(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

वाघोबा रागावले

सगळी टोळी आनंदात होती. कारण अनेक महिन्यांपासून ठरवलेलं स्वप्न साकार होणार होतं. ताडोबाच्या जंगलात जाऊन वाघोबांचं दर्शन घ्यायच, असं, अनेक दिवसांपासून टोळीतल्या प्रत्येकाच्या घरी ठरत होतं. या टोळीमध्ये रवी, शशी, मीना, तेजोमयी आणि रंगनाथ होते.

ताडोबाच्या जंगलामध्ये वाघोबाचं दर्शन करण्याच्या पहाटे दुपारी आणि रात्री अशा तीन वेळा असतात. रात्रीच्या दर्शन-सफारीला फार कमी लोकांना परवानगी दिली जाते. ही परवानगी ऑनलाइन पध्दतीनं दिली जाते. रवीच्या बाबांकडे ऑनलाइन बुकिंगचं काम सोपवण्यात आलं होतं. पहाटे आणि दुपारी दोनच्या सफारीचं बुकिंग झालं. मात्र रात्रीच्या सफारीचं बुकिंग होऊ शकलं नाही.

सकाळी सहा वाजताची पहिली सफारी असल्याने रवीचे आईबाबा इतरांसोबतच आदल्यारात्री ताडोबा जवळच्या अंधारी अभयारण्याच्या बाहेर असणाऱ्या हॉटेलमध्ये मुक्कामास थांबले.

दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाच वाजताच सगळी मंडळी तयार झाली. बरोबर सहा वाजता सफारीच्या गाडीमध्ये गाईडसोबत बसून मंडळी ताडोबाच्या जंगलात शिरली.

अद्याप सूर्य उगवायचा होता. त्यामुळे अंधाराचे साम्राज्य सभोवताल होते. थंडगार वारा सुटला होता. झाडाच्या पानांची सळसळ सुरु होती. गाडी जशी समोर जात होती तसे काही प्राण्यांचे आवाज ऐकायला येऊ लागले. काही पक्षांचं गुंजन सुरु झालं होतं. त्या निरव शांततेत हे पक्षाचं गुंजन लक्ष वेधून घेत होतं. वेगवेगळया प्रकारचे आवाज कानावर पडायला लागताच मुलं कान टवकारुन ते ऐकू लागली. मोठ्या मंडळींना पक्षांच्या या गुंजरवात फारसा रस दिसला नाही. सर्व वडीलधारी मंडळी, वाघ कधी दिसणार या चर्चेतच गुंग होती.

सफारीची गाडी या वाटेतून त्या वाटेकडे जात जंगल भ्रमंती घडवत होती. रस्त्यात माकडांचा थवा आला तेव्हा गाडी थांबली.

माकडांना काय बघायचं, रवीची आई म्हणाली.

इथे वेळ दवडला तर  वाघोबाचं दर्शन घडायचं नाही. तेजोमयीचे बाबा म्हणाले.

    काय रे बरोबर ना, मीनाच्या आईने गाईडला विचारलं.

तो फक्त हसला. काहीच बोलला नाही. याचा अर्थ गाईड आपल्याबाजूने बोलतो असं टोळीच्या आईबाबांना वाटलं.

०००

 मुलांचं लक्ष माकडांकडेच होतं. मोठ्या माकडांसमवेत खूप छोटी माकडं होती. त्यांची दंगामस्ती चालली होती. झाडाच्या फांद्यावर ती कधी सरळ तर कधी उलटी लटकत होती. एकमेकांचा पाठलाग करत होती. एकमेकांवर दात विचकत होती. एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर उड्या मारत होती. झाडाच्या फांद्यांना लटकून झुलत होती. लहानग्यांच्या खेळाकडे मोठी माकडं शांतपणे आणि कौतुकानं बघत होती. हे सारं दृष्य मजेशीर होतं. ते बघण्यात सर्व छोटी कंपनी गुंग झाली होती. माकडांचा हा खेळ काही वेळ बघत राहावा असं सर्व छोट्या कंपनीला वाटत होतं, पण आई बाबांनी गाईडला फार काळ तिथे राहू दिलं नाही. त्यामुळे मुलांचा हिरमोड झाला.

