(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

सिंहेश्वर, मच्छरास घाबरतो तेव्हा…

आपण जंगलाचा राजा असल्याचा अभिमान सिंहेश्वराला होता. त्यामुळे तो सर्व प्राण्यांना हिडिस फिडिस करत राहायचा. कोणत्याही प्राण्याची शिकार करण्यास तो मागेपुढे पाहत नसे. सगळे प्राणी तुच्छ आहेत. आपणच एकमेव श्रेष्ठ आहोत. या वनाचेच नव्हे तर जिथेजिथे वन आहेत, त्याठिकाणचे सम्राट आहोत असं त्याला वाटायचं. दिवसेंदिवस त्याचं वागणं क्रुर होत गेलं. त्यामुळे वननगरीत दहशतीचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे वनगरीच्या प्राण्यांनी ठरवलं की, आपण हे वनच सोडून दूर निघून गेलं पाहिजे. पण कुठं जायचं, हे काही कुणास सांगता येईना.

वननगरीच्या बाहेरचं जग कोणत्याही प्राण्याला फारसं ठाऊक नव्हतं. हत्ती, मोर अजगर अशासारखे प्राणी बाहेर एकदोनदा बाहेर जाऊन आले होते. पण बाहेरचं जग हे वनापेक्षा अधिक भीतीदायक होतं. तिथे खाण्या-पिण्याची राहण्याची आबाळ होण्याची जास्त शक्यता होती. वननगरी ही आपली हक्काची जागा आहे. सिंहेश्वराची अरेरावी आणि दुष्टपणा सोडला तर इथे मोठी सुरक्षितता होती. हत्तीरावानं आपला अनुभव सांगितला. मग आता करायचं तरी काय? सिंहेश्वराच्या क्रुरतेपासून सुटका करुन घेणं शक्य नाही. आपणास असच भीतभीतच या वनात यापुढे राहवं लागेल, असं वाटून सर्व प्राणी खिन्न झाले.

ही सभा सुरु असतानाच त्या ठिकाणी काही मच्छरं आले होते. सिंहेश्वरापेक्षा कमी असतील तरी काही प्राणी चांगले धिप्पाड होते. त्यातील काही प्राणी शिकारही चांगली करु शकत असत. चपळ होते. त्यांच्याकडे तीक्ष्ण सुळे आणि अणुकचिदार नखं होती. असं असूनही हे प्राणी एका सिंहेश्वरास घाबरतात हे बघून मच्छरांना दु:ख झाले. सभेतील प्राण्यांच्या चेहऱ्यावरचं दु:ख  आणि विशाद बघून एका मोठ्या मच्छराला राहवलं नाही. सभा संपत असतानाच तो मोठा मच्छर हत्तीरावाच्या कानाजवळ जाउुन म्हणाला, तुझी परवानगी असेल तर सिंहेश्वराला काटा काढण्याचा उपाय सांगू का मी. मोठ्या मच्छराचं हे बोलणं ऐकून त्या दु:खी वातावरणातही हत्तीला हसू आलं.

हत्तीराव, तुम्ही कां हसता आहात. अजगरानं विचारलं.

अहो एक मच्छर माझ्या कानात येऊन म्हणतो की तो सिंहेश्वराला धडा शिकवू शकतो. हा… हा… हा…

हत्तीचं बोल ऐकून इतरही प्राणी ही ही फी फी करत खिदळू लागले. ते हसणं खिदळणं एकूण मोठ्या मच्छराला राग आला. त्याने कोल्हयाला डंख मारला. कोल्हा वेदनेनं विव्हळू लागला. वाचवा, वाचवा , असं म्हणत ताडकन उभा राहिला.

कुणापासून वाचवा? लांडग्यानं विचारलं.

इथं तर कुणीच नाही. कोण आलंय इथं. मोरानं घाबरुन विचारलं.

असं घाबरु नका. आम्ही आलो आहोत. मोठा मच्छर जोराने म्हणाला. तो आणि त्याचे साथिदार हत्तीच्या मस्तकावर बसले होते. हत्तीरावाच्या कानात पुन्हा तो मोठा मच्छर म्हणाला,

या सर्वप्राण्यांना आमचं काय म्हणनं आहे ते ऐकण्यासाठी तुम्ही सांगा.

हत्तीरावांनी मग तसं सर्वांना सांगितलं. सभेत शांतता पसरली. मच्छर काय सांगतो याकडे प्रत्येक प्राणी कान देऊन ऐकू लागला.

मोठा मच्छर म्हणाला,

आम्ही सिंहेश्वराला धडा शिकवू शकतो. त्याला या वनातून हाकलून सुध्दा लावू शकतो. मात्र त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे.

कोणताच उपाय दिसत नसल्यानं अखेर मच्छरांचं म्हणणं मान्य करण्यात आलं.

