सध्या देशात इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात दोन हजार पेक्षा अधिक कंपन्या कार्यरत आहेत. या क्षेत्रातील किंवा उद्योगातील वार्षिक उलाढाल ५० हजार कोटींपेक्षाही अधिक झाली असून या वार्षिक वाढीचा वेग २७ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं सांगणं आहे.
इव्हेंट मॅनेजमेंटच्या तंत्र व कौशल्याद्वारे विविध प्रसंग वा कार्यक्रम हे भव्य, संस्मरणीय, प्रभाव पाडणारे ठरतात. प्रेक्षक/दर्शक मंत्रमुग्ध व्हायलाच हवेत, अशा पध्दतीने इव्हेंट मॅनेजमेंट संस्था विविध क्लृप्त्या योजित असतात. गेल्या पाच वर्षांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीने इव्हेंट मॅनेजमेंटचा चेहरामोहरा आमुलाग्र बदलला आहे.
दूरचित्रवाहिन्यांवरील कोणताही नवा कार्यक्रम, विविध उद्योगांमार्फत नव्या वस्तूंची ओळख करुन देणे, विविध पुरस्कारांचे कार्यक्रम, शास्त्रीय-चित्रपट- गैरचित्रपट संगीताचे कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, पुस्तक प्रकाशने, लिटरीचर फेस्टिवल, धार्मिक उत्सव, मोठे नेते/अभिनेते यांचे वाढदिवस, वेगवेगळया क्षेत्रात यश मिळाल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्राद्वारे साजऱ्या होणाऱ्या पार्ट्या, राजकीय पक्षांचे कार्यक्रम, अराजकीय कार्यक्रम, मोठे उद्योग, कॉर्पोरेट्स यांच्या सभा, वार्षिक बैठका, ऑलंपिक-राष्ट्रकूल- आशियाई क्रीडास्पर्धा यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, लग्नसोहळे, पुस्तके- ग्राहकोपयोगी वस्तू- पर्यटन-इलेक्ट्रॉनिक्स वस्तू – गृहसंकूले यांची प्रदर्शने, धर्मगुरुंचे सत्संग, विविध रोड शोज, अशा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन हे इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या वा संस्थांकडे सोपवण्यात येतात.
इव्हेंट्सचा मोठा प्रभाव
अशा इव्हेंट्सचा मोठा प्रभाव पडत असल्याचं दिसून येतं. एकाच कार्यक्रमाद्वारे हजारो लाखो व्यक्ती/ग्राहकांपर्यंत प्रभावीरीत्या संदेश पोहचवण्याचा हा खात्रीचा मार्ग ठरलाय. प्रत्येक सोहळा हा आधीच्यापेक्षा वेगळा कसा राहील याकडे लक्ष पुरवलं जातं. त्यामुळे ग्राहकांपर्यंत वस्तू आणि सेवा प्रभावीपणे पोहचताहेत.
घरगुती इव्हेंट्स सुध्दा साजरे करण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांची मदत घेतली जाते. हे क्षेत्र सेवाक्षेत्राचा महत्वाचा भाग ठरत असून ज्या कंपनी वा संस्थेद्वारे उत्तम आणि उत्कृष्ठ सेवा दिली जाते, त्या कंपनीला अधिकाधिक ग्राहक मिळतात.
