समुद्रातील गुप्तधनाचा शोध
उन्हाळ्याच्या सुटीत धम्माल गंमत आणि जंमत करायची असं तेजोमयीनं ठरवलं होतं.
धम्माल करायचं म्हणजे काय करणार तू तेजू?बाप्पांनी विचारलं.
बाप्पा मला समुद्राच्या तळाशी जावं वाटतं.
तिथे जाऊन गुप्तधनाचा शोध घ्यावसा वाटतो का ?बाप्पा म्हणाले.
बाप्पा,तुम्ही अगदी मनकवडे आहात हं!
शेकडो वर्षापूर्वी जगातल्या श्रीमंत राजाचे एक गलबत समुद्रात बुडालं आणि त्यात असलेला सोने-चांदी-हिरे-मोती यांनी भरलेला मोठा हंडा तोही बुडाला.तोच तुला शोधायचाय ना?
बापरे बाप,बाप्पा तुम्ही कसं काय हो एवढं माझ्या मनातलं ओळखू शकता?तेजोमयीनं विचारलं.
मग जाऊ या का आपण समुद्रात साहस गाजवण्यासाठी?बाप्पांनी विचारलं.
बाप्पांनी असं विचारताच तेजोमयी हरखून गेली.
बाप्पा तुम्हालासुध्दा साहस करावस वाटतं?
अगं,तेच ते मोदक खाऊन जरा कंटाळा आलाय.तेव्हा इकडे- तिकडे हातपाय मारुन यावं म्हंटलं.तर तूच आयडिया दिली.
मग आपण कधी जायचं बाप्पा?
तू म्हणशील तेव्हा…
चला तर आत्ताच…
अगं बाई,आताच गेलो तर आईबाबा नको ते प्रश्न विचारुन आपल्या हैरान करतील आणि आपल्या साहसाची मोहीम फुस्स करतील.
मग काय करायचं?
आई–बाबा मध्यरात्री घोरायला लागले की आपण हळूच निघू या...
बाप्पा,ही आयडीया नाही पटली बुवा!
कां बरं?
अहो समजा आईला मध्येच जाग आली,तर ती काळजीत पडेल ना!
पण आईला विचारत बसलो तर ती परवानगी देईल असं वाटतं का तुला?
देईल की नाही हे सांगता यायचं नाही.पण विचारुन गेलेलंच बरं बाप्पा.
व्हेरी गूड!
काय म्हणालात?
छान,असं म्हणालो.शहाणी मुलं कोणतीही गोष्ट आई-बाबांनाच विचारुन करतात.
बाप्पा,समजा आईने परवानगी नाहीच दिली तर मग?
तर मग मी आहे ना!काळजी कशाला करतेस? बाप्पा म्हणाले.
0000
तेजोयमीनं आईला समुद्राच्या साहसाबद्दल घाबरत घाबरत विचारलं.आई शिव्यांचा मारा करेल या अपेक्षेत असलेल्या तेजोमयीला धक्काच बसला.आईने केवळ परवानगीच दिली नाही तर तिने सुध्दा समुद्राच्या साहसावर येण्याची इच्छा व्यक्त केली.पण बाबांची परवानगी घे असं सांगायला ती विसरली नाही.मग तेजोमयीनं लाडे लाडे बाबांना विचारलं.ते कधीच नाही म्हणत नसत.मात्र परवानगी माझ्यासाठी नव्हे तर आईसाठी,असं म्हणताच बाबा खोखो हसायला लागले.
अगं बाई, तुझ्या आईचं साहस फक्त आपल्या घरातच चालतं.समुद्रात बुडाली–बिडाली तर?बाबा म्हणाले.
मग तुम्हीपण चला ना!तेजोमयी बाबांना म्हणाली.बाबा एका पायावर तयार झाले.पण जायचं कसं?बाबांनी विचारलं.
बाप्पा आहेत ना!
बाप्पा काय करणार आपल्या सोबत येऊन?
