विक्षिप्त शहाणा
राजेंद्रनगरचे राजपूत्र महेंद्र हा विक्षिप्त होता.इतका की ,त्याला जे सांगितलं त्याचं नेमकं उलटं करायचा.यात त्याला भूषणही वाटे.त्याचे पिताश्री राजे विश्वनाथ यांनी त्याला कितीदा समजावलं पण महेंद्रच्या वागणुकीत काही फरक पडला नाही.
त्यामुळे राजे विश्वनाथ यांना महेंद्राची फार चिंता वाटू लागली.तो राज्याच्या गादीवर बसल्यावर असा विक्षिप्त वागू लागला तर,त्याला दरबारातील इतर व्यक्ती हुसकावून लावतील किंवा इतर राजे आक्रमण करुन हे राज्य ताब्यात घेतील.अशी भीती राजे विश्वनाथांना वाटू लागली.त्यांनी ही भीती महेंद्रासमोर व्यक्तही केली.पण राजपुत्राने ते हसण्यवारी नेलं.त्याचा विक्षिप्तपणा काही कमी झाला नाही.
महेंद्रच्या विक्षिप्तपणाची प्रसिध्दी सर्वदूर पसरली.या सर्वांचा राजे विश्वनाथ यांच्या तब्येतीवर परिणाम झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले.
राजपूत्र महेंद्र आता राजा झाला.
राजे महेंद्र याच्या विक्षप्तीपणाचा फायदा घेऊन प्रधानजी रंगरत्ने याला आता राजा बनण्याची स्वप्न पडू लागले.महेंद्राच्या अशा वागण्यामुळे आपण त्याला हुसकावून महेंद्राच्या विक्षिप्तपणाचा फायदा घेऊन हाकलून लावू असा विश्वास त्याला वाटू लागला.तो संधीचा शोध घेऊ लागला.तशी संधी त्याला लवकरच मिळाली
एके दिवशी दरबारात गारुडी आला.त्याच्याजवळ तीन चार पेटारे होते. त्यात नाग होते.ते जादुचे असून ते कोणतीही इच्छा पूर्ण करु शकतात असं गारुडयाने महेंद्रांना सांगितलं.
ते ऐकून प्रधानजी रंगरत्ने याच्या डोक्यात एक कल्पना आली. ते ताबडतोब आपल्या जागेवरुन उठले आणि राजे महेंद्राना म्हणाले…
महाराज,या गारुड्याचे काही ऐकू नका. नागाच्या चमत्काराची खोटी कहाणी सांगून तो आपल्याकडून भरपूर संपत्ती उकळेल.अशी सवयच असते या गारुड्यांना!
आपल्या बोलण्याचा उलटा अर्थ काढून महेंद्र,गारुड्याला हाकलणार नाही आणि स्वत:च नागाला हातात घेईल.आपल्या इच्छा त्याला सांगेल. त्यावेळी
ळी तो नाग महेंद्रास डंख मारेल. यात महेंद्राचा मृत्यू होईल.मग आपणच राजे होऊ,असे दिवा स्वप्न रंगरत्नेंना भरदिवसा पडले.
प्रधानजींचे बोलणे ऐकून महेंद्र काही क्षण विचारात पडले.कोणताही निर्णय तडकाफडकी घेण्याची सवय असलेले महेंद्र, विचार करताहेत हे बघून रंगरत्नेच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
महाराज मग, नाग घेताहात ना आपल्या हातात,तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी?रंगरत्ने पुन्हा म्हणाले.
प्रधानजी,मी नक्कीच हा नाग हातात घेईन आणि त्याला माझी इच्छा सांगेन.पण त्याआधी त्याची खात्री करुन घ्यायला हवी की नाही?
हो अलबत करायलाच हवी?रंगरत्ने उत्साहात म्हणाले.
तर मग असं करा,तुम्हीच आधी नाग हातात घ्या. त्याला सर्व दरबाऱ्यांच्या समक्ष तुमच्या मनातील इच्छा सांगा.नागाने ही इच्छा पूर्ण केली की मग आम्ही तो नाग हातात घेऊन आमची इच्छा सांगू. महेंद्र म्हणाले.
महाराजांचे बोलणे ऐकून रंगरत्ने त त प प करु लागले.असं काही महेंद्र सांगतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. त्यांना दरदरुन घाम फुटला.पाय लटपटू लागले.घशाला कोरड पडली.महाराजांच्या आदेश पालन करण्याशिवाय पर्यायच नव्हता.
गारुड्याने रंगरत्नेंजवळ जाउन एक पेटारा उघडला.त्यातून फुस्स करत नागाने फणा काढला.महेंद्राने गारुड्यास नागास प्रधानजींच्या हाती द्यायचा आदेश दिला.
रंगरत्नेचा भीतीने थरकाप उडाला होता.पण नागास हातात घेण्यावाचून काही पर्यायच नव्हता.त्याने नागाला हात लावताच नागाने त्यांना डंख मारला.काही क्षणातच नागाचे विष प्रधानजींच्या शरीरात पसरल्याने त्यांचे शरीर काळनिळे पडले.ते दृष्य बघून सर्व दरबाऱ्यांचा थरकाप उडाला.
महेंद्राने गारुड्यास ताबडतोब नागास घेऊन दरबाराच्या बाहेर जायला सांगितले. तो जाताच महेंद्र दरबाऱ्यांना म्हणाला,
मी सगळं उलटं करतो असं तुम्हा सर्वांची समजूत आहे ना?त्याचा गैरफायदा घेऊन रंगरत्ने मलाच नागाच्या विषाला बळी पडण्यासाठी प्रवृत्त करत होता.म्हणजे तो राजा होण्यास मोकळा झाला असता.मी विक्षिप्त असेन पण मूर्ख नाही,हे कळलच असेल तुम्हाला आता.यापुढे जो कोणी माझ्या वाटेला थेट जाईल किंवा कटकारस्थान करेल त्यांची अशीच गत होईल हे लक्षात घ्या.
महेंद्राने दरबाऱ्यांना जे सांगितलं ते सर्व राज्यभर आणि आजूबाजूच्याही राज्यात पसरलं.हा विक्षिप्त राजा कोणत्या समयी काय करेल याचा नेम नाही.आपणच संकटात सापडू अशी प्रत्येकाची धारणा झाली.त्यामुळे महेंद्राच्या राज्याकडे नंतर कुणीही वाकड्या नजरेने बघितलं नाही.त्याच्या विक्षिप्तपणाचा फटका आपणास बसू नये म्हणून सर्वजण त्याच्याशी मिळून मिसळून वागू लागले.
सुरेश वांदिले
