नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने फॅशन तंत्रज्ञान या विषयातील उच्च श्रेणीचे व प्रगत ज्ञान मिळावे म्हणून, मास्टर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. सध्या तरी एखाद्या शासकीय शैक्षणिक संस्थेत चालवण्यात येणारा हा एकमेव आणि आगळावेगळा असा अभ्यासक्रम ठरला आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवीधर किंवा बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमाच्या मुख्य विषय घटकांमध्ये (१) शिवण उत्पादन तंत्रज्ञान, (२) पॅटर्न इंजिनीअरिंग, (३) वस्त्रप्रावरण गुणवत्ता अभियांत्रिकी, (४) वस्त्रप्रावरण निर्मिती प्रकिया, (५) वस्त्रप्रावरणांची व्यापक विक्री, (६) वस्त्रप्रावरणाचं कच्चे साहित्य, (७) संशोधन कार्यपध्दती आणि तंत्र, यांचा समावेश आहे.
पुढील काही विषय निवडल्यास अतिरिक्त क्रेडिट (श्रेयांक) प्रदान केलं जातं- (१) डाटा सायंस, (२) बिझिनेस स्टॅटिस्टिक्स, (३) मेटार्व्हस फॉर फॅशन, (४) ई कॉमर्स, (५) इंटरनॅशनल बिझिनेस, (५) बौध्दिक संपदा अधिकार
स्पेशलायझेशन
दुस-या सत्रापासून विद्यार्थी चार स्पेशलायझेशनच्या विषयांपैकी पुढील कोणतेही दोन विषय स्पेशलायझेशनसाठी निवडू शकतात.
(१) स्मार्ट फॅक्ट्री
या स्पेशलायझेनमुळे विद्यार्थ्याला इंडस्ट्री चार, मध्ये कार्य करण्याची सक्षमता प्राप्त होते. विद्यार्थ्यांना (१) आर्टिफिशियल इंटेलीजन्स, (२) ऑगमेंटेड रिॲलिटी, (३) व्हर्च्युअल रिॲलिटी, (४) इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्ज, (५) थ्री डी पेंटिंग्ज, (६) रोबोटिक्स, (६) बिग डेटा, (७) क्लॉऊड कॉम्प्युटिंग, ही कौशल्यं प्राप्त करुन फॅशन क्षेत्रातील पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्याची भूमिका बजावता येणं शक्य होतं. स्पेशलायझेशनमधील या घटकांमुळे उमेदवारांना मेकॅट्रॉनिक्स, मशिन लर्निंग या सारख्या विषयांमध्ये ज्ञान प्राप्त होतं. स्मार्ट उत्पादनासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, स्वयंचलन, सेन्सॉर्स, मनुष्यबळ यांचं एकात्मिकरण करणं सुलभ जातं.
करिअर संधी
हे स्पेशलायझेशन केलेल्या उमेदवारांना (१) माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापन, (२) स्वयंचलन, (३) यंत्रसामग्रीचं संशोधन आणि विकास आणि त्याचा उपयोग, (४) निर्मिती प्रकियेमधील संशोधन आणि विकास, (५) या उद्योगासाठी आवश्यक असणारे माहिती विश्लेषण, (६) तांत्रिक प्रमुख म्हणून करिअर संधी मिळू शकते.
(२) स्मार्ट गार्मेंट्स
या स्पेशलाझेशनमध्ये स्मार्ट वस्त्रप्रावरणांच्या निर्मिती आणि उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या थ्रीडी प्रिटिंग सारख्या तंत्राचं ज्ञान प्रदान केलं जातं. कोणतही शिवणकाम किंवा जोडकाम नसणारी वस्त्रप्रावरणं, विशेष प्रसंगांसाठी असणाऱ्या वस्त्रप्रावरणांच्या निर्मिती प्रकियेसाठी आवश्यक तंत्राचं ज्ञान प्रदान केलं जातं. थ्रीडी बॉडी स्कॅनिंगचं कौशल्य शिकवलं जातं. याचा उपयोग स्मार्ट वस्त्रप्रावरणांच्या पॅटर्न (साचा) ची निर्मिती, उत्पादन आणि विक्रीसाठी होतो. आभासी वस्त्रप्रावरणे, टेक्निकल ऑडिट मॅनेजर, फिट ॲनॅलिस्ट, प्राडक्शन मर्चंट, प्रॉडक्ट मॅनेजर, प्रॉडक्ट इंजिनीअर, संशोधन आणि विकास या क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते.