अहो,बाप्पा सोबत राहिले तर मज्जाच मज्जा येईल ना!
मजा की सजा?
मम्मी,तुझा बाप्पांवर विश्वास नाही का?
हॅहॅहॅSSSS बाबा हसत म्हणाले.
असं नाक फेंदारुन हसायला काय झालं?आई रागावून म्हणाली.
समुद्राच्या तळाशी पण असेच भांडणार का तुम्ही!
तुझे बाबाच सुरुवात करतात भांडायला…
आता तुम्ही भांडू नका हो.तुम्ही येणार नसाल तर मीच जाते एकटी.
तुला एकटीला कसं काय जाऊ देणार आम्ही?
अगं, बाप्पा असणार आहेत ना,मम्मी.
पुन्हा बाप्पा, हॅहॅहॅSSS बाबा हसले.
अहो बाबा, यात हसण्यासारखं काय?तुम्हाला यायचं असेल तर या नाही तर येऊ नका.
अगं तसं नाही पण…
पण काय?आईला पोहता येत नाही ना!
समजा समुद्रात एखादा व्हेल मासा आईच्या पाठीमागे लागला तर मग? बाबा खुदकन हसत म्हणाले. आईचा चेहरा रागाने लालबुंद झाला.
000
समुद्राच्या तळाशी जाण्याची तयारी तेजोमयीने केली होती.बाप्पा तर कधीचेच तयार होते.आई आणि बाबा वादविवादात अडकले होते.बाबा आईची फिरकी घेत असल्याचं तेजोमयीच्या लक्षात आलं होतं.
व्हेल पाठिमागे लागला तर आई काय करणार?असा खवचट प्रश्न बाबांनी त्याचसाठी विचारला असल्याचं तिला कळलं.आईला बाबांचा खऊटपणा कां बरं कळला नसेल? तिने बाबांच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नसल्याने तेजोमयीस असं वाटलं. चला बरे झाले,नाहीतर घरात युध्दासारखे वातावरण निर्माण झालं असतं.घरातील शांतता भंग पावली असती.तेजोमयी मनात म्हणाली.
बाप्पा ,मम्मीला बाबांच्या बोलण्यातली खोच लक्षात येऊ देऊ नकोस अशी मनोमन तिने प्रार्थना केली.पण बाप्पांनी तिची प्रार्थना काही एैकली नाही.
मम्मीचा बॉब्मगोळा पडलाच.भूकंप झाल्यासारखा वाटला.
अहो, मला काय मूर्ख समजलात की काय?व्हेल माझ्या पाठिमागे लागला तर काय? असं वाकडं बोललात ना!दाखवतेच मी आता तुम्हाला व्हेल-फेल कसा असतो ते!मम्मी बाबांकडे बघत म्हणाली.
तेजोमयीने कप्पाळावर हात मारुन घेतला.
बाप्पा खुदकन हसले.
000
आई–बाबांची बाचाबाची संपण्याची चिन्हे दिसेना तेव्हा तेजोमयीने हळूच बाप्पांना इशारा केला.बाप्पा काय समजायचे ते समजले.हळूच दोघेही बाहेर पडले.
बाप्पांना समुद्र काही नवीन नव्हता.दरवर्षी ते समुद्रात विश्रांतीला जातात.त्यामुळे कुठे बुडकी मारली की तळ गाठता येतो हे त्यांना चांगलं ठाऊक होतं.बाप्पांच्या सोबत तेजोमयी समुद्राजवळ आली.
बाप्पांनी मूषकस्वामीचं रुपांतर पाणबुडीत केलं.चारही बाजूंनी काच असलेल्या या बोटीतून बाहेरचं सांर काही दिसत होतं.
बोट कां?तेजोमयीनं विचारलं.
अगं, तू समुद्राच्या तळात गुदमरु नये म्हणून.या पाणबुडीत तुला आवश्यक असणा-या प्राणवायुचं प्रमाण योग्यरित्या ठेवलं आहे.समुद्रात साहस गाजवणारी बहादूर माणसं सोबत प्राणवायू घेऊन जातात.सुरक्षेची काळजी घेतली की बरं असतं.
