(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

त्याच्या काकांना पार्किन्सनचा आजार झाल्याने त्यांचा हात इतका थरथरायचा की त्यांना त्यांच्या शर्टाची बटणंसुध्दा लावणं शक्य होत नसे. त्यांना साधा चमचाही हाताने उचलता येणं अशक्य होऊ लागलं. काकांची ही अवस्था त्याला सहन होईना. ते आणि त्यांच्यासारख्या पार्किन्सन रुग्णांसाठी काहीतरी करायला हवं, असं त्याच्या मनाने घेतलं. तो झपाटून कामाला लागला. या झपाटण्यातून त्याने एका रोबोटिक चमच्या(स्पून)ची निर्मिती केली. बॅटरीवर चालणाऱ्या या स्मार्ट चमच्यामुळे त्याच्या काकांना दिलासा मिळाला. त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही. हाताचं थरथरणं थांबलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पूर्ववत आलं.

या रोबोटिक स्मार्ट चमच्याच्या नमुन्यास (प्रोटोटाइप) जर्मनी येथे झालेल्या रोबोटिक्स स्पर्धेत, फ्युचर इनोव्हेटर्स या कॅटेगरीत पहिला क्रमांक मिळाला. या स्मार्ट चमच्याची निर्मिती थ्री डी प्रिंटर आणि सेन्सर मोटर्सच्या साहाय्यानं त्याने केली होती.  

या चमच्याची उपयुक्तता तपासून घेण्यासाठी त्याने बेंगळुरु मधील एका  फिजिओथेरपी कॉलेजच्या तज्ज्ञांसमोर प्रात्यक्षिक केलं. तज्ज्ञ मंडळी प्रभावित झाली. त्यांनी काही सुधारणा सुचवल्या. त्यानुसार  त्याने या स्मार्ट चमच्याचं नवं डिझाइन तयार केलं. आता हा स्मार्ट चमचा अधिक हलका झाला. पार्किन्सन रुग्णांच्या थरथरत्या हातात तो घट्ट बसू लागला. हा सुधारित चमचा त्याने पुन्हा चाचणीसाठी अनेक रुग्णांकडे पाठवला. तो खूपच उपयुक्त असल्याचं सर्वांचं मत पडलं.

त्याला रोबोटिक्सची आवड त्याच्या आईने दिलेल्या ‘लेगो’ खेळामुळे झाली. त्यावेळी त्याचं वय होतं ९ वर्षे. ‘लेगो’ खेळातील सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिक्स या तंत्राचा वापर करुन तो विविध वस्तू तयार करु लागला. त्यातूनच त्याला स्मार्ट चमच्याची कल्पना सुचली. रोबोटिक्स मधील त्याचा उत्साह आणि रस बघून त्याच्या आईला एका वेगळ्याच कल्पनेची प्रेरणा मिळाली. त्यांनी स्वत:ची चांगली नोकरी सोडून
‘रोबोलेक्ट्रो टीम स्टुडियो’ ही कंपनी स्थापन केली. मुलांना २१ व्या शतकातील रोबोटिक्स सारख्या कौशल्यांना शिकवणं हा या कंपनीचा उद्देश त्यांनी निश्चित केला.

रोबोटिक्स मधील ‘त्याची’ गती बघून त्याच्या आईबाबांनी त्याला वेगवेगळ्या देशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केलं. आतापर्यंत त्याने जर्मनी, रशिया या सारख्या देशांचा समावेश असलेल्या २० हून अधिक देशामधील रोबोटिक्स स्पर्धांमध्ये भाग घेतला.

त्याचे बाबा मेकॅनिकल अभियंता आहेत. तर त्याला मेकॅट्रॉनिक्समध्ये रस. त्यामुळे त्याला वेगवेगळ्या रोबोटिक्स प्रकल्पांवर काम करण्यासाठी बाबांची मदत होते. त्याशिवाय तो यू ट्यूबवरील माहितीचा उपयोग करुन घेतो. यूट्यूबरील माहिती म्हणजे ज्ञानाचा महासागर असून त्यामुळे आपल्या ज्ञानात खूप भर  पडत असल्याचं तो सांगतो.

तो जेव्हा रोबोटिक्सवर काम करत नसतो तेव्हा, आपलं घर कसं अधिक स्मार्ट होईल, कसं उत्तम होईल, यासाठी वेगवेगळे प्रयोग करतो. यातूनच त्याने गेल्या वर्षी एका स्मार्ट पंख्याची निर्मिती केली.
बेंगळुरुमध्ये गेल्यावर्षी चांगलंच उन तापलं. त्यावर मात करण्यासाठी त्याने, खोलीतील प्रकाशासोबत जुळवून घेणारा, स्वत:च वेग नियंत्रित करणाऱ्या पंख्याची निर्मिती केली.

असा हा आरव अनिल. वय वर्षे २१. हल्ली मुक्काम बेंगळुरु.

सुरेश वांदिले