(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

  

समुपदेशकाकडे जाताना..

कोणत्याही विद्यार्थ्यांच्या दृष्टिने तशी पहिलीपासूनची सगळीच वर्षे महत्वाची असतात. मात्र मुलगा/मुलगी दहावीमध्ये गेल्या गेल्या पालकांना, मुलाच्या भविष्याविषयी काळजी वाटू लागते. या काळजीपोटी मग ते, आता मुलाने काय करायला हवे, म्हणजे त्याचे भविष्य सुरक्षित होईल असे ज्याला-त्याला विचारायला लागतात. त्यासाठी वेगवेगळया समुपदेशकांकडे जातात. मुलांची कलचाचणी, मानसशास्त्रीय चाचणी करुन घेतात. इतकं सगळं केल्यावरही, मुलाने पुढे काय करावे ? ही चिंता काही जात नाही.

व्यावसायिक म्हणजे शास्त्रीय पध्दतीने केलेल्या या चाचण्यांचे निकाल, त्यावरुन समुपदेशकांनी काढलेले निष्कर्ष, त्यांच्यासोबत झालेली चर्चा इतक्या बाबी हाताशी असूनही पालकांना काळजी कां वाटावी? हा प्रश्नच आहे. या कलचाचण्या अनेक कसोट्या, प्रश्न आदींचा वापर करुन केलेल्या असतात. त्याचे काही ठोकताळे असतात. त्यानुसार मुलांच्या बुध्दिमत्तेला काय पेलवेल याविषयी एक सर्वसाधारण मत व्यक्त केले जाते. दोन – पाच विषयांपर्यंत पर्याय सुचवले जातात. याचा अर्थ या पाच पैकी कोणताही एक पर्याय निवडला तरी पुढे करिअर घडणे अवघड जाऊ नये, अशा प्रकाराचा तो दिलासा असतो.

आता, समुपदेशक हा काही जादुगार किंवा भविष्यवेत्ता नाही की तो त्याच्या समोर आलेल्या निष्कर्षानुसार, अमूक मुलाने फक्त हाच विषय घ्यावा म्हणजे तो यशस्वी होणारच, असे सांगू शकत नाही. ते शक्यही नाही. समुपदेशाकडे गेलेल्या पालकांना मात्र आपल्या पाल्यासाठी अशा एका करिअर (हमखास यश देणाऱ्या) पर्यायाची अपेक्षा असते. ती अपेक्षा समुपदेशाकडून पूर्ण होताना दिसली नाही की मग ते आणखी कुणा दुसऱ्या समुपदेशाकडे जातात किंवा आणखी एखादा मार्गदर्शक निवडतात.

गोंधळात वाढ

या सर्वांमुळे अधिक गोंधळ होऊ शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. एकदा का समुपदेशकाकडे जाण्याचा निर्णय घेतल्यावर, त्याने दिलेल्या पर्यायांवर अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. तीन चार पर्याय दिल्यावर, त्यातल्या कोणत्या पर्यायामध्ये म्हणजे विषय घटकांमध्ये आपल्या पाल्याला अधिक गती- आवड- रुची आहे हे पालकांना कळायला हवे. पाल्य सुध्दा याबाबात पालकांना स्पष्टपणे सांगू शकतो. त्यापध्दतीने त्याला बोलते करायला हवे. चित्रकला किंवा नृत्य कला असे दोन पर्याय दिले असतील तर आपला पाल्य कशात अधिक रमतो, हे तर एव्हाना पालकांना कळलेच असेल. किंबहुना ते कळायला हवे. समुपदेशकाच्या सेवा घेण्यापूर्वी सर्वच पालकांनी आपल्या मुलात असणाऱ्या गुणांच्या सक्षम बाजूंची उजळणी करायला हवी.

