(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

वेळ निघून गेल्यावर..

   तेजोमयी अर्ध्या तासापासून काहीतरी शोधत होती. या खोलितून त्या खोलित जात होती. कपाटं उघडून बघत होती. वरची वस्तू खाली आणि खालची वस्तू वर करत होती. असं करताना कपाटातली पुस्तकं खाली पडली. दिवाणखाण्यातील टेबलवर असलेला फ्लावरपॉट खाली पडून फुटला. तेजोमयीचे पप्पा तिची ही धांदल बघत होते. राहवून शेवटी त्यांनी विचारलच

    काय गं, कसली शोधाशोध चाललीय तुझी मघापास्नं..”

    काही नाही हो पप्पा.. मैत्रिणीचं आणलेलं पुस्तक कुठं ठेवलय तेच कळत नाहीय..” तेजोमयी म्हणाली.

    तुझं कामच वेंधळयासारखं. कोणतीही गोष्ट जागच्या जागी ठेवत नाहीस. मग त्या गोष्टिला शोधण्यात वेळ जातो. डोक्याला ताप तो दुसराच.” असं पप्पांना म्हणावसं वाटलं. पण त्यामुळे आणखी गोंधळून तिची शोधयात्रा लवकर संपायची नाही असं त्यांना वाटलं. शिवाय मुलांना असं एकदम तोडून बोलू नये. त्यांना खूप दु: होतं. त्यांच्या मनाला लागतं. त्यात रागावण्याची भर पडली तर त्यांच्या दु:खाला पारावरच राहत नाही. त्यांचं हसणं, बागडणं लुप्त होऊ शकतं. असं नुकतच त्यांनी वाचलं असल्यानं स्वत:च्या  रागावर ताबा ठेवत त्यांनी तेजोमयीला विचारलं,

    ते पुस्तक शोधण्यासाठी मदत करु का मी..” तेजोमयीचा चेहरा उजळला. तिने आनंदानं उडीच मारली.

   यू आर ग्रेट पप्पाअसं म्हणून त्यांना मिठीच मारली.

    गधडे, तू नुसती आयतोबा झालीयस. स्वत:ची कामं स्वत: करायला कंटाळा येतो. त्यातून हा वेंधळेपणा.” असं म्हणण्याचा त्यांना मोह झाला. पण तो त्यांनी टाळला. गळयाभोवतीची तिची मिठी दूर करत पुस्तक शोधण्याच्या कामी तेजोमयीला मदत करु लागले.

    तेजोमयी कोणतीही गोष्ट जागेवर ठेवत नसल्यानं तिची अशी धांदल उडते. हे त्यांना माहीत होतं. तिच्या मैत्रिणीचं पुस्तक दिवाणखान्यातील कपाटातच असायला हवं असं त्यांना वाटलं. त्यांनी व्यवस्थितपणे कपाटातील मासिकं खाली काढली. एक एक वर उचलून बघितली. एका मासिकाच्या खाली तेजोमयीला हवं असलेलं पुस्तक दडलं होतं.

    गधडे..”असं म्हणून तिला रागवावं असं पुन्हा त्यांना वाटलं. पण हरवलेलं ते पुस्तक बघताच तेजोमयीचा चेहरा उजळला. ती खुदकन हसली.  तिचे डोळे चमकले.

   पप्पांना आपला बेत पुन्हा रद्द करावा लागला. तेजोमयीला समजवयाचं कसं याचा विचार ते करु लागले. तेजोमयीला घेऊन ते सोफ्यावर बसले.

    तेजू तुला असं वाटत नाही का की तुझं काही चुकतय म्हणून. ” पप्पा म्हणाले.

    कशाबद्दल बोलताहात बाबा तुम्ही. हरवलेल्या पुस्तकाच्या आनंदात तेजोमयी असल्यानं पप्पांचं म्हणणं तिला काही कळलं नाही.

    अगं मघापास्नं तुझी चाललेली शोधाशोध गं. “

    पुस्तक मिळालय ना आता. ” तेजोमयी म्हणाली.