(३) ऑपरेशनल एक्सलन्स (कार्यान्वयनातील उत्कृष्टता)
या स्पेशयालझनमध्ये निर्मिती प्रकियेच्या व्यवस्थापनाचं कौशल्य प्रदान केलं जातं. यामध्ये उत्पादन इफिसिएंसी (कार्यक्षमता), औद्योगिक अभियांत्रिकी ,शास्वतता, इरगॉनॉमिक्स (कामगार कार्यक्षमताशास्त्र), गुणवत्ता व्यवस्थापन, प्रकल्प आराखडा, साधनसामग्री आणि पुरठा साखळी व्यवस्थापन, यावर लक्ष केंद्रित केलं जातं. या घटकाच्या संकल्पना स्वयंस्पष्ट करण्यात येऊन सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीचं ज्ञान प्रदान केलं जातं. निर्णय प्रकियेत सक्रिय सहभागची कौशल्यं शिकवली जातात.
नियोजन, निर्मिती व्यवस्थापन, सिस्टिम व्यवस्थापन, औद्योगिक अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, शास्वत कार्यान्वयन (सस्टेनॅबिलिटी ऑपरेशन्स) आदी करिअर संधी मिळू शकते.
(४) टेक्निकल टेक्स्टाइल
या स्पेशलायझेशनमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, संरक्षण, अंतराळ, संरक्षक वस्त्रे अशासारख्या तांत्रिक क्षेत्रासाठी आवश्यक असणारी वस्त्रप्रावरणे आणि त्यासाठी आवश्यक साहित्याची निर्मिती क्षमता आणि कौशल्य निर्मितीचं ज्ञान प्रदान केलं जातं. या क्षेत्रासाठी आवश्यक प्रगत उत्पादन प्रकिया शिकवली जाते.
हे स्पेशलायझेशन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रॉडक्शन टेक्निकल टेक्स्टाइल इंजिनीअर, टेक्निकल टेक्स्टाइल इंजिनीअर, टेक्निकल टेक्स्टाइल डिझायनर, फंक्शनल टेक्स्टाइल टेक्नॉलॉजिस्ट, टेक्निकल टेक्स्टाइल डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इंजिनीअर, टेक्स्टाइल डिझाइन असेसमेंट इंजिनीअर या करिअर संधी मिळू शकतात.
संपर्क- https://nift.ac.in
०००
फॅशन उद्योजकता
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन इंस्टिट्यूट (एनआयएफटी) या संस्थेने कौशल्यनिर्मितीचे बरेच अभ्यासक्रम, निरंतर शिक्षण या पध्दतीने सुरु केले आहेत. हे अभ्यासक्रम अल्प कालावधीचे आणि रोजगारास चालना देणारे व स्वयंरोजगारासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.
(१) डिप्लोमा इन फॅशन आंत्रप्रिन्युरशीप
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना (१) विक्री, (२) विपणन (मार्केटिंग), (३) ब्रँडिंग, (४) रिटेलिंग आणि (५) मर्कंडायजिंगचे (व्यवसाय) प्रशिक्षण (६) वस्त्रनिर्मितीचे तांत्रिक ज्ञान, (७) धाग्यांचे तांत्रिक ज्ञान , (८) व्यवस्थापकीय कौशल्य तंत्र आणि तांत्रिक बाबी, (९) व्यवसाय कसा करावा, (१०) व्यवसायाचा आराखडा तयार करणे, (११) व्यवसायाच्या सुसाध्यतेचा अभ्यास, (११) प्रकल्प अहवाल, (१२)प्रकल्प व्यवस्थापन यांचे ज्ञान प्रदान केले जाते.
या अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा आहे. कोणत्याही विषयातील पदवीधर किंवा १२ वीनंतर तीन वर्षे कालावधीची पदविका प्राप्त केलेले उमेदवार अभ्यासक्रमासाठी अर्ज करु शकतात. दोन ते तीन वर्षांचा अनुभव असल्यास प्रवेश घेताना प्राधान्य दिले जाते.
