(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

तो तेव्हा १२ वर्षाचा होता. त्याच्या आजीला अलझेमायर्स या आजाराने गाठलं. तिला हळूहळू काहीच आठवेनास झालं. मन आणि शरीरावर नियंत्रण सुटू लागलं. रात्री कधीतरी उठून बाहेर निघून जायची. तिला शोधणं कठीण व्हायचं. आजीची ही अवस्था त्याल पाहवेना. आजीसाठी काहीतरी करण्याचं त्याच्या मनानं घेतलं. त्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्समध्ये लहानपणापासूनच रस असल्याने त्याचा या विषयांतील बरेच बारकावे कळले होते. या अभ्यासातून त्याच्या लक्षात आलं की आजीच्या मदतीसाठी एखादं इलेक्ट्रॉनिक्स उपकरण तयार करता येणं शक्य आहे. तो यात गढून गेला नि त्यातून त्याने कृत्रिमबुध्दीमत्तेचा वापर करुन एक स्मार्ट रिस्टबँड तयार केला. हा बँड विस्मृतीचा आजार झालेल्या वृध्दांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचं नंतर सिध्द झालं. या उपकरणाचं नाव त्याने ठेवलय “अल्फा मॉनिटर”. या उपकरणाची सगळ्या बाजूंनी तपासणी, छाननी केली गेली आणि आता ते मार्केटमध्ये सुध्दा लवकरच येईल.

एकिकडे याचा त्याला आनंद तर दुसरीकडे दु:ख! कारण ज्या आजीसाठी त्याने हे उपकरण शोधण्याचा विडा घेतला, ती दरम्यान देवाघरी निघून गेली. तिला काही या उपकरणाचा लाभ मिळू शकला नाही. पण आपल्या आजीसारख्या असंख्य वृध्दांना आता “अल्फा मॉनिटर”मुळे जीवन सुसय्य करता येईल, या भावनेने तो आजीच्या जाण्याचं दु:ख विसरण्याचं प्रयत्न करतो.

“अल्फा मॉनिटर” हे स्मार्ट घड्ळासारखं उपकरणं मनगटाला बांधता येतं. हे उपकरण दोन परस्पर जोडलेल्या घटकांपासून बनलय.  एका घटकामुळे रुग्णाच्या चालण्याची पद्धत, उभे राहण्याची स्थिती, शरीराचे तापमान आणि नाडी यांचे निरीक्षण होत राहते. शिवाय रुग्णाचे पडणे  देखील ओळखता येते.  या स्मार्ट वैद्यकीय उपकरणामुळे रुग्णाच्या हालचाली आणि शारीरिक स्थितीवर सतत लक्ष  ठेवणे शक्य होते. त्यामुळे रुग्णाची सुरक्षितता वाढते. दुसरा घटक म्हणजे काळजीवाहकांसाठी अलार्म प्रणाली.‍ रुग्ण पडला, भटकला किंवा एखादा अपघात झाला तर ही प्रणाली तात्काळ काळजीवाहकांना सूचना पाठवते. यामध्ये पिलबॉक्स’ नावाचे वैशिष्ट्य आहे, जे रुग्णांनी औषध घेण्याची वेळ झाली की अलर्ट पाठवते.  म्हणजेच, हा घटक रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि औषध वेळेवर घेण्यासाठी सतत लक्ष ठेवतो, ज्यामुळे काळजीवाहकांना त्वरित माहिती मिळते आणि रुग्णाची देखभाल अधिक प्रभावीपणे करता येते.

त्याला त्याच्या या संशोधनासाठी २०२१ साली प्रधानमंत्री राष्ट्रिय बाल पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. २०१९ साली आयडियेट फॉर इंडिया या देशव्यापी उपक्रमात १ लाख ३० हजार मुलं सहभागी झाली होती. त्यातून अत्युकृष्ट नवसंकल्पना मांडणाऱ्या  देशातील ५० विद्यार्थ्यांमध्ये त्याचा समावेश होता. मात्र त्याच्या संशोधनाची उपयुक्तता त्याला इतरांपेक्षा वेगळी ठरवून गेली.

गेल्या वर्षी त्याला सॅमसंग आणि आयआयटी दिल्लीकडून या उपकरणाच्‍या सखोल संशोधन आणि बौध्दिक संपदाप्रक्रियेसाठी ३३ लाख रुपयांचं अनुदान मिळालं.  त्याने यापूर्वी मशीन लर्निंगवर आधारित खड्डे शोधणारी प्रणाली, अपघात सूचना प्रणाली, करिअर मार्गदर्शनासाठी एआय चॅटबॉट अशा भन्नाट नवसंकल्पना साकारल्या.

तर असा हा हेमेश  चंदालावाला. वय वर्षे १८. हल्ली मुक्काम हैदराबाद

सुरेश वांदिले