्वत:चा रोजगार टिकवून ठेवता येणे शक्य होईल याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

पुढील काळात प्रत्यक्ष समोरासमोर बसून करणारे व्यवसाय वा रोजगार हे कमी होतील पण डिजिटल प्लॅटफॉर्म्सना अधिकाधिक प्राधान्य देणाऱ्या नव्या संधी निर्माण होतील या बाबीकडे केपीएमजी या संस्थेच्या भारतातील शिक्षण आणि कौशल्य विकास विभागाचे प्रमुख श्री नारायण रामस्वामी यांनी लक्ष वेधले आहे.

श्री मनीष कुमार यांच्यामते पुढील क्षेत्रांसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची सर्वाधिक गरज भासणार आहे.

() सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट – पुढील काळात अनेक कंपन्यांची बहुतेक सर्व कामे डिजिटल स्वरुपाची होतील. हा प्रवाह किंवा ट्रेंड भविष्यातही कायम राहू शकतो. त्यामुळे वेगवेगळया डिजिटल कामांसाठी आवश्यक असणारे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे कौशल्य आणि तंत्र  प्राप्त केलेल्या उमेदवारांची अधिकाधिक गरज भासू शकते.

() ॲप डेव्हलपेंट / डिझाइन – कंपन्यांच्या विविध कामांसाठी आवश्यक असणारे ॲप विकसित करणे, त्यांचे डिझाइन करणे , मोबाइल ॲपसाठी कंटेट म्हणजेज आशय निर्मिती करण्याची क्षमता, कौशल्य आणि तंत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिकाधिक रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.

() डाटा सायंटिस्टकंपन्यांनाकडे असणाऱ्या माहितीच्या साठ्याचे अचुक विश्लेषण करुन कंपनीच्या हितासाठी आणि अधिक उत्पादकतेसाठी नेमके काय करायला हवे, याविषयी भाकित करु शकणाऱ्या डाटा सायंटिस्ट किंवा माहिती विश्लेषकांना पुढील काळात मोठी मागणी राहू शकते.

() आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ॲण्ड मशिन लर्निंग या तंत्र कौशल्यात प्रावीण्य मिळवणारे उमेदवार, इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि रोबोटिक्स याविषयांच्या सोबतीने उत्कृष्ट संधी हस्तगत करु शकतात.

() बिझिनेस ॲनॅलिटिक्स- व्यवसाय वृध्दीसाठी विविध धोरणे ठरवावी लागतात. अचुक निर्णय घावे लागतात. त्यासाठीची पूर्व तयारी बिझिनेस ॲनालिटीक्स या विषयातील तज्ज्ञ करु शकतात. कंपनी वा उद्योगांकडे येणारा, गोळा होणारा आणि इतरत्र पाठवला जाणारा डाटा किंवा माहितीचा साठा यावर लक्ष ठेवणे, त्याचे सतत विश्लेषण करणे, त्यातील कंपनीच्या हिताच्या बाबी  व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देणे, या विश्लेषणाद्वारे कंपनीच्या उत्पादकता वाढीसाठी आवश्यक असणारे प्रारुप किंवा आराखडा (मॉडेल) तयार करण्याचे सूत्र सुचवणे या बाबीसाठी हे तत्ज्ञ साहाय्यभूत ठरतात.

 () क्लाउड कॉम्‍प्युटिंग तज्ज्ञ– यापुढील काळात बहुतेक सर्व व्यावसायिक संस्था आणि उद्योग हे क्लाउड कॉम्प्युटिंगकडे वळण्याची दाट शक्यता आहे. हे तंत्रज्ञान वापरायला सहज,सुलभ, परवडणारे,प्रत्येकाची गरज आणि आवशक्यतेनुसार संरचित करता येणारे आहे. क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिकाधिक उद्दिष्ट्ये साध्य करण्याकडे कंपन्याचा कल राहील. संसाधनांच्या वापराचे संनियंत्रण सुलभ करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होईल. संस्थात्मक प्रत्येक बाबी व प्रक्रियेकडे प्रभावीरीत्या लक्ष पुरवण्यासाठी या तंत्राचा वापर होईल. विक्री आणि विपणन प्रक्रियेतही महत्वाची भूमिका हे तंत्र बजावेल.

() कंटेट डेव्हलपर,कंटेट क्रियटेर,व्हीडीओ एडिटर आणि ऑपरेटर – यापुढील काळात सर्व मनोरंजन वाहिन्या आणि स्टुडिओ यांचा भर ,थेट ग्राहकांकडे (डायरेक्ट टू कंझ्युमर) जाण्याचा राहील. त्यासाठी विविध आशय,विषय,प्रकार आणि पध्दतीचे कार्यक्रम तयार केले जातील. त्या अनुषंगाने व्हीडिओ, संगीत,गेमिंग कार्यक्रम यांची निर्मिती केली जाईल. यासाठी फाइव्ह-जी या तंत्राचे साहाय्य घेतले जाईल. लाइव्ह स्ट्रिमिंग म्हणजेच ग्राहकापर्यंत थेट कार्यक्रम पोहचवणाऱ्या उद्योगाची मोठी वाढ पुढील काळात अपेक्षित आहे. या गरजा भागवणाऱ्या तंत्रकुशल मनुष्यबळाची फार मोठी गरज भासेल.

() आरोग्य सुविधा- रुग्णालय प्रशासन, औषधीनिर्मिती, वैद्यकीय पर्यटन (मेडिकल टुरिझम), टेलीमेडिसीन या क्षेत्रांमधील तज्ज्ञांची गरज वाढणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये देशातील आरोग्य क्षेत्राचा विस्तार आणि विकास करण्याचे तत्व समाविष्ट आहे. यापुढील काळात आरोग्य क्षेत्रावरील शासनाचा खर्च वाढता राहील. डिजिटल आरोग्य सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल. विविध चाचण्या,औषधे,आरोग्य पत्रिका (हेल्थ कार्ड्स),टेलिमेडिसिन अशी मोठी साळखी डिजिटल हेल्थ प्रणालीचा भाग बनेल. शासनाचा पा‍ठिंबा असल्याने या क्षेत्राला गती मिळेल. त्यामुळे या क्षेत्रासाठी मनुष्यबळाची अधिक गरज भासेल. (अपूर्ण)

०००