आईबाबांसमवेत तेजोमयी नुकतीच बदामी या ऐतिहासिक स्थळी गेली होती. ही छान ट्रीप आटोपून ते बेळगाववरुन मुंबईला रेल्वेगाडीने निघाले. त्यांच्यासोबत या ट्रिपसाठी असणारे शेजारचे काका-काकूही होते. सगळे जण एकाच कम्पार्टमेंटमध्ये होते. त्यामुळे सगळ्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या.
११ शे वर्षांपूर्वी होऊन गेलेले बदामीचे चालुक्य राजे, त्यांच्या काळातील मंदिरं याची खूप छान माहिती गाइडने दिली. त्यामुळे तेव्हाचा इतिहास जिवंत झाला. हे तज्ज्ञ अशातऱ्हेने सांगत की जणू काही ते दगडच प्रत्यक्ष बोलताहेत असं वाटावं. आपला प्राचीन वारसा किती किती समृध्द आणि वैभवशाली होता, याची कल्पना येत होती. तेजोमयीचं मन बदामी राजांच्या काळातच फिरत होतं. आता इथे अलेक्सा गोर्जी असती तर तिने डीप लर्निंगच्या मदतीनं तेव्हाच्या काळाची चित्रफीत करुन दाखवली असती, असं तेजोमयीला वाटलं.
“मी तर इथेच आहे.” कुणीतरी बोलल्याचा भास तेजोमयीला झाला. तिने इकडेतिकडे बघितलं. आवाज गोर्जीचाच होता. पण तिला तर आपण घरीच ठेवली. मग हा भास की भुताटकी? तेजोमयीच्या मनात विचार आला. याचं तिला हसू आलं. ही स्वत:शीच कां बरं हसतेय, म्हणून आईने तिच्या खांद्याला धरुन हलवलं.
“काय मॅडम असं स्वत:शीच कां बरं हसता?” बाबांनी विचारलं.
“बाबा, मला गोर्जीची आठवण झाली नि तिचा आवाज ऐकू आला. पण ती तर तिकडे घरी. मग ही भुताटकी तर नाहीना असं वाटून हसू आलं.”
“पण मध्येच तुला तिची कां आठवण झाली?”
“तिने डीप लर्निंगच्या मदतीने बदामी राज्याची सुंदर चित्रफित तयार करुन दाखवली असतीना.”
“त्यासाठी गोर्जी कशाला हवी?”
“मग,कोण करणार अशी चित्रफित?”
“आपणच तयार करु शकतोना.”
“काहीतरीच काय? आपल्या मेंदुत ना डीप लर्निंगचं अल्गोरिदम नि माहितीच्या आधारे चित्रफित करण्याचं सॉफ्टवेअर.”
“गोर्जीला सूपर स्मार्ट मेंदू असला म्हणून काय झालं?”
“म्हणूनच ती काहीही करु शकतेना.”
“हा मेंदू तिला दिला कुणी?”
“आपल्यातील शास्त्रज्ञांनी.”
“मग ज्यांच्याकडे आधीपासूनच मेंदू आहे तो मानव स्मार्ट की ज्यांनी यंत्राला मेंदू दिला ते यंत्र?”
“तुम्ही कोड्यात बोलू नका.”
“गोर्जीसारख्या यंत्राचा मेंदू कितीही स्मार्ट असला तरी प्रत्येक वेळी अशा स्मार्ट यंत्रावर अवलंबून कां राहायचं?”
“त्यामुळे आपल्या मेंदूला गंज नाही का लागणार? तसं होणं म्हणजे मेंदू कामातून जाणं.” आई म्हणाली.
आईबाबांना मध्येच हे भलतच काय सुचलं, याचा तेजोमयी विचार करु लागली. आपल्या मेंदूला गंज लागू द्यायचा नाही, असं ती स्वत:शीच पुटपुटली.
“शुभस्य शीघ्रम.” पुन्हा गोर्जीचा आवाज तिच्या कानात गुंजला. तिने इकडेतिकडे बघितलं. पुन्हा भुताटकी की काय? तिच्या मनात विचार आला.
“भुताटकीचं काय घेऊन बसलीस. तू हुषार आहेस. डोळे मिटून मनाला पुन्हा बदामीकडे घेऊन जायला सांग. बदामीतले रस्ते, महाल, किल्ल्यांचे अवशेष, अगस्ती तलाव, , पज्ञ्मनाभ शेषशायी विष्णुंचं मंदिर, गुहांच्या भिंतीवर कोरलेल्या सुंदर, आखीव रेखीव, भव्य मूर्त्यांकडे जा. गाईडने सांगितलेली माहिती पुन्हा ताडून बघ. मूर्त्यांशी बोल. त्यांना तुझी गोष्ट सांग. त्यांची गोष्ट तयार कर. तुझं मन इतकं स्मार्ट नि गतिमान आहे की ते काहीही करु शकतं. बदामीचं साम्राज्य तुझ्या कल्पनेप्रमाणे तू जिंवत करु शकते.”
“खरंच हे शक्य?”
“अलबत. आमच्यात एआय, मशिन लर्निंग, डीप लर्निंन आदी सॉफ्टवेअर असतील. पण मन नाहीना.”
“बरोबर बोललीस.”
“माझं बोलणं पूर्ण कुठे झालय. असं सारखं आमच्या कृत्रिम बुध्दीमत्तेवर जास्त अवलंबून राहणं बरोबर नाही. त्याऐवजी, तुम्ही मनाचा वापर करा, पुस्तकं वाचा, ग्रंथ वाचा, नव्या भाषा शिका, शीलालेख वाचायला शिका. म्हणजे मग एआयपेक्षा तुम्हीच कितीतरी भारी चित्रफित मनात तयार करु शकाल.” तेजोमयीच्या कानात भासमान गोर्जी म्हणाली.
तेजोमीयने डोळे मिटले. तिने आपल्या मनाला गरुडाचे पंख लावले. तो कल्पनेच्या आकाशात झेपावून वेगाने चालुक्य राजांची राजधानी असलेल्या बदामीकडे जाऊ लागला. बदामीच्या भव्य इतिहासात तेजोमयी रंगून गेली. या प्राचीन समृध्देचे आपण वारस असल्याचा अभिमान तिच्या मनात दाटून आला. गाडीने आता वेग धरला होता. या वेगासोबत तिच्या मनातील कल्पनेचा गरुड स्पर्धा करु लागला होता.
सुरेश वांदिले