(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

सागराचे सरदार ()

१० वी झाल्यानंतर किंवा १२ वी झाल्यानंतर नको तो पुढचा अभ्यास चांगली नोकरी मिळाली तर किती बरे होईल, असे बऱ्याच तरुणांना वाटत असते. हे असे वाटणे योग्य की अयोग्य हे ज्याचे त्याने आणि त्यांच्या पालकांनी ठरवणे योग्य. तथापि १० वी उत्तीर्ण आणि १२ वीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेतलेलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय कोस्ट गॉर्डमध्ये थेट भती होण्याची सुविधा दरवर्षी उपलब्ध होत असते.

साहस गाजवण्याची आणि आव्हान स्वीकारण्याची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर करण्याचा हा एक चांगला पर्याय आहे.

भारतीय कोस्ट गार्डमार्फत दरवर्षी नाविक(जनरल ड्युटी-सामान्य सेवा) आणि नाविक(डोमेस्टिक ब्रँच-गृहशाखा),यांत्रिक(मेकॅनिकल),यांत्रिक (इलेक्ट्रिकल),यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स),या पदांसाठी भरतीप्रकिया राबवली जाते.

अर्हता-

()नाविक(जनरल ड्युटी- सामान्य सेवा)– भौतिकशास्त्र गणित विषयांसह १२ वी, ()नाविक(डोमेस्टिक ब्रँच- देशांतर्गत शाखा)-१० वी उत्तीर्ण, ()यांत्रिक(मेकॅनिकल)/ यांत्रिक (इलेक्ट्रिकल)/यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स),-१०वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विषयातील तीन वर्षे कालावधीची पदविका. वयोमर्यादा- किमान १८ आणि‍ कमाल २२ वर्षे.

निवड प्रकिया-

या पदांच्या निवडीसाठी चार टप्प्यांमध्ये निवड प्रकिया राबवली जाते. हे चार टप्पे पार केल्यावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. अंतिम निवडीसाठी हे प्रशिक्षण समाधानकारकरीत्या उत्तीर्ण होणे आवश्यक ठरते.

टप्पा एक- लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ( ऑब्जेक्टिव्ह) व बहुपर्यायी उत्तरांची असते. पेपरमध्ये पाच सेक्शन(विभाग)असतात. उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचा विभाग निवडवावा लागतो. ही संगणकीय ऑनलाइन पध्दतीची परीक्षा आहे. लेखी परीक्षेमध्ये ८० प्रश्न विचारले जातात. कालावधी एक तास. अभ्यासक्रम- इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि‍ कार्यकारण भाव आणि शाखा निहाय अभ्यासक्रमावरील प्रश्न. निगेटिव्ह गुणपध्दती नाही. दुसऱ्या टप्प्यासाठी (फिजिकल फिटनेस टेस्ट) साठी पात्र होण्यासाठी लागणारे आवश्यक गुण (क्वालिफाईंग) खुला संवर्ग-४० आणि राखीव संवर्ग- ३६.

 

टप्पा दोन– लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित मेरीट(गुणवत्ता)यादी तयार केली जाते. या यादितील उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावले जाते. ही चाचणी एक ‍किंवा दोन दिवस घेतली जाते. ही चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तिसऱ्या टप्प्यासाठी प्रवेश दिला जाते. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रवास इथेच थांबतो. शारीरिक क्षमता चाचणी(फिजिकल फिटनेस टेस्ट)मध्ये पुढील बाबिंचा समावेश आहे.()सात मिनिटात १.६ किलोमीटर धावणे,()२० उठा बसा(उठक-बैठक/ स्क्वॅट अप्स), ()१० पुश अप्स. या तिनही चाळण्या कोणत्याही खंडाशिवाय लागोपाठ द्याव्या लागतात. यात सवलत घेतली तर या चाळणीत अनुत्तीर्ण केले जाते.

