
वाणिज्य शाखा: चांगल्या संस्था,उत्तम करिअर!
आपल्या देशातील, वाणिज्यशाखेचे शिक्षण देणाऱ्या काही प्रमुख संस्थांमध्ये प्रवेश मिळाल्यास पदवीस्तरापासूनच करिअरच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात.१२वीनंतर वाणिज्य शाखेचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयांचा प्राथमिकतेने विचार करायला हवा. अशी काही महाविद्यालये आणि शिक्षण संस्था पुढील प्रमाणे आहेत.
(१) श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स
गेल्या अनेक वर्षापासून, वाणिज्य शाखेतील सर्वोत्कृष्ट शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स या संस्थेने ख्याती प्राप्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर सूक्ष्म संनियंत्रण, करिअर करण्यासाठी आणि व्यक्तीमत्व विकासास उपयुक्त ठरतील, अशा विविध विषयांचा समावेश, संशोधनास चालना आणि उत्कृष्ट प्लेसमेंट सेल, या वैशिष्ट्यांमुळे देशातील विद्यार्थ्यांचा, या संस्थेतील वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न असतो. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ट्युटोरिअल्स, सहभागी शिक्षण, औद्योगिक प्रकल्पांना भेटी, क्षेत्रीय भेटी,वेगवेगळी चचासत्रे आणि नियमितपणे सादरीकरणाची संधी, इन्फॉर्मेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलाजीचा, अध्यापनात अधिकाधिक वापर ही आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. संस्थेने २०१८ मध्ये विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, अशा अभ्यासक्रमांचा प्रारंभ केला. यामध्ये बॅाम्बे स्टॉक एक्सचेंजच्या सहकार्याने, बिझिनेस ॲनॅलिटिक्स वुइथ आर (डाटा मायनिंग आणि सांख्यिकी विश्लेषणासाठी उपयोगात आणली जाणारी संगणकीय भाषा), चार्टर्ड इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अकाउंटट्न्टस, या संस्थेच्या सहकार्याने, डाटा ॲनॅलिटिक्स वुइथ आर, याच संस्थेच्या सहकार्याने, अकाउंटन्सी स्टार, या लघु मुदतीच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या संस्थेची गुणवत्ता लक्षात घेऊन, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (मनुष्यबळ विकास मंत्रालय) वाणिज्य आणि अर्थशास्त्र या विषयांसाठी नॅशनल रिसोर्स सेंटर, म्हणून मान्यता प्रदान करुन तशी सुविधा दिली आहे. यामुळे अर्थशास्त्र आणि वाणिज्य विषयाचे अध्यापन करणाऱ्या प्राध्यकांना नवे ज्ञान ग्रहण करणे आणि संशोधन करण्यास साहाय्य होते.
संस्थेत प्लेसमेंटसाठी मॅकन्सी, बीसीजी, ब्लूमबर्ग, केपीएमजी, गुगल, मायक्रोसॉफ्ट, नोमुरा,बार्कलेज,एचएसबीसी अशा कंपन्या येतात. या महाविद्यालयात गेल्या वर्षी प्लेसमेंट प्रकियेत १२० कंपन्यांनी सहभाग घेतला. ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना वेगवेगळया कंपन्यांमध्ये, त्यांच्या गुणवत्तेनुसार संधी मिळाली.
संस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, पदवीस्तरीय विद्यार्थ्यांनासुध्दा इंटर्नशीपची सुविधा मिळवून दिली जाते. आपल्याकडील अत्यल्प महाविद्यालयांमध्ये याकडे लक्ष पुरवले जाते. अनेक महाविद्यालये याचा विचारही करत नाही व तशी सुविधाही संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्नही करत नाहीत. संस्थेचा प्लेसमेंट सेल हा करिअर सेवा घटक किंवा करिअर सर्विस युनिट सारखा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो.
