(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

एके दिवशी वर्ग सुरु असतानाच, त्याला कंटाळा आला नि तो आपला डेस्क वाजवू लागला. सरांनी मागे वळून बघितलं. आता या मुलाला चांगला ओरडा मिळणार असं इतर विद्यार्थ्यांना वाटलं, पण झाल भलतच. त्याला रागावण्याऐवजी सरांनी त्याची पाठ थोपटली, मस्त झक्कास वाजवलं असं कौतुक केलं. त्याच्यासह सगळा वर्ग चकित झाला. त्याच्या डेस्क वाजवण्यात सरांना वेगळी लय आणि सूर आढळले. त्यावेळी त्याचं वय होतं ५ वर्षे. त्याच्या बोटातली ही जादू सरांनी त्याच्या घरच्यांपर्यंत पोहचवली. मग त्याच्या बाबांनी त्याला ड्रम वाजवण्याच्या प्रशिक्षण वर्गात टाकलं.

तशी त्याला संगीताची पार्श्वभूमी लहानपणापासूनच मिळाली. त्याचे बाबा सॅम स्टिफन हे व्हायोलिन वादक आहेत. त्यामुळे त्याचं बालपण वेगवेगळ्या वाद्यांच्या सानिध्यातच गेलं. त्याचे काका हे उत्तम पियानो वादक असल्याने त्याने पियानो वाजवावं असं त्यांच्या बाबांना वाटायचं पण त्याची ड्रम मधील गती आणि आवड बघून काकांनीच त्याला पहिली ड्रम किट घेऊन दिली. त्याला ड्रम वाजवण्याची प्रेरणा अमेरिकन ड्रमर टोनी रॉयस्टर (ज्युनियर), स्टिव्ह स्मिथ, डेव्ह वेकल यांच्याकडून मिळाली. त्याने कर्नाटक आणि पाश्चिमात्य शास्त्रीय कंठ संगीत व इतर संगीत प्रकाराचं प्रशिक्षण घेतलं आहे.

वयाच्या सहाव्या वर्षी या पठ्ठ्याने सुप्रसिध्द ड्रमर शिवमणीसोबत एक जाहीर कार्यक्रमसुध्दा केला. शिवमणी त्याला गुरुसमानच आहे. त्यांच्याच प्रेरणा आणि प्रोत्साहनाने त्याने हैदराबाद येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल चिल्ड्रेन फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करुन सर्वांना मोहून टाकलं. सात वर्षाचा असताना तिरुपती येथे झालेल्या टेडेक्स(TEDEx)च्या कार्यक्रमात त्याने कला सादर केली.  वयाच्या दहाव्या वर्षी त्याने लंडन येथील ट्रिनिटी कॉलेजची ड्रममधील ग्रेड सातची परीक्षा उत्तीण केली. ही परीक्षा उत्तीर्ण करणारा तो सर्वात लहान ड्रमर ठरला.

संगीतातील ही प्रगती बघून त्याच्या वडिलांनी भक्तीपर आणि धार्मिक गाण्यांना चाल देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. ही गाणी चांगलीच गाजली. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचा अभ्यास करण्याची प्रेरणाही त्याला त्याच्या वडिलांनी दिली. त्याने लहान वयातच भारतीय संगीत वाद्ये आणि ड्रम यांचं फ्युजन करुन ऑनलाइन संगीत सादर करायला सुरुवात केली. हा प्रयोग अनेक ज्येष्ठ संगितकारांना फार आवडला. त्याचं नाव सर्वातोमुखी होऊ लागलं. त्याची दखल सुप्रसिध्द संगीतकार ए.आर रहेमान यांनी घेतली. त्यांच्या भारतीय शास्त्रीय बँड ‘झाल्ला’ साठी त्याची निवड केली. त्याचे आतापर्यंत हिंदी, इंग्रजी आणि तमीळमध्ये अल्बम निघाले आहेत. मानव्यशास्त्राचा अभ्यास सोडून त्याने आता ध्वनी अभियांत्रिकी शाखेची कास धरली आहे.

तो ड्रमर तर उत्तम आहेच. शिवाय उत्तम गातो, तो चांगला रेकॉर्डिंग कलावंतही आहे. त्याचं एक ख्रिस्ती गाणं, ‘टेन थाऊजंड’ हे खूप गाजलं. या गाण्याला २०१७ साली दहा दशलक्ष व्ह्युज मिळाले. त्याने २०१२ साली स्वत:च्या ‘सुपरकीड बँड’ची स्थापना केली. असा स्वत:चा बँड असणारा तो सर्वात लहान ड्रमर ठरला.

तर, असा हा स्टिव्हन सॅम्युअल देवास्से. वय वर्षे १९, हल्ली मुक्काम चेन्नई.

सुरेश वांदिले

०००