सोन्याची अंडी देणारी कोंबडी आणि बोलणारा मच्छर
यंदा शाळा सुरु झाली त्या दिवसापासून परीक्षा एके परीक्षा होत राहिल्याने अभ्यास करुन करुन टिल्लू आणि टोळी जाम बोर झाली होती. उन्हाळ्याच्या सुटीत मस्त धम्माल करायची असं टिल्लू आणि टोळीने महिनाभराआधिच ठरवलं होतं.
000
या प्लाननुसार टोळी आई – बाबांना या प्लानची कल्पना देऊन दुसऱ्या दिवशी चार वाजताच बँडस्टँडकडे बेस्टच्या बसने निघाली. टोळी बँडस्टँडच्या थांब्यावर उतरुन रमत गमत चालू लागली.चालता चालता टिल्लूला सुपरस्टार शाहरुख खान यांचा मन्नत नाव असलेला बंगला दिसला.त्याने टोळीचे लक्ष तिकडे वेधले.
“आपल्याला या बंगल्यात जाता येईल का “असं मी म्हणाली होती.
“ वेडी का खुळी गं तू..अगं या बंगल्यात शाहरुख खानच्या मित्रांशिवाय कुणालाही जाता येत नाही.कडक सुरक्षा असते इथे. “
” छॅय..आपण कां बरं शाहरुख खानचे मित्र नाहीत रे. “.गंपू दु:खी होऊन म्हणाला.
” शाखरुख अंकलला आपण एसएमएस केला तर तो कदाचित आपल्याला बोलावून घेईल कदाचित.त्याला मुलं आवडतात असं मी कोणत्यातरी एका इंग्रजी पेपरमध्ये वाचलं होतं. “तेजोमयी म्हणाली.
“गूड आयडिया.. “टिल्लू म्हणाला..
“अरे पण आपणाकडे शाहरुख अंकलचा मोबाईल नंबर कुठाय.. “वैष्णवने टोळीच्या निदर्शनास ही बाब आणली.टोळी निराश झाली.
“मन्नतचे दूरुनच दर्शन घेऊन निघू या..खूप वेळ गेला आपला. “टिल्लू म्हणाला.
टिल्लू आणि टोळी थोडावेळ बंगल्याजवळ घुटमळली आणि पुढे निघाली..
थोडे अंतर चालून गेल्यावर टिल्लू म्हणाला-“कामधेनू,सोन्याची अंडी देणारी कोंबडी,चांदिची अंडी देणारी हंसी,नाणी थुंकणारे कोंबडे,हिरे जडवलेला नारळ देणारा गाढव,मांजर होणारी राजकन्या,अल्लाउद्दिनचा जादूचा दिवा,जादूचा गालीचा,सोन्याची हरीण आणि हॅरी पॉटरकडे असतो तसा जादूचा झाडू यांचा शोध आपल्याला या बंगल्याच्या आसपास लागू शकतो बरं का? “
“ तू पण येड्यासारखा काहीतरी बडबडतोस नेहमी. “तेजोमयी मन्नत कडे बघत म्हणाली.
“यात काय वेडेपणा झाला गं , “टिल्लू तेजोमयीला म्हणाला.
” खरं तर आपल्या सारख्या स्मार्ट मुलांना असलीच साहस करायला हवीत.या बंगल्याचं नाव मन्नत असं आहे.याचा अर्थ मनी इच्छिले ते देणारा.तेव्हा टिल्लूच्या मनात ते जे आलय ते कदाचित या ठिकाणी खरंही ठरेल.. “वैष्णव म्हणाला.
“त्यासाठी आपल्याला शाहरुख अंकलच्या बंगल्यात जावं लागेल.तिथं राहवं लागेलं.प्रत्येक खोलीची तपासणी करावी लागेल.ती सुध्दा गुपचूप.शाहरुख अंकलला न कळता.हे शक्य आहे का?थोडं डोकं ठिकाणावर ठेऊन विचार करा ना. “तेजोमयी म्हणाली.
“काही क्षण कुणीच काही बोललं नाही.कल्याणीने ही शांतता मोडली.. “ती म्हणाली..
” मघापासून या बंगल्याकडेच नुसत काय बघत बसला आहात.समोर समुद्राच्या लाटा अंगावर येत आहेत.मस्त हवा सुटलीय. मावळतीचा सूर्य कसा झक्कास दिसतोय हे बघायचं सोडून तुम्ही मन्नत काय बघत बसलात.कल्याणी एका दमात बोलल्याने तिला दम लागला.तेजोमयीने तिला स्वत:जवळचं पाणी दिलं.टोळीने मन्नतवरील नजर दुसरीकडे फिरवली .सर्व मंडळी समुद्राच्या काठावर येऊन बसली. तेजोमयी तुला असं वाटत नाही का आपल्याला हि-याचा नारळ देणारा गाढव मिळाला किंवा कामधेून मिळाली तर आपणही शाहरुख सारखा असा भव्य बंगला बांधू शकू. “टिल्लू तेजोमयीला म्हणाला.