संपर्क- श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, नॉर्थ कॅम्पस, मॉरिस नगर,दिल्ली-११०००७, दूरध्वनी- ०११-२७६६७९०५, ईमेल-admissions@srcc.du.ac.in, संकेतसथळ-srcc.edu
०००
(२) नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स
(१) बी.कॉम – वित्तीय आणि आणि आर्थिक जगातील समस्यांचा सक्षमपणे सामना करता येणे शक्य व्हावे, यासाठी या अभ्यासक्रमात व्यावसायिक कौशल्ये शिकवली जातात. लेखा, वित्त आणि कर निर्धारण, या तीन विषयघटकांवर,अभ्यासक्रमात विशेष लक्ष केंद्रित करण्यात येते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना सीए, आयसीडब्ल्यूए, सीएफए,सीएमए, एमबीए आणि वित्त व लेखा विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करणे सुलभ जावे, यादृष्टिने अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना वित्त, गुंतवणूक, लेखा, परीक्षण, माहिती प्रक्रिया या विषयांमध्ये कौशल्य प्राप्त होऊ शकते.
अभ्यासक्रमात, इंटर सीए विषयांचा समावेश करण्यात आला आहे. सीए, सीएमए, सीएफए, या करिअरकडे जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासक्रमातील विषयघटक उपयुक्त ठरतात.
(२) बॅचलर ऑफ कॉमर्स इन फायनांशिअल मार्केट्स- या अभ्यासक्रमात वित्तीय बाजाराशी निगडित विविधांगी पैलू शिकवले जातात.अभ्यासक्रमात वित्त, गुंतवणूक, अर्थशास्त्र, गुंतवणुकीतील जोखिम, वित्तीय बाजारात यशस्वी होण्यासाठी लागणारे विविध सिध्दांत, कायदेशीर बाबी, संवाद कौशल्य आदी विषयघटकांचा समावेश करण्यात आला आहे. योग्य निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीचे कौशल्य, विद्यार्थ्यांना शिकवले जाते. कालावधी-तीन वर्षे.
(३) बी कॉम इन अकाउंटिंग ॲण्ड फायनांस या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे. सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) आणि वित्तीय विश्लेषक (फायनांशिअल ॲनॅलिस्ट) हे करिअर करण्याच्या अनुषंगाने, हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. कंपनी/ उद्योगाची वित्तीय बाजू अधिक सक्षम आणि बळकट करण्याचे कौशल्य, हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार प्राप्त करु शकतात. योग्यवेळी वित्तीय निर्णय घेणे व त्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता या उमेदवारांमध्ये निर्माण होते.
इतर अभ्यासक्रम
बी कॉम इन- (१) इकॉनॉमिक्स ॲण्ड ॲनॅलिटिक्स, (२) इकॉनॉमिक्स, (३) मॅनेजमेंट ॲण्ड फायनांस, (४) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज
संपर्क- नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स ,स्वामी भक्तीवेदांत मार्ग, भागुबाई मफतलाल कॉम्प्लेक्स, कूपर रुग्णालयाच्या विरुध्द दिशेला. विले पार्ले(पश्चिम), मुंबई-४०००५६, दूरध्वनी- ०२२-४२३३८०००, ईमेल- info@nmcollege.in संकेतस्थळ- https://nmcollege.in/
०००
(४) सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिकस
महाराष्ट्र शासनाच्या अख्यत्यारितील हे महाविद्यालय, वाणिज्य शाखेतील शिक्षण देणारे महत्वाचे महाविद्यालय समजले जाते. या महाविद्यालयास १०७ वर्षाची परंपरा आहे. वाणिज्य शाखेतील शिक्षणाचा देशात आणि आशिया खंडात पहिल्यांदा प्रारंभ करणाऱ्या संस्थांमध्ये या महाविद्यालयाचा समावेश होतो. वित्तीय घडामोडींचे केंद्रस्थान असलेल्या,मुंबईतील चर्चगेट परिसरात हे महाविद्यालय कार्यरत आहे.
या संस्थेचे वाणिज्य शाखेतील ज्ञानाजर्नाचे महत्व आणि कौशल्य लक्षात घेऊन आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्यपूर्व आशियामधील विद्यार्थी प्रवेशासाठी इच्छूक असतात. वाणिज्य आणि अर्थशास्त्राचे देशातील नामवंत अध्यापक, तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक ,यासंस्थेच्या विकासात मोठा हातभार लावला आहे. विद्यार्थ्यांच्या चौफेर व्यक्तीमत्व विकासाकडे प्राधान्याने लक्ष पुरवले जाते. मुंबई विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांमध्ये ही संस्था नेहमीच आघाडीवर राहिली आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थी अमेरिका,ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियातील उच्च शिक्षणासाठी मोठ्या संख्येने निवडले जातात. या संस्थेला, मोस्ट ट्रस्टेड ब्रँड अवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ही संस्था ,डॉ.होमी भाभा क्लस्टर युनिव्हर्सिटीचा भाग बनली आहे. ही युनिव्हर्सिटी देशातील तिसऱ्या क्रमांकाची क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे. त्यामुळे या संस्थेचे अभ्यासक्रम हे अधिक गुणवत्तापूर्ण , काळाशी सुसंगत व व्यावसायिक होतील.