संधी – हा अभ्यासक्रम केल्यावर (१) स्वतंत्र व्यावसायिक (बिझिनेस ओनर्स), (२) व्यवसाय सल्लागार (बिझिनेस कंसलटंट्स), (३) निधीची उपलब्धता करणे (फंड रेझर्स), (४) नव्या व्यवसायांचा विकास (न्यू व्हेंचर डेव्हलपर्स) अशा करिअर संधी मिळू शकतात किंवा स्वत: निर्माण करता येऊ शकतात.
०००
(२) ई-कॉमर्स फॉर फॅशन बिझिनेस
सध्याचा काळ ई कामर्सचा असल्याने, फॅशन व्यवसायही या पध्दतीने करता येणे शक्य व्हावे यासाठी, या संस्थेने तीन महिने कालावधीचा, ई-मर्स फॉर फॅशन बिझिनेस, हा अभ्यासक्रम एनआयएफटीने, सुरु केला आहे. तो ऑनलाईन पध्दतीने करता येतो. या अभ्यासक्रमात ऑनलाईन व्यवसाय कसा करावा, त्यासाठी सुयोग्य डिजिटल प्लॅटफॉर्म कसे निवडावे, ई-कॉमर्स व्यवसायामधील सध्याचे प्रवाह, ई-बिझिनेस वाढवण्याचे तंत्र शिकवले जाते. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन मर्कंडायजिंग, ऑनलाईन मार्केटिंग आणि फॅशन आंत्रप्रिन्युरशीप अशा क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात.
संधी – हा अभ्यासक्रम केल्यावर स्वतंत्र व्यावसायिक (बिझिनेस ओनर्स), व्यवसाय सल्लागार (बिझिनेस कंसलटंट्स), निधीची उपलब्धता करणे (फंड रेझर्स), नव्या व्यवसायांचा विकास (न्यू व्हेंचर डेव्हलपर्स) अशा करिअर संधी मिळू शकतात किंवा स्वत: निर्माण करता येऊ शकतात.
संपर्क- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, एनआयएफटी कॅम्पस, प्लॉट नंबर १५, सेक्टर-४, खारघर, नवी मुंबई-४१०२१०, दूरध्वनी-०२२-२७७४७०००, ईमेल- fce.mumbai@nift.ac.in
या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना https://nift.ac.in/mumbai/continuingeducation या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागतो.
०००
(३) ब्रँड आयडेंटिटी डिझाइन
बाजारात येणारी कोणतीही नवी वस्तू किंवा उत्पादनाला ग्राहकांकडे आकर्षून घेण्यासाठी स्वतंत्र ओळख निर्माण करणे आवश्यक असते. अशी ओळख निर्माण करण्यासाठी व्युहनीती किंवा आराखडा तयार करावा लागतो तसेच अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करुन त्यांना कायमस्वरुपी टिकवायचे असते. त्याअनुषंगाने हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरु शकतो. हा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना एखाद्या नव्या उत्पादनाची स्वतंत्र ओळख (ब्रँड आयडेंटिटी) निर्माण करण्याचे तंत्र आणि कौशल्य शिकवले जाते.
या अभ्यासक्रमात पुढील विषय घटकांचा समावेश आहे- (१) लोगो (विशिष्ट चिन्ह/आकृती) ची निर्मिती प्रकिया आणि अभिकल्प/डिझाइन, (२) लोगो डिझाइनसाठी डिजिटल तंत्राचा वापर, (३) छायाचित्रण कला, (४) ब्रँडचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग.
करिअर संधी
हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना (१) लोगो डिझाइन, (२) ब्रँड कोलॅट्रल डेव्हलपमेंट, (३) सोशल मीडिया पोस्ट डिझाइन आदी क्षेत्रात करिअर संधी मिळू शकते.
या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असून कोणत्याही ज्ञानशाखेतील १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना तो करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र दिले जातो. हा अभ्यासक्रम एनआयएफटीच्या रायबरेली (nift.ac.in/raebareli) कॅम्पसमध्ये करता येतो.
सुरेश वांदिले