“अरे देवा,तू पुन्हा या बंगल्यातच अडकलास.वाटतं..या बंगल्याची भूताटकी झालीय की काय तुला. “तेजोमयी म्हणाली.
” मला नक्कीच वाटतं की शाखरुख अंकलच्या बंगल्यात आपल्याला हे जादुचे प्राणी मिळतील.
असले प्राणी केवळ चांदोबा मासिकाच्या कथेत असतात नाही तर हॅरी पॉटरच्या पुस्तकात असतात.वास्तवात असं काही नसतं.. “वैष्णव म्हणाला.
“शाहरुख अंकललाच विचारलं तर.. “टिल्लू बोलला.
“ त्याला कशाला? “
” कारण त्याला नक्कीच सोन्याची अंडी देणारी कोंबडी किंवा हि-याचा नारळ देणारा गाढव किंवा मग मनी इच्छिले ते देणारी कामधेनू भेटली असली पाहिजे.त्याशिवाय कां तो एवढा मोठा बंगला घेऊ शकला. “टिल्लू म्हणाला.
“स्टुपिड आहेस तू..जादू बिदू काही नाही.अरे तो सूपरस्टार आहे.त्याला सिनेमात खूप काम मिळतात.तो जाहिरातींमध्ये काम करतो. त्याचे त्याला भरपूर पैसे मिळतात. “तेजोमयी म्हणाली.
“अगं तुझच म्हणणं खरं आहेस असं कां समजतेस.टिल्लूच्याही बोलण्यात काही तरी पॉइंट असू शकतो ना.. “वैष्णवी म्हणाली.
“मलाही तसच वाटतं.शाहरुखच्या घरी एक उडणारा घोडा असावा.हा घोडा त्याला सिनेमाची कामं जिथे जिथे सुरु असेल त्या ठिकाणी बरोबर घेऊन जा त असावा.मग काय त्या सिनेमाचा हिरो शाहरुख अंकल आणि त्यालाच पैसाच पैसा.. “वैष्णवने तर्क चालवला.या तर्काकडे टोळीतल्या इतर सदस्यांनी लक्ष दिले नाही.
000
सूर्य मावळला होता.अंधार पसरु लागला.लाटा वेगाने किनाऱ्यावर येऊ लागलेल्या.हवाही जोरात वाहू लागलेली.तरी टोळी उठण्याचे नाव घेईना.शेवटी तेजोमयीच म्हणाली. “अरे बघा घड्याळाकडे, आठ वाजताहेत.घरी निघणार की नाही.नाही तर या लाटंामधून एखादा समुद्रराक्षस येउुन आपल्याला समुद्राच्या आत खोलवर घेऊन जायचा. “
तेजोमयी असं बोलताक्षणिच टिल्लू ताडकन उठून म्हणाला. “तेजू आता तुला कसा आठवला समुद्र राक्षस.तुला पण माझ्यासारखच वाटतयं ना..दॅटस इट. या लाटांमधून मध्यरात्री समुद्र राक्षस बाहेर पडून समुद्रातील हिरे-मोती-सोने-चांदी-प्लॉटिनम-युरेनियम-माणके-पाचू-रत्ने शाहरुख अंकलला देऊन जात असावा.. “
“अरे देवा देवा…हे काय टिल्ल्या, तू शाहरुख अंकलचा पिच्छाच सोडत नाहीस रे.. “तेजोमयी म्हणाली.
टोळी उठली आणि घराकडे जायला निघाली.टिल्लूचे लक्ष मात्र मन्नत कडेच होते.या बंगल्यात शिरुन सोन्याची अंडी देणाऱ्या कांेबडीला कॅडबरी किंवा हल्दीरामची काजू कतली देऊन एक जरी अंडं मिळवता आलं तर मज्जाज मज्जा येईल.अस तो मनात म्हणाला.आता आपण काही बोललो तर टोळी आपल्याला मूर्ख ठरवेल हे माहीत असल्याने तो चूप बसला.आणि शिळ वाजवू लागला.
“काय रे काय झालं एवढं खुषित यायला. “कल्याणिने विचारले.
” मी सांगते ना..तेजोमयी म्हणाली..याचा डोक्यात आता जादूच्या कोंबडीचा विचार येत असणार..तो कदाचित मनाने शाहरुखच्या बंगल्यात सोन्याची अंडी देणा-या कांेबडी पर्यंत पोहचलाही असणार.. “तेजोमयी म्हणाली.
“तुला कसं माहीत. ” चमकून टिल्लू म्हणाला.
” हा बघ मच्छर.. “कानाभोवती घोंगावणा-या मच्छराकडे बोट दाखवत तेजोमयी म्हणाली.
” त्याने सांगितले की काय.. “वैष्ण्व म्हणाला.
“स्टुपिड आहेस तू..मच्छर कुठे बोलतो होय.. “टिल्लू म्हणाला.
“कां नाही..कोंबडी जर सोन्याची अंडी देऊ शकते तर मच्छर कां बोलू शकणार नाही मिस्टर.. “तेजोमयी तोंड वेडावत म्हणाली..
तिला काय म्हणायचे होते हे कळल्याने टोळी खो खो हसायला लागली.
00 सुरेश वांदिले