गाडी पुढे निघाली. काही क्षणानंतर हरणांची टोळी रस्त्यावर बागडताना दिसली. सर्व बच्चे कंपनी एका सुरात वाव वाव म्हणाली. हरणांना प्राणी संग्रहालयात सर्वांनी बघितलं होतं. पण प्रत्यक्ष जंगलात बघण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. लहान – मोठी अशी २०-२५ तरी हरणं असावित. गाडीचा आवाज ऐकून ती काही घाबरली नाही. त्यांनी फारसं लक्षही दिलं नाही. सर्व हरणं आपल्याच तालात त्या ठिकाणी विहरत होती. हरणाची कांती आणि त्यावरचे ठिपके मनमोहक होते. एव्हाना उन्ह आलं होतं. त्यामुळे त्यांची कांती चमचम करत होती. यातच एखादा सुवर्णमृग दडलेला असावा असं रवीला वाटलं. त्याने तसं शशीला सांगितलं. शशी आई-बाबास विचारता झाला. पण शशीच्या आईबाबास या हरणाच्या कळपात जराही रस दिसला नाही. इतरांचे आईबाबासुध्दा बघून न बघितल्यासारखे करत होते. मीनाचे बाबा गाईडला म्हणाले सुध्दा,

अरे, हरण बघायला आम्ही थोडच इथे आलो आहोत. वाघ दिसला तरच खरी सफारी.

    गाईड यावर काहीच बोलला नाही. फक्त हलकसं हसला. ती बागडणारी, पळणारी हरणं बघण्यात वडीलधाऱ्यांना फारसा रस न नसल्यानं गाईडने गाडी पुढे काढली. एव्हाना बऱ्यापैकी उन्ह आलं होतं. जंगलातली बोचणारी थंडी तितकीशी जाणवत नव्हती. पक्ष्यांचा किलबिलाट वाढला होता.

०००

गाडी पुढे जात असताना गाईडनं गाडी थांबवली. सर्वांचं लक्ष एका झाडाकडं वेधलं, त्या झाडाच्या फांद्यांवर ५० पेक्षा जास्त पोपट बसले होते. जणू काही पोपटांची शाळाच भरली होती. झाडांच्या फांद्यावर झुलणारी लाल चोच आणि हिरवेकंच रंगाचे पोपट बघून छोटी मंडळून हरखून गेली. पोपटा पोपटा बोलतोस गोड, घे ना जरा पेरुची फोड, ही कविता, मीनाला आठवली. आपण यांना पेरु देऊ या का, तिने गाईडकाकांना विचारलं. पण जंगलात गाडिच्या खाली उतरायचं नसतं, असं काकांनी सांगितलं. त्यामुळे मीना हिरमुसली. गाईडकाका म्हणाले, जंगलातल्या या पक्ष्यांना काही द्यायचं गरज नाही. त्यांना भूक लागली ते बरोबर त्यांना आवडणाऱ्या फळांच्या झाडांकडे जातात आणि मजेत खातात.    जंगलातले पोपट सुध्दा बोलतात का हो. रविने विचारलं.

माणसासारखं तर बोलत नाहीत. त्यांची स्वत:ची भाषा आहे. ती त्यांनाच कळते. ते तसे बोलतात, तसेच ते गातही असावेत , आपणास त्यांची भाषा कळत नसल्याने त्यांचं गाणं कळत नसावं.

आपण पोपट झालो तर.. मीना म्हणाली.

 काही तरी सळसळ झाली, त्यामुळे पोपटांची ती रांग उडाली. पन्नास पोपट एकत्रच पहिल्यांदाच मुलांनी बघितले होते. धनुष्यबाणासारखा आकार करत ते उडणारे पोपट बघून मुलांनी टाळया वाजवल्या. वडिलधाऱ्या मंडळींना यातही फार रस दिसला नाही.

रविच्या बाबांनी पुन्हा एकदा गाईडला विचारलं, अरे, हे काय दाखवत बसलास, वाघ दाखव ना.

    हो साहेब, असं गाईड बोलला आणि त्याने गाडी पुढे काढली. पाच मिनिटानंतर गाडी एके ठिकाणी थांबली. रस्त्याच्या एका बाजूला चारपाच बारशिंगे उभे होते. गाडी थांबल्याबरोबर ते सावध झाले आणि आत झाडीत पळाले. राखाडी रंगाचे ते बारशिंगे बघून मुलांचा आनंद व्दिगुणित झाला. गाईडने आता गाडी हळूहळू पुढे न्यायला सुरुवात केली. कारण त्याच्यामते आणखी काही बारशिंगे त्यांना दिसू शकले असते. त्याचे म्हणणे खरे ठरले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आठ- दहा छोटे मोठे बारशिंगे गवत चरत होते. त्यांचं काही गाडीकडे लक्ष नव्हतं. त्यामुळे मुलांना जवळून बारशिंग्यांना बघता आलं. डौलदार बारशिंगे बघून सर्वांना आनंद झाला. बारशिंग्यावर हल्ला करण्याआधी वाघही विचार करतो अशी माहिती गाईडकाकाने मुलांना दिली.  