०००

या सभेची बित्तंबातमी एका कावळयानं सिंहेश्वराच्या कानी टाकली. त्याक्षणी सिंहेश्वराला सर्व प्राण्यांचा प्रचंडच राग आला. पण त्याहीपेक्षा त्याला त्या मोठ्या मच्छराचा खूप राग आला. आपल्या धडा शिकवण्याची भाषा करणारा हा मच्छर सिंहेश्वराच्या अजिबातच पचनी पडला नव्हता. या मच्छरांचा नायनाट आधी करु आणि नंतर इतर प्राण्यांचा समाचार घेऊ असं सिंहेश्वरानं मनोमन ठरवलं.

हे मच्छर कुठे दिसतात, कुठे राहतात याचा शोध घेण्याचं त्याने कावळयाला सांगितलं. अशी माहिती दिली तर यापुढे आपण आपल्या शिकारीतील काही वाटा त्याला आणि त्याच्या पिल्लांना कायम राखून ठेऊ असं सिंहेश्वरानं कावळ्यास वचन दिलं. कावळा खुष झाला.

कावळा मग मच्छरांचा शोध घेऊ लागला. इकडे तिकडे भटकत असताना त्याच्या लक्षात आलं की, सिंहेश्वर वनातल्या ज्या तलावात पाणी प्यायला जातात, त्या ठिकाणी हा मोठा मच्छर, त्याचे कुटुंबीय आणि साथिदार राहतात. त्याने ही माहिती सिंहेश्वरास दिली. सिंहेश्वराला अत्यानंद झाला.

सिंहेश्वर वेगाने तळयाकडे निघाला.तळयाजवळ पोहचताच  गर्जना करत म्हणाला,

मच्छरांनो कुठे दडून बसला आहात, या माझ्यासमोर. वननगरीतील प्राण्यांना माझ्याविरुध्द भडकवता काय, मूर्खांनो, मीच या वनाचा राजा आहे आणि पुढेही राहणार आहे. कुणी हुं की चू करु शकत नाही माझ्यासमोर. तुम्ही कोण आलात रे तिस्मारखान…

सिंहेश्वर असं बोलत असताना त्याचा अंहकार, गर्व आणि अभिमान ओसंडून वाहत होता. आपणास तुच्छ समजणाऱ्या या सिंहेश्वराला आपला प्रताप दाखवण्याची योग्य वेळ आता आल्याचं मोठ्या मच्छरानं ताडलं. त्याने सर्व साथिदारांना इषारा केला. हा इषारा मिळताच मच्छर टोळी सिंहेश्वरावर तुटून पडली. जमेल तिथे त्याला चावा घेउु लागली. सिंहेश्वरानं गर्जना केली. जबडा मोठा केला. शेपटी जोरजोरानं हलवली. तो गडबडा लोळायला लागला. पण मच्छरांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ते चाव्यावर  चावे घेतच राहिले. या चाव्यांनी त्रस्त होऊन सिंहेश्वरानं तिथून धूम ठोकली.

झाडावर बसलेला कावळा हे दृष्य बघून चकित झाला. सिंहेश्वराला मच्छरांनी पळवल्याचं अदभूत घटना त्याच्यासमोर घडली होती. सिंहेश्वर पळू लागताच मच्छर टोळीही त्याच्या पाठीमागे ऊडू लागली. आता पुढे काय घडणार याची उत्सुकता ताणल्या गेल्यानं कावळाही त्यांच्या पाठीमागे उडू लागला. सिंहेश्वर जिवाच्या आकांतानं पळत पळत गुहेत पोहचला. तो धापा टाकत कसा बसला खाली बसत नाहीच तोच मच्छरटोळी पुन्हा त्यांच्या अंगावर चावा घेऊ लागली. आता त्यांनी सिंहेश्वराच्या कुटुंबियांवरही हल्ला केला. या चाव्यांनी सिंहेश्वर आणि त्याचे कुटुंबीय घाबरुन गेले. सर्वजण गुहेच्या बाहेर पडले. वाट मिळेल तिकडे पळू लागले. सिंहेश्वर आणि त्याचे कुटुंबीय वनातून बाहेर पडल्यावरच मच्छरांनी त्याचा पाठलाग सोडला.. कावळा हे सर्व काही बघत होता. त्याच्या डोळयावर अजिबातच विश्वास बसत नव्हता. त्याने मच्छरांचा जयजयकार केला.

तूच आमचा आता राजा हो, अशी गळही घातली. तेव्हा मोठ्या मच्छरानं त्यास नकार दिला.

तो म्हणाला की, हे वन सर्वांचं आहे. सर्वजण सारखेच आहेत. कुणाकडे शक्ती अधिक आहे म्हणून काही तो या वनाचा राजा होत नाही. आपण सर्वांनी आता गुण्यागोविंद्यानं राहिलं पाहिजे. प्रत्येकामध्ये काहीना काही गुण असतातच. थोडीशी शक्तीही असते. ते गुण, ती शक्ती आणि युक्ती याचा वापर केला तर कुणालाही भ्यायची गरजच पडत नाही.

मोठ्या मच्छराचं म्हणनं सर्वांना पटलं. वननगरीत त्यानंतर सर्वप्राणी गुण्यागोविंद्यानं राहू लागले…

 

सुरेश वांदिले,