ओके!तेजायमी म्हणाली .
बाप्पा आणि तेजोमयी पाणबुडीत बसले.पाणबुडी सुसाट वेगाने समुद्राच्या तळाशी निघाली.जसे जमीनवर वृक्ष,प्राणी पशूपक्षी,फुलं यांचं अदभूत दृष्य दिसतं.त्याहून अदभूत दृष्य समुद्राच्या आत जाताना तेजोमयीला दिसत होतं.असंख्य रंगांच्या छटा असणारे छोटे मोठे जलचर बघून ती हरखून गेली.
बाप्पांनी तिला ऑक्टोपस दाखवला.आठ तोंडाचा तो महाकाय जलचर रवंथ करत तरंगत होता.शेकडो प्रकारचे छोटे मासे इकडून तिकडे तिकडून इकडे पळत होते,एकमेकांसोबत खेळत होते.महाकाय शार्क मासा मध्येच कुठून तरी आला .त्याने छोट्या छोट्या माशांना गप्पदिशी तोंडात टाकले आणि एखादया राजाच्या थाटात निघुनही गेला.मग समोर आला तो व्हेल.समुद्रातील हत्ती असं त्याचं वर्णन बाप्पांनी केलं.तो १०० फुट लांब होता. त्याचं वजन ३३ हत्तींएवढं असल्याचं बाप्पांनी सांगितलं.व्हेल मासा शार्कपेक्षा शांत वाटला.त्याच्या सोबत त्याचं एक बाळही होतं.ते मस्त मस्ती करत होतं.
बाप्पांनी तिचं लक्ष व्हेल कडून वळवून पाणघोडयाकडे नेलं.घोड्यासारखा तोंड असलेला हा जीव उभा उभाच इकडे तिकडे पळत होता.त्याच्या पाठीमागे एक हिरवासमुद्र साप लागला होता.पाणघोडा त्याला चकवा देत होता आणि हिरवा साप त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होता.या दोघांचा हा जीवघेणा खेळ बराच वेळ चालला होता.अचानक पाणघोड्याने उसळी घेतली आणि हेलिकॉप्टरसारखा तो पाण्याच्या वर उडाला.हिरवा साप चडफडत दुस-या भक्ष्याच्या पाठीमागे लागला.
पाण्याच्या एवढया आत जात असताना बंदिस्त पाणबुडीत तेजोमयीला अचानक सूर्यासारखा तेजस्वी गोल दिसला.बाप्पांनी ते समुद्रातील ज्वालामुखीचं तोड असल्याचं सांगितलं.ज्वालामुखी आणि समुद्रात,असं आश्चर्यानं तेजोमयीनं आँ केला.
ज्वालामुखीच काय ,समुद्रात पृथ्वीवरील एव्हरेष्ट शिखरापेक्षा उंच पर्वत आहे,असं बाप्पा म्हणाले.त्यांनी पाणबुडी समुद्रातील उचं पर्वताच्या टोकावर नेली.
हा पर्वत बघून ती आश्चर्यचकित झाली.या पर्वताच्या टोकावर जाऊन तिरंगा फडकावा आणि जन गण मन आणि गर्जा महाराष्ट्र माझा, असं म्हणावसं तिला वाटलं.पण पाणबुडीच्या बाहेर शार्क माशांचे तीक्ष्ण दातांचे जबडे बघून तिची बोबडी वळली.
काय गं एवढी तू बहादूर आणि भीतेस या शार्कला?
तुम्हाला भीती वाटत नाही बाप्पा?
भीती आपल्या मनात असते.त्याचा आपण विचार करत राहतो म्हणून आपले हात पाय थरथर कापायला लागतात.
अहो पण बाप्पा,या शार्कसमोर आपण गेलो तर तो काय आपलं झेंडूच्या फुलांनी स्वागत–बिगत करेल असं तुम्हाला वाटतं का?
