
स्टार्टअपसाठी “अमृत”
राज्यशासनाच्या अंतर्गत कार्यरत असणा-या कौशल्य विकास विद्यापीठाने, तरुणांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी, “अमृत” (ॲकॅडेमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट ॲण्ड ट्रेनिंग), ही योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना राबवण्यासाठी, एमएसएसयु आय-स्पार्क महाराष्ट्र स्किल्स युनिव्हर्सिटी, या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. स्टार्टअप्सना प्रोत्साहन व चालना देणाऱ्या, इनक्युबेशन केंद्राची स्थापना करण्यासाठी स्पेशल परपोज व्हेईकल (विशेष उद्दिष्ट साधन) म्हणून ही कंपनी कार्य करेल..
साहाय्याचं स्वरुप
या योजनेंतर्गत ५० तरुण उद्योजकांना अर्थसाहाय्यासाठी निवडलं जाईल. या उद्योजकांना तीन लाख रुपयांपर्यंतचं अर्थसहाय्य केलं जाईल. राज्यातील नवउद्दमींना त्यांच्या नवसंकल्पनांव्दारे उद्योग सुरु करता यावा यासाठी हे अर्थसाहाय्य केलं जाईल. दरमहा त्यांना २५ हजार रुपये एक वर्षासाठी दिले जातील. यामुळे उद्योग स्थापनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही, असा विश्वास कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.शुभांगी पारकर यांनी व्यक्त केला आहे. विशेषत: स्टार्टअप सुरु केलेल्या किंवा स्टार्टअप सुरु करण्यासाठीची नावीन्यपूर्ण संकल्पना असणाऱ्या नवउद्दमिंना या योजनेचा विशेष लाभ होऊ शकतो. या योजनेची माहिती व नोंदणी करणासाठीची संपर्कसाखळी mssuispark.in या संकेतस्थळावर ठेवण्यात आली आहे.
ही योजना कार्यान्वित करण्यासाठी कौशल्य विद्यापीठानं महाराष्ट्र शासनासोबत सामंजस्य करार केला आहे. यंदाच्या केंद्रीय आणि राज्य अर्थसंकल्पात तरुणांमधील उद्याजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशष योजनांची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी आर्थिक तरतुदही करण्यात आली आहे. याचा लाभ सुध्दा “अमृत” योजनेव्दारे मिळू शकतो.
योजनेची उद्दिष्ट्ये-
(१) नवउद्दमिंना वेगळा, अफलातून विचार करण्याच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी आणि उद्योजकीय पर्यावरणात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी साहाय्य केलं जाईल व त्यांना उत्तेजन दिलं जाईल.
(२) नवउद्दमींना उद्योग सुरु करण्यासाठी किंवा सुरु केलेल्या उद्योगात उंच उडी घेण्यासाठी आवश्यक असणारे उद्योजकीय ज्ञान, कौशल्य, साहित्य यांचं साहाय्य केलं जाईल. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना सक्षम केलं जाईल.
(३) नवउद्दमिंना त्यांच्या उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या संसाधनांची उपलब्धता करुन दिली जाईल. यामध्ये जागेची उपलब्ध्ता, अर्थसाहाय्याचे विविध स्त्रोत, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि अत्यावश्यक व्यावसायिक सेवा यांचा समावेश आहे. नवउद्दमींचे स्टार्टअप यशस्वी होऊन त्याची चौफेर प्रगती होण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेतली जाईल.
(४) स्टार्टअप्सना, व्यावसायिक ज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण करुन परस्परांचा लाभ करुन देण्यासाठी सुयोग्य अशा समुदायाच्या निर्मितीस हातभार लावला जाईल.
(५) स्टार्टअप सुरु करण्यासाठी साहाय्य करणं हा प्रारंभिक उद्देश असला तरी या स्टार्टअप्सनी दीर्घमुदतीच्या कालावधीसाठी यशस्वी व्हावं यासाठीही सर्व प्रकारचं साहाय्य केलं जाईल. नैतिकता, जबाबदारीयुक्त व्यवसाय प्रारुपाचा अवलंब करुन उत्तम उद्योजकीय पर्यावरण निर्मितीस अशा नवउद्दमिंनी हातभार लावावा यासाठी साहाय्य केलं जाईल.
(६) उद्योजकतेपासून वंचित राहिलेल्या समाजघटकांपर्यंत स्टार्टअप संकल्पनांचा विस्तार होऊन त्यांना या उद्योजकीय पर्यावरणात येण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील.
इनक्युबेशन
इनक्युबेशन (नवउद्दमिंच्या साहाय्यासाठी उभारण्यात येणारी केंद्रे/प्रकिया) ची क्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत- (१) मीडिया-माध्यमे, (२) आयटी आणि आयटीईस-माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा, (३) इलेक्ट्रिक मोबिलिटी- विजेवर चालणारी वाहने, (४) लॉजिस्टिक्स पुरवठा, (५) हेल्थ ॲण्ड वेलनेस- आरोग्य आणि निरोगीपणा, (६) मॅन्युफॅक्च्युरिंग- निर्मिती
इनक्युबेशन केंद्रात पुढील बाबिंचे साहाय्य केलं जातं- (१) संपर्कसाखळीची उपलब्धता, (२) प्रेरकांचं साहाय्य, (३) दोन व्यक्तींसाठी कार्यालयीन जागा, (४) उपलब्धतेनुसार परिषदांसाठी सभागृह, (५) कंपनीची स्थापना आणि कायदेविषयक सल्लासेवा, (६) व्यवसाय सर्वेक्षण, (७) बौध्दिक संपदेसाठी साहाय्य, (८) लेखा (अकाउंटिंग) विषयक सेवा
संपर्क- पहिला माळा, एलफिंस्टन टेक्निकल हायस्कूल, मेट्रो चौक, मुंबई-४००००१, भ्रमणध्वनी- ८६५५९४६६४६, ईमेल-contact@mssu.ac.in
सुरेश वांदिले