प्रत्येक मुलातच काहीनाकाही वैशिष्ट्यं असतेच असते, हे शास्त्रीय तथ्य आहे. तुमच्या मुलाला गणितात अधिक गती आहे की मैदानात त्याचा जीव अधिक रमतो किंवा दोन्ही गोष्टी त्याला चांगल्या जमतात, हे तर पालकांना कळायलाच हवे. मुलाला गणितात गती आहे पण पालकांना मात्र त्याने स्पोर्ट्स पर्सन (क्रीडापटू म्हणणे जरा गावठी वाटू शकते.) तेही क्रिकेटर व्हावे असे वाटत असेल तर त्याची विकेट जाणार हे पक्कं. मुलगा विविध चित्र, आकृत्या, पेंटिग यात मस्त रंगतो हे दिसत असूनही त्याने पुढे सीए (चार्टर्ड अकाउंटंन्ट)व्हावे असा आग्रह धरणे किंवा अपेक्षा करणे म्हणजे ताळेबंद चुकलाच म्हणून समजा.

मुलांचे प्रत्येक गुण-अवगुण हे तो दहावीपर्यंत पालकांच्या डोळयादेखत विकसित होत असतात. या गुण अवगुणांमध्ये त्याच्या करिअरची बिजं दडली असतात.

गुणअवगुणांचे विश्लेषण

कोणता गुण अधिक चांगला आणि कोणता अवगूण अधिक वाईट याचे विश्लेषण आईबाबांनी करायलाच हवे. अभ्यासापेक्षा बॉडीबिल्डिंसाठी सतत व्यायाम शाळेत किंवा जिममध्ये पळणाऱ्या मुलांचा हा अवगुण असल्याचं काही पालकांना वाटू शकतो. मात्र अशी मुलं फिटनेस-योग- मॉडेलिंग- सैन्यदल- कुस्ती- ज्युदो-शरीरशौष्ठव – सुरक्षा सेवा-पोलीस दल अशा सारख्या क्षेत्रात उज्वल करिअर करु शकतात. तेव्हा समुपदेशकाकडे जाताना या सर्व बाबी लक्षात ठेऊन त्यांच्यासोबत चर्चा विनियम करायला हवे. मुलाच्या गुण अवगुणांशी सुसंगत, समुपदेशकांचे निष्कर्ष येत असतील तर प्रश्नच मिटला. पण येत नसतील तेव्हा, त्यांना अशा गुण- अवगुणांची स्पष्ट आणि पारदर्शक कल्पना देणे गरजेचे आहे. त्यानुसार समोरचे निष्कर्ष आणि त्यांचा अनुभव व या क्षेत्रातील ज्ञान यांचा मेळ घालून समुपदेशक  आणखी सुयोग्य मार्गदर्शकन करु शकतात.

पालकच खरे समुपदेशक

समुपदेशकापेक्षाही आपल्या पाल्याला सर्वार्थाने ओळखण्यात पालकांची भूमिका महत्वाची असते. वयाच्या सोळाव्या- सतराव्या वर्षापर्यंत आपल्या डोळयासमोर असणाऱ्या पाल्याचे गुण- अवगुण- दुर्गुण जर ओळखता येत नसतील तर मग मात्र कितीही उच्च दर्जाचा आणि भरपूर शुल्क घेणारा व भरपूर अनुभव असणारा समुपदेशक असला तरी मुलांच्या करिअरचे गणित चुकू शकते हे लक्षात ठेवलेले बरे.

एककलमी रेटा

परीक्षेत अधिकाधिक गुण मिळवण्याच्या एककलमी रेट्यामुळे विद्यार्थ्याला या काळात भाषा कौशल्य, संवाद कौशल्य, गणितीय कौशल्य, सादरीकरण कौशल्य अशा बाबींना साध्य करता येत नाही. याकडे पूर्णत: दुर्लक्ष होतं. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून शंभरातील २५ ते ३० टक्केच मुलं सक्षमरीत्या अभ्यासक्रम पूर्ण करु शकतात. त्यांना करिअरच्या संधी चांगल्या मिळतात. पण त्याच वर्गातील इतर मुलांना मात्र संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष इथे संपत नाही, कारण पुढे विविध स्पर्धापरीक्षेच्या आखाड्यात उतरल्यावर या बाबींच्या अभावामुळे या परीक्षाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता येत नाही. अशा परीक्षा देण्यात उमेदिची चार-पाच वर्षे निघून  जातात. यश काही मिळत नाही. दुय्यम किंवा तिय्यम श्रेणीच्या नोकरी किंवा रोजगाराकडे वळावे लागतं.

