मालकीनबाई घरी नाही हे बघून मार्गारेट मावशीने बाहेर मोकळ्या हवेत फिरुन येण्याचं ठरवलं. तिने रॉबिन्सनला इशारा केला. तो काय, नेहमीच बाहेर उंडारायला तयार असायचा. नेपोलीयन डॉगीपासून संरक्षण करण्यासाठी मामाचा उपयोग ढालीसारखा मावशी करुन घ्यायची. घराबाहेर पडल्याबरोबर मावशीने याची, मामाला आठवण करुन दिली.
“राबू डिअर, तुला आठवण आहे ना.”
“कशाची गं मावशे?”
“अरे,तो नेपोटल्या बिपोटल्या माझ्यावर नजर ठेऊन असतो ना.”
“मावशे डोण्टवरी,नेपोटल्याच काय त्याच्या बापालाही, तुला आडवा जाऊ देणार नाही.ही ‘मो’ची नाही तर ‘मा’ची गॅरंटी हाय. हा हा हा! ”मामा डोळे मिचकावत म्हणाला. ‘मो’ नि ‘मा’ची भानगड काय, हे विचारण्याच्या फंदात न पडता मावशीने, मामाची पप्पी घेतली. दोघांची भटकंती सुरु झाली.
अचानक मामाचं लक्षं, इलेक्ट्रिकच्या तारावर बसलेल्या पक्ष्यांवर गेलं. मस्त मजेत ते पक्षी बसले होते. इकडूनतिकडून जात होते. हवेमुळे तार हललीकी तेही हलल्याडुलल्या सारखे वाटत. हे बघून रॉबिन्सनला गंमतच वाटली. तो मावशीला म्हणाला,
“मावशे, हे पक्षी लयभारी आहेत असं वाटत नाही का तुला?”
“राबू,मी सोडून मला कुणीच भारी वाटत नाही. हा हा हा!” मावशी शेपूटवर करुन फिस्सकन हसून, मामाचा चिमटा काढत म्हणाली. मामा,ओय ओय करुन ओरडू लागला.
“मावशे जरा दयामाया दाखव की.”
“माम्या,मी दाखवते दया म्हणूनच तुझ्यावर करते माया, माझ्याशिवाय कुणीच भारी नाही हे विसरु नको राया.”
“मावशे,तू जर एव्हढीच भारी आहेस, तर मग पक्षी बसलेल्या तारांवर चढून दाखव बरं.”
“राब्या,हे चॅलेंज समजायचं का?”
“यस्स!”
“हा हा हा!”
“काय झालं?”
“ही हू है हा!”
“मावशे, असं खिदळायला काय झालं?”मामानं गोंधळून विचारलं.
“रॉबेटल्या,हे चॅलेंज स्वीकारायला मी काही मूर्ख नाही.हा हू हा हू!”
“आँ!कां बुवा?”
“गधड्या,त्या इलेक्ट्रिकच्या तारांचं एक गुपित मला ठाऊकाय ना.”
“म्हणजे पुन्हा भानगड!”
“भानगड नाही गधड्या,त्या तारातली गडबड.”
“मला सांग की.”
“सांगते ना.आधी तू त्या भूर्जीपाववाल्याच्या दुकानातून माझ्यासाठी भूर्जी आण जरा.भूर्जी माझ्या पोटात, मेंदू चालेल जोरात… गुपित येईल ओठात, शिरेल तुझ्या डोक्यात. समजलं”
मावशीला, मनातल्या मनात शिव्या हासडत मामा भूर्जीपाववाल्याच्या दुकानात हळूच शिरला. दुकानदाराचा डोळा चुकवून भूर्जी तोंडात टाकणार तोच, त्याचे लक्ष मामाकडे गेल्यानं तो जोरात ओरडला. मामा घाबरुन पळू लागला. ते बघून मावशीही त्याच्यापाठीमागे पळत सुटली. पळताना मामांचं भान राहिलं नाही. त्यामुळे तो एका डबक्यात पडणार, तोच मावशीने त्याची शेपटी पकडली नि त्याला पडू दिलं नाही.
“गधड्या, डोळे उघडे ठेऊन तरी पळना. या डबक्यात इलेक्ट्रिकची तार पडलीय. त्याचा शॉक लागून तू गेला असतास, पंधराच्या भावात!”
घाबरलेल्या मामाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्या छातीत धडधड होत होती. ते बघून मावशीने त्याला एका झाडाचा आडोशाला नेलं. त्याला प्रेमानं थोपटलं. मामा थोडा शांत झाल्याचं बघताच मावशी सुसाट वेगानं भूर्जीवाल्याच्या दुकानाकडे पळाली. दुकानदाराची नजर चुकवून तिने भूर्जी तोंडात पकडली नि पुन्हा सुसाट वेगाने मामाकडे पोहचली. मामाला एक तुकडा तिने दिला. भूर्जी पोटात गेल्यावर मामास तरतरी आली.
“मावशे,यू आर ग्रेट, तू होतीस म्हणून मी वाचलो. पण मला एक कळलं नाही, इलेक्ट्रिक तारामुळे, मी जर ‘पंधराच्या’ भावात जाणार असं तू म्हणालीस,मग इलेक्ट्रिकच्या तारांवर मजेत बसणारे पक्षी किमान ‘बारा’च्या भावात नको का जायला?त्यांना काहीच कसं होत नाही?”
