तुम्ही-आम्ही चार वर्षाचे असतो तेव्हा, आपणास कुणीतरी म्हणजे आईबाबा, दादाताई किंवा आजीआजोबा यांनी गोष्ट सांगावी असं वाटतं. पण, “त्याच्या” बाबतीत वेगळच घडलं. “तो”चार वर्षाचा असताना, त्याला नव्या नव्या कल्पनांवर आधारित गोष्टी सुचू लागल्या. या गोष्टी इतरांना सांगायला त्याला आवडू लागलं. तेव्हाच, त्याच्या आईबाबांच्या लक्षात की, हे आपलं बाळ, जरा नव्हे तर फारच वेगळं आहे. तो काळ कोविडचा होता. सगळेजण घरात बंदिस्त झाले होते. या काळात ‘त्याच्या’ आईबाबांनी त्याला खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळे “त्याच्या” मनातल्या नि कल्पनेतल्या गोष्टी त्याला रंगवता आल्या नि फुलवताही आल्या.
एकदा, या गोष्टी त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऐकल्या. त्यांनी, या गोष्टी प्रकाशित करण्याची सूचना, ‘त्याच्या’ आईबाबांना केली. वयाच्या आठव्या वर्षी म्हणजेच ४ डिसेंबर २०२१ रोजी त्याचं पहिलं पुस्तक, ‘वन्स अपॉन इन माय माईंड’, हे प्रकाशित झालं. तो, तेव्हा सर्वात कमी वयाचा लेखक ठरला. या पुस्तकाच्या एक हजार प्रति विकल्या गेल्या. त्यानंतर सप्टेंबर २०२२ पर्यंत, ‘द मिरर ॲण्ड द ग्रिडी मॅन’, ‘द डेसपिकेबल व्हायरस’, ‘पेन्नी ॲण्ड द मॉन्स्टर’ हे कथासंग्रह आणि ‘द मेलिफ्लुओस ओडेसी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. आणखी एका विक्रमाची नोंद झाली. एका वर्षात सर्वाधिक पुस्तकं प्रकाशित करणारा, सर्वात लहान वयाचा ‘तो’ लेखक ठरला.
या लिखानाच्या प्रेमातूनच २०२२ साली ‘रिध्द्ज वर्ल्ड पब्लिकेशन’ या कंपनीची त्याने स्थापना केली. अर्थातच, आईबाबांचे सहकार्य, साहाय्य आणि पाठिंबा होताच. एका अर्थाने, “तो” या कंपनीचा संस्थापक ठरला. तेव्हा त्याचं वय होतं १० वर्षे. बऱ्याच जणांनी, सर्वात कमी वयाचा उद्योजक म्हणून त्याचं कौतुक केलं. पण, याचा काही त्याला अभिमान नि गर्व झाला नाही. ‘जे करण्यात खूप आनंद मिळतो, ज्यात भान हरपून जातं, ते मनापासून करणं,’ हे त्याच्या मते महत्वाचं. तेच तो करतोय.
तर, रिध्द्ज वर्ल्ड प्रकाशन संस्था प्रामुख्यानं मुलांच्या गोष्टींची पुस्तकं प्रकाशित करते. विशेषत: लहान मुलांनी लिहिलेल्या पुस्तकांना प्राध्यान्य दिलं जातं. या प्रकाशनाने आतापर्यंत २५ पुस्तकं प्रकाशित केली आहेत.
२
तर, तो चार वर्षाचा असल्यापासून गोष्टी लिहायला लागला. त्याची पुस्तकही निघालीत. मग, एकेदिवशी त्याच्या आईबाबांनी, याच गोष्टिंच्या ‘ऑडियो बूक’ची कल्पना त्याच्यासमोर मांडली. म्हणजे, त्याला आणखी काहीतरी नवं भन्नाट करण्याची संधीच होती. अशी संधी तो कशी बरी सोडणार? मग त्याने त्याच्याच आवाजात, या गोष्टींच्या पुस्तकांचे ऑडिओ बूक्स तयार केले. तेव्हा आईबाबांच्या लक्षात आलं की, तो खूप चांगला आणि प्रभावीपणे बोलू शकतो. आपलं म्हणणं थेट आणि स्पष्टपणे मांडू शकतो.
