एकदा, शाळेतून घराकडे जात असताना, मला रस्त्याच्या कडेला गर्दी दिसली. मिही उत्सुकतने डोकावलो. तिथे एक साप निपचित पडला होता. कुणीतरी म्हणालं, मारुन टाका याला. कुणीतरी दगडही हातात घेतला. त्याक्षणी कशाचाही विचार न करता, गर्दिला ढकलत, सापाजवळ पोहचलो नि त्याला हातात घेतले. त्या सापाला दफ्तरात टाकून घराकडे निघालो. घरी आल्या-आल्या बाबांना सापाची गोष्ट सांगितली. आई ओरडली. बाबांनी मात्र पाठ थोपटली. त्यांनी कुणालातरी लगेच फोन केला. थोड्याच वेळाने काही मंडळी घरी आली. ते साप वाचवणाऱ्या संस्थेत काम करणारे सर्पमित्र होते. त्यांनी दफ्तरातील साप बाहेर काढला. तो आतापर्यंत अर्धमेलाच झाला होता. त्या सर्पमित्रांनी हलक्या हाताने त्याला एका पिशवित टाकलं. त्यांनी माझं कौतुक केलं. “असंच संकटातील प्राण्याचं रक्षण कर, त्यांची सुटका कर, त्यांची काळजी घे.” असं त्यातील एकाने मला सांगितलं.
तेव्हाच, मी सर्पमित्र व्हायचं ठरवलं. त्यासाठी, संकटातील सापांची सुटका कशी करायची? त्यांना नंतर कुठे आणि कसं नेऊन सोडायचं? कुणाची मदत घ्यायची? स्वत:चीही कशी काळजी घ्यायची? याचं तंत्र शिकून घेतलं. हे सगळं करण्यात मला खूप आनंद मिळू लागला. आतापावेतो, मी १००० तरी सांपाची सुटका केली असेल.
त्यानंतर, माझा मदतीचा हात इतर प्राण्यांनांही दिला. रस्त्यांवरुन जातयेत असताना अनेक भटकी कुत्रे, जखमी झालेले, विव्हळत असलेले दिसत. एकदा अशाच एका कुत्र्याला, माझ्या घराजवळच असलेल्या, पशुंच्या दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्याची जखम स्वच्छ केली. त्याला इंजेक्शन दिलं. सलाइन लावलं. मला हे शिकवाल का? असं डॉक्टरांना विचारलं. पहिल्यांदाच कुणीतरी त्यांना अशी विनंती केली होती. मी वेळात वेळ काढून सारं काही जमेल तसं शिकून घेतलं. मग स्वत:च अनेक कुत्र्यांवर उपचार सुरु केले. अशा कुत्र्यांना मग, त्यांच्यासाठी असलेल्या निवाऱ्यात पोहचून देत असे. आतापावेतो, आठशेच्या वर भटक्या कुत्र्यांना, मी दिलासा देऊ शकलो.
मी, पहिल्या सापाला वाचवलं तेव्हा चौथित होतो. माझं वय होतं दहा वर्षाचं. १२ व्या वर्षी मी देशातील सर्वात लहान, सर्पमित्र ठरलो. १५ व्या वर्षी इंडिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये याची नोंद झाली. इनजेनियस चार्म वर्ल्ड रेकॉर्डमध्येही याची दखल घेतली गेली.
शाळेचं सगळं व्यवस्थित करुन प्राण्यांच्या साहाय्याला धावून जाण्याचं काम मी, न कंटाळता उत्साहाने करतच आहे. प्राण्यांच्या या सेवेची दखल, भारत सरकारनेही घेतली. २०२४ साली मला, प्रधानमंत्री बाल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. प्राण्यांच्या साहाय्यासाठी धावून जाण्यासोबतच आता, मी ग्रीन अर्थ गॉर्डियन्स या संस्थेत सक्रिय झालो असून पर्यावरण रक्षणासाठी, माझ्याच वयाच्या मुलांच्या आणि मोठ्यांच्याही मनात जाणीव जागृतीसाठी मनापासून काम करू लागलोय. स्वच्छता
मोहिम, वनसंवर्धन ही कामेही मला आवडू लागलीय. ज्या गोष्टीचा आनंद मिळतो, ते केलं केलं की, सगळं काही सहज आणि सुलभ होतं, माझंच बघाना, संकटातीलह सापांची सुटका करताना, अनेकदा मला त्याचा फटका बसला. पण, मिळणाऱ्या आनंद आणि समाधानापुढे तो त्रास काहीच नव्हता.
असो, तर मी सय्याम माझुमदार. वय वर्षे १७. हल्ली मुक्काम आसाम राज्यातील गौहाटी.
सुरेश वांदिले