अजिबात नाही.पण त्याला भ्यायचं कशाला हे मला म्हणायचं होतं!तू आता या पाणबुडीत सुरक्षित आहेस.तो काही आत येऊ शकत नाही.पण त्याच्यासाठी तू नवीन,मी नवीन. ही पाणबुडी नवीन. मग त्यालासुध्दा भीती वाटू शकते ना.तोही तुझ्यामाझ्यासारखा जीवच की! कदाचित आपण एखाद्या मोठ्या संकटात सापडलो तर नाहीना असं त्या शार्कला वाटू शकतं.या संकटातून कशी सुटका करायची याचा तो विचार करत असावा.
म्हणजे जशी मला भीती वाटतेय तसच शार्कलाही वाटते,असं म्हणायच बाप्पा तुम्हाला?
अलबत!
मग त्याला काय मी हॅलो करु का?
असं कुठं मी म्हंटलय?फक्त तू त्याची भीती न बाळगता त्याला बघण्याचा आनंद घे.तू त्याची शत्रू नाहीस हे तुझ्या डोळयातून,तुझ्या चेह-यावरील हावभावातून त्याला कळलं ना तर कदाचित त्याच्या मनातील भीती जाऊन तुला हाय करेल.
असं खरच घडावं अशी इच्छा बाळगून तेजोमयी शार्ककडे तिच्या घरातील अलेक्झांडर द डॉगीकडे ज्या प्रेमान बघते त्याच नजरेने बघू लागली.
0000
बाप्पा अशा बुडालेल्या जहाजांमध्ये खूप सारी संपत्ती राहत असेल नाही का हो? तेजोमयी त्या बुडालेल्या जहाजाकडे बघत म्हणाली.
अगदी बरोबर!
मग बाप्पा या जहाजात जायचं का आपण?
नको बाबा!
काहो मी सोबत असताना तुम्ही घाबरता कशाला?
अगं बाई दूरुन डोंगर साजरं म्हणतात ना तसच दूरुन जहाज साजरं असं म्हणावं लागेल!
काहो,यात कुणी राक्षस– बिक्षस राहतो की काय?
अगं बाई राक्षस किस झाड की पत्ती!म्हणजे त्याच्यापेक्षाही भयानक दुसरं राहतं की या जहाजात?
मग?अगं ही जहाज बुडून तळाखाली येतात.मग हळूहळू इथे समुद्रातील जलजर,समुद्र साप,ऑक्टोपस,शार्क इथे वास्तव्याला येतात.विषारी पानवृक्ष वाढतात वेली वाढतात.अशा जहाजांच्या आत शिरलो तर यापेकी कोण आपल्या भोवती विळखा टाकेल याचा नेम नाही!असा विळखा म्हणजे मृत्यूची कराल दाढ!
बाप्पा, अशाने या जहाजातील संपत्ती तशीच राहील ना?
अशा बुडालेल्या जहाजांमध्ये प्रत्येकवेळी संपत्ती असेलच असं नाही.समुद्रातील पाण्यात सोणं-नाणं वाहून जाऊ शकतात.ऑक्टोपस, शार्क सारखे जलचर उत्सुकतेपोटी सोणं -चांदी, नाणे गिळू शकतात.काही अतीधाडसी चाचे बुडालेल्या जहाजात शिरुन अशी संपत्ती पळवून नेऊ शकतात.
म्हणजे प्रत्येक जहाज हे अलिबाबाच्या गुहेसारखच असत असं म्हणता येईल, नाही का बाप्पाघ्
अगदी बरोबर! बाप्पा म्हणाले.
00000
अगदी बरोबर,असं बाप्पा उत्तरले.पण त्यांच्या लगेच लक्षात आलं की अलिबाबाची गुहा काय हेच आपल्याला ठाऊक नाही.ते मनात जरासे ओशाळले.पण आता तेजोमयीला विचारायचं कसं हा प्रश्न त्यांना पडला.त्यांच्या चेह-यावरील प्रश्नार्थक भाव बघून तेजोमयीनं न राहवून विचारलं,बाप्पा काय झालं हो?