मुलांना प्रेरणा देणाऱ्या, त्यांना चांगली शिकवण देणाऱ्या, पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगणाऱ्या, उत्तम जीवनमूल्ये सांगणाऱ्या त्याच्या गोष्टी मुलांसोबत पालकांनाही आवडू लागल्याचं, आईबाबांच्या लक्षात आलंच होतं. या ऑडियोबूक्सनी त्यावर शिक्कामोर्बत केलं. सर्वात लहान वयात ऑडिओबूक्स तयार करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
त्यावरुन त्याच्या आईबाबांना आणखी एक कल्पना सुचली. हा आपला बाळ इतका छान बोलतो, लोक त्याच्या बोलण्याने प्रभावित होतात, तर मग त्याच्या प्रेरणादायी भाषणांचं पॉडकॉस्ट सुरु केलं तर? या कल्पनेला २०२३ साली त्यांनी मूर्त रुप दिलं. त्याचं पोडकॉस्ट, ‘बिकॉज आय कॅन वुइथ रिध्दान’ यानावाने यूट्यूबवर प्रसिध्द आहे. यामध्ये, त्याच्यासारख्या लहान आणि तरुण वयातील पराक्रमी मुलांच्या मुलाखती घेतो. विविध क्षेत्रातील कर्तृत्वान मोठ्यानांही बोलतं करतो. त्याला हजारो दर्शक ऐकत असतात. लहानमुलं आणि तरुणांना वेगवेगळया क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा त्याचा मुख्य उद्देश असतो.
३
अशाप्रकारे, या विक्रमविराचा प्रवास आता, ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणजे प्रेरणादायी विचार मांडणारा वक्ता, असा सुरु झाला, तेव्हा तो होता फक्त ११ वर्षाचा. आतापर्यंत किमान अकरा हजार विद्यार्थी आणि मोठ्यांपुढे त्याने प्रेरणादायी भाषणं दिली आहेत. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात अत्यंत प्रतिकूल परिस्थितून वर आलेल्या आणि खूप यश मिळवलेल्या व्यक्तींच्या गोष्टी तो सांगतो. स्वत:चे अनुभव सांगतो. या भाषणांना बरीच गर्दी होते. त्याला वेगवेगळ्या शाळांमधून आणि इतर कार्यक्रमांमध्ये बोलावणं येतं. अनेकांच्या मते, तो सर्वात लहान असा प्रेरणादायी वक्ता किंवा मोटिव्हेशनल स्पिकर आहे. अशी, त्याची नोंद, ‘इंडिया बूक रेकॉर्डस आणि एशिया बूक रेकॉर्डस’ नी घेतली आहे.
‘लेखक – पुस्तकांचा प्रकाशक – ऑडिओ बूक वाचक- प्रेरणादायी वक्ता ’ असा त्याचा प्रवास सुरु छान सुरु आहे. त्याची साहित्यिक कामगिरी लक्षात घेऊन पुणे इंटरनॅशनल लिटरिचेर महोत्सव, न्यू दिल्ली वर्ल्ड बूक फेअर, या मोठ्या महोत्सवात विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात येतं.
त्याला लिखाणासाठी त्याच्या आईबाबांनी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं. अनेकांना ते मिळत नाही. मग अशांच्या मदतीसाठी हा विक्रमवीर वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्यातील महत्वाचा उपक्रम म्हणजे, लहानमुलांसाठी जागतिक कथालेखन स्पर्धा. रिध्दान पब्लिकेशन वर्ल्डमार्फत या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. या स्पर्धेत जगभरातील मुलं, ‘वन्स अपॉन इन अवर माईंड,’ या आशयावर आधारित कथा लिहितात. आतापर्यंत अशा तीन स्पर्धा झाल्या. त्यातून, ‘वन्स अपॉन इन अवर माईंड’चे दोन भाग प्रकाशित झाले. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, कतार, फिलिपाइन्स, युनायटेड अरब एमिरेटस सारख्या १८ देशातील ३ हजार मुलांनी सहभाग घेतला. त्यातील २८ यशस्वी मुलांच्या कथांचे संग्रह त्याने विनामूल्य छापून दिले. या सर्व बाल/कुमार लेखकांचा गौरव आता आंतरराष्ट्रीय लेखक म्हणून केला जातो. या बाल/कुमार लेखकांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी, तो ‘प्रगती विचार मंच’ आणि ‘पुणे बूक फेस्टिवल’चे व्यासपीठही मिळवून देतो.
इतक्या सगळया गोष्टी इतक्या लहानवयात करत असतानाच, आपल्या अवतीभवतीच्या समाजासाठी, आपण काहीतरी देणं लागतो, याची त्याला लवकरच जाणीव झाली. ऑडिओ बूक वाचनातून मिळालेल्या रक्कमेचा काही भाग, तो अंध मुलांच्या कल्याणासाठी आणि अनाथालय चालवणाऱ्या ‘बीव्हीजेएसएस’ या संस्थेला देतो. या फाऊंडेशनचा तो ब्रँड ॲम्बेसेडर आहे. इंग्रजीतून संभाषण कौशल्य आणि सर्जनशीलतेची अभिव्यक्ती याव्दारे तो मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो.
तर असा हा रिध्दिम जैन! वर्य वर्षे ११. सध्या मुक्काम पुणे.
सुरेश वांदिले