नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेने फॅशन तंत्रज्ञान या विषयातील उच्च श्रेणीचे व प्रगत ज्ञान मिळावे म्हणून, मास्टर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम सुरु केला आहे. सध्या तरी एखाद्या शासकीय शैक्षणिक संस्थेत चालवण्यात येणारा हा एकमेव आणि आगळावेगळा असा अभ्यासक्रम ठरला आहे. या अभ्यासक्रमाला कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवीधर किंवा बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा घेतली जाते.
काय शिकाल?
या अभ्यासक्रमाच्या मुख्य विषय घटकांमध्ये (१) शिवण उत्पादन तंत्रज्ञान, (२) पॅटर्न इंजिनीअरिंग, (३) वस्त्रप्रावरण गुणवत्ता अभियांत्रिकी, (४) वस्त्रप्रावरण निर्मिती प्रकिया, (५) वस्त्रप्रावरणांची व्यापक विक्री, (६) वस्त्रप्रावरणाचं कच्चे साहित्य, (७) संशोधन कार्यपध्दती आणि तंत्र, यांचा समावेश आहे.
स्पेशलायझेशन
दुस-या सत्रापासून विद्यार्थी चार स्पेशलायझेशनच्या विषयांपैकी पुढील कोणतेही दोन विषय स्पेशलायझेशनसाठी निवडू शकतात.
(१) स्मार्ट फॅक्ट्री
या स्पेशलायझेनमुळे विद्यार्थ्याला इंडस्ट्री चार, मध्ये कार्य करण्याची सक्षमता प्राप्त होते. विद्यार्थ्यांना (१) आर्टिफिशियल इंटेलीजन्स, (२) ऑगमेंटेड रिॲलिटी, (३) व्हर्च्युअल रिॲलिटी, (४) इंडस्ट्रिअल इंटरनेट ऑफ थिंग्ज, (५) थ्री डी पेंटिंग्ज, (६) रोबोटिक्स, (६) बिग डेटा, (७) क्लॉऊड कॉम्प्युटिंग, ही कौशल्यं प्राप्त करुन फॅशन क्षेत्रातील पुरवठा साखळी अधिक सक्षम करण्याची भूमिका बजावता येणं शक्य होतं. स्पेशलायझेशनमधील या घटकांमुळे उमेदवारांना मेकॅट्रॉनिक्स, मशिन लर्निंग या सारख्या विषयांमध्ये ज्ञान प्राप्त होतं. स्मार्ट उत्पादनासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, स्वयंचलन, सेन्सॉर्स, मनुष्यबळ यांचं एकात्मिकरण करणं सुलभ जातं.
हे स्पेशलायझेशन केलेल्या उमेदवारांना (१) माहिती तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापन, (२) स्वयंचलन, (३) यंत्रसामग्रीचं संशोधन आणि विकास आणि त्याचा उपयोग, (४) निर्मिती प्रकियेमधील संशोधन आणि विकास अशा करिअर संधी मिळू शकते.
(२) स्मार्ट गार्मेंट्स
या स्पेशलाझेशनमध्ये स्मार्ट वस्त्रप्रावरणांच्या निर्मिती आणि उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या थ्रीडी प्रिटिंग सारख्या तंत्राचं ज्ञान प्रदान केलं जातं. कोणतही शिवणकाम किंवा जोडकाम नसणारी वस्त्रप्रावरणं, विशेष प्रसंगांसाठी असणाऱ्या वस्त्रप्रावरणांच्या निर्मिती प्रकियेसाठी आवश्यक तंत्राचं ज्ञान प्रदान केलं जातं. थ्रीडी बॉडी स्कॅनिंगचं कौशल्य शिकवलं जातं. याचा उपयोग स्मार्ट वस्त्रप्रावरणांच्या पॅटर्न (साचा) ची निर्मिती, उत्पादन आणि विक्रीसाठी होतो. आभासी वस्त्रप्रावरणे, टेक्निकल ऑडिट मॅनेजर, फिट ॲनॅलिस्ट इत्यादी करिअर संधी मिळू शकते.
(३) ऑपरेशनल एक्सलन्स (कार्यान्वयनातील उत्कृष्टता)
या स्पेशयालझनमध्ये निर्मिती प्रकियेच्या व्यवस्थापनाचं कौशल्य प्रदान केलं जातं. यामध्ये उत्पादन इफिसिएंसी (कार्यक्षमता), औद्योगिक अभियांत्रिकी ,शास्वतता, इरगॉनॉमिक्स (कामगार कार्यक्षमताशास्त्र), गुणवत्ता व्यवस्थापन, प्रकल्प आराखडा, साधनसामग्री आणि पुरठा साखळी व्यवस्थापन, यावर लक्ष केंद्रित केलं जातं. या घटकाच्या संकल्पना स्वयंस्पष्ट करण्यात येऊन सर्वोत्कृष्ट कार्यप्रणालीचं ज्ञान प्रदान केलं जातं. निर्णय प्रकियेत सक्रिय सहभागची कौशल्यं शिकवली जातात.
नियोजन, निर्मिती व्यवस्थापन, सिस्टिम व्यवस्थापन, औद्योगिक अभियंता इत्यादी करिअर संधी मिळू शकते.
(४) टेक्निकल टेक्स्टाइल
या स्पेशलायझेशनमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, संरक्षण, अंतराळ, संरक्षक वस्त्रे अशासारख्या तांत्रिक क्षेत्रासाठी आवश्यक असणारी वस्त्रप्रावरणे आणि त्यासाठी आवश्यक साहित्याची निर्मिती क्षमता आणि कौशल्य निर्मितीचं ज्ञान प्रदान केलं जातं. या क्षेत्रासाठी आवश्यक प्रगत उत्पादन प्रकिया शिकवली जाते.
हे स्पेशलायझेशन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रॉडक्शन टेक्निकल टेक्स्टाइल इंजिनीअर, टेक्निकल टेक्स्टाइल इंजिनीअर, टेक्निकल टेक्स्टाइल डिझायनर, इत्यादी करिअर संधी मिळू शकतात.
संपर्क- https://nift.ac.in
०००