(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

सर्वोत्कृष्ट वैद्यकीय शिक्षण (1)

वैद्यकीय व्यवसायात मान-सन्मान आणि पैसा यासर्व बाबी मनाजोगत्या किंबहुना कितीतरी अधिक पट मिळत असल्याने, बहुतेक सर्वच पालकांना आपला मुलगा/मुलगी डॉक्टर व्हावा, असे कायम वाटत आले आहे. सर्वाधिक प्रतिष्ठित करिअर पर्यायात या व्यवसायाचा दशकानुदशके समावेश होत आहे. अद्यापही त्यात तसुभरही फरक पडलेला नाही. करोना काळात डॉक्टरांनी बजावलेली भूमिका ही देवदुतासारखीच होती.

करोनोत्तर काळात वैद्यकीय व्यवसायास आणखी महत्व मिळणार हे अधोरेखित झाले आहे. ज्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना अनेक पर्याय खुले आहेत आणि ज्यांना वैद्यकीय पर्यायाचाही समावेश आहे, त्यांनी इतर पर्यायांना बाजुला ठेवून या पर्यायाचा स्वीकार केला पाहिजे. वैद्यकीय व्यवसायात यापुढे केवळ राष्ट्रीय स्तरावरच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावरही फार मोठी मागणी राहील. या क्षेत्रात मागणी आणि पुरवठा यात नेहमीच व्यस्त प्रमाण राहिले, ते आणखीनच वाढेल. मात्र त्याचा विचार करता, ज्या विद्यार्थ्यांना मनापासून या क्षेत्रात यावयाचे असेल त्यांनी, या क्षेत्रात करिअरच्या सर्वोच्च स्थानी पोहचण्याचे पक्के ठरवले पाहिजे. यासाठी एमबीबीएसचा साडेपाच वर्षांचा कालावधी, पुढे स्पेशलायझेशनचा कालावधी अशी सात- आठ- दहावर्षे तपर्श्चयेसारखी अभ्यास आणि प्रात्यक्षिके यात घालवली तर पुढे आपोआपच सेवा घडतेच घडते आणि त्याअनुषंगाने इतरही बाबी आपसुकच प्राप्त होतात.

सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालय

भारतातील सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नवी दिल्ली स्थित, ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, या संस्थेचा समावेश होतो. गेली अनेक वर्षे या संस्थेने, शिक्षणप्रशिक्षणसंशोधन या तिनही घटकातील आपला देशस्तरीय पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. या संस्थेत देशातील सर्वोत्कृष्ट प्राध्यापक, वैद्यकीय शाखेतील विविध विषयांना शिकवतात. ही या संस्थेची सर्वात मोठी (ज्ञान) शक्ती /सामर्थ्य समजले जाते.

या महाविद्यालयातून शिकलेले विद्यार्थी पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रेष्ठ दर्जाचे वैद्यकीय व्यावसायिक/तज्ज्ञ झाले. अनेकांनी वैद्यकीय क्षेत्रात महत्वाचे संशोधन केले. आपल्या गुरुंपेक्षा अधिक सक्षम शिक्षक झाले.

संस्थेमधील गुरुजन, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन देतात, त्यामुळे विद्यार्थी घडत जातो, अशी भावना डॉ. राकेश अग्रवाल यांनी व्यक्त केलीय. डॉ.अग्रवाल हे आंतरराष्ट्रीय कीर्तिचे वैद्यक असून त्यांच्या प्रकांड बुध्दीमत्तेमुळे त्यांना जागतिक आरोग्य संघटना ते  अमेरिकेतील डिसिज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन, या संस्थेत कार्य करण्याची संधी मिळालीय. विषाणूजन्य हेपॅटिटीस बी आणि ई, बाबत त्यांनी केलेल्या संशोधनावर जागतिक दर्जाची मोहर उमटलेली आहे. डॉ अग्रवाल हे एम्सचे विद्यार्थी आहेत.

दर्जा आणि गुणवत्ता

सध्या या संस्थेत पदवी आणि पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमात तीन हजारच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशात सर्वाधिक संशोधन निबंध याच संस्थेतून प्रकाशित झाले आहेत. सध्या 700  पेक्षा अधिक संशोधनात्मक प्रकल्प इतर संस्थांच्या सहकार्याने राबवले जात आहेत.

या संस्थेत दररोज 10  हजार रुग्णांवर उपचार केले जातात. हे रुग्ण विविध श्रेणी आणि प्रकारातील असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर प्रात्यक्षिकांचा अनुभव मिळतो. येथील डॉक्टर 2 लाखाच्या आसपास दरवर्षी शस्त्रक्रिया करतात.

या महाविद्यालयात दरवर्षी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी 125 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. येथील पायाभूत सुविधा, दर्जेदार अध्यापन, संशोधन कार्यास प्राधान्य, नव्या कल्पनांना तत्काळ उचलून धरण्याची मानसिकता, विविध विभागांमधील सहज-सुलभ सहकार्य, ब्रँड व्हॅल्यू आणि उत्कृष्ट असे विद्यार्थी जीवन यामुळे या संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी द बेस्ट (सर्वोत्कृष्ट) बणूनच बाहेर पडतो.

नावीन्यपूर्ण शैली

या संस्थेने एमबीबीएस विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य वाढीस लागावे यासाठी 2019 मध्ये सेट (SET-स्किल- ई लर्निंग आणि टेक्नॉलॉजी) हा उपक्रम सुरु केला. पारंपरिक वैद्यकीय शिक्षणाला अत्याधुनिक चेहरा देण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम सुरु करण्यात आला. शिवाय टेलिमेडिसीन, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि बिग डेटा ॲनॅलिटिक्स या नव्या क्षेत्रांचाही समावेश स्पेशलायझेशनचे विषय म्हणून केला.

