(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

स्मार्ट पॅकेजिंग

आपल्या देशातील बहुवीध वस्तुंच्या बाजारपेठेचा आकार बघता पॅकेजिंग क्षेत्राचं महत्व लक्षात यावं. २०२७ या कालावधीत पॅकेजिंग क्षेत्राची वाढ २६ टक्क्‌यांपेक्षा अधिक राहील याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्ष वेधलं आहे. गेल्या दशकात पॅकेजिंग क्षेत्रातील वाढ विस्मयकारक अशी आहे. विशेषत: खाद्यान्नं आणि औषधांशीं संबंधित विविध उत्पादनांची घरपोच मागणी वाढली असून, ही उत्पादनं किंवा वस्तू सुरक्षितरीत्या पोहचवणं, वस्तुची किंचितही तूट-फूट होऊ न देणं, बाह्य तपमानाचा कोणताही परिणाम होऊ न देणं अशा अनेक बाबी पॅकेजिंग करताना विचारात घेतल्या जातात.

वाढतं शहरीकरण आणि वाढता मध्यम वर्ग यामुळेही पॅकेजिंग उद्योगाला चालना मिळाली आहे. या ग्राहकांच्या गरजेनुसार वेगवेगळे  आकार, साहित्य, उपयुक्तता, सक्षमता या गुणधर्मांसह पॅकेजिंग केलं जातं.

  या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तिंना चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सध्या ग्राहकांचा कल हा ऑनलाइन खरेदीकडे असल्यानं, होम डिलिव्हरीच्या पॅकेजिंगची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यात सतत वाढ होताना दिसते. त्यासाठी अशा कौशल्यप्राप्त उमेदवारांची गरजही वाढणार आहे. ही बाब लक्षात घेता, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग या संस्थेने सुरु केलेले विविध अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतात.

यातील काही अभ्यासक्रम हे दीर्घ कालावधीचे आहेत. तर काही अभ्यासक्रम लघु मुदतीचे आहेत. लघुमुदतीच्या अभ्यासक्रमात सर्टिफिकेट (प्रमाणपत्र) अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी-

 या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिने असून तो  निर्यातयोग्य  मालाच्या सुयोग्य पॅकेजिंगसाठी उपयुक्त ठरतो. १९६९ साली हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमास एशियन पॅकेजिंग फेडरेशनची अधिस्वीकृती मिळाली आहे.

हा अभ्यासक्रम मुंबई, दिल्ली, कोलकता ,हैदराबाद, चेन्नई येथे करता येतो. हा अभ्यासक्रम सप्टेबर ते डिसेंबर या कालावधीत आयोजित केला जातो. कोणत्याही शाखेतील १२ वी, आयटीआय, पदवीधर किंवा पदविकाधारकांना या अभ्यासक्रमास प्रवेश मिळू शकतो.

काय शिकाल?

(१)पॅकेजिंगची मुलभूत तत्वे, (२)साधने, (३)प्रक्रिया, कार्यप्रणाली, (४)विविध पॅकेज प्रकारांची निर्मिती आणि त्यांचा उपयोग, (५)पॅकेजिंग सहित्याची सुरक्षितता, (६)मूल्य, इत्यादी. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर संस्थेमार्फत प्रमाणपत्र दिलं  जातं.  

पोस्ट ग्रज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग

गेल्या २५ वर्षांपासून हा अभ्यासक्रम चालवण्यात येत आहे. कालावधी दोन वर्षे. अर्हता- अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयातील पदवी. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दरवर्षी मे किंवा जून महिन्यात चाळणी परीक्षा घेतली जाते. अभ्यासक्रमाचा प्रारंभ ऑगस्ट महिन्यात होतो. हा अभ्यासक्रम संस्थेच्या मुंबई, दिल्ली, कोलकता आणि हैदराबाद कॅम्पसमध्ये करता येतो. हा अभ्यासक्रम चार सत्रांचा आहे. यापैकी तीन सत्रांचा अभ्यासक्रम कॅम्पसमध्ये शिकवला जातो. चौथ्या सत्रामध्ये वेगवेगळया पॅकेजिंग उद्योगामध्ये प्रत्यक्ष काम करावे लागते.

हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पॅकेजिंग उद्योगात गुणवत्ता परीक्षण आणि मूल्यमापन, निर्मिती, विक्री आणि विपणन, डिझायनिंग अशा सारख्या क्षेत्रात करिअरच्या संधी मिळतात. हा अभ्यासक्रम केलेले उमेदवार राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे सध्या उच्च पदांवर कार्यरत आहेत.

डिप्लोमा इन पॅकेजिंग

पॅकेजिंगच्या क्षेत्रात सध्या कार्यरत असणाऱ्या ज्या व्यक्तिंना आपलं कौशल्य आणखी वाढववायचं असल्यास, त्यांच्यासाठी संस्थेने हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम पत्रव्यवहाराव्दारे (करस्पांडन्स) करता येतो. कालावधी- १८ महिने. कोणत्याही विषयातील पदवी ही किमान शैक्षणिक अर्हता आहे.

संपर्क-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, प्लॉट इ –, रस्ता क्रमांक ८, एमआयडीसी एरिआ,पोस्ट बॉक्स- ९४३२,अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००९३, दूरध्वनी- ०२२-६९१९२२४२, ईमेल- – dpc@iip-in.com

 संकेतस्थळ- http://www.iip-in.com.

०००