(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

सारे काही आठ दिवसात ,पण..
   रामराव,शामरावांचे मित्र.गोमाजीराव,शामरावांचे मित्र.गोमाजीराव सरकारी ऑफिसर.कार्यक्षम वगैरे.त्यांच्याकडील फाइलची मुव्हमेन्ट पटपट होते,असा त्यांचा लौकिक.पण रामरावांना काही हा अनुभव आला नाही.त्यांचं एक बारिकसं आणि भुरकं कामही महिन्याभरापासून रेंगाळलं होतं.कारण गोमाजीरावांना वेळच भेटत नव्हता.ही बैठक,ती बैठक,असं त्यांचा पीए रामरावांना सांगायचा.पण कशाची बैठक हे मात्र त्यास सांगता येईना.माहितीच्या अधिकारात विचारायचं म्हणजे एक महिन्याची निश्चिंती.तेही रामारावांनी करुन बघितलं.माहिती उपलब्ध नाही असं उत्तर मिळालं.
   आपल्या भुरक्या कामाचं नशिबच फुटकं असल्याचं रामरावांच्या लक्षात आलं.त्यांनी आपल्या एका ज्योतिष मित्राकडून या भुरक्या कामाची प्रश्नकुंडली काढून पाहिली.ही कुंडली काढली तेव्हा सर्व ग्रह आणि उपग्रह हे वक्री  झाले होते.याची वाईट दृष्टी त्याच्यावर पडली होती.त्याची काळी छाया याच्या घरावर पडली होती.त्यामुळे काम जरी भुरकं असलं तरी ते होण्यासाठी अडथळयांची शर्यत पार पाडवीच लागेल.असं ज्योतिषमित्रानं सांगितलं.ग्रह शांती केली तर वक्री ग्रह सरळ नाही का होणार,असे रामरावांनी विचारलं.ज्योतिषमित्राने प्रश्नकुंडली काळजीपूर्वक तपासली.ज्योतिषमित्र म्हणाले,एक अदृष्य ग्रह तुमचा प्रश्न सोडविण्याचा आड येताना दिसतोय.हा ग्रह आकाशतला नसून या पृथ्वीतलावरील आहे.त्यामुळे या ग्रहाची शांती कशी करावयाची हे मज सांगता येणार नाही.
   मग मी काय करु हो,प्रश्न तिथे उत्तर,अडथळा तिथे मार्ग असतोच ना.रामराव काकुळतीने म्हणाले.पण ज्योतिषमित्र असमर्थता दर्शवून निघून गेले.
   आपल्या भूरक्या कामाची चिंता कशी मिटवायची या विवंचनेत असताना एके दिवशी रामराव,शामरावांना त्याच सरकारी ऑफिसात भेटले.रामरावांची चिंता शामरावांनी हेरली.रामारावांनी सारं वर्णन केलं.
   हात्तिच्या,इतका लहानसा प्रॉब्लेम.मी गोम्याला सांगतोना.क्षणात प्रश्न निकालात काढेल, असं बोलून शामरावांनी, रामरावांना गोमाजीरावांच्या दालनात नेलं.
   गोमाजीरावांच्या शिपायीरावांना शामराव हे परिचित असल्यानं त्याने अडवलं नाही.शामरावांची वट बघून रामराव हरखून गेले.दालनात गोमाजीराव एका फाईलच्या स्टडीमध्ये गुंग होते.शामरावांनी गोमाजीरावांची समाधी भंग केली.गोमाजीरावांनी दोघांना बसायला सांगितले.चहा मागवला.शामरावांनी,आतापर्यंत आपल्या दोस्ताला या भुरक्या कामासाठी कसा मनस्ताप सहन करावा लागला हे सांगितलं.
   ते ऐकून गोमाजीरावांचं ह्रदय द्रवलं.आधीच आपली भेट झाली असती तर बरं झालं असतं. ते म्हणाले.
   आपण खुपदा येऊन गेलो,पण आपली भेट होऊ शकली नाही.असं रामराव गोमाजीरावांना म्हणाले.गोमाजीरावांनी शिपायीराव आणि पीएराव यांना शिव्या हासडल्या.त्यांच्यामुळे आपल्याला बट्टा लागतो.हे सांगण्यास ते विसरले नाहीत.तुम्ही उद्या या तुमचे काम लगेच करतो.डोण्ट वरी.असं त्यांनी आश्वासन दिलं.चहा घेऊन शामराव आणि रामराव दालनाच्या बाहेर पडले.
