
स्नॅक्स आणि नमकीन निर्मिती
भारत सरकारच्या वतिने उद्योजकांच्या साहाय्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. विशेषत: उद्योजकतेच्या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना विविध प्रकारच्या सोई, सुविधा, सवलती, आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून साहाय्य केलं जातं. यासाठी, “उद्यमी” वेबपोर्टलाचा उपयोग केला जातो.
या पोर्टलवर, स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरु शकतील अशा अनेक घटकांच्या प्रशिक्षणाची सुविधा आहे. या प्रशिक्षणाचे व्हीडियो या वेबपोर्टलवर ठेवण्यात आले आहेत. कोणत्याही विषयातील १२वी उत्तीर्ण उमेदवार हे प्रशिक्षण घेऊ शकतो. यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येते. एकापेक्षा अनेक प्रशिक्षण स्वत:च्या सुविधेप्रमाणे घेता येतात. प्रशिक्षणाचे व्हीडिओ आणि साहित्य तज्ज्ञांनी तयार केले आहेत. विविध घटकातील २६० प्रशिक्षण साहित्य या वेबपोर्टलवर ठेवण्यात आले आहेत. प्रशिक्षण साहित्याची भाषा हिंदी आहे.
स्नॅक निर्मिती
भारतीयांना वेगवेगळया प्रकारचे स्नॅक्स आवडतात. सांस्कृतिक भिन्नता असली तरी प्रत्येक राज्यातील विविधांगी स्नॅक्सप्रकार बहुतेक सर्वच भारतीय आवडीने आणि मजेत खातात. विविध प्रकारचे स्नॅक्स, चवदार असतातच शिवाय ते कोणत्याही दुकानात आणि खाऊ गल्लीत सहजतेने मिळतात. तळलेल्या खाद्यपदार्थांनासुध्दा खूप मोठी मागणी असते. लोकांची क्रयशक्ती वाढल्याने आणि खाण्याच्या बाबतीतला आनंद घेण्यासाठी फारशी तडजोड न करण्याचा स्वभाव किंवा वृत्तीमुळे भारतातील स्कॅनची बाजारपेठ वेगाने वाढत आहे.
कोविड काळानंतर, आरोग्यदायी स्नॅक्स किंवा खाद्यपदार्थांकडे लोकांचा ओढा लक्षणीयरीत्या वाढलेला दिसतो. त्यामुळे आरोग्यदायी चवदार स्नॅक्सची मागणी वाढलीय. ही मागणी पुरवण्यासाठी अधिकाधिक पोषणमूल्ये असलेले स्नॅक्स आणि खाद्यपदार्थ बाजारपेठेत येत आहेत. या मागणीमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडण्याची शक्यता नसून, या क्षेत्रात नव्या उद्योजकांना, चांगली संधी असल्याचं, या क्षेत्रातील तज्ज्ञांचं सांगणं आहे. या अनुषंगानं या प्रशिक्षणात सर्व प्रकारची माहिती दिली जाते.
यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे- (१) स्नॅकप्रकिया उद्योग कसा सुरु करणार? (२) यशस्वी उद्याजेकतेसाठीच्या टिप्स, (३) स्नॅक्स प्रकिया उद्योगाची बाजारपेठीय क्षमता, (४) तळलेल्या चिप्स निर्मितीसाठी आवश्यक प्रकिया तंत्रज्ञान, (५) या उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि इतर साहित्य, (६) सुरक्षा आणि आरोग्य आदी विषय घटकांचा यात समावेश आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी साधारणत: १५ तासांचा आहे. प्रशिक्षण साहित्यात ६ व्हीडिओ, ११ व्याखाने आणि ५ लिखित साहित्याच्या पीडीएफचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीस स्नॅक निर्मिती उद्योगात यायचे असल्यास, त्याच्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे या व्याख्यानात मिळतात. या प्रशिक्षणाचं शुल्क ८०० रुपये आहे. एकदा भरलेले शुल्क परत केले जात नाहीत.
०००
बहुमिश्र पीठ निर्मिती
आपल्या देशात फुलका, पोळी, चपाती, पराठा अशा प्रकारातील पोळया मोठ्या प्रमाणात सेवन केल्या जातात. गेल्या काही वर्षांमध्ये मल्टीग्रेन किंवा बहुधान्य मिश्रपीठ किंवा कणिकेच्या पोळी वा तत्समप्रकरातील रोटी खाण्याकडे अनेकांचा ओढा वाढलेला आहे. या बहुधान्य मिश्र पीठात, दोन किंवा अधिक धान्यप्रकार, बेदाणे आणि बियाणे यांचं एकत्रीकरण केलं जातं. या व्यवसायातून चांगलं उत्पन मिळू शकतं. हा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल किंवा साहित्य, यंत्रसामग्री, प्रकियापध्दती ,बाजारपेठीय संधी, उद्योग सुरु करण्याच्या पायऱ्या, याविषयी प्रशिक्षण मिळू शकतं.
या प्रशिक्षणामध्ये ९ व्याख्यानांचा समावेश आहे. बहुमिश्र धान्यपिठासाठी उपयोगात आणली जाणारी धान्ये, बाजारपेठीय क्षमता, प्रकिया तंत्रज्ञान कसे अवगत करणार?, मिश्रपीठ तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि साहित्य याविषयी माहिती दिली जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी हा साधारणत: २३ तासांचा आहे. यामध्ये ९ व्याख्यानं, ४ व्हिडियो यांचा समावेश आहे. त्याचबरोबर लिखित साहित्याचे ५ पीडीएफ दिले जातात. या प्रशिक्षणाचे शुल्क ८०० रुपये आहे.
०००
नमकीन निर्मिती
नमकीन, खाद्यपदार्थास सदैव चांगली मागणी असते. त्यामुळे या उद्योगाकडे वळणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. नमकीन निर्मिती प्रकियेच्या प्रशिक्षण मॉड्युलमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे- (१) नमकीनची तोंडओळख, (२) नमकीन विक्रीची बाजारपेठीय संधी आणि क्षमता, (३) नमकीन निर्मितीसाठी लागणारे साहित्य आणि यंत्रसामग्री, (४) नमकीनची प्रकिया, (५) नमकीनचे पॅकेजिंग, (६) नमकीनची सुरक्षा ,आरोग्यदायी पोषणमूल्यांचा अंतर्भाव आदी बाबींचा समावेश आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी साधारणत: १५ तास आहे. प्रशक्षिण साहित्याचे मूल्य ९५० रुपये आहे. यामध्ये १२ व्याख्याने, ६ व्हिडिओ आणि ६ पीडीएफ प्रकारातील साहित्याचा समावेश आहे.
संपर्क-https://courses.udyami.org.in
सुरेश वांदिले