या प्रवासात झालेल्या कुतरओढीमुळे या मुलांच्या मनात स्वत:विषयी ,पालकांविषयी, सामाजिक परिस्थितीविषयी कटुता येण्याचीही शक्यता असते. ही कटुता घेऊन ही मुलं जे काही पदरी पडलय, ते सुध्दा नीट वा योग्यपध्दतीने करत नाहीत. त्यामुळे आणखी एक धक्का बसण्याची शक्यता असते.

कोचिंग क्लासेच्या साप्ताहिक परीक्षेत तर खूपच चांगले गुण मिळत होते किंवा कोचिंग क्लासच्या ऑल इंडिया परीक्षेमध्ये त्याची रॅकिंग पहिल्या पाचशेत आली हो, मात्र परीक्षेत काय झाले ते कळत नाही किंवा परीक्षेच्या नेमक्या दोन दिवस आधी त्याला बरे नव्हते किंवा परीक्षेच्या दिवशी तो फारच घाबरला किंवा सिलॅबसच्या बाहेरचे प्रश्न आले हो किंवा त्याने तर अचुकच सोडवले होते, तपासण्यात काही गडबड झालेली दिसते, अशी पोकळ कारणे सांगणे टाळायला हवित कारण यामुळे आपण आपला अहंच जोपासत असतो. आपली कमकुवत बाजू किंवा आपल्या चुकांवर पांघरुन टाकण्याचा हा प्रयत्न असतो. असे सांगणे खोटं समाधान असते. खरं सांगितल्याने आपली वा मुलाची प्रतिष्ठा काही कमी होत नाही . कुणालाही त्याच्याशी घेणे-देणे असत नाही. तेव्हा घरी आणि समुपदेशाकडे किंवा आणखी कुणाकडेही मार्गदर्शन घेण्यासाठी जायचे असल्यास प्रामाणिक व पारदर्शक माहिती देणं अत्यावश्यक ठरतं.

प्रामाणिक विचारमंथनातूनच मुलांच्या मनात काय चाललय ही माहिती काढता येऊ शकते.  मानसशास्त्रीय दृष्टया आपल्या निर्णयांना कुणाचा तरी पाठिंबा हवा असण्याची गरज  असते. त्या गरेजेचं वर्तृळ आपण आपल्या सोयीनुसार काढू इच्छितो. ते टाळायला हवे. मुलाची इच्छा डॅाक्टर वा इंजिनीअर बनण्याची नसेलच तर त्यासाठी इतरांच्या मान्यता वा पाठिंबा मिळण्याचा प्रयत्न हा अंतिमत: केविलवाणा ठरु शकतो. त्यामुळे त्यावाटेने जाउु नये. गणितात हुषार असूनही एखादया मुलाची अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याची इच्छा असेल तर त्याला नक्कीच प्रोत्साहन दिले पाहिजे. अशी मुलं पुढे मोठा पल्ला गाठतात. अशांना एकतर अपयश येत नाही. समजा आले तर ते स्वत:च त्यातून मार्गही काढतात. किंबहुना चांगल्या पर्यांयांचा शोध ते स्वत:च घेऊन ठेवतात. स्वत:च्या निर्णयाची जबाबदारी घेण्याचा प्रामाणिकपणा अशांकडे असतो.

विविध पर्याय

सध्या करिअरचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे मुलाचे पुढे काय होणार, अशा शंका व्यक्त करण्यात हशील नाही. नव्या शैक्षणिक धारेणानुसार इंटर्नशीप- अप्रेसिंटशीप- प्रात्यक्षिकांवर भर या बाबिंना भर देण्यात येणार आहे. यामुळेही विद्यार्थ्यांना शिकत असतानाच्या काळात रोजगारक्षम होण्याची आणि स्वत:मधील कौशल्य वाढवण्याची संधी मिळू शकते.

सुरेश वांदिले

000