संकल्प आणि सिध्दी
सध्याच्या आत्यंतिक स्पर्धेच्या काळात मनाजोगत करिअर करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असले तरी त्यासाठी निर्धारपूर्वक
प्रयत्न करायला हवा. खूप हुषार की किमान बुध्दीमत्तेचा असो, कुणाचीही स्पर्धेपासून
सुटका नाही. ही बाब एकदा पक्की लक्षात घेतली की मग सर्व बुध्दिमत्ता आणि कौशल्य पणाला
लावून प्रयत्न केल्यास ठरवलेले उद्दिष्ट गाठता येणे शक्य होऊ शकतं.
करिअरची निवड
करिअरची निवड, हा प्रत्येक तरुणाचा अत्यंत
महत्वाचा निर्णय असतो. हा निर्णय त्यांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पाडत असतो. आपण
कुठे राहणार, काय करणार, किती उत्पन्न मिळणार, जीवनशैली कोणती राहणार या सर्वबाबी
कोणते करिअर निवडू किंवा नोकरी- व्यवसाय करु याच्याशी निगडित असतात.
दोन तीन दशकांपूर्वी करिअरसंबंधी जी स्थिती अवतीभवती होती, तशी आता
राहिलेली नाही. कारण जगातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.
यासाठी तंत्रज्ञान, दळणवळण आणि संपर्क साधनात झपाट्याने झालेल्या व दरदिवशी होत
असलेल्या प्रगतीचा मोठा हातभार लागत आहे. त्याचे प्रतिबिंब करिअच्या बदलत्या
स्वरुपात झालेले दिसते. हे बदल आजच्या तरुणांनी व्यवस्थित समजून घेतले तर त्यांना करिअरच्या
दिशा ठरवणे व त्यानुसार आपली व्यूहनीती ठरवणे सोपे जाउु शकते.
समाधान आणि आनंद
करिअर निवडीचा निर्णय घेताना आपला आनंद, समाधानासोबतच समंजसपणे व सर्व
बाजूंचा विचार करुन घेतलेल्या निर्णयाबद्दल नंतर कोणताही किंतु – परंतु मनात न
ठेवणे हे सुध्दा महत्वाचे ठरते.
आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिकपणे व निष्ठने नोकरी-व्यवसाय करणाऱ्या
अनेक व्यक्ती भेटतात. मात्र त्या नोकरी/व्यवसायात आंनदी, खुष आणि समाधानी असतीलच
असे नाही. त्यांच्यासाठी ते एक नित्यकर्म असते. त्यामुळे जेव्हा करिअरचा विचार
करतो तेव्हा त्यामध्ये आपली बुध्दी, सर्जनशीलता आणि परिश्रम यांना ओतावे लागते. या
सर्व बाबींमधून आनंद मिळाला तरच कार्यक्षमता आणि उत्पादकक्षमता वाढू शकते.
त्यामुळे करिअर निवडीचे सुयोग्य नियोजन हवे.
बदलांचा प्रचंड वेग
स्वातंत्र्योत्तर काळात भारतात प्रचंड बदल झाले. गेल्या दशकात या
बदलांचा वेग प्रचंड होता. जगातील सर्वात वेगाने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेपैकी
आपला देश असल्याचे आता सर्वमान्य झालेय. भारताची मोठी लोकसंख्या ही एक संधी
असल्याचे अर्थकारणात गती असणाऱ्या तज्ज्ञाचे सांगणे आहे. त्यामुळे आपल्या देशात
नित्य नव्या नव्या करिअर संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या संधीपैकी कोणत्या
हस्तगत करु शकतो याकडे डोळसपणे लक्ष द्यायला हवे. आधीच्या पिढीकडे करिअरच्या संधी
आणि पर्याय मर्यादित होते. मात्र सध्या तशी स्थिती नाही.
एकच नोकरी वा व्यवसायात राहण्याची आजच्या तरुणांची मानसिकता नाही.
बदलामुळे वेगाने प्रगती साध्य करता येते, असे आजच्या तरुणाईला वाटते. त्यात बऱ्याच
अंशी तथ्य सुध्दा आहे. मात्र त्यासाठी स्वत:ला सतत स्वत:ला अपडेट ठेवणे, नवे
कौशल्य आत्मसात करणे, ज्ञानात भर घालत राहणे, नव्या तंत्रज्ञानाला हस्तगत करणे
गरजेचे झाले आहे. हे ज्या तरुणाला जमणार नाही त्याला करिअर संधी मिळणे जसे अवघड
राहील त्याचबरोबर मिळालेली संधी टिकवणे सुध्दा त्याहून अवघड जाऊ शकते. शिवाय स्थिर
नोकरी/व्यवसायपेक्षा अधिक प्रगतीसाठी नव्या संधींचा शोध घेणे यात बऱ्यापैकी
धोकासुध्दा राहू शकतो. तो धोका स्वीकरण्यासाठी मानसिक तयारी हवी. घरच्यांचे
पाठबळसुध्दा हवे. स्वत:चा व्यवसाय/स्टार्टअप सुरु करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या
तरुणांनी अपयशाची मानसिक तयारी करुन ठेवणे आवश्यक ठरतं. कोणते करिअर निवडावे वा
निवडलेलं करिअर सोडावे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत पर्याय असला तरी ते करताना
स्वत:मधील अंगभूत क्षमता सुध्दा लक्षात घेणे गरजेचे असते. त्या लक्षात घेतल्या
नाही किंवा स्वत:च्या क्षमतांबद्दल जास्त अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षाभंग कधीही होऊ
शकतो, ही बाब लक्षात ठेवायला हवी.
