दिशा
भारतातील ॲलोपथीचे शिक्षण हे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण समजले जाते. असे शिक्षण देणाऱ्या जगातील प्रमुख देशांमध्ये भारताचा समावेश होतो. शिवाय भारतीय डॉक्टरांचे कौशल्यसुध्दा इतर अनेक देशातील डॉक्टरांपेक्षा अधिक असल्याचे समजले जाते. त्यामुळे भारतात वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्या परदेशातील रुग्णांची संख्या वाढतेय. हे मेडिकल टुरिझम भारताच्या परकीय गंगाजळीत चांगली भर घालत आहे. भविष्यात यात अधिकाधिक वाढ होण्याची शक्यता दिसून येते.
सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस-नवी दिल्ली, ही संस्था पदवी, पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आपल्या देशात सर्वोत्कृष्ट समजली जाते. गेली किमान ५० वर्षे या संस्थेने आपला दर्जा आणि गुणवत्ता कायम राखला आहे. या संस्थेचे महत्वाचे वैशिष्ट म्हणजे, इथे दिले जाणारे संशोधन कार्यास महत्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण आणि प्रभावी वापर ! कोविडच्या काळात, ई-इंटेंसिव्ह केअर युनिटच्या मार्फत या संस्थेने देशातील ५०० रुग्णालयांचे, रुग्ण परीक्षण- देखभाल- उपाययोजना याबाबत संनियंत्रण केले. गेल्या वर्षिच्या मध्यापर्यंत या संस्थेने माहिती विश्लेषण आणि तांत्रिक सहकार्य पुरवून देशात दररोज २० लाख कोविड चाचण्या (आर टी-पीसीआर) पार पाडल्या. संशोधन, प्रशिक्षण, नावीन्यपूर्णता, पायाभूत सुविधा याबाबत या संस्थेशी देशातील कोणतीच संस्था बरोबरी करु शकत नाही. त्यामुळेच देशात असलेल्या जवळपास ६०० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही संस्था असते. यामध्ये गेल्या ५० वर्षात फरक पडलेला नाही.
इतर संस्था
या संस्थेशिवाय पुढील संस्थांनी आपला दर्जा आणि गुणवत्ता सातत्याने कायम राखली आहे.(१) ख्रिचियन मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल- वेल्लोर, (२) आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज-पुणे, (३) जवाहरलाल इंस्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्यु केशन ॲण्ड रिसर्च – पुडीचेरी, (४) मौलाना आझाद मेडिकल कॉलेज – नवी दिल्ली, (५) इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सांयसेस, बनारस हिंदू विद्यापीठ – वाराणसी, (६) किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी –लखनौ, (७) वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज – नवी दिल्ली, (८) लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज–नवी दिल्ली, (९) युनिव्हसिटी कॉलेल ऑफ मेडिकल सायंसेस –नवी दिल्ली.
शैक्षणिक शुल्क
भारतातील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षणाचा खर्च हा अव्वाच्या सव्वा असला तरी शासकीय संस्थांमध्ये मात्र बराच कमी आहे. पुणे येथील आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण शुल्क घेतले जात नाही. याचा अर्थ येथील अभ्यासक्रम जवळपास नि:शुल्क आहे.
अत्यंत कमी शिक्षण शुल्क असलेल्या काही शिक्षण संस्था पुढील प्रमाणे आहेत – (१) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, नवी दिल्ली- १,६२८ रुपये, (२) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, जोधपूर-३,१०६ रुपये, (३) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, भुवनेश्वर- ५,८५६ रुपये, (४) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, रायपूर- ५८५६ रुपये, (५) ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस, ऋषिकेश-१६,९५० रुपये, (६) लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली,-९,०४० रुपये (७) युनिर्व्हसिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायंसेस, नवी दिल्ली- ३६,०३० रुपये, (८) जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, पुडीचेरी-४२,००० रुपये, (९) मौलाना आझाद मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली- १७,३०० रुपये.
खाजगी महाविद्यालये
काही खाजगी महाविलयातील शैक्षणिक शुल्क पुढील प्रमाणे आहेत- (१) ख्रिचियन मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, वेल्लोर-१,५७,८८० रुपये, (२) एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायंसेस, धारवाड- १,९३,७४६ रुपये, (३) महात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेस, वर्धा-७,२१,३५० रुपये, (४) त्रिची एसआरएम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर, तिरुचिरापल्ली -१६,८४,००० रुपये,
(५) आर्मी कॉलेज ऑफ मेडिकल सायंसेस, नवी दिल्ली-१९,४४,५४० रुपये, (६) दयानंद मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल, सायंसेस, लुधियाना – २४,२५,२९७ रुपये, (७) सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज, बेंगळुरु -२८,७३,०००रुपये, (८) पीएसजी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंस ॲण्ड रिसर्च , करिमनगर -३९,६३,०००रुपये, (८) ख्रिचियन मेडिकल कॉलेज, लुधियाना-४०,५९.३६५ रुपये.(सूचना- हे आकडे गेल्या वर्षिचे आहेत.यंदा यात बदल होऊ शकतात)
सुरेश वांदिले
००००