गाडी अशीच हळूहळू समोर जात असताना एके ठिकाणी दोन रानगवे दिसले. धिप्पाड असे रानगवे, मुलं आणि मोठी माणसं पहिल्यांदाच बघत होती. गाडीचा आवाज ऐकून त्या रानगव्यांनी गाडीकडे बघितलं. या गाडीचं आणि माणसांचं त्यांना फार अप्रुप असावं असं वाटलं नाही. एक नजर टाकताच ते पुन्हा आपल्याच तोऱ्यात गवत चरु लागले. गव्याच्या मानेवर तीक्ष्ण व टोकदार शिंग होती. वाघ या गव्यांच्या वाटेला जात नाही. असं गाईडने सांगितलं. वाघ जर जंगलाचा राजा असेल तर हे गवे सुध्दा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात राजासारखेच वावरतात. स्वत:हून कुणाच्या वाटेला जात नाही. मात्र कुणी यांच्या वाटेला गेलं तर मग त्याची खैर नसते. अशी माहिती गाईड देत असतानाच तेजोमयीची आई त्याला म्हणाली, अरे बाबा हे जरी खरं असलं तरी आम्हास वाघोबा कधी दिसणार ते सांगना.  मुलांना सर्व प्राणी- पक्ष्यांमध्ये आनंद मिळत होता तर मोठ्यांचं मात्र वाघोबा कधी दिसणार, कधी दिसणार असं चाललं होतं.

    गाईड तेजोमयीच्या आईला म्हणाला, अहो ताई, वाघोबा जसा या जंगलाचा राजा आहे तसा स्वत:च्या मनाचाही राजा आहे. त्याला वाटेल तेव्हाच तो आपल्याला दर्शन देईल ना.

म्हणजे काय, वाघ दिसणारच नाही का, सीमाचे बाबा म्हणाले.

असं मी म्हणालो नाही साहेब. वाघ जिथं जिथं येऊ शकतो, त्या ठिकाणी मी तुम्हाला नेतच आहे. कधीनाकधी तो या ठिकाणी आलेला आहे. आज तो आतापर्यंत कां आला नाही, हे मी कसं सांगणार.

म्हणजे वाघ दिसणारच नाही का, मीनाचे बाबा निराश होत म्हणाले.

असे निराश होऊ नका,आता नाही दिसला तर दुपारी दिसेल.

दिसेल,दुपारी दिसेल, रवी आणि सीमा हसत हसत म्हणाले.    

गाडी पुढे निघाली. गाडी हळू हळू जात होती. एके ठिकाणी दोन मोर आणि तीन चार लांडोर उभे होते. मुलांनी मोरपीस बघितलं होतं, पण मोरास पहिल्यांदाच बघत होते. मोरांना बघून सर्व मुलं हरखून गेली. एकटक त्यांच्याकडे बघत राहिली. अचानक एका मोराने पिसारा फुलवला. तो पिसारा,पंखा हलवतो तसा हलवू लागला. ते दृष्य अतिशय मनोहारी होते. पिसारा हलवता हलवता तो मोर मागे पुढे करत होता. त्यामुळे तो जणू काही नाचत आहे असं वाटतं होतं. नाचरे मोरा, आंब्याच्या वनात नाच, अशी कवितेची ओळ रविला आठवली. हे आंब्यांचं वन आहे का हो, असं त्याने गाईडला विचारलं. या ठिकाणी आंबा, साग, वेळू अशी वेगवेगळी झाडं आहेत. मोर फक्त आंब्याच्याच वनात नाचतो असं नाही. तो इथे रस्त्यावर येऊनही नाचू शकतो. जंगलात वाघ दिसणं हे आपल्या हाती नसतं तसं मोराचं नाचणं हे सुध्दा आपल्या हाती नसतं. आजचा दिवस चांगला म्हणून हा पिसारा फुलवलेला मोर दिसला. गाईड म्हणाला. त्या मोर आणि लांडोरीचं टोळीकडे बघुदा लक्ष गेलं असावं. त्यामुळे ते सावध होऊ झुडुपात गुडूप झाले.