अभ्यासक्रम
(१) बॅचलर ऑफ कॉमर्स इन बँकिंग ॲण्ड इन्शुरन्स- या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे असून, कोणत्याही विषयातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यास हा अभ्यासक्रम करता येतो. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळायला हवेत. विद्यार्थ्याने एकाच प्रयत्नात १२ वी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. बँका, इंश्युरन्स कंपन्या व आस्थापनांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात, या हेतुने हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. या दोन्ही क्षेत्रात, खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे विविध संधी उपलबध झाल्या आहेत. अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. याक्षेत्रात उपयुक्त ठरणारे तंत्रज्ञानही शिकवले जाते.
इतर अभ्यासक्रम
(१) बी कॉम इन अकाउंटिंग ॲण्ड फायनांस, (२) बी कॉम इन बँकिंग ॲण्ड फायनांशिअल ॲनॅलिटिक्स, (३) बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, (४) बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, (५) बॅचलर इन लक्झरी ब्रँड ॲण्ड रिटेल मॅनेजमेंट
संपर्क- सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, बी रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०, दूरध्वनी- ०२२-२२०४२८९७, ईमेल-sydprincipal@sydenham.ac.in,
sydprincipal@yahoo.co.in,संकेतस्थळ- http://sydenham.ac.in/
०००
(५) सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स
अभ्यासक्रम-(१) बी.कॉम, (२) बी.कॉम इंटिग्रेटेड, (३) बी.कॉम इन मॅनेजमेंट अकाउंटिंग, (४) बी.कॉम इन बिझिनेस ॲनॅलिटिक्स, (५) बी.कॉम इन अकाउंटिंग ॲण्ड फायनांस.
संपर्क- सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, सेनापती बापट रोड, पुणे- ४११००४, दूरध्वनी-०२०-२५६५३९०३, ईमेल-contact@symbiosiscollege.edu.in, संकेतस्थळ- https://symbiosiscollege.edu.in/
000
मुंबईतील आघाडीची महाविद्यालये-
(१) नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स, (२) सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, (३) मिठिबाई कॉलेज ऑफ आर्ट्स, चौहान इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड अमृतबेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स(स्वायत्त), (४) के.जे.कॉलेज ऑफ कॉमर्स, (५) के.सी.कॉलेज, (६) एस. के. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स.
०००
पुण्यातील आघाडीची महाविद्यालये-
(१) सिम्बॉयसीस कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स, (२) नेस वाडीया कॉलेज ऑफ कॉमर्स ,(३) सेंट मिरा कॉलेज फॉर गर्ल्स, (४) इंदिरा कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड कॉमर्स ॲण्ड सायन्स, (५) स्कूल ऑफ कॉमर्स-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, (६) सर परशुरामभाऊ कॉलेज, (७) एमआयटी आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज
०००
प्लेसमेंटसाठी आघाडीची महाविद्यालये
उद्योग आणि कंपन्यांमार्फत प्लेसमेंटसाठी प्राधान्य देणारी सर्वोच्च महाविद्यालये-
(१) श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स- नवी दिल्ली, (२) लेडी श्रीराम कॉलेज फॉर वुमेन – नवी दिल्ली, (३) लोयोला कॉलेज चेन्नई, (४) एन.एम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स- मुंबई, (५) मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्स मुंबई, (६) हिंदू कॉलेज दिल्ली, (७) ख्रिस्त युनिव्हर्सिटी-बेंगळुरु, (८) हंसराज कॉलेज दिल्ली, (९) रामजस कॉलेज दिल्ली, (१०) चौहान इंस्टिट्यूट ऑफ सायन्स ॲण्ड अमृतबेन जीवनलाल कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स- मुंबई, (११)सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिकस-मुंबई
०००