(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

दिवाळीच्या सुट्यांमध्ये करायचं काय, असा प्रश्न 

तेजोमयीला पडला. फिरणार किती, पत्ते कुटणार किती, 

टीव्ही पाहणार किती, चित्रपटांना जायचं किती असे अनेक प्रश्न तिच्या मनात रुंजी घालायला लागले. त्याच त्याच गोष्टी किती वर्ष करायच्या ? व्यक्तिमत्व विकास कँपचा तर तिला कंटाळा आला होता. अशा कँपचे नाव जरी मम्मीपप्पांनी घेतलं तरी तिचा चेहरा आंबट व्हायचा. अशा कॅम्पमध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या नावाखाली टाइमपासच 

अधिक होतो, हे तिला दोन तीन कॅम्पला हजर 

राहिल्यानंतर लक्षात आलं होतं. त्यामुळे सहामाही परीक्षा संपण्याच्या आधीच मम्मी पप्पांना, या वर्षी अजिबात 

कॅम्प नाही असं सांगून टाकलं. त्यामुळे तुला पाहिजे ते कर,नंतर आमच्या नावानं ओरडायचं नाही,असं पप्पांनी बजावलं. त्यामुळे परीक्षा संपल्यावर कॅम्पला जाण्याचा तिचा मार्ग बंद झाला. आता करायचं काय,असा प्रश्न तिला पडला. 

पण या प्रश्नाचं उत्तर काही तिला मिळेना. अशी वेळ जेव्हा यायची तेव्हा ती बाप्पांसमोर उभी राहायची. आताही तिने तेचं केलं. बाप्पांना आपली समस्या सांगितली.

   बाप्पा तेजोमयीला म्हणाले, तू माझ्यासोबत येशील का, मस्त धम्माल करता येईल तुला. सुटी सत्करणी लागेल

     कुठं जायचं बाप्पा आपण… तेजोमयीने बाप्पांना 

विचारलं..

     तुला मी जंगलात घेऊन जाईन…

   बापरे बाप…

   अगं ,जंगलाचं नाव घेताच कां बरं घाबरलीस तू..

    बाप्पा जंगलात वाघोबा, सिंहोंबा, अस्वल, कोल्हा,

लांडगा असे एकाहून एक भीतीदायक प्राणी राहतात ना..

   अगं, या प्राण्यासोंबत हरीण, मोर, हत्ती, वेगवेगळे पक्षी सुध्दा राहतात.त्यांना मुक्तपणे बघितलं की किती आनंद 

होतो मनाला.शिवाय मी सोबत असल्यावर तुला भीती 

ती काय?बाप्पा म्हणाले.

    नाही हो करता बाप्पांसोबत जंगलात जायला तेजोमयी तयार झाली.

0000

 

   बाप्पांनी मुषकस्वामीला त्याच्या एका मित्राला घेऊन 

यायला सांगितलं. मुषकस्वामीने त्याच्या मित्राला 

बाप्पांसमोर उभं केलं. बाप्पांनी मुषकस्वामी आणि त्या 

दुसऱ्या उंदरावर मंत्र टाकला. दोघांनाही पंख फुटले. बाप्पा मुषकस्वामीवर आरुढ झाले. त्यांनी तेजोमयीला दुसऱ्या 

उंदरावर बसायला सांगितलं. दोन्ही उंदरांनी आकाझात

 झेप घेतली.

   आकाशात उडताना मस्त मजा येत होती. तेजोमयी या नव्या अनुभवानं हरखली. मस्त उडत उडत बाप्पा आणि 

तेजोयमी एका घनदाट जंगलाच्या वर आले. हळूहळू खाली उतरले . खाली उतरल्यावर बाप्पांनी मुषक स्वामी आणि दुसऱ्या उंदराला वनात फिरायला पाठवलं. बाप्पा आणि तेजोमयी दोघांनी एका आंब्याच्या झाडाखाली थोडयावेळ 

विश्रांती घेतली.

   बाप्पांनी आंब्याच्या झाडाला गदागदा हलवलं. पिकलेले आंबे खाली पडले. ते आंबे माचवून त्याचा रस दोघांनी 

पिला.

   तुमच्या मँगो फ्रुटी-बुटीपेक्षा झक्कास चव आहे की नाही या ताज्या आंब्याची. झाडावरचं पिकलेलं फळ खाण्याचा आनंद कशातच मिळत नाही तेजोमयी. बाप्पा म्हणाले. तेजोमयीनं होकारर्थी

 मान डोलावली. विश्रांती घेतल्यानंतर बाप्पा म्हणाले,चल आता आपण जंगल भ्रमंती करु या..

   दोघेही जंगलातील वाटेने निघाले..

000

   जंगलाचं सौंदर्य बघता बघता बाप्पा आणि तेजोमयीच्या गप्पा सुरु होत्या..