“मामू तेच तर सिक्रेट आहेना.”
“आता सांग बघू, खूप झाली तुझी मस्करी”
“रॉब्या,हे पक्षी या तारांवर जसे आरामात बसू शकतात, तसं तू आणि मी बसू शकत नाही.”
“अगं, आपलं नाही, पक्षांच विचारलं मी.”
“तेच सांगतेय गधडया. हे पक्षी इलेक्ट्रिकच्या म्हणजेच विजेच्या तारांवर आरामात बसू शकत असल्याने, या तारांतील इलेक्ट्रानचा प्रवाह, कमीतकमी विरोध होणाऱ्या बाजूने म्हण किंवा रस्त्याने म्हण जातो”
“अरे वा वा!”
“राब्या काय वावा! तुझ्या पिटुकल्या मेंदुत शिरतय कां काही. सारखा मध्येमध्ये करतोस.”
“मावशे मी इटुकला, माझा मेंदू पिटुकला, तसे ते इलेक्ट्रॉन थिटुकले नाहीत का? त्यांच्यातील शक्ती माझ्या लक्षात आलीय म्हणून वावा वावा!”
“वावा! मामू तू इलेक्ट्रॉनची शक्ती, बरोबर ओळखलीस हं. अरे, हे हुषार इलेक्ट्रॉन सोप्या मार्गाने बाहेर जात असताना, पक्ष्यांच्या पायाजवळ पोहचतात, तेव्हा त्यांना दोन वेगवेगळया वाटा दिसतात.”
“मग काय होतं?”
“हे इलेक्ट्रॉन काही क्षणासाठी विचारात पडतात.”
“कशासाठी?”
“पक्ष्यांच्या पायांमधून पुढे जायचं की तारेतूनच जायचं.”
“मग?”
“पण, हे इलेक्ट्रॅान इंटेलिजन्ट असल्याने त्यांच्या लगेच लक्षात येतं की, पक्षांचे पाय हे तारेसारखे, चांगले विद्दूत वाहक नाहीत. त्यांच्या पायातून गेलो तर गडबड व्हायची.”
“कसली गं?”
“अरे, या इलेक्ट्रॉन्सना, पुढे सहज आणि सरळ जाण्यात अडथळा आणि विरोध निर्माण होऊ शकतो.”
“म्हणजे भानगडच की.”
“तसच समज. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स पक्ष्यांच्या पायातून जाण्याचा प्रयत्नही करत नाहीत. तारांमधूनच पुढे जातात.समजलं”
“याचा अर्थ, पक्ष्यांच्या शरीरात विजेचा प्रवाह शिरत नाही. त्यामुळे त्यांना काहीही होत नाही.”
“अगदी बरोबर.”
“मग मावशे, मी चढून बघू का या तारेवर. त्यावर बसून झुला घ्यावा वाटतो गं.”
“रॉब्या, मलासुध्दा तशीच इच्छा होतेय रे.”
“मग, चांगल्या कामाला उशीर कशाला.चल की झटपट. चढू पटपट”
“पडू मटमट.”
“ही काय कटकट.”
“रॉब्या, आपणास जर या पक्ष्यांसारखं केवळ आपले पायच तारेवर ठेऊन दुसऱ्या कशालाही स्पर्श न करता बसता आलं असतं तरच आपण सुरक्षित राहू. मात्र आपला स्पर्श जवळच्या फांदिस किंवा तारेच्या खांबास झाल्यास,आपलं काही खरं नाही.”
“म्हणजे काय होऊ शकतं आपलं?”
ब“मामू, आपला स्पर्श झाडाच्या फांदिला किंवा तारेच्या खांब्यास झाल्यास त्यातून आपला स्पर्श खालच्या जमिनीला होतो. विजेच्या तारेपेक्षा कमी विरोध असलेला हा नवीन मार्ग वीज प्रवाहास सापडतो. त्यामुळे तो विजेच्या तारेला सोडून हा नवा रस्ता पकडतो नि आपल्या शरीरात शिरतो. त्याचा आपणास चांगलाच धक्का बसतो. शिरलयं का तुझ्या इटुकल्या मेंदूत.”
“मावशे, फक्त वीज वाहून नेणारी तार असले तर नो डेंजर!”
“बरोबर!”
“मात्र, या तारेतून जाणाऱ्या विजेला जमिनीपर्यंत पोहचण्यासाठी कमी विरोधाचा मार्ग मिळाला तर व्हेरी डेंजर”
“क्या बात है. लय हुषार हो माझा मामू,” मार्गारेट , मामाचा गालगुच्चा घेत म्हणाली.
“मावशे, एक आयाडिया माझ्या इटुकल्या मेंदूत आलीय.”
“आता काय?”
“आपण मालकीनबाईंना या तारेवर बसायला सांगितलं तर?”मामा डोळे मिचकावत म्हणाला.
“असे दिवा स्वप्न बघायला वीज थोडीच लागते मामू. हा हा हा!”मार्गारेट मामाची मिशी ओढत म्हणाली.
सुरेश वांदिले
“”