सच्चा–झुठा
मंगळावर पुन्हा एकदा मानवाचं यान पोहचलं.पृथ्वीतलावर आनंदी आनंद जाहला.वरच्या मंगळालाही आनंद झाला.मात्र पत्रिकेतील मंगळ खिन्न झाला. ज्योतिष महाराजांना पत्रिकेवरील मंगळाची फार काळजी.कारण म्हणे,हा मंगळ अमूक अमूक घरी असला तर बोंबला. तो तिथे अमंगळ.पण मुकेशभाईंच्या किंवा अनिल भाईंच्या किंवा अमिताभ दद्दूंच्या घरी कुणी जन्म घ्यावा हे जसं सांगता येत नाही.तसं पत्रिकेत मंगळाने मंगलमय घरीच वास्तव्य करावं असंही कुणाला सांगत यायचं नाही.तो त्याच्या मनाचा राजा.शिवाय पायलीचे पन्नास लाख सटरफटर शोध लावण्याचा पराक्रम गाजवणाऱ्या मानवानं,अमंगल घराकडे निघालेल्या मंगळाला उचलून मंगलमय ठिकणी त्याचं प्लेसमेंट करण्याचं शास्त्रसुध्दा डेव्हलप केलं नाही,एवढया लाख भर वर्षांत.
पत्रिकेतील मंगळाचं अंमलगत्व हे शुभविवाहाशी नाजुकरित्या जोडल्या गेलय.संभाव्य नवरा नवरीच्या पत्रिकेतील त्याचं अमुक तमुक घरी असणं किंवा नसणं हे शुभविवाहाच्या आड जाणारी कधी मांजर कधी बोका तर कधी लांगडा ठरत आलय.मांजर आडवी गेली तर सात पावलं मागं गेलं की तिच्या आडव्या जाण्यामुळे निर्माण होऊ पाहणारा वाईट्ट प्लस इफेक्ट दूर होतो.(बोका नि लांडग्यांबद्दल असं काही ऐकिवात नाही.)पण मंगळाला पत्रिकेतून काही सात घरे मागे जा असं तर म्हणू शकत नाही.पत्रिका म्हणजे बुध्दीबळाचा डाव नव्हे की मांडली पत्रिका आणि नेले त्यास सात घर मागे त्यास.
पत्रिकेतील मंगळरावांचे विशिष्ट घरात असणे आणि नसण्यामुळे मॅरेज ऑर मेड इन हेवन्स या म्हणण्याला तसा काहीच अर्थच नाही.ही शुध्द लोणकधी थाप ठरते.खरं तर मॅरेज ऑर मेड किंवा ब्रेक इन (पत्रिकेतील)मार्स असं तिकडे शेक्सपियर आणि इकडे कालिदास या दोघांनाही कां सुचलं नाही.हा प्रश्नच आहे.
असो,तर पत्रिकेतील मंगळरावांच्या जरा इकडे तिकडे असण्याने किती ह्रदय कमळे कोमेजून गेली असतील.लग्न म्हणजे दोन ह्रदयांचं जुळून येणारं गीत गुंजन पण मंगळरावांच्या कथित प्रतापामुळे ते साध्य होत नाही.त्यामुळे अनेक दोन जीव एकत्र येऊ शकत नाहीत.त्यामुळे तिसरा जीव निर्माण होऊ शकत नाही.हा तिसरा जीव कदाचित भविष्यात उत्तम शास्त्रज्ञ असू शकतो. कदाचित तत्वज्ञ,कदाचित नट असू शकतो.कदाचित लेखक ,कदाचित एखादे ऍ़डव्हान्स्ड बापू–बुवा–महाराज–बाबा असू शकतो.पण हे सारं होऊ शकत नाही.कारण मंगळरावांचं नको त्या घरातलं असणं.हे त्याचं असणं केवळ ज्योतिष महाराजांनाच कळतं.तो तिथेच कां हा प्रश्न विचारणार कुणाला?हिटलर साहेबांना एखादा प्रश्न विचारण्यासारखचं हे.शिवाय मंगळ काळा की गोरा हे ज्योतिष महाराजांनाही माहीत नसतं.
मंगळरावांमुळे अनेक घरं बसू आणि वसू शकली नाहीत.संसार फुलू शकले नाही.ही कथित करणी पत्रिकेतील मंगळाची पण दोष मात्र वरच्या मंगळाला. एवढया वर्षात वरचा मंगळ खरोखरच अशा काळ्या कर्तृत्वाचा आहे का हे मानवानं जाणून घेतलं नाही.आता ही संधी आली आहे.मंगळावर मानवाचं यान पुन्हा एकदा उतरलं.हे यान मंगळाच्या अंतरंगाचा शोध घेईल.पत्रिकेत धुमाकूळ घालणारा मंगळ आणि हा वरचा मंगळ एकच की दोन की जुळे भाऊ की सावत्र भाऊ की काका पुतणे की मामा भाचे की डबल रोल की क्लोन याचा शोध घेता येणे शक्य होईल.
पत्रिकेतला मंगळ जर मानवी जीवनात इतका दखल देऊ शकतो तर मग खराखुरा मंगळ पृथ्वीची वाटच लावेल ना.पण तसे काही चिन्ह दिसत नाहीत.जी काही माहिती आलीय त्यावरुन तो बिच्चाराच वाटतोय.धुळीने माखलेला.भुकेलेला.तहानलेला.बेंगरुळ.खिन्न.असांस्कृतिक.आपल्या भावविश्वात दखल देऊन संपूर्ण कायापालट करणाऱ्या एखाद्या प्रेषिताची वाट बघत असलेला.असा हा मंगळ.व्हिटॅमिन्स,प्रोटिन्स ,कार्बोहायड्रेटस,फॅटस याचा अभावाने निस्तेज आणि कुपोषित झालेला.असा हा दुर्बळ मंगळ एका कागदाच्या तुकडयावर कसा काय प्रबळ होऊ शकतो.तेच तर हा वरचा मंगळ शतकानुशतके सांगत असला पाहिजे.की बाबांनो तो मी नव्हेच.पत्रिकेतील मंगळ कुणीतरी दुसराच तोतया.सदाशिवरावांसारखा.खऱ्या मंगळाचं रुप–स्वरुप पुर्णांशने समोर येइलच कधीतरी तो पर्यंत पत्रिकेतील तोतया मंगळाने आपलेरुप बदवलेलं नाही म्हणजे झाले. ज्योतिषमहाराजांनी त्याचा मृत्यू झाल्याचे किंवा तो कायम स्वरुपी अलकनंदेच्या तीर्थयात्रेला प्रस्थान करता झाला असे सांगू नये,म्हणजे मिळवले.