व्यकिमत्वाची अंर्तबाह्य ओळख
आपल्या व्यक्तिमत्वाची अंर्तबाह्य ओळख स्वत:ला असणे गरजेचं आहे.
त्यामुळे आपल्या क्षमता आणि कमकुवत बाजू दोन्हींचा चांगला परिचय होऊ शकतो. करिअरची
दिशा ठरवताना त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर स्वत:च्या व्यक्तिमत्वामध्ये काही बदल
घडवून आणणे शक्य होते.
कौशल्यात वाढ
आपल्याकडे काही कौशल्य असतात. मात्र काही व्यक्तिंकडे अधिक कौशल्य
असतात. प्रत्येक नोकरी/व्यवसायासाठी काही मूलभूत कौशल्याची गरज भासते. ही कौशल्ये
प्राप्त करणे आणि त्यात गती मिळवणं हे स्पर्धेच्या काळात गरजेचे आहे. कोणतेही
कौशल्य हे प्रयत्नपूर्वक हस्तगत करता येते. तुमच्याकडे कोणती पदवी किंवा पदविका
आहे यावरच काही चांगले करिअर सध्याच्या काळात घडू शकत नाही, ही बाब लक्षात ठेवायला
हवी. त्यामुळे स्वत:स हव्या असलेल्या किंवा ज्याचा आराखडा मनात तयार आहे, अशा
करिअरसाठी कोणत्या कौशल्याची गरज भासते, याचा शोध घेऊन ते कौशल्य प्राप्त
करण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात करायला हवी.
आपल्या करिअरविषयी स्पष्टता सुध्दा असणे आवश्यक आहे. कोणत्या संस्था
वा कंपनीत आपणास नोकरी हवी, आपणास प्रगतीच्या कोणकोणत्या संधी अशा कंपनीमध्ये मिळू
शकतात. कंपनीला कोणत्या ज्ञानकौशल्याची अधिक गरज आहे, कंपनीच्या सक्षम बाबी
कोणत्या आणि कमकुवत बाबी कोणत्या, कंपनीचे स्पर्धक कोण या सर्व बाबी लक्षात घेणे
वा जाणून घेणे आवश्यक ठरते. एखादी कंपनी किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेपेक्षा फक्त
नोकरी महत्वाची असे जर एखाद्याने ठरवल्यास त्यासाठी विविध पर्याय राहू शकतात. पण
एखाद्याने कंपनी वा संस्थेच्या प्रतिष्ठेला अधिक महत्व दिल्यास त्याला मिळणाऱ्या
संधी कमी होऊ शकतात. याबाबतची मनोभूमिका स्पष्ट असल्यास, ठरवलेलं उद्दिष्ट साध्य
करताना मानसिक गोंधळ राहत नाही.
वेगळा विचार
सध्याच्या काळात केवळ जीवन जगण्यासाठीच नोकरीची आवशक्यता असते असे
मागासलेपणाचे समजले जाते. करिअरसोबत अंगभूत गुणांचा विकास आणि आवडीला वाव याचा मेळ
कसा बसवता येईल याकडे लक्ष द्यायला हवं. सर्वांनाच असे साध्य करता येईल असे जरी
शक्य नसले तरी, ज्यात आनंद व समाधान मिळेल अशा करिअरचा विचार प्राधान्याने करायला
हवा. पगार किंवा मिळणारे फायदे एवढ्याच मर्यादेत नोकरीचा विचार करणे बरेचदा
नैराश्य आणत असते. संबंधित कंपनी वा संस्थेमध्ये अधिकाधिक शिकायला मिळणे, नव्या
संधी मिळणे, नव्या जबाबदारी मिळणे हे स्वविकासासाठी आवश्यक ठरते. सध्याच्या काळात
कार्यरत मनुष्यबळास वरच्या दर्जाच्या नोकऱ्या प्रयत्न केल्यास मिळू शकतात. मात्र
त्यासाठी स्वत:चे सुयोग्य विश्लेषण करणे आणि फायदे आणि तोट्याचे गणित पक्क करणे
आवश्यक ठरते. मर्यादित लाभ मिळत असल्यास, बदलाचा विचार करणं श्रेयस्कर ठरेलच असे
नाही. पण हे लाभ मोठे असतील आणि प्रगतीच्या आणखी संधी मिळत असतील तर बदल स्वीकारणे
श्रेयस्कर ठरते. सध्या कार्यरत असणाऱ्या कंपनी/संस्थेला दुखवून बाहेर पडणे योग्य
ठरत नाही. कारण त्यामुळे परतीचे मार्ग आपण स्वत:च बंद करुन टाकत असतो.
वेगळपण सिध्द करा
सध्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वत:चं वेगळपण सिध्द करणे
गरजेचे आहे. हे केले की आपली आवशक्यता कायम भासत राहते किंवा नव्या प्रकल्पासाठी
संधी देताना पहिली पसंती मिळू शकते.
नोकरी मिळत नसेल वा मनासारखे करिअर घडवता येत नसेल तर त्यासाठी
परिस्थिती किंवा नशिबाला दोष देण्यात अर्थ नसतो. स्वत:मधील कमतरताच आपल्याला
संधींपासून दूर नेत असते, ही बाब लक्षात
ठेवायला हवी. त्यामुळे आपले दोष कोणते, याचा सतत शोध घेत राहून ते वेळोवळी दुरुस्त
करणे महत्वाचे ठरते. यशाची निर्मिती मनात होते, पण आपले कार्य एवढयापुरत मर्यादित
ठेऊन चालत नाही. या संकल्पित यश प्राप्तीसाठी परिश्रम आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची
गरज असते.
०००