सर्वात मोठा मूर्ख..
बादशहा अकबरास बरेचदा आपल्या दरबाऱ्यांची परीक्षा घेण्याची सवय होती. त्यांच्या मनात येई त्या विषयावर परीक्षा होत असे. मात्र आज त्यांना विषय काही सूचेना. कधी इकडे बघ,कधी तिकडे बघ. कधी डोळे मीट. तर कधी सिंहासनावर डावी उजवीकडे वळ. असे त्यांचे चालले होते. असा बराच वेळ गेला. दरबाराचे कामकाज खोळबंले. जोपर्यंत बादशहा हे कामकाज सुरु करणार नाही तो पर्यंत कुणालाही काहीच करता येत नव्हते. त्यांची ती अवस्था बघून प्रधानजी भीत भीत अकबरास म्हणाले, खाविंद आपणास बरे नाही का? तसे असेल तर आपण दरबार बरखास्त करुन आराम करावा. यावर बादशहाने प्रधाजनीकडे रागाने कटाक्ष टाकून डोळे मिटून घेतले. प्रधानजी खाली बसले. इतर काही प्रमुख दरबाऱ्यांनी अकबरास विचारण्याचा प्रयत्न केला. पण बादशहा आपले चिडीचूप.
शेवटी प्रधानजींनी इच्छा नसूनही त्यांनी बिरबलास विनंती केली. बादशहा, त्याला नक्कीच प्रतिसाद देतील याची त्याला खात्री होती. बिरबल हो नाही करत उभा राहिला.
उभे राहताच तो जोरजाराने रडू लागला. त्या आवाजाने बादशहाने डोळे उघडले. समोर बिरबल रडत असल्याचे बघून, त्याने बिरबलास रडण्याचे कारण विचारलं.
खाविंद, मी खरचं रडत आहे का? असा सवाल करुन बिरबल जोरजोरात हसू लागला.
अरे बिरबला, तू आता रडत होतास, आता हसायाला लागलास? चाललय तरी काय तुझं? सांगत कां नाही?अकबर गरजला.
खाविंद, मी खरच हसत होतो का? बिरबलाने प्रतिप्रश्न करुन गायला सुरुवात केली.
आता हळूहळू अकबराची सहनशक्ती संपायला लागली. अकबर चढ्या आवाजात म्हणाला,
बिरबला, तू रडतोस काय, हसतोस काय, गातोस काय? विचारले तर काही सांगत नाहीस. तू आता बोलला नाहीस तर तुला हाकलून लावीन दरबारातून.
खाविंद, खरच मी गात होतो का? बिरबला खाली मान घालून प्रत्युत्तरा दाखल म्हणाला. त्याने नाचायला सुरुवात केली. हे बघून अकबराचा संताप अनावर झाला. इतर दरबारी मात्र आनंदित झाले. प्रधानजीच्या मनात तर आनंदाच्या उकळया फुटायला लागल्या. बिरबलाबद्दल इतक्या तक्रारी करुन, खोटंनाटं सांगून त्याचे दरबारातील महत्व काही कमी होत नव्हतं. तो अकबराच्या गळयातला ताईत झाला होता. हा ताईट तुटण्याची आता वेळ आल्याची प्रधानजी आणि इतर दरबाऱ्यांनी ओळखले.
इकडे अकबर संतापाने लालबुंद झाला. तो सिहांसनावरुन ताडकन उभा राहिला आणि त्याने तलवार काढली.
बिरबला, आता तू मूर्खासारखे वागणं थांबवलं नाहीस तर तुझा शिरच्छेद करीन मी. अकबर जोरात म्हणाला.
म्हणजे खाविंद, मी मूर्खासारखा वागत आहे का? असं म्हणून बिरबल गाढवासारखा ओरडू लागला.
आपण तलवार काढली, शिरच्छेद करण्याची धमकी दिली तरी बिरबलाचं वेड्यासारखं वागण थांबत नाही, हे बघून अकबर हताश झाला. तलवार मान्य करुन सिंहासनावर बसत तो, बिरबलास काकुळतीने म्हणाला,
बिरबला, तू माझ्या सहनशक्तीचा अंत बघू नकोस. आता तू तुझे माकडचाळे बंद केले नाहीस तर, मी काय करेन हे याची तू कल्पनाही करु शकणार नाही.
खरच का खाविंद मी माकडचाळे करत आहे? बिरबल प्रत्युत्तरादाखल म्हणाला आणि जागच्या जागेवर माकड उड्या मारु लागला. अंग खाजवू लागला.
बिरबला, अकबर जोरात ओरडला..
तू आम्हास काय मूर्ख समजतोस की काय? दरबाराचा किमती वेळ तू घालवतोस, तुला त्याचं काहीच कसं वाटत नाही?
खाविंद, खरच का मी दरबाराचा किमती वेळ वाया घालवत आहे. तर मग लगेच कामकाज सुरु करुया का? बरोबरना प्रधानजी. बिरबल प्रधानजीकडे बघत म्हणाला. प्रधानजींना होकारार्थी मान हलवण्यावाचून पर्याय नव्हता. त्यांनी कामकाजासाठी पुकारा केला.
अचानक अकबरास हसू आले. सर्व दरबाऱ्यांना आश्चर्य वाटले. प्रधानजी भीत भीत विचारलं.
खाविंद काय झाल?
प्रधानजी, अहो आम्हास आज दरबाऱ्यांची परीक्षा घेण्यासाठी प्रश्नच सुचत नव्हता. पण तो प्रश्न सुचला आणि त्याचं उत्तरही मिळालं.
काय सांगता खांविद, वा वा. कोणता बरे प्रश्न? प्रधानजींनी विचारलं.
दरबारातील सर्वात मूर्ख व्यक्ती कोण? बरोबरना बिरबला. त्याच्याकडे बघत अकबर म्हणाला. बिरबलास हसू आवरता येत नव्हतं. त्यामुळे त्याने मान खाली घालून मान हलवली.
मग प्रधानजी सांगा बघू दरबारातील सर्वात मूर्ख व्यक्ती कोण? बादशहाने प्रधानजींना विचारलं.
खाविंद, त्यात काय मोठसं, बिरबलानं स्वत:च्या वागणुकीने आज सिध्द केलेय की ते. प्रधानजी मिशीवर ताव देत म्हणाला..
हा हा हा..प्रधानजी तुम्ही पुन्हा एकदा चुकलात. बिरबल नाही तर हा तुमचा बादशहा, दरबारातील सर्वात मूर्ख व्यक्ती ठरला. ज्याला दरबाऱ्यांना फालतू प्रश्न विचारणं हे दरबारातील कामकाजापेक्षा महत्वाचं वाटतं.हा हा हा…
प्रधानजींनी मान खाली घातली. बिरबलाने आजही बाजी मारली,हे लक्षात आल्यानं त्यांना जळफळाट व्हायला लागला. पण उसने अवसान आणून त्याने दरबाराच्या कामकाजास सुरुवात केली.
सुरेश वांदिले
