व्हा गणितज्ज्ञ
गणित विषयात गती आणि आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुध्द गणिताचाच अभ्यासक्रम निवडायला हवा. गणितात श्रेष्ठ दर्जाचे करिअर घडवणा-या अपार क्षमता दडल्या आहेत.
गणित या विषयाचे महत्व सर्वकालिक असे आहे. गणिताच्या काठीण्य पातळीचा खूप गवगवा सतत होत राहिल्याने केवळ गणित या विषयात करिअर करण्याची इच्छा ठेवणाऱ्या मुला-मुलींची संख्या कमी होत गेली. विशेषत: प्रज्ञावंत मुले-मुली अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळत राहिली. त्यामुळे शुध्द गणिताच्या अभ्यासक्रमाकडे जाण्याची अशी तीव्र इच्छा दिसून येत नाही. गणित हाच विषय घेऊन संशोधन, अभ्यापन, विश्लेषण अशा विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्यातरीही गणितज्ज्ञच व्हावे असे वाटणाऱ्या मुलामुलींची संख्या अल्पप्रमाणात आहे.
बी.एस्सीच्या एका विषयापैकी एक विषय म्हणून गणित विषय घेतला जातो. गणित विषयाचाच अभ्यासक्रम चालवणाऱ्या नामवंत दर्जेदार संस्थांकडे वळणाऱ्या मुला-मुलींची संख्या अल्प राहिली आहे. आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान, वास्तुकला यांचा खरा पाया हा गणित राहिला आहे. वित्तीय व्यवस्थापन, अभियांत्रिकी आणि आता सामाजिक शास्त्राला वेगळया उंचीवर नेण्यात गणित आणि गणितज्ज्ञ महत्वाची भूमिका बजावत आहेत.
आयआयटी-मुंबई
पदव्युत्तर स्तरावर गणितामध्ये स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आयआयटीसह अनेक महत्वाच्या संस्थांमध्ये होते. तथापि पदवीस्तरावर गणिताला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम अल्प प्रमाणात आपल्या देशात चालवले जातात. अशा संस्थेमध्ये आता आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे.
मागील दोन वर्षापासून आयआयटी मुंबईने, बॅचलर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स (बी.एस इन मॅथेमॅमिटक्स) हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.
या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षाचा आहे. या अभ्यासक्रमाला जॉईंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन – अडॅव्हान्स्ड (जेईई–अडॅव्हान्स्ड) या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारचे गणितीय कौशल्य निर्मिती व्हावे या दृष्टिने या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
इतर अभ्यासक्रम
आयआयटी मुंबईमध्ये पाचवर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम संस्थेतील विद्यार्थ्यांना करता येतो. मात्र यासाठी विद्यार्थ्यांनी किमान एक वर्षे पदवी अभ्यासक्रमात व्यतित केलेला असावा. ज्या विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा असेल त्यांना डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्सला अर्ज करावा लागतो. प्रत्येक अर्जाच्या तपासणीनंतर प्रवेशाविषयी अंतिम निर्णय घेतला जातो. हा अभ्यासक्रम केलेले अनेक विद्यार्थी पुढे जगातील नामवंत शैक्षणिक संस्थांमधील पीएचडी अभ्यासक्रमासाठी निवडले गेले आहेत.
एम.एस्सी मॅथेमॅटिक्स- हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. एम.एस्सी इन ॲप्लाइड स्टॅटिस्टिक्स ॲण्ड इन्फर्मेटिक्स हा स्पेशलाइज्ड अभ्यासक्रमही चालवण्यात येतो. दोन्ही अभ्यासक्रमांना जॉईंट ॲडमिशन टेस्ट फॉर एम.एस्सी (जेएएम-जॅम) द्वारे प्रवेश दिला जातो.
संपर्क– डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स, आयआयटी बॉम्बे, पवई – मुंबई-४०००७६, दूरध्वनी- ०२२-२५७६७४५१,फॅक्स-२५७६७४५२ ईमेल- , head.math@iitb.ac.in, संकेतस्थळ- http://www.math.iitb.ac.in
000
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स
या संस्थेमार्फत बॅचलर ऑफ सायन्स (रिसर्च) इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम चालवता जातो. या अभ्यासक्रमाचा कालावधी- चार वर्षे.
अर्हता- गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयासह १२वी विज्ञान परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याला ६० टक्के गुण मिळायला हवेत. अनुसूचित जाती आणि जमातीसंवर्गातील विद्यार्थ्यांना ही मर्यादा केवळ उत्तीर्ण होण्यापुरतीच ठेवण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची निवड पुढील कोणत्याही एका परीक्षेतील गुणांवर आधारित केली जाते. (१) किशोर वैद्यानिक प्रोत्साहन योजनेतील फेलोशिपसाठी निवड, (२) आयआयटी जेईई-मेन परिक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याने ६० टक्के, एनसीएल(नॉन क्रिमी लेअर) – ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्याने ५४ टक्के, अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्याने ३० टक्के गुण मिळवायला हवेत. (३) आयआयटी जेईई ॲडव्हान्स्ड परिक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याने ६० टक्के, एनसीएल- ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्याने ५४ टक्के, अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्याने ३० टक्के गुण मिळवायला हवेत. (३) नीट (NEET-नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) – यूजी (अंडर ग्रॅज्युएट) परीक्षेत खुल्या संवर्गातील विद्यार्थ्याने ६० टक्के, एनसीएल- ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्याने ५४ टक्के, अनुसूचित जाती/जमाती आणि दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्याने ३० टक्के गुण मिळवायला हवेत. केंद्र शासनाच्या नियमानुसार जागा राखीव ठेवण्यात येतात.