   उद्या रामराव येतील त्यांनी चटकन आत सोडायचं,असं शामरावांनी शिपायीरावांना गोमाराजीरावांच्या दालनातून बाहेर पडताना त्याला सांगितलं.
   साहेब,तुम्ही सांगितलं म्हणजे आमच्या सरांनीच सांगितल्या सारखच आहे.उद्या या साहेबांना दहा वाजताच यायला सांगा.आल्या आल्या त्यांना सोडतो आतमध्ये.शिपायीराव बोलले.
   रामराव दुसऱ्या दिवशी बरोबर दहा वाजता पोहचले.शिपायीरावांनी त्यांना गोमाजीरावांच्या दालनात सोडलं.गोमाजीरावांनी त्यांचं हसून स्वागत केलं.प्रश्न समजून घेतला.आठ दिवसात तुमचे काम झाल्याचेच समजा असं सांगून त्यांना निरोप दिला.आठदिवसांनी रामराव,गोमाजीरावांना भेटले.गोमाजीरावांनी त्यांचं हसून स्वागत केलं.रामारावांच्या कामाची फाइल मागवल्याचं गोमाजीरावांनी रामरावांना सांगितलं.आठ दिवसात सारं काही कळेल असं बोलून त्यांनी रामरावांना निरोप दिला.आठ दिवसांनी रामरावांनी गोमाजीरावांची भेट घेतली.गोमाजीरावांनी त्यांचं हसून स्वागत केलं.फाइलचा अभ्यास सुरु असून तो आठ दिवसात संपेल नि तुमचं काम होईल, असं सांगून त्यांनी रामरावांचा निरोप दिला. पुढच्या आठ दिवसांनी रामरावांनी गोमाजीरावांची भेट घेतली.तेव्हा त्यांनी रामरावांचं उभे राहून स्वागत केले.अभ्यास पूर्ण झाला असून फाइल माझ्याकडेच ठेवली आहे,असं गोमाजीरावांनी फाइलकडे बोट दाखवत रामारावांना सांगितले.रामरावांचा चेहरा उजळला.
   मग आज होणार ना सर माझे काम,रामरावांनी अधिरतेनं विचारलं.
   व्हायलाच पाहिजे.पण फाइलमध्ये एक जीआर जोडलेला नव्हता.तो जोडायला सांगितला आहे.आठदिवसात होऊन जाईल सारं.गोमाजीराव म्हणाले.रामरावांच्या उजळलेल्या चेहऱ्यावर अमावस्येची काजळी पसरली.
   काळजी करु नका हो.मी आहे ना,तुमचे काम होणार म्हणजे होणारच.आठ दिवसांनी या,असं बोलून गोमाजीरावांनी रामरावांना निरोप दिला.हताश झालेल्या रामरावांनी अखेर शामरावांना गाठलं.त्यांना सारं काही विदित केलं.शामरावांनी गोमाजीरावाला शिव्या हासडल्या.
   काम कां होत नाही,हे आपण स्वत: बघून घेतो.असं शामरावांनी,रामरावाला सांगितलं.त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी गोमाजीरावांना भेटले.थेट विषयालाच हात घातला.
   अरे काम झालेच आहे.ही बघ फाईल.शामरावांना गोमाजीराव म्हणाले.
   मग घोडे अडलं कुठे?
   गांधीदर्शन झालं नाही ना.अद्याप.
   विनोबा दर्शन नाही का चालणार गोमाजीराव..रामरावांचं बोलणे ऐकून गोमाजीरावांनी कप्पाळावर हात मारुन घेतला.सामान्य ज्ञानाचा असा अंधार असेल तर,अज्ञानाच्या डोही गंटागळया खाणं आलंच.गोमाजीराव बोलले.आणि त्यांनी रामरावांना निरोप दिला.
   गांधी दर्शन घडण्यासाठी शामरावांनी स्वखर्चाने माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक शामरावांनी,रामरावांना घेऊन दिले आहे