मालकीनबाई मार्गारेट मांजरमावशीला, सारख्या हिडीस फिडीस करतात. घालूनपाडून बोलतात. ते करताना त्याच त्या चार-पाच घिस्यापिट्या शब्दांचा वापर करतात.
बिळात लपून बसलेल्या रॉबिन्सन उंदीर मामाच्या कानावर या शिव्या पडत. त्याच त्या शिव्या ऐकून रॉबिन्सला जाम कंटाळा आला. त्याचे कान विटले. “स्वत:ला स्मार्ट नव्हे तर अतिस्मार्ट समजणारी मार्गी, कशी काय त्याच त्या शिव्या सहन करते? की तिची दाखवायची बुध्दी वेगळी, नि प्रत्यक्षातील बुध्दी वेगळी असेल का?” रॉबिन्सन स्वत:शीच पुटपुटला. त्याच्या लक्षात आपली चूक लगेच लक्षात आली. त्याने डाव्या पायाने स्वत:ला गालावर लगावली नि स्वत:लाच बजावलं, “गधडूद्दीन डोंग्य्रा, मार्गीची बुध्दी तेज आहे म्हणूनच तुझ्या सगळया प्रश्नांची उत्तरे ती देते नि मालकीनबाईला चुकवून तुझ्या खादडण्याची सोय करतेना. बरोबर बरोबर. मार्गे चुकलच माझं. तुझ्या बुध्दीवर संशय घेणं म्हणजे सूर्याच्या प्रकाशाला मेणबत्ती दाखवण्यासारखं. सॉरी!” असं म्हणून त्याने पुन्हा स्वत:च्या गालावर उजव्या पायाने लगावली.
कशावरुन तरी मालकीनबाई मार्गारेटवर पुन्हा त्याच कंटाळवाण्या शिव्यांसह खेकसल्या नि काही कामानिमित्त घराबाहेर पडल्या. जाताना धाडदिशी दरवाजा लावला. त्या बाहेर जाताच मामा बिळाच्या बाहेर आला. मावशी लहान तोंड करुन बसली होती. मामा पळतच किचनमध्ये गेला नि त्याने मावशीसाठी लोणी आणलं. मावशीला दिलं. मावशीला बरं वाटलं. तिचा चेहरा खुलला. हे बघून रॉबिन्सन तिला म्हणाला,
“अगं मार्गे मावशे, ही मालकीनबाई तुझ्यासारखी इंटेलिजंट नि स्मार्ट कां नाही? ”
“रॉब्या, तुला रे हा प्रश्न कां पडला?”
“मावशे, मालकीनबाई त्याच त्या दोन-चार शिव्या तुला देते. त्याचा तुला कंटाळा येत नाही का? मी तर जाम बोर झालोय बघ.”
“गधड्या, मालकीनबाईंनी मला खूप शिव्या द्याव्या अशी तुझी इच्छा आहे का? तशी इच्छा असेल तर, तुला गट्टम करण्याची, मी दाबून ठेवलेली इच्छा आधी पूर्ण करेन.”आपला जबडा दाखवत मावशी गरजली.
“सॉरी सॉरी मावशे, मला म्हणायचं होतं, या मालकीनबाईंना हे चारपाचच शब्द कां आठवतात बॉ? या मनुष्यप्राण्याला शब्द आठवण्याची नि साठवण्याची काही शक्तीबिक्ती किंवा क्षमता असेलना? हा माझा मूर्खासारखा प्रश्न असला तरी त्याचं उत्तर तर तुझ्याकडेच असणारच, माझे स्मार्टू मावशे!” रॉबिन्सन लाडाने मावशीची मिशी ओढत म्हणाला. समोर प्रश्न आल्यावर त्याला भिडलच पाहिजे हा मार्गारेटचा खाक्या असल्याने तिने मामाचा प्रश्न मनात घोळवला. डोळे मिटले. मेंदुला इकडे तिकडे दौडवले. क्षणात डोळे उघडून म्हणाली,
“रॉबिन्सनराव, मालकीनबाई जरा कमी किंवा अजिबातच स्मार्ट नसल्यानं त्यांच्या मेंदूत फार काही शब्द राहत नाहीत. शिवाय शिव्यांसारखे किंवा निषेध करणारे शब्द हे भाषेतील मूलभूत आणि भावनिक शब्द असतात. ते मेंदूच्या भावनिक प्रक्रिया नियंत्रित करणाऱ्या भागातून (लिंम्बिक सिस्टिम) निर्माण होऊन मुखावाटे पडतात. त्यासाठी उच्च भाषिक बुद्धिमत्तेची गरज नसते. त्यामुळे तणावाखाली असताना, लोक कमी विचार करून पटकन त्याच त्या भावनिक शब्दांचा वापर करतात.”
