स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये १३ वर्षे ब्रिटिशांनी डांबून ठेवलं, ते बघण्याची तेजोमयीची फार दिवसांची इच्छा, अंदमान सफरीमुळे अखेर पूर्ण होणार होती. त्यामुळे अंदमानला जायचं ठरल्यावर तेजोमयीस खूप आनंद झाला.
एका पर्यटन कंपनीच्या अंदमान टूरच्या प्रवाशांसह आईबाबा आणि तेजोमयी, विमानाने पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर उतरले. आता याचं नाव श्री विजयपूरम असं करण्यात आलय. विमानतळाच्या बाहेर पडल्याबरोबर स्वातंत्र्यवीरांचा भव्य पुतळा सगळ्यांना दिसला. तिथे जाऊन सगळ्यांनी त्यांना वंदन केलं. मग सुरु झाली फोटो काढण्याची गडबड. त्यातून ढकलाढकली, धक्काबुक्की, एकमेकांवर चिडणं. कसंबसं टूर गाइडने सगळ्यांना शांत केलं. बसमध्ये चढल्यावर सगळेजण, आपले फोटो कसे आलेत, ते मोबाइलमध्ये बघण्यात मग्न झाले.
मुक्कामाच्या हॉटेलमध्ये ताजेतवाणे होऊन सगळेजण लगेच सेल्युलर जेलकडे निघाले.
ब्रिटिशांनी १८९६ ते १९०६ या काळात हा तुरुंग बांधला. प्रत्येक कैद्यासाठी एक कोठडी म्हणजेच “सेल” या तुरुंगात असल्यानं याला सेल्युलर जेल असं नाव पडलं. ही इमारत अजुनही चांगल्या स्थितीत आहे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शेकडो स्वातंत्र्यसैनिकांना इथे ठेवण्यात आल्याने आता याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात आलाय.
सेल्युलर जेलमधील सर्व कैद्यांच्या गळ्यात तुरुंगाचा एक बिल्ला टाकला जाई. सगळ्यांचे बिल्ले सारखेच होते. फक्त स्वातंत्र्यविरांच्या गळ्यातील बिल्ल्यावर “डी” असं लिहिलं होतं. “डी” म्हणजे डेंजरस. स्वातंत्र्यवीर सावरकर हे ब्रिटिशांच्या दृष्टिने सर्वाधिक डेंजर कैदी होते. म्हणून हा उल्लेख.
ब्रिटिशांनी स्वातंत्र्यविरांचे या तुरुंगात प्रचंड हाल केले. त्यांच्या कोठडीच्या समोरच फाशी देणारी जागा असल्याने कैद्यांच्या किंकाळ्या, त्यांचे हाल, त्यांचं तडफडणं बहुतेक दररोज स्वातंत्र्यवीरांना बघावं लागे. फाशी दिलेल्या कैद्यांचे मृतदेह काही दिवस लटकावून ठेवले जातं. पण या भयावह परिस्थितीतही स्वातंत्र्यवीर मनानं खंबीर राहिले.
कोणतीही सोय नसलेल्या या काळकोठडीच्या भिंतीवर त्यांनी “कमला” नावाचं महाकाव्य लिहिलं. हे काव्य, ब्रिटिश अधिकारी रंग फासवून मिटवून टाकत. त्यानेही खचून न जाता स्वातंत्र्यवीर पुन्हा या भिंतीवर हे काव्य लिहून काढत. भारताच्या या अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी स्वातंत्र्यवीराबद्दल अशी बरीच माहिती तेजोमयीने वाचली होती. त्यामुळे स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीचं दर्शन कधी घडतं, असं तेजोमयीस होऊन गेलं होतं.
सगळा तुरुंग दाखवल्यावर दुसऱ्या मजल्यावरील शेवटी असलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या कोठडीकडे सगळे पर्यटक निघाले. ‘सगळयांनी एका रांगेत उभे राहावं, रांगेच्या दुसऱ्या बाजूला पादत्राणे काढून ठेवावित म्हणजे परत जाताना ती घालणं सोईचं जाईल’, अशा सूचना टूर गाइड करत होता. पण बऱ्याच जणांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केलं. ज्या रांगेत उभे होते तिथेच पादत्राणे काढली. त्याच रांगेत उभ्या असणाऱ्यांना या पादत्रांणावरुन जावं लागलं. त्यामुळे काहीजण अडखळले. एक वृध्द व्यक्ती पडता पडता राहिली.
स्वातंत्र्यवीरांना ठेवण्यात आलेली कोठडी छोटी असल्याने पाच-सहा जणांनाच एकावेळी तिथे जाऊ दिलं जाई. आईबाबा आणि तेजोमयीसोबत आणखी दोन-तीन व्यक्तींना आत सोडलं गेलं. तेजोमयी आणि आईबाबांनी खोलीचं निरीक्षण केलं. स्वातंत्र्यवीरांनी, मरणयातना भोगल्या ती कोठडी बघून तेजोमयीचा उर भरुन आला. त्या कोठडीतील स्वातंत्र्यवीरांच्या तसबिरीसमोर बसून, त्यांना तिघांनी वंदन केलं.
अर्धा मिनिटसुध्दा झाला नसेल, एक पर्यटक ओरडला, “अरे, जरा जल्दी करो. हमे सेल्फी निकालनी है.” या आवाजाने तेजोमयी आणि आईबाबा तिथून उठले. त्या व्यक्तीसोबत असल्यांनी मग वेगवेगळ्या पोजमध्ये तिथे फोटो काढायला सुरुवात केली. स्वातंत्र्यवीरांचा फोटो येईल अशा बेताने सेल्फी काढण्यासाठी वेगवेगळया कोनातून ही मंडळी कॅमेरा क्लिक करु लागले. मनासारखा कोन मिळाल्यावर आणि सगळ्यांच्या छबीसोबत स्वातंत्र्यवीरांचाही फोटो आल्याने मंडळी आनंदून तिथेच जोरजोराने खिदळू लागली. कुणालाही कशाचं गांभीर्य वाटेनासं झालं.
सेल्फीच्या नादात हे असं बेशिस्तीत वागून स्वातंत्र्यवीरांचा आपण अपमानच करतोय असं कुणालाही वाटत नव्हतं. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती त्यांच्यासोबतच्या सेल्फीतून नव्हे तर त्यांची प्रखर देशभक्ती, निष्ठा, सहनशीलता, बुध्दिमत्ता, शिस्त, दुर्दम्य इच्छाशक्ती, अजोड साहस, चारित्र्य या गुणांमधून मनात नि ह्रदयात कोरायला हव्यात, हे कुणाच्याही गावी नव्हतं. हे सगळं बघून तेजोमयीस आश्चर्यासोबत वाईट वाटलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. चला चला बाहेर पडा, असे शिट्टी वाजवून शिपायाने आठवण करुन दिली. ‘स्वातंत्र्यवीर, आम्हाला क्षमा करा’, असं काहीसं पुटपुटत तेजोमयी आईबाबांसमवेत कोठडीच्या बाहेर पडली.
सुरेश वांदिले