काही नाही गं!
कसं काही नाही?तुमचा चेहराच सांगतो ना की तुम्हाला काही तरी शंका आलीय ती!
अहो विचाराना मग मला!आपल्या मनातल्या शंकेचं निरसन करायलाच हवं,असच तुम्ही सांगता ना बाप्पा!ते फक्त काय सांगण्यापुरतच की काय?
तसं नाही गं! पण
पण काय?
आता बोलणं भागच होतं हे बाप्पांच्या लक्षात आलं.त्यांनी आवंढा गिळला आणि दुसरीकडे बघत म्हणाले ही अलिबाबाची गुहा आहे तरी काय?
बाप्पांचा हा प्रश्न एैकताच तेजोमयी हसायला लागली.
म्हणून मला विचारावं वाटत नव्हतं.
सॉरी सॉरी!तेजोमयीला आपली चूक लक्षात आली.सगळयाच गोष्टी प्रत्येकाला माहीत असेल असं नाही.एखाद्याने प्रश्न विचारला व आपल्याला त्याचं उत्तर ठाऊक असेल तर हसण्याऐवजी त्याला समजावून सांगितलं पाहिजे असं तिला बाप्पांनीच सांगितलं होतं.ते तिला आठवलं.तिने बाप्पांची क्षमा मागितली आणि अलीबाबाची गुहा काय हे तिने समजावून सांगितलं.
000
समुद्राच्या तळाशी बाप्पा आणि तेजोमयीची पाणबुडी एक भल्यामोठया जहाजाजवळ पोहचली.ते जहाज पाच सहा मजली घराएवढे होते. प्रवासात असताना वादळात सापडून हे जहाज बुडालं असलं पाहिजे असं बाप्पांनी तेजोमयीला सांगितलं.
म्हणजे बाप्पा हे टायटानिक जहाज तर नाही ना! वाSSSव!
कशासाठी वाSSSव?
टायटनिक बघायला मिळालं ना मला!
तुला कसं माहीत हेच टायटानिक म्हणून?
बाप्पा याच्यावर एक चित्रपट मला बाबांनी दाखवलाय?काय मस्त होता हो!
अगं, पण तो तुमचा चित्रपट याच जहाजावर असेल कशावरुन?समुद्र प्रवासाला निघालेली बरीच जहाज कधी कधी प्रचंड वादळात सापडतात.कधीकधी भल्या मोठ्या पाषाणाला आदळतात.तर कधी तर जहाजाचा कप्तान दिशा चुकतो.त्यामुळे समुद्रातील चुंबकीय क्षेत्रात जाऊन अडकतात.तर कधी समुद्रावरील चाचे अशा जहाजांवर हल्ले करतात.प्रवाशांना लुटतात.त्यांना ठार करतात.जहाजाला बुडवून टाकतात.अशा संकटात सापडलेली जहाजं मग समुद्राच्या तळाशी येऊन पडतात.वर्षानुवर्षे तिथेच राहतात.मग त्यांच्याविषयी अनेक कथा-दंतकथा-भयकथा सांगोवांगी पसरत राहतात!
म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक बुडालेल्या जहाजाची एक गोष्ट असते म्हणायची!
गोष्ट नव्हे बाई कादंबरी म्हण कादंबरी!
म्हणजे या जहाजावरसुध्दा कादंबरी लिहिता येईल ना मला बाप्पा!मी मोठी झाली की नक्कीच या आणि इतर बुडालेल्या जहाजांवर कादंबरी लिहीन.
पण या बुडालेल्या जहाजांवर लिहिता लिहिता तूच जर बुडाली तर?
तुम्ही आहात की मला अलगद वाचवायला!तेजोमयी म्हणाली आणि बाप्पा खळखळून हसले.
सुरेश वांदिले
000