मोर आणि त्याच्या पिसाऱ्याचा मनुराद आनंद मुलांनी घेतला. आईबाबांनी मोर बघताना वाघाची आठवण काढली नाही. पण मोराच्या पिसाऱ्या ऐवजी ते, वाघ कधी दिसतो याचीच चिंता वाहत असल्याचं दिसत होतं.

वाघाला काय एवढ आईसक्रीम लागलं असतं रे, आपल्या आईबाबांचं काहीच कळत नाही बुवा. दिसला तर दिसला नाही तर गेला उडत. रवी सीमाच्या कानाजवळ जाऊन पुटपुटला. तिला हसू आलं. गाईडलाही ते ऐकू गेलं असावं, तोही हसला.

जास्त शहाणपणा करु नकोस हं, रवीची आई त्याच्याकडे डोळे मोठे करुन म्हणाली.

गाडी पुढे जात असतानाच वाटेत दोन कोल्हे रस्ता पार करताना दिसले. पंचतंत्रातला धुर्त कोल्हा इंग्रजी कुत्र्यासारखा दिसत होता. त्याची नजर भेदक होती. त्याची ठेवण बुटकीशी होती. काही क्षण गाडीसमोर थांबून ते दोन्ही कोल्हे झुडुपात गुडूप झाले.

गाईडने गाडी पुढे तीन चार पानवठ्यावर नेली. या ठिकाणी पाणी पिण्यासाठी वाघ येतो. ही वाघाचं दर्शन घडणारी हक्काची जागा. पण अशा तीनचार ठिकाणी दहा-वीस मिनिटे थांबूनही वाघोबा काही आले नाही.

गाडी पुढे निघाली. दुसऱ्या बाजूने इतर पर्यटकांना घेऊन गाडी परतीला निघाली होती. यांच्या गाडीजवळ ही थांबली. गाडीतली सर्व मंडळी आंनदी दिसत होती. कारण त्यांना एका पाणवठ्यावर वाघ दिसला होता. सर्व प्रवाशी खुष होते.

तरी, आम्ही म्हणत होतो की वेळ दवडू नका. मोर काय ,हरीण काय नंतर कधीही बघता येतील पण वाघोबा दिसणार नाही. रवीचे बाबा वैतागून म्हणाले. इतर आईबाबांनाही त्यास सहमती दर्शवली. ज्या ठिकाणी आज वाघाने दर्शन घडवले होते, त्या दिशेने गाडी निघाली. वाघोबा आता येतील, मग येतील असे करत बराच वेळ गेला, पण वाघोबांना काही यांची दया आली नाही. आईबाबा मंडळी वाघोबाकडे डोळे लावून बसले असताना मुले मात्र त्या पानवठ्यातील मगरी, त्यांच्या खरबरीत पाठीवर शांतपणे बसलेले बगळे, पाण्यातील झाडांवर गोळा झालेले आणि डोळे लावून बसलेले बगळे आणि इतर काही पक्षी यांचे निरीक्षण करत होते. त्यांचा आंनद घेत होते. अर्ध्या तासानंतर आई- बाबा मंडळींना कंटाळा आला. सकाळच्या सफरीची वेळ संपत आली होती. त्यामुळे गाईडने गाडी परतीच्या प्रवासाला घेतली.

पोपट, मोर, वानर, गवा, हरीण, बारशिंगे

मगर, बगळे असे पशुपक्षी दिसल्याने मुलं आनंदात होती, तर वाघ दिसला नाही म्हणून आई-बाबा मंडळी दु:खी कष्टी झाली होती. हे हिरमुसलेपण घेऊन सर्वजण हॉटेलमध्ये परतले. जेवण आणि थोडी विश्रांती घेऊन मंडळी दुपारच्या सफरीला निघाली.

