आईच्या वाढदिवसाला तिला नवा स्मार्ट फोन घेऊन द्या असा लकडा तेजोमयीने बाबांकडे लावला. बाबांनी ते मान्य केलं. ऑनलाइन बुकींग करुनच फोन बोलावयचं ठरलं. मात्र आईने यास साफ नकार दिला.
मी करतेय ते बरोबर ना रे ठोंब्या, असं आईने अलेक्झांडरकडे बघत विचारलं. त्यानेही आज्ञाधारकपणे मान हलवली. आईने प्रेमानं आणि लाडानं त्याला थोपटलं.
अरे, पण ती वाढदिवसाची भेट नको म्हणतेय. तिचा फोन खराब झाल्याने तिला आता नवा फोन देण्याचं आम्ही ठरवलंय. त्याला तू नाही म्हणतोस ? असं तेजोमयीने, प्रश्नार्थक भाव चेहऱ्यावर आणून अलेक्झांडरला विचारलं. आईच्या विरोधात हे सांगणं असल्याचं अलेक्झांडरला तेजोमयीच्या हावभावावरुन कळलं. त्यामुळे त्याने प्रतिक्रिया देण्याऐवजी आईकडे बघितलं.
त्याला बिचाऱ्यास कशाला मध्ये घालता. तो तर माझ्या बाजुचा. त्याला माझं म्हणनं पटलय. आई अलेक्झांडरकडे बघत म्हणाली. पठ्ठ्याने पुन्हा मान हलवली.
जाऊ दे गं, तो आईचा लाडका लेक, त्याला आपलं म्हणणं काही कळायचं नाही. बाबा अलेक्झांडरचा कान हलकेच पिरगाळत म्हणाले.
पण, आई तू स्मार्ट फोन कां नको म्हणतेस गं? तुझा फोन किती खराब झालाय. बटनांवरील अक्षर दिसत नाही. स्क्रीनवर अस्पष्ट दिसतं. तुझ्या फोनची स्मरणशक्ती कमी आहे. हा फोनसुध्दा बाबांनीच वापरलेला होता. त्यांनी नवा घेतल्यावर तुला दिला. तेजोमयीनं आईच्या लक्षात आणून दिलं..
आता तो टाकूनच द्यायची वेळ आलीय बघ. बाबा म्हणाले.
ते खरं आहे हो, पण सध्या काम चालतय ना..मग उगाच खर्च कां करायचा? तुम्हाला वाढदिवासाची भेटच द्यायची असेल तर आपण एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करु या ना.. आई बाबांकडे बघत म्हणाली.
अगं, नवीन स्मार्ट मोबाईल म्हणजे तुझ्यासाठी चांगलंच काम की ! त्यात नव्या गोष्टी असतील. तुझा मैत्रिणींशी वेगवान संपर्क होईल. व्हीडीओ कॉल करता येतील. यू ट्यूबवर गाणी ऐकता येतील. योगासनं शिकता येतील. फेसबूकवरची माहिती वाचता येईल. व्हॉट्स ॲपवरुन माहितीचं देवाणघेवाण करता येईल. नवा स्मार्ट फोन तुला ज्ञानाने संपन्न आणि मनोरंजनाने समृध्द करेल. असं बाबा एका दमात बोलून गेलं.
ठोंब्या, तुला तरी यातलं काही कळलं का? आईनं अलेक्झांडरकडे बघत त्याला विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. ते बघून बाबा हसले.
तुला जर स्मार्ट फोन नको असेल तर मग काय हवं बरं.. तेजोमयीनं विचारलं.
माझ्या मनात बरेच दिवसांपासून एक विचार येतोय? आई म्हणाली.
कोणता गं?
तेजोमयीस, शाळेत सुरक्षित नेणाऱ्या आणि घरी आणून सोडणाऱ्या मार्शल दिदीस काही रक्कम दिली तर..
अरे वा, बेस्ट कल्पना...बाबा उत्स्फुर्तपणे बोलून गेले.
गेलं वर्षभर तेजोयमीच्या शाळेची बस बंद आहे. त्या गाडीवर असणारी मार्शल दिदी रिकामी आहे, बिचारी. तिला थोडी मदत होईल आपल्या रक्कमेमुळे. आई म्हणाली.
बाबांना ही कल्पना आवडलीच होती. त्यांनीही स्मार्टफोनसाठी लागणाऱ्या पैशांइतकेच आणखी पैसे त्यात घातले. तेजोमयीनं तिच्या पिगी बँकेतील पैसे टाकले. ती रक्कम मार्शल दिदीला, आईच्या वाढदिवसाच्या दिवशी बोलावून दिली. या आपुलकीने भारावून गेलेल्या दिदिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हीच माझी खरी वाढदिवसाची भेट, असं बोलून आईने मार्शल दिदीची पाठ थोपटली.
०००