नावीण्यपूर्ण कल्पनांची अंमलबजावणी करण्याची संधी याक्षेत्रात मिळत असते. त्यामुळे सर्जनशीलता, वेगळा विचार करण्याचं कौशल्य, तंत्रावरची हुकूमत व परीश्रम करण्याची तयारी असणाऱ्या व्यक्तिंना या क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. पुढील काही वर्षात या संधी आणखी वाढत जाण्याची शक्यता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
इव्हेंट मॅनेजमेंटचे वर्गिकरण
इव्हेंट मॅनेजमेंट हे पुढील प्रकारांमध्ये सध्या विभाजित करता येतात. (१) मनोरंजन- पुरस्कार सोहळे, लाइव्ह शो, संगीत संम्मेलन, फॅशन शो, नाटके/नृत्य, (२) सामाजिक- लग्न समारंभ व्यवस्थापन, वाढदिवस पार्टी, लग्नाचे वाढदिवस, गेट टुगेदर, विविध सामाजिक कार्यक्रम ,रोटरी /लॉयन्स क्बलसाठी निधी संकलन, (३) कॉर्पोरेट- पुरस्कार वितरण, वार्षिक बैठका, चर्चासत्रे , सभा – सम्मेलने, प्रशिक्षण कार्यक्रम, वार्षिक सहली, (४) शैक्षणिक- करिअर मार्गदर्शन प्रदर्शने, महाविद्यालयातील संमेलने, सहली, वार्षिक क्रीडा स्पर्धा, (५) मार्केटिंग आणि प्रमोशन- प्रदर्शने, चित्रपट प्रमोशन, नव्या वस्तूंची ओळख करुन देणे/ मार्केटमध्ये आणण्याआधीची पूर्वओळख.
अभ्यासक्रम
या क्षेत्रात लागणा-या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन, नॅशनल अकॅडेमी आफ इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरु केले आहेत.
(१) बीबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन-
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमामध्ये पुढील विषय घटकांचा समावेश आहे.
(१) इंग्रजी संवाद कौशल्य, (२) व्यवस्थापकीय प्रक्रिया, (३) व्यावसायिक संवादकौशल्य, (३) पर्यायवरणाचा अभ्यास, (४) वित्तीय व्यवस्थापन, (५) मानव अधिकार, (६) कार्यकारी अधिकाऱ्यांसाठी आवश्यक अर्थशास्त्र, (७) सेवा क्षेत्रासाठी जाहिरात व्यवस्थापन, (८) संस्थात्मक वागणूक, (९) विक्री व्यवस्थापन, (१०) इव्हेंट मॅनेजमेंट आणि जनसंपर्काची ओळख, (११) इव्हेंट मॅनेजमेंटचे नियोजन, (१२) इव्हेंट निर्मितीची प्रक्रिया, (१३) महिलांचे अधिकार, (१४) मनुष्यबळ व्यवस्थापन, (१५) इव्हेंटसाठी येणारा खर्च व निधीची उपलब्धता, (१६) इव्हेंटचे मार्केटिंग, (१७) प्रायोजक मिळवणे, (१७) सॉफ्टवेअर हाताळणी, (१८) विवाह सोहळे, (१९) लाइव्ह सोहळयांसारखे विशेष इव्हेंट्स, (२०) इव्हेंट पथक किंवा टिम व मनुष्यबळ व्यवस्थापन, (२१) इव्हेंटसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीचे व्यवस्थापन, (२२) ब्रँड मॅनेजमेंट, (२३) इव्हेंट आतिथ्य, (२४) विविध नियम, कायदे आणि परवानग्या, (२५) आंत्रप्रिन्युरशीप व प्रकल्प व्यवस्थापन, (२६) मीडिया व्यवस्थापन, आदी विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रात्यक्षिकांवर अधिकाधिक भर देण्यात येतो. या अभ्यासक्रमाला विद्यापीठ अनुदान आयोगाचीही मान्यता मिळाली आहे.
करिअर संधी-
हा अभ्यासक्रम केल्यावर पुढील करिअर संधी मिळू शकते- (१) इव्हेंट कुऑर्डिनेटर, (२) ब्रँड डेव्हलपमेंट मॅनेजर, (३) ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर, (४) प्रॉडक्शन एक्झिक्युटिव्ह, (५) सेलिब्रिटी मॅनेजमेंट, इत्यादी. या शिवाय, वृत्तवाहिन्या, जाहिरात कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्या, हॉटेल्स, राजकीय पक्ष यांना सुध्दा अशा प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते.
