(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

स्मार्टली वागा…

आजोबा खेकडा आपल्या दोन नातवंडांसोबत समुद्राच्या वाळूत खेळत होते. खेळत असतानाच एक लाट आली आणि त्या तिघांना मागे घेऊन गेली. असे बराच वेळ घडले. तेव्हा दोन्ही नातवंडांना खूप राग आला.त्यांनी आजोबांकडे बघितलं.आजोबा हसले.

आजोबा, तुम्हाला या लाटांचा राग नाही येत का?

राग कशासाठी करायचा? ते त्याचं काम करत आहेत.आपण त्यांचा राग केला तरी त्यांचं काम ते थोडेच सोडणार …

पण आजोबा, तुमच्या लहानपणी या लाटा अशाच येऊन तुम्हाला त्रास द्यायच्या का? एका नातवाने विचारलं.

असं तर काही नाही.

नाही कसं नाही,आजी एकदा सांगत होती की, तुम्ही समुद्राच्या वाळूवर नक्षी कोरत होतात नि या लाटा येऊन तुमची नक्षी मोडत होत्या.

खर आहे ते..

मग तेव्हा तुम्हाला याचा राग नाही आला का?

राग येऊन मी काय करणार?मी लाटांना विचारलं तुम्ही असं कां करताहात?

मग त्या काय म्हणाल्या.

अरे,त्या माझ्या भल्यासाठीच तसं करत होत्या.

ते कसं काय बुवा..

लाटा मला म्हणाल्या की, तू नक्षी काढत काढत वाळूच्या बाहेर गेलास तर कोळी पकडतील ना तुला. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा नक्षी मोडून टाकतो. सांगा बघू होती की नाही या लाटांना माझी काळजी. आजोबांनी नातवंडांना विचारलं.

दोन्ही नातवंड थोडे विचारात पडले. एकाच्या चेहऱ्यावर हसू आलं तर दुसऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले. ते बघून आजोबा म्हणाले, तुम्हाला लाटांचं वागणं पटलं नाही वाटतं.

आजोबा,तुम्ही फक्त त्यांच्याच नजरेनं बघता ना..

म्हणजे रे काय?

अहो, तुम्हाला नक्षी काढण्याचा आनंद मिळत होता की नाही.

हो..खूप आनंद मिळत होता.

मग हा आनंद,या लाटा घालवत होत्या की नाही..

ते सुध्दा बरोबर आहे..

मग, त्यांना तुमची काळजी होती हे कशावरुन म्हणता..

अरे,लाटांमुळे नक्षी मिटत राहिल्याने मी किनाऱ्यापर्यंत पोहचू शकलो नाही ना.त्यामुळे मला कोळी पकडू शकले नाहीत.

अहो आजोबा,किती भोळे आहात तुम्ही. कोळयाने पकडलं असतं हे कशावरुन?

आँ…

हो ना, तुम्ही किनाऱ्यापर्यंत पोहचला असतात तर आणखी नवं काहीतरी पाहयाला,अनुभवायला मिळालं असतं.

म्हणजे तुम्हाला नक्षीपूर्ण करण्याचा आणि नव जग बघण्याचा असा दुहेरी आनंद मिळाला असता की नाही.

हो हो हो.

या लाटांनी तुमचा आनंदच हिरावून नेला ना..

अरे पण कोळी..

आजोबा..बाहेर कोळयांनी पकडलं असतं, असं लाटा सांगत. मग पाण्यातसुध्दा ऑक्टोपस, व्हेल दादा, सापभाऊ आपल्याला संधी मिळेल तेव्हा पकडतातच की..

हो रे, खरच की..

आजोबा, प्रत्येक जण त्याचं त्याचं काम करत असतं हे खरच. पण दुसऱ्याचा कामात लुडबूड करुन त्याचा आनंद हिरावून घेणं पण बरोबर नाही. पुढे हे झालं तर ते होईल आणि ते झालं तर हे होईल असं म्हणून भ्यायचं नाही. जे काही व्हायचं असेल त्याच्याशी सामना करण्यात मजा आहे की नाही..

हो हो… अगदी बरोबर..पण बाळांनो,तुम्हाला कशा कळतात बरं या शहाणपणाच्या गोष्टी..

आम्ही २१ व्याशतकातली स्मार्ट बाळं आहोत ना..दोन्ही नातवंडं म्हणाले.आजोबांना दोघांचाही मोठा अभिमान वाटला आणि त्यांचे डोळे भरुन आले.

सुरेश वांदिले