   पण त्यात किती वेळ गेला तेजू. “

    असं कधी कधी होतं पप्पा. “

    बाळ असं कधीच होउु नये ना. यात वेळ जातो. मनस्ताप होतो. मघा फ्लॉवर पॉट फुटला. आपलच नुकसान झालं. असं नुकसान झालं तर आईबाबांना राग येऊ शकतो. “

    म्हणजे तुम्हाला माझा राग आला होता. “

    थोडा थोडा तर आलाच होता. जागच्या जागी वस्तू ठेवायची सवय नसली तर अशा भानगडी होतात. अनेकदा खूप मोठ्ठ आणि कधीही भरुन येणारं नुकसान होतं. “

  म्हणजे काय? “

    तुला याविषयी एक गोष्टच सांगतो ना. ” पप्पा म्हणाले. गोष्ट म्हंटल्याबरोबर तेजोमयी सावरुन बसली.

   पप्पा गोष्ट सांगू लागले.

0000

2

   वननगरीतल्या प्राण्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा होती. “

    निवासी शाळा म्हणजे. “

    शाळा संपल्यावर तू जशी घरी येते तसं घरी यायचं नाही तर शाळेच्या आवारात असलेल्या वसतीगृहात राहायचं. त्याला निवासी शाळा म्हणतात. “

    म्हणजे प्राण्यांची मुलं शाळेच्या वसतीगृहातच राहायची? ” तेजोमयीने विचारलं.

    हो. किंग लॉयन, पंतप्रधान वाघोबांपासून गाढवोबाच्या मुलांपर्यंत साऱ्याच प्राण्यांची मुलं वसतीगृहात राहायची. तसा वननगरीचा नियमच होता.किंग लॉयनचा मुलगा प्रिन्स सिल्लू किंचित वेंधळा होता. शाळेची पुस्तकं, पाटी तो कधीच जागेवर ठेवायचा नाही. बुटं जागेवर ठेवायचा नाही. शाळेतून वसतीगृहाच्या खोलीवर गेला की दफ्तर असच टाकून द्यायचा. त्याचे कपडेही इकडे तिकडे फेकलेलेच असायचे. “

    मग.. “

    मग काय? त्यामुळे त्याला दुसऱ्या दिवशी शाळेची कोणतीच गोष्ट वेळवर मिळायची नाही. काहीतरी विसरुन जायचा. अनेकदा पिरेड्सची पुस्तकं वेळेपर्यंत सापडल्यानं त्याला तसच जावं लागे. त्यामुळे शिक्षक त्याला रागवायचे. पूर्वीचे शिक्षक छडीचा मार देत. त्यामुळे प्रिन्स सिल्लूला सर्वाधिक मार मिळे. मार मिळाला की प्रत्येक वेळी तो ठरवायचा की आता आपण व्यवस्थितपणा अंगात बाणवायचा. पण शाळेतून वसतीगृहावर आल्यावर त्याचं पुन्हा ये रे माझ्या मागल्या. शिक्षकांनी त्याला खूप समजावलं. किंग लॉयननेही त्याला एकदा प्रेमानं आणि एकदा रागावून सांगितलं. त्याला ते सारं पटायचं. तो सर्वांना प्रॉमिस सुध्दा करायचा. पण त्याच्यात सुधारणा झाली नाही. याचा त्याला एके दिवशी  मोठा फटका बसला. “

    काय झालं पप्पा ? ” तेजोमयीनं उत्सुकतेनं विचारलं.

000

3

   प्रिन्स सिल्लू चांगला खेळाडू होता. मॅरेथान या लांब पल्ल्याच्या दौडित त्याने कधीच पहिला क्रमांक सोडला नाही. एकदा वननगरितील सगळया शाळांचं ऑलंपिक भरलं. लांबपल्ल्याच्या दौडीसाठी प्रिन्स सिल्लूची निवड झाली. तो या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकेल अशी सगळयांनाच खात्री होती. “

    त्याने सुवर्णपदक जिंकलं नाही का? ” तेजोमयीनं विचारलं.