   काय हो बाप्पा, मी नुकतच वाचलं की जंगली श्वापदं 

स्वत: कुणावरही आक्रमण करत नाहीत..

   खरय ते..

    मग त्यांची भीती बाळगायची नाही का आपण..

   खरं सांगू का बाळ, भीती बाळगायची गरज नसते..तुम्ही जंगलात गेले असताना समजा वाघ तुमच्या समोर आला नि त्याला खात्री पटली की समोरचा माणूस आपल्यावर 

हल्ला करणार नाही तर तो काहीही न करता  निघून जातो.. पण जर त्याला वाटलं समोरचा माणूस बंदूक काढून 

आपल्यावर गोळी झाडेल तर मग मात्र तो हल्ला करायला मागे पुढे पाहत नाही.

   याचा अर्थ खरा दोष आमच्याकडे येतो ..

   करेक्ट..

   पण, वाघावर विश्वास कसा ठेवायचा?

   अगं, तुम्ही मानव त्याच्या राज्यात म्हणजेच जंगलात बिनधास्त जाता..आपल्या राज्यात येणारे मानवी पाहूणे आपला घात करणार नाही असा विश्वास वाघाला असतो म्हणूनच तो तुम्हला जंगलात प्रवेश करु देतो की नाही? 

अन्यथा  त्याने जंगलाच्या प्रवेशद्वारातून तुम्हरला

हाकलून लावलं असतं ना..

   करेक्ट..

   अगं सलीम अली, मारुती चितमपल्ली या तुमच्यातल्या ग्रेट माणसांनी वर्षानुवर्षे जंगलात राहून वाघोबाच्या 

वागण्याचा अभ्यास केला तेव्हा त्यांना सुध्दा हेच आढळून आलय. माझा अनुभव म्हणशील तर पार्वतीमाता 

वाघावरच बसते की.आतासुध्दा आपल्या सोबत एक 

वाघोबा दाट झाडीतून चाललाय..त्याचं आपल्यावर पूर्ण 

लक्ष आहे. त्याला आपण दोघेही काही करणार नाही याची खात्री पटलीय..नाहीतर तो कधीचाच आपल्यापुढे दत्त 

म्हणून उभा राहिला असता.

   बापरे बाप..

   बोलावू का त्याला.

   नको हो बाप्पा. मला भीती वाटतेय.

   घाबरु नकोस. आपण त्या वाघोबाशी मैत्री करु की..असं बोलून बाप्पांनी कसला तरी आवाज केला. तेजोमयीनं डोळे मिटून घेतले.ती बाप्पांचं नामस्मरण करु लागली. 

रामरक्षा म्हणण्याचा प्रयत्न केला तर ती तिला ओळीच 

आठवेना. तेव्हा पुन्हा ती बाप्पांचं नामस्मरण करायला 

लागली.

   अगं, डोळे उघड. बाप्पा तेजोमयीला म्हणाले. तेजोमयीने एक डोळा किंचितसा उघडून बघितला. वाघोबा बाप्पांच्या पायाशी बसलेला दिसला.

   आई S ग, ती जोराने ओरडली.

   बाप्पांनी तिला जवळ घेतले.

   अगं, तू डोळे उघड. वाघोबा काहीच करणार नाही. तो 

कधीचाच तुझे डोळे उघडण्याची वाट बघतोय..

   बाप्पांच्या या बोलण्यामुळे तेजोमयीला धिर आला. तिने बळेबळे डोळे उघडले. मनातून मात्र ती जाम घाबरली होती.

   नमस्कार तेजोमयी. वाघोबा तिला म्हणाले. त्यांनी 

आपला पंजा समोर केला. बाप्पांनी तिला तिचा हात समोर करायला लावला.

   किती मऊ हात आहे गं तुझा. वाघोबा म्हणाले.,

   जंगलात कोणत्याही पादत्रांणाशिवाय वावरणाऱ्या 

वाघोबांचा पंजाही मऊशार होता,अगदी आईच्या 

हातासारखा. तेजोमयीला असं सांगावसं वाटलं पण तिच्या तोंडून शब्द फुटेना. 

   चित्रातल्या आणि डिस्कव्हरी चॅनेलमधील वाघोबाला

 प्रत्यक्ष बघून तेजोमयी त त प प करायला लागली. तिची अवस्था बघून बाप्पा आणि वाघोबा दोघेही हसू लागले. 

वाघोबांना हसताना बघून तेजोमयी आश्चर्यचकित झाली. वाघोबांच्या मिशीला हात लावत बाप्पा तिला म्हणाले,

   तू घाबरु नकोस.हा वग्गू काही करणार नाही तुला.

   वग्गू..बाप्पा तुम्ही याला वग्गू म्हणता.तेजोमयीनं 

घाबरुन विचारलं.

