सर्वश्रेष्ठ काय?
एकदा बादशहा अकबराच्या दरबारात मोठे मोठे ,नामांकित विव्दान गोळा झाले होते. अकबर त्यांच्याची वेगवेगळया विषयावर चर्चा करत होता.ही चर्चा सुरु असतानाच अकबराने सर्वांपुढे एक प्रश्न ठेवला,जगात सर्वश्रेष्ठ काय?या प्रश्नाचं अचूक उत्तर देणाऱ्यास मोठ्ठ बक्षीस देऊ असं अकबराने घोषित केलं.
दरबारात जमलेले विव्दान आणि दरबाऱ्यांमध्ये चर्चा सुरु झाली.जगात सर्वश्रेष्ठ कोण असू शकतं बरं?अकबराने काही वेळ ही चर्चा अशीच सुरु राहू दिली.त्यानंतर त्याने एकेकास,जगात सर्वश्रेष्ठ कोण? हा प्रश्न थेट विचारायला सुरुवात केली.
कुणी म्हणालं,हा सूर्य सर्वश्रेष्ठ आहे.त्यामुळे आपणास प्रकाश मिळतो.कुणी म्हणाले नदी सर्वश्रेष्ठ.नदीतील पाण्यामुळे आपल्या शेतीत अन्नधान्य पिकतं.प्यायला पाणी मिळतं.कुणी म्हणाल,पाऊस सर्वश्रेष्ठ.तो जर नसता तर नदीत पाणी कुठून बरं आलं असतं.पावसाचं पाणी शेतात पडतं.त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन होतं.कुणी म्हणालं,ग्रंथ सर्वश्रेष्ठ.त्यातून ज्ञान मिळतं.कुणी म्हणालं,देव सर्वश्रेष्ठ.त्याने आपल्याला या पृथ्वीवर धाडलं.कोणत्याही विव्दानाचं एकमत मात्र होत नव्हतं.
त्यामुळे मग अकबराने आपला मोर्चा दरबाऱ्यांकडे वळवला.काही दरबाऱ्यांनी वेगळी उत्तर दिले.मात्र बहुतेक दरबाऱ्याचं एकमत होतं की,बादशहा अकबरच सर्वश्रेष्ठ.कारण तो सर्वसमर्थ असा राजा असून,त्याच्यापुढे बाकी सर्वजण क:पदार्थ आहेत.तो सर्वात तेजस्वी असून,त्याची प्रभा सूर्यापेक्षा अधिक पसरते.तो सर्वश्रेष्ठ आहे कारण तो मोठ्या साम्राज्याचा अधिपती आहे.
दरबाऱ्यांच्या या उत्तरावर अकबरास हसू येतं होतं.सर्व दरबारी खुषमस्करे असून आपल्याला खुष करण्यासाठी आपलं उगाचच कौतुक करताहेत,हे त्याने ओळखलं.अशा खुषमस्कऱ्यांना खरं तर दरबारातून हाकलून द्यायला पाहिजे,असं अकबराच्या मनात आलं.
तुला काय वाटतं बिरबला?कारण सर्व विव्दान बालले.आपल्या दरबाऱ्यांनीही त्यांचं म्हणणं मांडलं.तू मात्र चिडीचूप आहेस.अकबराने बिरबलास विचारलं.
खाविंद,या विव्दांनापुढे मी फारच शुल्लक.त्यामुळे मी काय सांगणार ना.आपले दरबारी तर काय ते सर्वश्रेष्ठ आहेत,म्हणूनच तुमचे दरबारी आहेत,तेव्हा या श्रेष्ठांच्यापुढे मला बोलणं उचित वाटत नाही.
अरे बिरबला,तू जर काहीस सांगितलं नाही,तुझं मत मांडलं नाही तर,तर ही चर्चा अपूर्ण राहील ना.कोणतीही अपूर्ण चर्चा किंवा गोष्ट मला भयंकर त्रास देते हे तुला तर ठाऊकच आहे.अकबर थोड्या चढ्या आवाजात म्हणाला.
बादशहा बिरबलास रागावल्याचे बघून बऱ्याच दरबाऱ्यांना आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसू लागला.चाणाक्ष बादशहाच्या नजरेतून ही गोष्ट काही सुटली नाही.
तो बिरबलास म्हणाला.,अरे बघ बिरबला,तू काहीच बोलला नाहीस हे बघून आपले दरबारी कसे दु:खी झाले आहेत बिचारे.तू जर आताही शांत राहिलास तर ते रडायलाच लागतील.
अकबराचं उपरोधिक बोलणं दरबाऱ्यांना बरोबर कळलं.त्यांच्या माना खाली गेल्या.
बिरबल पुन्हा उभा राहिला आणि बोलू लागला..
खाविंद, आपला इतकाच आग्रह आहे तर मी माझं मत सांगतो.
सांग सांग अकबर म्हणाला.
सर्व विव्दान आणि दरबारी बिरबलाच्या बोलण्याकडे कान टवकारुन लक्ष देऊ लागले.
बिरबल म्हणाला,
खाविंद,या जगात सर्वश्रेष्ठ असते ती प्रत्येकाकडे असणारी बुध्दी. जो कुणी या बुध्दीचा जसा वापर करेल तशी त्याला फळं मिळतात. तो या बुध्दीच्या बळावर रंकाचा राव होतो नि या बुध्दीमुळेच रावाचा रंकही होतो. आपल्याकडे असलेली बुध्दीच आपल्या विव्दान बनवते.आपल्याला वाईट माणूस बनवते आणि आपल्याला उत्तम माणूसही बनवते.
वा वा वा वा, खरच खरच हे सत्य आहे.सर्व विव्दान मंडळी एकासुरात म्हणाली. बिरबरलाच्या बुध्दीचार्तुर्याचे सर्वांनी मनोसक्त कौतुक केले. दरबाऱ्यांचे चेहरे मात्र पडले.अकबर या उत्तराने खुष झाला.तो आपल्या जागेवरुन उठला आणि बिरबलाजवळ येऊन त्याने त्याला घट्ट मिठी मारली.
सुरेश वांदिले
००००ग
