मानवी मेंदूचा विश्लेषणात्मक विकास करण्यात आणि त्याला अधिक सक्षम करण्यात गणिताची मदत होत असल्याचे, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. तान्या इव्हान्स यांनी त्यांच्या संशोधनाव्दारे दाखवून दिले आहे. गणितावर प्रभुत्व मिळवल्यास कोणतीही समस्या सोडवण्याचे कौशल्य हे अधिकाधिक प्रगत होत असल्याचे अभ्यासकांना दिसून आले आहे. गणितज्ज्ञ जेव्हा समस्या सोडवतात तेव्हा त्यात स्पष्टता असते. अधिक चांगल्या तऱ्हेच्या कार्यपध्दतीसुध्दा यातून विकसित होतात.
गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची रहस्ये शोधून काढण्यासाठी गणितीय सूत्रे आणि सिध्दांताचा सर्वाधिक उपयोग झाला आहे. गणित ही एकमेकव वैश्विक भाषा असल्याचे समजले जाते. कोणताही देश– भाषा- प्रांत-संस्कृती यामध्ये गणितीय सूत्रे आणि सिध्दांत आणि व्याख्या बदलत नाहीत, त्यामुळे गणितज्ज्ञ कोणत्याही देशात आणि प्रांतात सहजतेने कार्यरत राहू शकतो.
गणितावर प्रभुत्व असणाऱ्या व्यक्तीला करिअरच्या विविध संधी मिळतात. (१) वित्त (फायनांस), (२) निर्मिती (मॅन्युफॅक्चुरिंग), (३) विमा प्रंबधन (ॲक्चुरिज), (४) अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग), (४) दळणवळण (कम्युनिकेशन), (५) व्यवसाय (बिझिनेस), (६) विज्ञान (सायन्स) या क्षेत्रात यशस्वी करिअर करण्यासाठी गणितातील प्रभुत्व किंवा उत्तम आकलन महत्वाचे ठरते. ही क्षेत्रे परस्पर विरोधी दिसत असली तरी त्यांचा पाया गणितीय कौशल्य असतो, हे लक्षात ठेवायला हवे.
अभ्यासक्रम
(१) मुंबई आयआयटीमध्ये बीएस इन मॅथेमॅटिक्स चार वर्षे कालावधीचा अभ्याक्रम करता येतो.जेईई ॲडव्हान्सड गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. या शिवाय यंदा १२वीची परीक्षा दिलेल्या ज्या विद्यार्थ्यांनी इंडियन नॅशनल मॅथेमॅटिकल ऑल्मपियाडची कनिष्ठ किंवा वरिष्ठ अर्हता प्राप्त केली असेल ते, बीएस एन्ट्रन्स एक्झामिनेशनव्दारे प्रवेश मिळवू शकतात. संपर्क-math.iitb.ac.in.
(२) आयआयटी इंदौरने २०२३ च्या शैक्षणिक वर्षापासून, बीटेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग, हा अभ्यासक्रम सुरु केला आहे.हा अभ्यासक्रम आयआयटी दिल्ली, आयआयटी गौहाटी आणि आयआयटी रोपर येथही करता येतो.संपर्क- https://math.iiti.ac.in/programs/
(३) आयआयटी कानपूर येथे, बीएस-एमएस इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड सायंटिफिक कॉम्प्युटिंग, हा इंटिग्रेटेड आणि बीएस इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड सायंटिफिक कॉम्प्युटिंग, हा अभ्यासक्रम करता येतात.संपर्क- iitk.ac.in/maths
(४) चेन्नई मॅथेमॅटिकल इंस्टिट्यूट
या संस्थेत बीएस्सी(ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स, बीएस्सी (ऑनर्स) इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटर सायंस हे अभ्यासक्रम करता येतात.संपर्क-cmi.ac.in
(५) बेंगळुरु स्थित इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स येथे बी.एस (बॅचलर ऑफ सायन्स-रिसर्च) इन मॅथेमॅटिक्स हा चार वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम करता येतो. या अभ्यासक्रमास जेईई मेन/ ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांवर प्रवेश दिला जातो. संपर्क- ug.iisc.ac.in/math.
(६) कोलकता स्थित इंडियन स्टॅस्टिकल इंस्टिट्यूट या संस्थेचा, बॅचलर ऑफ मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम बेंगळुरु कॅम्पस यथे करता येतो. तीन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. निवड- संस्थेच्या चाळणी परीक्षेव्दारे. संपर्क- isical.ac.in/admission,
(७) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकशेन ॲण्ड रिसर्च या संस्थेतील बीएस-एमएस या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांतर्गत स्पेशलायझेशनसाठी गणित हा विषय निवडता येतो. संपर्क- iiser.ac.in
(८) एनआयटी सुरत- या संस्थेच्या डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स ॲण्ड ह्युमॅनिटिज मार्फत पाच वर्षे कालावधीचा इंटिग्रेटेड एम.एस्सी इन मॅथेमॅटिक्स हा अभ्यासक्रम चालवला जातो. प्रवेशासाठी जेईई- मेनचे गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क- https://www.svnit.ac.in