   अगं, जसं तुला मी तेजू म्हणतो तसं याला वग्गू. तो 

माझा दोस्त आहे. बाप्पा असं म्हणतातच वाघोबांनी 

होकारार्थी मान हलवली. या गप्पांमध्ये दहा मिनिटे गेली. या वेळेत वाघोबा एकदाही गुर्रावले नाही.आपल्याकडे बघून त्यांनी डोळे वटारले नाही हे तेजोमयीच्या लक्षात आलं. त्यामुळे तिची भीती कमी झाली. तिने हलकेच वाघोबांच्या मिशिला हात लावला. वाघोबा पुन्हा हसले. प्रेमाने 

तेजोमयीच्या गालाला आपला गाल घासला. वाघोबांच्या या प्रेमामुळे तेजोमयीला भरुन आले. तिची भीती कुठल्या कुठे पळून गेली.ती वाघोबांच्या नजरेला नजर भिडवीत 

म्हणाली,

   वग्गू काका, तुम्ही एवढे प्रेमळ आहात तर गेल्या काही दिवसात तुमचे नातेवाईक बिबट्याराव आणि दुसरे वाघोबा का बरं आमच्या वस्तीत येता आणि आमच्यावर हल्ला करता?

   तेजोमयीचा प्रश्न एैकून वाघोबा गंभीर झाले. त्यांच्या 

डोळयातून अश्रू ओघळले. त्यांचे पाणावलेले डोळे बघून 

तेजोयमीला वाईट वाटले. बाप्पांनी आपल्या उपरण्याने 

वाघोबाचे डोळे पुसले. त्याच्या पाठिवर हात फिरवला 

आणि  ते तेजोमयीला म्हणाले,

   अगं,तुम्ही मानवानं त्याच्या या राहत्या घरावर म्हणजे वनावर आक्रमण केलेय ना..तो राहणार कुठं, जाणार कुठं, खाणारं काय? तुम्ही आप्पलपोटे आहात. स्वत:चाच 

विचार करता. तुमच्या घरी एखादा अनाहूत माणूस आला त्याने तुम्हाला तुमच्याच घरातून हुसकावून लावले तर 

तुम्हाला काय वाटेल. सांग बघू..

   त्याला झोडपून काढू..तेजोयमी म्हणाली.

   वाघोबांचं तसंच झालय..तेव्हा तुम्ही मानवानं आता तरी शहाणे होऊन त्याच्या घरावरचं आक्रमण थांबवलं पाहिजे.

     नाहीतर ..

   कळलं बाप्पा मला..तेजोयमी म्हणाली..

000

    तेजोयमी बाप्पांसोबत जंगलात मज्जा करायला गेली 

होती.पण तिथे वाघोबा आणि इतर प्राण्यांचे जे हाल मानवानं केले हे बघून ती दु:खी झाली. वाघोबांनी जेव्हा तिचा निरोप घेतला. तेव्हा तिच्या डोळयातून अश्रू ओघळले. 

वाघोबाही हळवे झाले. वाघोबांनी बाप्पांच्या पायवर डोके 

ठेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. बाप्पांनी त्याला टाटा केला. तेजोमयीने डोळे पुसत बाय केले.वाघोबा दु:खी अंतकरणाने झाडीत निघून गेले.

 

   तेजोमयी आणि बाप्पा बराच वेळ जंगलात फिरत राहिले. बाप्पांनी तिला जंगल आणि पशूपक्ष्यांबद्दल बऱ्याच 

गमती-जमती सांगितल्या, पण तेजोमयीचं त्याकडे विशेष लक्ष

 नव्हतं. तिला माणसानं वाघोबावर आणलेलं संकट आठवत राहिलं. तिच्या मनात काय चाललय हे बाप्पांच्या 

लक्षात यायला वेळ लागला नाही.

   हे बघ बाळ, तुझ्या सारख्या छोट्या मुलांना जरी या 

प्राण्यांचं दु:ख कळलं.ते दु:ख दूर करण्यासाठी तुम्ही 

प्रयत्न केले तरी हळूहळू तुमचे पालकही तुमच्यासोबत 

 येतील.

   बाप्पा अगदी मनातलं बोललात तुम्ही. घरी गेले की पूर्ण सुट्टीत मी वाघोबा वाचवा..असंच ज्याला त्याला सांगणार आहे.

   बाळ, तू एक छानसा वाघोबा मित्र मंडळ स्थापन कर त्यासाठी.

   त्याचे तुम्ही अध्यक्ष व्हाल ना बाप्पा. तेजोमयी म्हणाली.

   बाप्पा पोट धरुन हसले. त्यांनी शिळ घातली.

मुषक स्वामी आणि दुसरा उंदीर हजर झाले.त्यांच्यावर बसून बाप्पा आणि तेजोमयी घराकडे निघाले..

सुरेश वांदिले