(२) एमबीए इन इव्हेंट मॅनेजमेंट-
या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येतो. प्रवेशसासाठी चाळणी परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाते.
हा अभ्यासक्रम केल्यावर (१) इव्हेंट टेक्निकल एक्स्पर्ट, (२) इव्हेंट स्पॉन्सरशिप मॅनेजर, (३) इव्हेंट रिर्पोटर, (४) इव्हेंट डिजिटल ॲनॅलिटिक्स मॅनेजर, (५) इव्हेंट कॉन्फरंस आर्किटेक्ट, (६) इव्हेंट मॅनेजर (७) वेडिंग प्लॅनर, (८) प्रॉडक्शन हेड, (९) इव्हेंट कस्टमर एक्सपिरिअंस मॅनेजर अशा सारख्या संधी मिळू शकतात.
बीबीए आणि एमबीए या दोन्ही अभ्यासक्रमांना मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करीअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट या संस्थेने मान्यता प्रदान केली आहे.
इतर अभ्यासक्रम
(१) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायजिंग मीडिआ, ॲण्ड इव्हेंट्स. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी
(३) डिप्लोमा इन ॲडव्हर्टायजिंग मीडिआ, ॲण्ड इव्हेंट्स. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी
(४) डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट ॲण्ड पब्लिक रिलेशन. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्षं. अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी
संपर्क- गरवारे इंस्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन ॲण्ड डेव्हलपमेंट कॅम्पस, कलिना विद्यानगरी सांताक्रुज पूर्व मुंबई ४०००९८ संकेतस्थळ- http://www.naemd.com, ईमेल- mumbai@naemd.edu.in ७२०८००६६४२
०००
(२) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट
ही आपल्या देशातील इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणारी पहिली संस्था. मुंबई फेस्टिवल, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, मुंबई इंटरनॅशनल मॅरॅथॉन, नवरात्री महोत्सव, कॉर्पोरेट लाइव्ह कॉन्सर्टस, सेलिब्रेटिजचे विवाह सोहळे यांच्या आयोजनामध्ये या कंपनीचा सहभाग राहिला आहे. या संस्थेच्या विद्यार्थ्यांना, प्रो कबड्डी, सनबर्न, झी सिने ॲवार्ड, स्टार परिवार ॲवार्ड, फिल्मफेअर ॲवार्ड, आयपीएल अशा सारख्या मोठ्या इव्हेंट्सध्ये प्रशिक्षण मिळालं आहे. या अभ्यासक्रमात ७० टक्के भर प्रात्यक्षिकांवर दिला जातो. देशातील नामवंत इव्हेंट कंपन्यांमध्ये प्लसेममेंटसाठी साहाय्य केलं जातं.
मुंबई कॅम्पस
(१) डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट, अर्हता- कोणत्याही विषयातील १२वी, कालावधी ११ महिने
(२) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट – या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. कालावधी एक वर्षं. इव्हेंट मार्केटिंग, जाहिरात या विषयीचे सर्व पैलू अभ्यासक्रमात शिकवले जातात.
(३) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हर्टायजिंग, मीडिया ॲण्ड इव्हेंट मॅनेजमेंट- या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. कालावधी एक वर्षं.
संपर्क – इंडिया इंस्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हनमेंट बिल्डिंग, सी.डी बर्फवाला लेन, जुहू गल्ली, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८ भ्रमणध्वनी- ०२२-२६९९५२१४ ईमेल- support@niemindia.com
०००
पुणे कॅम्पस –
येथे डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो.
संपर्क – ऑफिस नं.२०२, मोसैक बिल्डिंग, स्टारबक्स च्यावर, फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य दरवाजाच्या विरुध्द दिशेला, शिवाजी नगर पुणे- ४११००४, भ्रमणध्वनी- ९१७५१५३३२५, संकेतस्थळ- niemindia.com, ईमेल- pune@niemindia.com ऑल
सुरेश वांदिले