टप्पा तीन- पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांमधील उमेदवारांच्या कामगिरीनुसार अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाते. या टप्प्यामध्ये कागदपत्रांची तपासणी केली जाते. या प्रक्रियेला एक ते दोन दिवस लागतात. ऑनलाइन पध्दतीने पाठवलेल्या सर्व कागदपत्रांची वैधता या टप्प्यात प्रत्यक्षरीत्या तपासली जाते. यामध्ये नाव, जन्मतारीख, पालकांचे नाव, गुणांची टक्केवारी, जात प्रमाणपत्र आदी बाबींची तपासणी केली जाते. या तपासणीत काही बदल आढळून आल्यास उमेदवारास अनुत्तीर्ण केले जाते.

टप्पा तीनच्याच दरम्यान अंतिम वैद्यकीय चाचणी केली जाते. या चाचणीत उमेदवार अयोग्य आढळून आल्यास त्याची प्रशिक्षणासाठी निवड केली जात नाही. वैद्यकीय दृष्ट्या अयोग्य आढळून आलेल्या उमेदवारांना अपिल करण्याची संधी दिली जाते. त्यानुसार पुन्हा वैद्यकीय चाचणी , कोस्ट गॉर्डने अधोरेखित केलेल्या किंवा निवडलेल्या लष्करी रुग्णालयात स्वत:च्या खर्चाने करावी लागते.

प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांना याच टप्प्यात पोलिसांचे सत्यापन(व्हेरिफिकेशन)प्रमाणपत्र सादर करावे लागते.

टप्पा चार- उमेदवाराने सादर केलेल्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळून बघितली जाते. या पडताळणीत हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आल्यास उमेदवारांना सेवेतून काढून टाकले जाते.

एखादा उमेदवार सर्वच पदांसाठी अर्हता धारण करीत असेल तरी त्यास फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येतो. एकापेक्षा अधिक पदासाठी त्याने अर्ज केल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.

शारीरिक मानके– या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी काही शारीरिक मानके पुढीलप्रमाणे आहेत.()किमान उंची -१५७ सेमी., ()छाती- सुयोग्य प्रमाणात, ५ सेमीपर्यंत फुगवता आली पाहिजे.,()वजन-उंची आणि वयाशी सुसंगत असावे.अधिक/उणे(+-)१० ग्राह्य धरले जाते.,()श्रवण-सामान्य/उमेदवारांनी आपल्या कानातील मळ स्वच्छ करुन वैद्यकीय चाचणीला जाणे अपेक्षित आहे. दातांवर साचलेला मळ/किड  स्वच्छ केलेला असावी.()टॅटू-शरीराच्या कोणत्याही भागावर कायमस्वरुपी टॅटू रंगवण्यास/ गोंदवण्यास परवानगी नाही. टॅटू रंगवण्याबाबत काही सवलती असून त्याबद्दल विस्तृत माहिती joinindiancostguard.cdca.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रगतीची संधी

नाविक पद हे वेतनश्रेणीच्या तिसऱ्या पातळीचे असून निवड झालेल्या उमेदवारांना त्यांची गुणवत्ता/दर्जा बघून आठव्या पातळीपर्यंत पदोन्नती मिळू शकते. नाविक म्हणून निवड झालेले उमेदवार प्रधान अधिकारी(

नाविक ,उत्तम नाविक-प्रधान नाविक- अधिकारी- उत्तम अधिकारी- प्रधान अधिकारी

) आणि यांत्रिक म्हणून निवड झालेले उमेदवार हे प्रधान साहाय्यक अभियंता(यांत्रिक-उत्तम यांत्रिक- प्रधान यांत्रिक-साहाय्यक इंजिनीअर-उत्तम साहाय्यक इंजिनीअर- प्रधान साहाय्यक इंजिनीअर,

) या पदापर्यंत पदोन्नत होऊ शकतात. सर्व निवड झालेल्या उमेदवारांना मोफत अन्नधान्य, वैद्यकीय सुविधा(आई वडिलांसह संपूर्ण कुटुंब),अल्प भाडे असलेले शासकीय निवास्थान किंवा असे निवासस्थान उपलब्ध नसल्यास शासनाच्या नियमानुसार घरभाडे भत्ता, कँटिन आणि इतर कर्जसुविधा, निवृत्तीनंतर वैद्यकीय सुविधा, दरवर्षी ४५ दिवसांची अर्जित(हक्काची) रजा दिली जाते. तसेच सर्व कुटुंबीयांसह प्रवासासाठी रजा प्रवास सवलत दिली जाते. ५० लाखांचे विमा कवचही प्रदान केले जाते. यासाठी काही रक्कमेचा सहभाग द्यावा लागतो.

