वाईटातनं चांगलं…
पिंटू, मिंटू, चिंटू आणि छिंटू म्हणजेच कॉलनीतल्या जेम्स बाँड टोळीने एके दिवशी शाळेतून येतांना रावतेकाकूंना त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून खाली कचरा टाकताना बघितलं.
सोसायटीत इकडून तिकडे चुगल्या करण्यात त्यांनी पहिला क्रमांक मिळवला होता. कॉलनीतल्या पोरांवर त्या फार खार खावून असायच्या. सारख्या मुलांवर खेकसत असायच्या. मुलांच्या दंगामस्तीमुळे, खेळण्यामुळे कॉलनीतली शिस्त बिघडल्याची तक्रार सोसायटीच्या सेक्रेटरीकडे नेहमी करायच्या. कॉलनीतल्या प्रत्येक मुलास एकदा तरी त्यांच्या शिव्यांचा प्रसाद मिळाला होता. त्यामुळे कॉलनीतल्या मुलांनी त्यांना धडा शिकवायचाच असा निश्चय केला होता. पण तशी संधी काही मिळत नव्हती. मात्र जेम्स बाँड टोळीने रावतेकाकूंना खिडकीतून कचरा फेकताना बघितलं नि या घटनेत काकूंना धडा शिकवण्याची संधी असल्याचं टोळीतल्या मिंटूच्या सुपिक डोक्यात आलं.
पण, आपण सर्वांनी कितीही घसा फोडून सांगितलं तरी कचरा फेकलाच नाही असंच काकू ठासून सांगणार ना. छिंटू म्हणाला.
कचरा मीच फेकला याचा पुरावा द्या म्हंटलं तर पुरावा आणायचा कुठून ,पिंटूने रास्त शंका काढली.
त्यांनी आजच कचरा फेकला असेल, दररोज थोड फेकणार त्या. चिंटू म्हणाला.
तुझं म्हणणं बरोबर असलं तरी, काकूंचा स्वभाव पाहता त्या नेहमीच खिडकीबाहेर कचरा फेकत असल्या पाहिजे. त्यांना आपण पकडायला हवं. मिंटू म्हणाला.
अरे, पण आपण पोलीस आहोत काय त्यांना पकडायला. शिवाय, कचरा फेकणं ही काय चोरी नाही. मिंटूने शंका व्यक्त केली.
चोरी नसली तरी असं चोरुन लपून, कुणी नाही बघून कचरा फेकणं हे कोणत्या नियमात बसतं?
पण रावतेकाकूंना हे सांगणं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटी बांधण्यासारखं. छिंटू त्याच्या बुध्दिमत्तेनुसार बोलला.
आजकाल मांजरीच काय वाघाच्यासुध्दा गळ्यात घंटी बांधता येतं, पण रावतेकाकू त्या पलिकडच्या आहेत. पिंटू म्हणाला.
त्या पलिकडच्या म्हणजे? त्या मंगळावरच्या तर नाहीत ना. मिंटू म्हणाला. त्यावर टोळी फिदीफिदी हसली.
हसता काय, त्याने दात दिसतात. ते दाखवण्याऐवजी बुध्दी दाखवाना, रावतेकाकूंना रंगेहाथ पकडण्याची. मिंटू म्हणाला.
कॉलनीतल्या गजानन महाराजांच्या मंदिरातील बेंचवर बसून टोळी विचारमंथनात गढून गेली. पण अर्धातास गहन चर्चा करुनही त्यांना उपाय सुचला नाही. संध्याकाळ उलटून गेल्याने ते आपआपल्या घरी परतले.
रात्री जेवल्यानंतर मिंटूने रावतेकाकूंना कचरा फेकताना टोळीनं कसं बघितलं, त्यानंतर त्यांना कसं रंगेहाथ पकडायचा कसा निश्चय केला,पण खूप विचार करुनही कोणताच उपाय कसा सापडला नाही, याचं घरी साग्रसंगीत वर्णन केलं. मिंटूच्या बाबांना यात मोठी गंमत वाटली.
रावतेकाकूंना अद्दल घडवायलाच हवी असं कॉलनीतल्या इतर माणसांप्रमाणेच त्यांनाही वाटत होतच. रावतेकाकू रंगेहाथ पकड मोहिमेसाठी आपण मुलांना मदत करु शकू असं त्यांना मनोमन वाटलं. त्यांनी मिंटूच्या आईशी चर्चा केली. त्यातर एका पायावरच तयार होत्या. सापही मरावा आणि काठीही तुटू नये अशी मस्त संधी आल्याचं त्यांनी मिंटूच्या बाबांना सांगितलं. बाबांनी काही क्षण विचार केला आणि त्यांनी आपला स्मार्ट फोन मिंटूच्या हाती सोपवला.
पण बाबा,या फोनचं मी काय करु? मिंटूने विचारलं.
सांगतो,अरे जेव्हा जेम्स बाँड नव्या मोहिमेवर निघतो ना तेव्हा त्याचं ऑफिस नवे नवे अस्त्रे त्यास देत असते. मैदान मारण्यासाठी. तसंच हे अस्त्र समज .
म्हणजे हो काय बाबा? मिंटूने उत्सुकतेने विचारलं.
बाबांनी मग त्याला स्मार्टफोनच्या मदतीने व्हीडिओ कसा चित्रित करता येतो. हे समजावून सांगितलं.