०००

सकाळच्यापेक्षा दुपारचं जंगल वेगळं भासत होतं. सूर्य मावळतीला लागला होता. त्यामुळे उन्हाची किरणं आता कमी प्रमाणात येत होती. थंडगार वारा अंगाला बोचू लागला होता. सकाळी दिसणारी झाडं आता थोडिशी गुढ वाटायला लागली होती. झाडाचं सळसळणंही थांबलं होतं. वेगळीच निरव शांतता सर्वत्र भरुन राहिली होती. सकाळच्यापेक्षा दुसऱ्या मार्गाने गाइड गाडी नेत होता. त्यामुळे वेगळया प्रकारची झाडं-झुडपं -वेली बघायला मिळत होत्या. काही वेली तर अंगावर कोसळतात की काय इतक्या खाली आल्या होत्या. त्या वेलींमुळे अंगावर ओरखडे उमटू नये म्हणून वेली आल्या की खालीच वाकावं लागत असे. अशी वेगवेगळया प्रकारची झाडं बघण्याची मुलांची पहिलीच वेळ होती. त्यामुळे अस्ताव्यस्त पसरलेली झाडं बघून मुलांना आनंद होत होता. वाटेत येणाऱ्या पानथळयावर गाडी थांबायची. वाघोबा येण्याची वाट बघितली जायची. पण तीन – चार पानवठे होऊनही वाघोबा काही दिसले नाही. सहा वाजेच्या आत जंगलातून बाहेर पडायचं असल्यानं गाडी परतीला फिरली. अखेर वाघ दिसलाच नाही. आईबाबा मंडळी जाम निराश झाली. मुलं मात्र खुष होती. वाघ नाही तर नाही, इतर प्राणी-पक्षी-चित्र विचित्र झाडं झुडूप बघून त्यांचा आंनद गगनात मावेनास झाला होता.

अंधार दाटून आला होता. गाडी वेगाने निघाली. हॉटेलमध्ये मंडळी जेव्हा परतली, तेव्हा आईबाबांचे चेहरे पडले होते. वाघोबांनी त्यांना निराश केले होतं. रात्रीचं जेवण झालं. थोडावेळ गप्पा मारुन सर्व जण झोपी गेले.

००००

टक टक टक

रवी आणि त्याचे आईबाबा ज्या खोलित झोपले होते, त्या खोलिच्या दारावर कुणीतरी टक टक करत होते.

क क कोण, रवीचे बाबा घाबरुन उठले.

मी वाघोबा..

क क काय..बाबा आणखीणच घाबरले.

मघाशी मी तुम्हाला भेटलो नाही ना, मग आता स्वत: आलोय दर्शन द्यायला..

न न न नको.. बाबांची घाबरगुंडी उडाली होती.

अरे कां नको, मघा तर सारखा सारखा वाघोबा वाघोबा करत होता..

त त त प म्हणजे भीती वाटते.. बाबा कसे बसे बोलले.

माझी कशाची भीती वाटते.

न न न नाही म्हणजे हो म्हणजे…

आता दार उघड ना, बघून घे मला, जवळून. मी दिसतो कसा,माझ्या मिशा कशा, माझे ठिपके कसे, वाघनखं कशी , जबडा कसा…सारं काही जवळून दाखवतो की तुला…

न न नको..

अरे घाबरुटल्या…जरा जंगलाचा आनंद घ्यायला शिका ना…वाघ म्हणजेच काही जंगल नाही. जरा पोरांकडून शिका. कशी मजेत जंगल बघत होती. बघता बघता दंगली होती. दंगून रंगली होती. आनंदून गेली होती. जरा मुलांसारखा आनंद घ्या. वाघ दिसला नाही म्हणून मुलं काही रडत बसली नाही तुमच्या सारखी..

हो हो बरोबर आहे…

चल मग दार उघड.

न न नको..

उघड म्हणतो ना..नाहीतर दरवाजा फोडून आत शिरेन आणि …

 

न न नाही नाही, वाचवा वाचवा…

असं बाबा खूप जोरात ओरडले आणि गादीच्या खाली पडले. त्यांच्या आरडाओरडीमुळे आई आणि रवी उठला. त्यांनी दिवा लावला. बाजूच्या खोलितील आई बाबा आणि मुलं धावत आली. रवीच्या बाबांना दरदरुन घाम फुटला होता. रविने त्यांना पाणी दिलं. काय झालं ते आता सर्वांच्या लक्षात आलं होतं. बाबांना काही तरी भयानक स्वप्न पडलं होतं.

बाबांनी मग स्वप्नात आलेल्या वाघोबाची गोष्ट सांगितली. ती ऐकून सर्व मुलं हसली. आईबाबांना त्यांची चूक उमगली. वाघोबाच्या नादात जंगल सफारीचा खरा आंनद घालवून बसल्याचं त्या सर्वांच्या लक्षात आलं.

सुरेश वांदिले