त्याला असं कधी वाटलं नव्हतं की, एखादे दिवशी साक्षात भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, त्याचं खास कौतुक करतील. शाबासकी देतील. पण,ते प्रत्यक्ष घडलं. त्याने शोधलेला ‘व्हेमन’ मोदिजींना फार प्रभावित करुन गेला. ‘व्हेनम’चा तसा अर्थ ‘विष’. तुम्हाला वाटेल हा पठ्ठ्या ‘विषा’ची परीक्षा घ्यायला गेला तरी कशाला? पण ते बरंच नाही कां झालं? अहो, त्याने ‘व्हेनम’ शोधला म्हणूनच त्याची कीर्ती प्रधानमंत्र्यापर्यंत पोहचू शकलीना.
या पठ्याचं ‘व्हेनम’ म्हणजे नागोबा किंवा विंचवाच्या विषासारखं नाही, बरं का. हे किंवा हा ‘व्हेनम’ म्हणजे एक रोबो आर्म, म्हणजेच यांत्रिक खांदा आहे. हा यांत्रिक खांदा अगदी मानवी खांद्यासारखा हालचाल करु शकतो. एव्हढच काही त्याचं महत्व नाहीय. तर, हा रोबोटिक आर्म कोणत्याही आणि कुठेही लपवलेला बॉम्बचा झटदिशी शोध लावू शकतो नि त्याला तितक्याच झपाट्याने नष्टही करु शकतो.
या पठ्ठ्याला हॉलिवूडचे सिनेमे फार आवडतात. त्यातही तंत्र आणि विज्ञानावर आधारित सिनेमे तर त्याचा जीव की प्राण. या शौकातूनच त्याला या रोबोटिक आर्मची कल्पना सुचली. तसाही तो रोबो तंत्रज्ञानाने आधीपासून झपाटलेला होताच. आपल्या कल्पनेतल्या वेगवेगळया प्रकारच्या रोबोंची असंख्य रेखांकनं करणं, त्याचं प्रारुप म्हणजेच मॉडेल तयार करणं, त्यांना काम करता यावं म्हणून तंत्रज्ञानाची सांगड घालणं, असं बरचं काही तो वेड्यासारखा करत राहायचाच.
तो
पारुल विद्यापीठात, सध्या संगणक अभियांत्रिकीचा अभ्यास करतोय. त्यामुळे त्याला रोबो तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सर या सगळ्या गोष्टिचं ज्ञान होतच. पण, केवळ ज्ञान असून चालत नाही. हे ज्ञान जरा हटके, हललं डुललं पाहिजे म्हणजे काहीतरी अफलातून आणि नवं शोधण्याची प्रेरणा त्यातून मिळाली पाहिजे. त्याला तशी प्रेरणा मिळाली नि त्यातूनच दूरवरुन नियंत्रीत करु शकणाऱ्या रोबो आर्म ‘व्हेनम’ची निर्मिती घडली. या ‘व्हेनम’च्या निर्मितीसाठी त्याला आठ महिन्यांचा कालावधी लागला. या ‘व्हेनम’ निर्मितीच्या सर्व तांत्रिक बाबीवर त्याने लक्ष केंद्रित केलं, तर त्याच्या आईबाबांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असणारा निधी पुरवला.
या रोबो ‘व्हेनम’ला,विज्ञान आणि तंत्रज्ञान गटातील लिमिटलेस इंडिया यूथ हॅकथॉन स्पर्धेतल्या हजारो स्पर्धकांमधून पहिला क्रमांक मिळाला. या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यासाठी मोदिजी आले होते. तिथे त्यांनी ‘व्हेनम’ची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आयआयटी रुरकीच्या टेक्झिबिशन स्पर्धेतही ‘व्हेनम’ने बाजी मारली.
या यशाने फार वाहून न जाता, हा पठ्ठ्या आता नव्या प्रकल्पाच्या पाठिमागे लागलाय. भरधाव जाणाऱ्या गाड्यांवर लावू शकणारी ड्रोन विरोधक यंत्रणा त्याला निर्माण करायचीय. त्यातही त्याने बऱ्यापैकी आघाडी घेतलीय. त्याच्या मनातली ही कल्पना लवकरच साकारण्याची चिन्हे आहेत. ही यंत्रणा, ड्रोनने एखाद्या वस्तूचा किंवा यंत्राचा वेध घेण्याआधीचा ड्रोनचाच वेध घेऊन त्याला निष्फळ बनवू शकेल.
मोदिजींच्या कौतुकला पात्र ठरलेला हा पठ्ठ्या म्हणजे, अनिरुध्द नौटियाल. वय वर्षे २०. हल्ली मुक्काम वडोदरा.
सुरेश वांदिले