000
मिंटू झोपी गेला. दुसरा दिवस कधी उजाडतो नि आपल्या टोळी दोस्तांना भेटून स्मार्टफोन कथा कधी सांगतो असं त्याला
झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेला जाण्यासाठी टोळी गजानन महाराज मंदिराजवळ गोळा झाली. मिंटूने मोठ्या उत्साहानं स्मार्टफोन कथा त्यांना सांगितली. टोळीचा उत्साह व्दिगुणित झाला.
पण आपण शाळेत असताना रावतेकाकुंनी कचरा फेकला तर, छिंटूने शंका उपस्थित केली.
असं करु या का, आज आपण शाळेला दांडीच मारु. चांगल्या कामासाठी एक दिवस बुट्टी मारली तरी काही बिघडत नाही. आपले आईबाबाही रागावणार नाही. चिंटू म्हणाला. त्याचं म्हणणं मुलांना पटलं. कुणाच्याही लक्षात येणार नाही अशारीतिनं मुलं मंदिराच्या अवतीभवती घुटमळत राहिले. मुलं डोळ्यात तेल घालून रावतेकाकूंच्या फ्लॅटच्या खिडकीकडे लक्ष ठेवून होते. साधारणत: अडीचच्या सुमारास रावतेकाकूंच्या खिडकीजवळ काहीतरी हालचाल दिसली. मिंटू जय्यत तयारीतच होता. त्याने स्मार्टफोनमधला व्हिडिओ सुरु केला आणि खिडकीकडे रोखून ठेवला. काही वेळातच काकू बाहेर आल्या. त्यांनी इकडेतिकडे बघून कचरा खाली टाकला. दोन ते तीन मिनिटात सारं काही उरकलं. व्हिडिओत हे बंदिस्त झालं. आता रे काय करायचं. चिंटूने विचारलं
रात्री मिंटूने तो व्हिडिओ बाबांना दाखवला. बाबा आता काय करायचं?
तुम्ही काही करु नका, आम्हीच करतो. चांगलाच धडा शिकवू आपण रावतेकाकुंना आता.
.
000
बाबांनी सोसायटीच्या सेक्रेटरींना सांगून तातडीची बैठक बोलावली. काहीतरी गंभीर बाबीशिवाय अशी बैठक बोलवली जात नसे. त्यामुळे बैठकीसाठी कॉलनीतली सर्व मंडळी गोळा झाली. बैठकीच्या आधी मिंटूच्या बाबांनी स्मार्टफोनचा व्हिडिओ सोसायटीच्या टीव्हीला जोडून ठेवला होता. सेक्रेटरी साहेबांनी प्रस्तावना केली. त्यानंतर मिंटूच्या बाबांना व्हिडिओ सुरु करायला सांगितला. व्हिडिओ सुरु झाल्यावर त्यात रावतेकाकूंची कामगिरी बघून सगळेजण थक्क झाले. रावतेकाकुंना मेल्याहून मेलं झालं.
व्हिडिओ बंद झाल्यावर सेक्रेटरी म्हणाले
काकू, तुमच्या सारख्या सुज्ञास असं शोभतं काहो. आपल्या घरातला कचरा तुम्ही खाली टाकून खालचा परिसर अस्वच्छ करता. घाण करता. ओला कचरा आणि सुका कचरा टाकण्यासाठी वेगवेगळया कुंड्या आहेत. तिथे आपण टाकू शकतो ना हा कचरा. केवळ घर स्वच्छ ठेवलं म्हणजे आपण फार टापटीप असं वाटून घेऊ नका. परिसर स्वच्छ नसेल तर आपलं घरही पुन्हा अस्वच्छ होणारच. हो की नाही काकू.
हो हो,मी सर्वांची क्षमा मागते. काकू खाली नजर वळवून म्हणाल्या.
केवळ क्षमा मागून कसं चालेल बरं. छिंटूची आई म्हणाली.
मग काय करु मी?
सगळी कॉलनी एकदा काकूंना स्वच्छ करायला सांगा. पिंटुच्या आईने आसुरी आनंदात सूचना केली.
एकदम झक्कास आयडिया आहे. पण या शिक्षेत मी सहभागी होणार, पिंटू उठून म्हणाला. छिंटू,मिंटू,चिंटू या तिघांनीही हात वर केले.
गधड्यांनो,हे काय नाटक चाललय तुमचं. चिंटूची आई त्याच्यावर व इतर मुलांवर खेकसली.
पिंटू समोर येऊन म्हणाला.
आपण रावतेकाकुंना शिक्षा म्हणून कॉलनी स्वच्छ करायला सांगतोय हे छानच आहे, पण कॉलनी त्यांची एकट्याचीच नाहीना. सर्वत्र घाण साचली आहे. नाली तुंबली आहे. मग आपण सगळ्यांनीच काकूंसोबत कॉलनी स्वच्छ करायला घेतली तर सगळं चकाचक होईल. घाण निघून जाईल. मच्छरांची भीती जाईल. डेंग्यूची भीती जाईल.आपण या स्वच्छता मोहिमेचे कॅप्टनपद रावतेकांकूना देऊ.
केवळ रावतेकाकूंनाच दोष देऊन उपयोग नव्हता. कॉलनीत अस्वच्छता वाढीसाठी प्रत्येकाचाच थोडाथोडा हात भार लागला होता. काकूच्या निमित्त कॉलनीची स्वच्छता होऊन जाणार होती.
ज्या मुलांना आपण शिव्या देत होतो, रागावत होतो, तिच मुलं आपल्या मदतीला आल्याचं बघून रावतेकाकूंचं ह्रदय भरुन आलं. त्यांच्या डोळयातून घळघळ अश्रू वाहू लागले.
सुरेश वांदिेले
