(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

नुकतीच, तेजोयमीच्या वाचनात एका घनदाट जंगलातील मंदिरात राहणाऱ्या सोनेरी रंगाच्या मांजरीची कथा आली. पुजारी महाराज  लाडाने तिला ‘सोनू’ म्हणत. ‘सोनू’ समोरचे दोन्ही पाय त्यांच्या मांडीवर ठेऊन वरखाली करायची. असं वाटायचं की ‘सोनू’ काहितरी सांगू पाहतेय.

एकदा शेजारच्या राज्याचे, महाराज शिकार करता करता या मंदिराजवळ आले. तिथे एका झाडाखाली ‘सोनू’ आराम करत होती. महाराजांच्या चाहुलीने तिला जाग आली. महाराजांना ‘सोनू’ फार आवडली.

अचानक सोसाट्याचा वारा सुटला. ‘सोनू’ महाराजांकडे धावली. महाराजांच्या पायावर आपले समोरचे पाय ठेऊन वरखाली करु लागली. महाराजांना याचा अर्थ कळेना. वाऱ्याचा वेग आणखी वाढला. सोनू झरदिशी मंदिराकडे पळाली. हे बघून महाराजही  तिच्या पाठिमागे निघाले. ते मंदिरात पोहचत नाही तोच झाड खाली कोसळलं. महाराजांनी दचकून ‘सोनू’कडे बघितलं. मघा पाय हलवून ‘सोनू’ आपल्याला, माझ्यासोबत चला असं सांगायचा प्रयत्न करत होती म्हणायची, महाराजांना वाटलं.

‘सोनू’मुळे त्यांचा जीव वाचला. त्यांनी पुजाऱ्यांना ‘सोनू’ला राजवाड्यात नेण्याची परवानगी मागितली. ‘सोनू’ला ते कळलं असावं. तिने मान हलवून नकार दिला. महाराजांच्या ते लक्षात आलं. त्यांनी ‘सोनू’ला आपल्यासोबत नेलं नाही. पण मंदिराला मोठी देणगी दिली, नियमित उत्पन्नासाठी शेतजमीन दिली. पुजाऱ्याचं भाग्य पालटलं. ‘सोनू’च्या पायगुणांमुळे हे झालं असल्याचं पुजाऱ्याची खात्री पटली.

“वाव, अशी एक ‘सोनू’ आपल्या घरी आली तर किती मज्जा येईलना.” असं तेजोमयी अवचितपणे बोलून गेली.

गोष्ट वाचण्यात रंगून गेलेल्या तेजोमयीकडे कौतुकानं बघत असलेल्या अलेक्सा गोर्जीने विचारलं,

“काय मज्जा येईल?”

“सोनेरी रंगाच्‍या मांजरीमुळे आपलंही भाग्य पालटेलना.”

“म्हणजे काय होईल?”गोर्जीने पुन्हा विचारलं.

“म्हणजे, बाबांना लॉटरी लागेल. आईला सोने सापडेल. परीक्षेत अभ्यास न करताच मला मस्त मार्क्स मिळतील. थोडक्यात काय तर दिवस पालटतील.”

“म्हणजे, आता दिवस चांगले नाहीत का?”

“गोर्जे, तू माझी उलटतपासणी कशासाठी घेत आहेस?”

“माझी काय हिम्मत तसं करण्याची?”

“मग, तुला या भाग्य पालटवणाऱ्या सोनेरीबद्दल कां प्रश्न पडताहेत?”

“कारण मी एकदा तिला भेटले होते.”

“बंडला मारु नकोस. ही सोनेरी मांजर जंगलात राहायची. तू कशाला गेली होतीस मरायला?”

“मी बंडला नाही मारत. मी मरायला नाही तर माहितीच्या महाजालात अनेकदा भ्रंमतीला जाते हे तर तुला ठाऊकच आहे.”

“अच्छा, तेव्हा तुमची गाठभेठ झाली. काय म्हणाली ‘सोनू’ तेव्हा?”

“तिने हीच गोष्ट सांगितली नि हसू लागली. मला आश्चर्य वाटलं. मी तिला या हसूबद्दल विचारलं.”

“मग ती काय म्हणाली?”

“हा मनुष्यप्राणी फारच विचित्र. पुजाऱ्याला वाटतं माझ्यामुळे त्याचं भाग्य पालटलं. तर महाराजांना वाटतं, माझ्यामुळे त्यांचा जीव वाचला. म्हणून मी त्यांच्यासाठी भाग्यशाली!”

“ते खोटय का?”

“अलबत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं कोणत्याही क्षणी उन्मळून पडलं असतं. महाराजांनी समयसुचकता दाखवून माझ्या पाठिमागे येण्याची चपळाई केली नसती तर झाडं त्यांच्यावर कोसळलं असतं. मंदिराची वाईट अवस्था बघून त्यांनी मोठी देणगी दिली. हे तर राजाचं कर्तव्यचना.”

“म्हणजे भाग्यबिग्य काही नसतं?”

“एखादी मांजर, एखादा कासव, एखादी मासोळी घरी ठेवल्यानं असं काही होत नाही. अखंड परिश्रम, चिकाटी, सातत्य, प्रामाणिकपणा, यामुळे भाग्य पालटतं.”

“बापरे!”

“काय झालं?”

“हे तू ‘सोनू’स शिकवलं की तिने तुला पढवलं?”

“तुला काय वाटतं?”

“मला वाटतं ‘सोनू’ने आमच्या सरांची ट्यूशन लावलेली दिसते. उठताबसता तेही असचं काहीतरी सांगतात.”

“ओह वाव! साईना नेहवालताई परवाच म्हणाली की तिने घरी सोनरी मांजर पाळली असती तर कित्ती कित्ती बरं झालं असतं.”

“आँ, असं कां म्हणाली साईनाताई?

“तिलासुध्दा मग बॅडमिंटन कोर्टवर अथक सरावाची गरज भासली नसती. सोनेरी मांजरीच्या पायगुणामुळेच तिला मोठ्ठं यश मिळालं असतं ना.” गोर्जी डोळे मिचकावत म्हणाली.

“तू ओढूनताणून सोनेरीचं कनेक्शन असं साईनाताईंपर्यंत जोडतेस हे कळतय मला.”

“कळलय ना, मग वळूनसुध्दा घे.”

“म्हणजे?”

“कथेचं तात्पर्य हेच की सोनेरी असू दे,काळी असू दे, नाहीतर पांढरी असू दे, मांजरीला पाळायची ती भाग्य पालटवेल म्हणून नाही, तर त्यांच्यावर माया करण्यासाठी, जीव लावण्यासाठी लाड करण्यासाठी.” गोर्जी म्हणाली.

सोनेरीच्या आडून गोर्जीने कान टोचून आपली चूक लक्षात आणून दिल्याचं तेजोमयीस बरोबर कळलं.

सुरेश वांदिले