“याचा दुसरा अर्थ असा की, मालकीनबाईंच्या मेंदूत शिव्यांचा साठा मर्यादित असला तरी इतर स्मार्ट मनुष्यप्राण्याच्या मेंदूत असंख्य शब्द राहू शकतात म्हणायचं.”
“होरे माझ्या हुशार रॉबेश्वरा!”
“म्हणजे किती?”
“रॉबूद्दिन, मनुष्यप्राण्यातील काही अतिहुषारांना, ज्यांना इतर मनुष्यप्राणी संशोधक म्हणतात, त्यांना असं आढळलं की, अमेरिकेतल्या १६ वर्षांच्या मुलाच्या मेंदूत १० ते १२ हजार सक्रिय शब्दांचा संग्रह राहतो.”
“म्हणजे तो इतक्या शब्दांचा वापर करु शकतो. असचना.”
“अगदी बरोबर. हे झालं १६ वर्षांच्या मुलाचं. तर २२ किंवा २३ वर्षाच्या मुलांच्या मेंदूत २० ते २५ हजार सक्रिय शब्दांचा संग्रह राहतो.”
“पण हे कळलं कसं?”
“रॉबूसिंग, डेव्हिट क्रिस्टल या ब्रिटिश भाषातज्ज्ञाने त्यासाठी एक प्रयोग केला.
“काय केलं त्याने?”
“त्याने शब्दकोश फाडला.”
“कशासासाठी?”
“प्रयोगासाठी रे.”
“असा फाडफूड प्रयोग. अजबच म्हणायचा.”
“होना. तर या डेव्हीडने मग या फाडलेल्या शब्दकोशातील वेगवेगळी पाने मुलांना दिली. यातील किती शब्द त्यांना माहीत आहेत, याची बेरिज करायला लावली.”
“त्यातून काय सिध्द झालं?”
“मुलांना ६० ते ७५ हजार शब्द माहीत असल्याचं दिसून आलं.”
“वाव!”
“टाव! पण मग त्याच्या हेही लक्षात आलं की आपण फक्त शब्दकोशातल्या मूळ शब्दांचाच विचार करतो. पण या शब्दांचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, प्रत्यय लावून, विशेषण, क्रियाविशेषण लावून वेगवेगळी रुपं तयार होतात.”
“याने की, मुलांना माहीत असणाऱ्या शब्दांची संख्या ६० ते ७५ हजारांहून अधिक निघते असचना.”
“वा क्या बात है, आईनस्टाईनच्या सत्ताविशाव्या वंशजा. पण हे सगळे निष्क्रिय म्हणजे फारसे उपयोगात न आणणारे शब्द असतात.”
“पुढे काय झालं?”
“पुढे या डेव्हिड महाशयांनी त्यांचा निष्कर्ष ताडून पाडण्यासाठी आणखी एक प्रयोग केला.”
“या रिकामटेकड्याला दुसरा उद्योग नव्हता वाटतं.”
“अरे राबूप्रताप मुर्खेश्वरा, या संशोधकांच्या अशा रिकाटेकडपणाच्या उद्योगातून नवं नवं संशोधन बाहेर पडतं ना.”
“मग काय बाहेर पडलं?”
“डेव्हिड महाशयांनी एक पुस्तक घेतलं. त्यात दहा लाख शब्द होते. त्यातले त्याने मूळ शब्द शोधले. त्यावरुन, डेव्हिड यांचा निष्कर्ष बरोबर असल्याचं इतर संशोधकांच्या लक्षात आलं.”
“म्हणजे नेमकं काय झालं?”
“या मनुष्यप्राण्याला साधारणत: ३८ हजार शब्द माहिती असतात. बस्स.”
“मावशे असं जर असेल तर मालकीनबाईंचं डोकं फारच भंगार म्हणायचं. किमान दोन-चार हजार तरी शिव्या लक्षात ठेवा म्हणावं. किती दिवस त्याच शिळया शिव्या ऐकायच्या मी.” रॉबिन्सन बिळाकडे धूम पळत, मावशीला दात दाखवत म्हणाला.
मावशी मिशीला पिळ देत मनात पुटपुटली, “मालकीनबाईंच्या सक्रिय शब्दसंग्रहाला वाढवण्यासाठी शिव्यांची नवीन यादी मीच तयार करते नि उद्यापासून शिकवते त्यांना!”
सुरेश वांदिले