जेव्हा त्याच्या वयाची लहानमुलं व्हिडिओ गेम बघत किंवा खेळत तेव्हा तो वेगवेगळ्या विषयांवरील डाक्युमेंटरिज (माहितीपट) बघायचा. विशेषत: समुद्राशी सबंधित माहितीपट त्याला खूप आवडत. एकदा त्याने व्हेलमाशाच्या मृत्यूचा माहितीपट बघितला. तेव्हा प्रचंड हादरला. त्या व्हेलचा मृत्यू झाला होता, त्याच्या अन्ननलिकेत अडथळा निर्माण झाल्याने. ते झालं होतं, त्याच्या पोटात गेलेल्या प्लॅस्टिकमुळे. जेव्हा डॉक्टरांनी व्हेलच्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी त्याचे शवविच्छेदन केले, तेव्हा त्यातून १८ किलो प्लॅस्टिक आढळले.
मनुष्यप्राणी प्लॅस्टिकचा अनिर्बंध वापर करुन समुद्रातील प्राण्याचा जीव किती धोक्यात टाकतोय हे त्याच्या लक्षात आलं. त्याच्या संवेदनशील मनाला व्हेलचा मृत्यू फारच लागला. पण केवळ हळहळ व्यक्त करुन काय उपयोग? ते अनेकजण करतात नि गप्प बसतात. पण त्याने ठरवलं की आपण समुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा शोधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. याचाच विचार दिवसरात्र करत असतानाच त्याचे लक्ष घरातील भांडे धुण्याच्या बेसिनकडे गेले. त्यातील पाणी बाहेर पडण्याची साधी यंत्रणा आपल्याला समुद्रातील तळातील प्लॅस्टिक कचरा बाहेर खेचून घेण्यासाठी उपयोगी ठरु शकेल, असं त्याला वाटलं. त्याने आपल्या कल्पनेनुसार त्याची एक प्रतिकृती (नमुना) तयार केली. ते एक साधे जहाज होते. त्याने त्याला नाव दिलं एरव्हीस! हे जहाज हायड्रोजन आणि अक्षय नैसर्गिक वायूवर चालणारे होते. जहाजाभोवती असंख्य कप्पे आणि ताटल्या होत्या. पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणाऱ्या त्या ताटल्या भोवरा तयार करुन कचरा हळूहळू मध्यभागी खेचतात. या प्रकल्पात तीन टप्पे होते. पहिल्यात समुद्रातील कचरा गोळा करायचा होता, दुसऱ्यात हा कचरा नेमका कुठून आला याचा शोध घ्यायचा होता तर तिसऱ्यात हा कचरा समुद्रात येण्याआधीच त्याला अडवायचे होते.
२०१६ साली ही कल्पना त्याने मांडली. तेव्हा तो चौथित शिकत होता. सध्या हा प्रकल्प शैक्षणिक स्वरुपातच आहे. पण तरुणांमध्ये, समुद्रावर होणाऱ्या प्लॅस्टिकचे भयावह परिणाम आणि प्रदूषणाबाबात जाणीव जागृती करण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरला आहे. त्याने या प्रकल्पाविषयी माध्यमांतून समजावून सांगितले. त्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. टेडेक्स (टेक्नॉलॉजी,एंटरटेनमेंट आणि डिझाइन)च्या व्यासपीठावर ही संकल्पना सादर करण्याची संधी त्याला देण्यात आली. अशी संधी मिळणारा तो सर्वाधिक कमी वयाच्या तरुणांपैकी एक ठरला. तो विलक्षण प्रतिभावान मुलगा असल्याचे अनेकांच्या लक्षात आले.
तो सध्या पर्यावरण योध्दा म्हणून जगभर ओळखला जातो. त्याने एरव्हीस फाऊंडेशनची स्थापन केली असून त्याव्दारे समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध काम करतो.
हा योध्दा आपल्या महाराष्ट्राचा. प्रारंभीचे शिक्षण इथेच झाले. २०२४ साली तो पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेला. कनेक्टिक हॉचकिस शाळेत शिकू लागला. सध्या बर्लकले येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे डाटा सायंस संशोधक म्हणून एनिग्मा नावाच्या डाटा विश्लेषण व व्हिज्युअलायझेशन प्लॅटफॉर्मवर काम करतो. याच्या साहाय्याने सूक्ष्मजीवांचा अभ्यास त्याला करता येतो.
अभ्यास आणि संशोधन कार्याशिवाय २०१९ सालापासून मोटवाणी जडेजा फाऊंडेशनचा कार्यकर्ता म्हणूनही सहभागी होतो.
तर, असा हा हाझिक काझी. वय वर्षे १९. मूळ पुण्याचा, हल्ली मुक्काम बर्कले (अमेरिका)!
सुरेश वांदिले