संपर्क– असिस्टंट रजिस्ट्रार-ॲकेडमिक, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरु-५६००१२, दूरध्वनी-०८०-२२९३२२१०,फॅक्स-२३६०१४१३, ईमेल- ar@academic.admin.iisc.ernet.in, संकेतस्थळ- www.iisc.ac.in
किशोर वैद्यानिक प्रोत्साहन योजना आणि जेईईमधील गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात.
०००
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना १९३० करण्यात आली. गेल्या ९० वर्षात ही संस्था सांख्यिकी आणि गणित या विषयातील शिक्षण-प्रशिक्षण देणारी आणि संशोधनास वाव देणारी जागतिक संस्था म्हणून ख्यातकीर्त झाली आहे. या संस्थेचे हे अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन संसदेने विशेष अधिनियम पारित करुन या संस्थेस इन्स्टिट्युशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा प्रदान केला आहे. यामुळे या संस्थेस स्वतंत्ररीत्या पदवी आणि पदविका देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
अभ्यासक्रम-
(१) बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स)- कालावधी- तीन वर्षे. हा अभ्यासक्रम बेंगळुरु कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांसह १२ वी विज्ञान परीक्षा.
(२) मास्टर ऑफ मॅथेमॅटिक्स (ऑनर्स)- कालावधी- दोन वर्षे. हा अभ्यासक्रम कोलकता आणि बेंगळुरु कॅम्पस येथे शिकवला जातो. अर्हता- गणित विषयासह बी.एस्सी परीक्षा.
या अभ्यासक्रमांची संरचना अशा पध्दतीने करण्यात आली आहे की हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारास गणित, सांख्यिकी, संगणकशास्त्र, गणितीय भौतिकशास्त्र याविषयांमध्ये उच्च शिक्षण घेता येणे सुलभ जावे. गणित विषयाचा ज्या ठिकाणी थेट उपयोग केला जातो, तिथे विद्यार्थ्यांना करिअरची संधी तत्काळ मिळते.
शिष्यवृत्ती-
(१) बी.मॅथ- दरमहा ३ हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी ३ हजार रुपये. (२) एम.मॅथ- दरमहा ५ हजार रुपये आणि दरवर्षी पुस्तके व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार रुपये.
प्लेसमेंट
या संस्थेचे अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना पुढील ठिकाणी प्लेसमेंट्स मिळाल्या आहेत – अमेरिकन एक्स्प्रेस, ॲक्सिस बँक, एक्सए लाइफ इंशुरन्स, बीएआरसी इंडिया, बीसीएस टेक्नॉलॉजी, ब्लॅक रॉक, बार्कलेज शेअर्ड सर्व्हिस, कॅपिटल वन, सिटी बँक, क्रिसिल, सिटी कॉर्पोरेशन, डेलॅाइट, आयबीएम, आयसीआयसीआय, अर्न्स्ट ॲण्ड यंग, गोल्डमन सॅच, एचसीबीसी टेक्नॉलॉजी ॲण्ड सर्व्हिस, जे.पी.मॉर्गन, केपीएमजी, मॅकिन्सी, मीडिया नेट, मायक्रोसॉफ्ट, नॉव्हॅरटीस, निलसेन, पेट्रॅबाइट्स, रिलायन्स, सॅमसंग, स्टँडर्ड चार्टर्ड, टीसीएस ॲनालिटिक्स, टीसीएस इनोव्हेशन लॅब, युनायटेड हेल्थ ग्रुप, वालमार्ट,
प्रवेश प्रक्रिया
बी.मॅथ आणि एम.मॅथ- प्रवेशासाठी दोन चाळणी परीक्षा घेतली जाते. यामध्ये पहिली परीक्षा ही बहुपर्यायी वस्तुनिष्ट पध्दतीची आहे. दुसऱ्या परीक्षेत वर्णनात्मक प्रश्न विचारले जातात. बी.मॅथ प्रवेशासाठीच्या पेपर मधील प्रश्न १२ वीच्या गणितावर आधारित असतात. एम.मॅथ प्रवेशासाठीच्या पेपर मधील प्रश्न बी.एस्सी मॅथ (ऑनर्स) च्या स्तरावरील असतात.
गणित या विषयासह बी.ई किंवा बी.टेक किंवा या संस्थेची बी.स्टॅटिस्टिक्स आणि बी.मॅथ ही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना एम.मॅथ अभ्यासक्रमाला थेट प्रवेश दिला जातो.
इंटरनॅशनल मॅथेमॅटिकल ऑलम्पियाड ट्रेनिंग कॅम्पसाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेपासून सूट देण्यात येते. हे ऑलम्पियाड नॅशनल बोर्ड ऑफ हायर मॅथेमॅटिक्स, डिपार्टमेन्ट ऑफ ॲटोमिक एनर्जी यांच्यामार्फत घेतली जाते. मात्र या उमेदवारांना इतर उमेदवारांसारखेच अभ्यासक्रमासाठी अर्ज करावा लागतो. या उमदेवारांची अंतिम निवड ही मुलाखतीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर घेतली जाते.
संपर्क- इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, २०३ बरॅकपोर, ट्रंक रोड, कोलकाता – ७००१०८, दूरध्वनी -०३३-२५७५२५००, संकेतस्थळ- www.isical.ac.in , ईमेल- dean@isical.ac.in
००००