(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

दृष्टिकोन

परदेशातील वैद्यकीय शिक्षण  स्वस्त असल्याने व प्रवेश सुलभतेने मिळत असल्याने लाखावर विद्यार्थी तिकडे जात असल्याचे गेल्या वर्षी युक्रेन प्रकरणानंतर प्रकर्षाने लक्षात आले. एखाद्याने कुठे आणि काय शिकायला जावे हा संपूर्णपणे व्यक्तिगत प्रश्न असला तरी असा निर्णय घेताना साधकबाधक विचार होणे गरजेचे आहे.

भारतापेक्षा अनेक बाबतीत मागे असलेल्या आणि युध्द वा इतर समर प्रसंगांशी सतत तोंड द्यावे लागणाऱ्या देशांमध्ये भारतीय मुले वैद्यकीय शिक्षणासाठी जात असतात. भारताचे परराष्ट्र खाते याविषयी वेळोवेळी सावधगिरीचा इशारा देत असते. त्याकडे कानाडोळा केला जातो. गेल्या वर्षी इतके रामायण अथवा महाभारत घडूनही यंदाही परदेशातील वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा ओढा काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही हमखास प्रवेश मिळवून देतो, अशा धाटणीच्या जाहिरातीही झळकू लागल्या आहेत.

सावधगिरी बाळगा

एका मोठ्या वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये अमेरिकेतील संस्थांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला सुलभतेने प्रवेश मिळवून देण्याचा दावा करण्यात आला आहे. भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या खर्चापेक्षा कमी खर्चात, असे आकडेवारीनीशी या जाहिरातीत नमूद करण्यात आले. शिवाय कोणतीही प्रवेश चाळणी परीक्षा नाही. थेट प्रवेश! हे जरा चमत्कारिकच! एकिकडे तीव्र स्पर्धा आणि दुसरीकडे-आजाव घर तुम्हारा, अशी स्थिती.कदाचित ते खरेही असेल. अशा जाहिरातींनी आकर्षून पालकांनी मुलांना वैद्कीय शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेताना, संबंधितांना विविध प्रश्न विचारुन भांडावून सोडले पाहिजे. उदा-कोणत्याही चाळणीशिवाय प्रवेश कां दिला जातो? शिक्षण संस्था खरोखरच अस्तित्वात आहे का? रँकिग आहे का? त्याचा पुरावा काय? दर्जेदार वैद्यकीय शिक्षण देणार म्हणजे नेमके काय करणार? अभ्यासक्रमाचे विषय घटक कोणते? इंटरर्नशीपची काय सुविधा? हे शिक्षण संपल्यावर पदव्युत्तर पदवीसाठी पात्र होता येते काय? भारतात आल्यावर काय? युक्रेनसारखी समस्या निर्माण झाली तर त्यातून मार्ग काढण्याचे काही संभाव्य नियोजन? हे सर्वसाधरण प्रश्न झाले.असले उलटसुलट प्रश्न विचारुन आपली खात्री करुन घ्यायला हवी. या प्रश्नांच्या मिळालेल्या उत्तरातून समाधान झाल्यास मुलांना परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घ्यावा आणि भविष्यातील उद्भवू शकणाऱ्या समस्यांची जबाबादारी स्वीकारण्याची मानसिक तयारी करावी. नंतर ,उगाच भारत सरकारला किंवा नशिबास दोष देत बसू नये.

०००

नवी दर्जेदार महाविद्यालये

आपल्या देशात गेल्या काही वर्षात सातत्याने नवी वैद्कीय महाविद्यालये उघडली जात आहेत. २००० नंतर उघडल्या गेलेल्या पुढील वैद्कीय महाविद्यालयांनी गुणवत्ता आणि दर्जा राखण्यात सातत्य दाखवले आहे. (१) वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज – नवी दिल्ली, (२) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, जोधपूर, (३) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, भुवनेश्वर, (४) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, रायपूर, (५) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, ऋषिकेश, (६) आर्मी कॉलेज  ऑफ मेडिकल सायंसेस, नवी दिल्ली, (७) इरा- लखनौ मेडिकल कॉलेज  ॲण्ड हॉस्पिटल, लखनौ, (८) डॉ.राजेंद्र प्रसाद गर्व्हनमेंट मेडिकल कॉलेज  ,कांग्रा – हरयाणा , (९) श्री राममूर्ती स्मारक इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, बरेली, (१०) सिक्किम मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, गंगटोक

महाराष्ट्रातील पुढील काही वैद्यकीय महाविद्यालयांनी आपला दर्जा आणि गुणवत्ता कायम राखला आहे- (१) ग्रँट मेडिकल कॉलेज, मुंबई, (२) जी.एस मेडिकल कॉलेज, मुंबई, (३) बी.जे.गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, पुणे, (४) भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज, पुणे, (५) गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर, (६) इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, नागपूर

सुरेश वांदिले

 

००००