    सांगतो ना. स्पर्धेच्या दिवशी त्याला त्याचे स्पोर्ट्स शूज वेळेवर दिसेना. शूज कुठे ठेवले हेही त्याला आठवेना. स्पर्धा सुरु होण्याची वेळ आली तरी याची शोधाशोध सुरुच होती. आता काय करावं हे त्याला कळेना. त्याचा घसा कोरडा झाला. तो मैदानात पोहचला नसल्याने त्याला शोधत शोधत त्याचे पी.टी.टिचर धावत त्याच्या खोलित आले. स्पर्धा सुरु व्हायला काही मिनिटे उरली होती. पी.टी.टिचर त्याला रागावले. शूज मिळत नाही असं प्रिन्स सिल्लूने सांगितल्यावर तर ते जाम भडकले. आता अनवाणी पायानेच धावं असं त्याच्यावर ओरडून टिचर निघून गेले.शुजविना धावण्याशिवाय प्रिन्स सिल्लूजवळ पर्याय नव्हता. त्याच्या डोळयात अश्रू आले. खिन्न मनानेच तो मैदानात आला. स्पर्धा सुरु व्हायला केवळ एक सेंकद उरला होता. पंचही त्याला रागावले. तो मनातून  पूर्णपणे खचलाच. तो कसाबसा लेन मध्ये उभा राहिला. स्पर्धा सुरु झाली. पण त्याला उत्साह वाटेना. पायांना दगड, गोटे, काटे, टोचत होते. मात्र तो तशाही स्थितीत धावत राहिला. काही वेळानंतर त्याने मनात असं ठरवलं की आज आपण शुजशिवायच ही शर्यत जिंकून दाखवू. ”

   त्याने शर्यत जिंकली का? ” तेजोमयीने अधिरतेनं विचारलं.

    सांगतो ना. दगड, गोटे, काटे यातून तो वेडयासारखा धावत होता. त्याच्या पायाला जखमा होत होत्या. त्याला वेदना होत होत्या. पण तो जीवाच्या आकांताने धावतच राहिला. त्याने त्याची पर्वा केली नाही. अखेर त्यानेच ही शर्यत जिंकली.मात्र तो शेवटच्या टोकाला पोहचला नि परीक्षकांच्या पायाजवळ धाडकन पडला. त्याच्या दोन्ही पायातून रक्त येत होतं. तो भयंकर विव्हळत होता. एका पायाला जरा जास्तच जखमा झाल्या होत्या. त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या पायातील काटे काढले. मात्र एक काटा खूप खोलवर गेला होता. तो डॉक्टरांना काढणं जमत नव्हतं. तो काटा बाहेर काढणं आवश्यक होतं. नाहीतर त्याचा पाय सडला असता. त्याचा परिणाम सगळया शरीरावर झाला असता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचा पाय कापण्याचा निर्णय घेतला. लॉयन किंग धाय मोकलून रडू लागला. सर्व शिक्षक हळहळले. शाळेतील इतर मुलांना वाईट वाटलं. पण करणार काय? पाय कापला नसता तर त्याचा जीवसुध्दा धोक्यात आला असता. प्रिन्स सिल्लूच्या डोळयातून अखंड अश्रू वाहत होते. आपल्या अव्यवस्थितपणाचा एवढा मोठा फटका बसेल असं त्याला वाटलं नव्हतं. प्रिन्स सिल्लूच्या पायाचं ऑपरेशन झालं. तो काही महिन्यांनी ठीक झाला. पण आता त्याचा एक पाय निकामी झाला होता. त्याला आता नीट चालता येईना. धावणं तर शक्यच नव्हतं. त्याला नंतर पुन्हा कधीही मॅरेथॉन शर्यतीत भाग घेता आला नाही. ”

   पप्पांनी एका दमात ही गोष्ट पूर्ण केली.त्यामुळे त्यंाना दम लागला. त्यांनी पाण्याचा एक घोट घेतला.तेव्हा कुठे त्यांना बरं वाटलं.

000

4

    पण पप्पा,हे असं खरोखरच घडलं का हो. ” तेजोमयीनं चाचरत विचारलं.

    मग तुला काय वाटलं मी खोटं सांगितलं. “

    तसं नाही हो.पण.. “

    हे बघ बाळ प्रिन्स सिल्लूची गोष्ट एैकून तुला वाईट वाटलं ना. “

    हो, बिच्चारा सिल्लू. “

    बिच्चारी तेजू असं म्हणायची पाळी आणणार आहेस का मग आमच्यावर,त्याच्यासारखच नेहमी नेहमी अव्यवस्थिपणे वागून. “

   नाही हो पप्पा. तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं मला.आता याच क्षणापासून माझ्यात बदल करते बघा. यापुढे मी वेंधळ्यासारखी वागले ना तर मला शिक्षाच करा तुम्ही. “तेजोमयी पप्पांना प्रॉमीस करत म्हणाली.

   पप्पांनी तिच्याकडे कौतुकानं बघितलं.

000

   सुरेश वांदिले

   वाय 1/15,शासकीय वसाहत,वांद्रे पूर्व

   मुंबई51

   भ्रमणध्वनी9324973947