साहस गाजवण्याची संधी

भारतीय सागरी सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडण्यासोबतच कोस्ट गॉर्ड हे सागरी संपत्ती (तेल/ वायू/ जलचर/ धातू)चे संरक्षण करतात. संकटात सापडलेल्या मच्छिमारांच्या साहाय्याला धावून जातात. संकटात सापडलेले जीव आणि संपत्तीचेही रक्षण करतात. सामुद्रिक कायद्यांचे पालन होण्याकडे लक्ष पुरवतात. तस्करी, जलचरांची बेकायदेशीर  हत्या/शिकार, मादक पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवतात. सामुद्रिक पर्यावरण व हवामानचे संवर्धन करण्याचीही  जबाबदार पार पाडावी लागते. दुर्मिळ जलचरांचे संरक्षण करतात. सागराशी संबधित शास्त्रीय माहिती गोळा करतात. युध्दाच्या प्रसंगी भारतीय नौदलाच्या साहाय्याला धावून जातात.

ज्या पुरुष आणि महिला उमदेवारांना सागरी आव्हानांचा सामना करण्याचे धैर्य आणि इच्छाशक्ती असेल त्यांच्यासाठी कोस्ट गॉर्डमधील विविध करिअर उत्तमोत्तम संधी देत असतात. सागरावरील या आव्हानांचा सामना करण्यासाठी उत्तम नेतृत्व कौशल्य, सजर्नशीलता आणि नव्या वैचारिक शक्यतांची अंमलबजावणी करण्याची क्षमता व कौशल्य यांची गरज असते. ही गरज कोस्ट गॉर्डमधील विविध श्रेणीचे मनुष्यबळ उत्कृष्टरीत्या भागवत असतात. कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांना दर्जेदार जीवन जगण्याची संधी मिळते. कठोर परिश्रम, व्यावसायिकता, धोक्यांचा सामना करण्याचे कौशल्य, साहस गाजवण्याची संधी , भारत आणि परदेशातील अनेक ठिकाणी भ्रमंतीची संधी मिळते. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत असण्याचे समाधान फार मोठे असते. इतर कोणत्याही नागरी सेवापेक्षा कोस्ट गार्डमधील वैविध्यपूर्ण करिअर हे सर्वच बाजूंनी उत्तम दर्जाचे असते. निवड झालेल्या अधिकाऱ्यांना विविध क्रीडा प्रकार आणि साहसी उपक्रमात सहभागी होण्याची  आणि प्रशिक्षणाची संधी दिली जाते.

 

संपर्क- कोस्ट गार्ड, रिजनल हेडक्वार्टर्स (पश्चिम),वरळी सी फेस कॉलनी, मुंबई-३०,दूरध्वनी-०२२-२४३७१९३२, दूरध्वनी-०२२-२५५०३१०८/२५५०३१०९

००००

 

शिष्यवृत्ती

जी आय आयएस सिंगापूर ग्लोबल सिटिजन स्कॉलरशीप 

        सिंगापूर येथे दहावी नंतर दोन वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या  विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.  उच्च गुणवत्ता असणारे व इतर क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करु शकतात. अर्हता – दहावी मध्ये 94 टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण, इंग्रजी या विषयाचा अभ्यास केलेला असावा. या शिष्यवृत्तीमध्ये शैक्षणिक शुल्कातून पूर्णपणे सूट वसतिगृहाचे शुल्क यांचा समावेश आहे. संपर्क- https://singapore.globalindianschool.org/scholarships/global-citizen-scholarship

०००