टेलिमेडिसीन या तंत्राला अवगत करण्याचे देशातील सर्वात पहिले पाउुल या संस्थेने उचलले. या संस्थेने आपल्या अभ्यासक्रमात, जेनेटिक्स, फॅमिली हेल्थ, इथिक्स अशा काही नव्या घटकांचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे ज्या आजार आणि रोगांचा सध्या फारसा प्रादुर्भाव होत नाही, त्यावरील अभ्यासाचा भर कमी करण्याचे ठरवले आहे.

या संस्थेला जागतिक दर्जाची वैद्यकीय युनिव्हर्सिटी (विद्यापीठ) करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

इतर कॅम्पसेस

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील दर्जेदार शिक्षणाची व्याप्ती केवळ दिल्ली कॅम्पसपुरती मर्यादित राहू नये यासाठी, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत देशातील 18 ठिकाणी या संस्थेची कॅम्पसेस सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये  (1) भोपाळ, (2) भूवनेश्वर, (3) जोधपूर (4) पाटणा,(5) रायपूर, (6) ऋषिकेश, (7) मंगलगिरी, (8) नागपूर, (9) कल्याणी, (10) भटिंडा, (11) गोरखपूर, (12) रायबरेली, (13) देवगढ, (14), बिबिनगर (15) गौहाटी, (16) राजकोट, (17) जम्मू,(18) बिलासपूर येथील एम्सचा समावेश आहे.

प्रवेश संख्या

भोपाळ, भूवनेश्वर, जोधपूर, पाटणा, गोरखपूर, रायपूर, मंगलगिरी, नागपूर, कल्याणी आणि ऋषिकेश या कॅम्पसमध्ये प्रत्येकी 125 विद्यार्थ्यांना, भटिंडा, रायबरेली या कॅम्पसमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांना, बिबिनगर, देवगड या कॅम्पसमध्ये प्रत्येकी 62  विद्यार्थ्यांना आणि गौहाटी, राजकोट, बिलासपूर आणि जम्मू कॅम्पसमध्ये प्रत्येकी 50  विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

पदव्युत्तर अभ्यासक्रम

आयएनआय-सीईटी (इंस्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पार्टन्स-कम्बाइन्ड एन्ट्रन्स टेस्ट) ही चाळणी परीक्षा  वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशासाठी घेतली जाते. मात्र या परीक्षेव्दारे केवळ ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसेसच्या नवी दिल्ली व इतर 18 कॅम्पसेस येथे, पुडीचेरी येथील जवाहर इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, चंदिगढ येथील पोस्ट ग्रॅज्यूएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, बेंगळुरु स्थित नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ ॲण्ड न्युरो सासन्स,या राष्ट्रीय महत्वाच्या संस्था, असा दर्जा प्राप्त संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमांमधे प्रत्येकी सहा वर्षे कालावधीचे एमडी, एमएस, डीएम, डीसीएच आणि एमडीएस अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. जुलै मधील शैक्षणिक सत्रासाठी मे महिन्यात आणि जानेवारी मधील शैक्षणिक सत्रासाठी नोव्हेंबर मध्ये एम्स-नवी दिल्लीव्दारे परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा संपूर्णरीत्या ऑनलाइन अशी आहे.

०००

देशातील टॉप टेन महाविद्यालये

वेगवेगळया सर्वेक्षणांमध्ये पुढील १० वैद्यकीय महाविद्यालये गुणवत्ता आणि दर्जा याबाबत गेल्या काही वर्षात आघाडीवर आहेत. यामध्ये () ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स-दिल्ली, ()ख्रिस्तियन मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल-वेल्लोर, ()आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज-पुणे, ()मौलाना आझाद मेडिकल कॉलेज-नवी दिल्ली, ()जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च-पुडीचेरी, ()किंग्ज जॉर्ज मेडिकल  युनिव्हर्सिटी- लखनौ, ()इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, बनारस हिंदू विद्यपीठ-वाराणसी, ()वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज-नवी दिल्ली, () लेडी हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज नवी दिल्ली, (१०)युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस-नवी दिल्ली.

000

०००

मिलिटरी नर्सिंग सेवा

करोना काळात डॉक्टरांसोबतच नर्सेसनी केलले रुग्णसेवेचे कार्य फार महत्वाचे ठरले. यापुढील काळात वैद्यकीय व्यवसायासाठी नर्सेस या महत्वाची भूमिका बजावणार आहेत. भारतीय लष्कराला सुध्दा नर्सेसची गरज मोठ्या प्रमाणावर भासते.

ही गरज भासवण्यासाठी लष्कराने, मिलिटरी नर्सिंग सेवा सुरु केली आहे. त्यामार्फत चार वर्षे कालावधीचा बीएस्सी इन नर्सिंग, हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला फक्त महिला उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते. परीक्षेचा कालावधी-दीड तास. ही संगणकीय पध्दतीची ऑनलाइन परीक्षा आहे. या परीक्षेतील गुण आणि त्यानंतरच्या मुलाखतीमध्ये मिळालेले गुण यावर अंतिम निवड केली जाते.

अर्हता- 12 वीमध्ये भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी याविषयामध्ये सरासरीने 50  टक्के गुण मिळणे आवश्यक.

या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या सर्व उमेदवारांना अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर नियमित किंवा लघु सेवेची संधी दिली जाते.

संपर्क-joinindianarmy.nic.in, दूरध्वनी-011-23092294

000