(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 स्वप्न स्वप्न खेळ.

बादशहा अकबर दरबारातील कामकाज संपवून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा सिंहासनावर बसले आणि दरबाऱ्यांना उद्देशून म्हणाले.

चला आपण स्वप्न स्वप्न खेळ खेळू या..

आँ..सर्व दरबारी एकमुखाने उद्गारले. बादशहाला काहीही सुचतं हं. ते सुध्दा मूर्खासारखं असं बऱ्याच दरबाऱ्यांना वाटलं. पण ते बोलण्याची कुणाची टाप नव्हती. त्यामुळे बहुतेक सर्वांनी, वा वा वा, काय छान कल्पना आहे, अशी कल्पना केवळ बादशहालाच सुचू शकते असे म्हणून बादशहाचे खोटे खोटे कौतुक केले. या खोट्या कां होईना पण कौतुकाने अकबर सुखावून गेला. आपल्या बुध्दीचा त्याला अभिमान वाटला.

दरबाऱ्यांच्या उत्तराने खूष झालेला अकबर त्यांना म्हणाला, मग आपण खेळू या ना आपण स्वप्न स्वप्न खेळ.

सर्व दरबारी जोरात हो म्हणाले. मात्र बिरबल काहीच बोलला नाही.

बिरबला, तुला हा खेळ खेळायचा नाही का?

तसे नाही खाविंद..पण

आता पण नाही नि बिन नाही.या खेळात जो जिंकेल त्याला आम्ही सोन्याचे १००० नाणे देऊ.

पण खाविंद हे कसं शक्य आहे? बिरबल म्हणला.

कां नाही? सारं शक्य आहे. प्रत्येक जण काल त्याला पडलेलं स्वप्न सांगेल. जे स्वप्न आम्हाला सर्वोत्कृष्ट वाटेल त्याला आम्ही बक्षीस देऊ. मान्य. अकबर म्हणाले.

सर्वांनी होकार दिला..

बिरबल तुला मान्य आहे ना..

त्याने नाराजिने होकरार्थी मान हलवली..

दरबारातील एकएक जण कालरात्री पडलेलं स्वप्नाचे वर्णन रंगवून रंगवून करु लागला. दरबाऱ्याचे स्वप्न सांगून झाले की त्यावर टाळ्या पडू लागला.

आपल्या दरबाऱ्यांना एकाहून एक सुंदर स्वप्न पडतात, याचा अर्थ त्यांना चांगली झोप लागते, हे अकबराच्या लक्षात आले, त्यामुळे अकबर आनंदले. ते प्रत्येक दरबाऱ्याला वा वा बहोत खूब..क्या बात है अशा प्रतिक्रिया देऊन त्यांचे कौतुक करत होते.

 आता फक्त बिरबल उरला होता. मात्र सर्वांचे स्वप्न सांगून झाल्यावरही तो उठला नाही.

अरे बिरबला, तू तुझे स्वप्न सांगण्यास इतका घाबरतो कां, की तुला काल स्वप्नच पडले नाही.अकबराने बिरबलास विचारलं.

खाविंद, या सर्वांना पडलेल्या स्वप्नांचे वर्णन ऐकून माझी छातीच दडपून गेली. या सर्वांच्या पुढे माझं स्वप्न म्हणजे सूर्यापुढे काजवेच जणू. तेव्हा मला वाटतं खाविंद की माझं स्वप्न मी न सांगितलेलंच बरं. या सर्वांच्या शानदार स्वप्नांचा त्यामुळे अपमान ठरेल त्यामुळे. बिरबल खाली मान घालून म्हणाला.

म्हणजे याचा अर्थ तू आमचे ऐकणार नाहीस तर. हे असं वागणं आमच्या आदेशाची पायमल्ली आहे, असे समजून आम्ही तुला शिक्षा देऊ  शकतो. अकबर गरजले

खाविंद, आपला एवढा आग्रहच आहे तर मग आम्ही सांगतो. चुकभूल झाली तर क्षमा असावी. असे बोलून बिरबल त्याला पडलेल्या स्वप्नाविषयी सांगू लागला.

खाविंद, मला काल अगदी पहाटे पहाटे असं स्वप्न पडलं..

कसं? अकबराने उत्सुकतेनं विचारलं..

खाविंद स्वप्नामध्ये मला दिसलं की मी तुमच्या तलवारीचा म्यान झालो आहे. हे बघून मला धन्य धन्य वाटले.

अरे, असे कसे स्वप्न असू शकते. एक दरबारी लगेच उभा राहून बोलला.

नेहमीप्रमाणे बिरबल आगावूणा करु पाहतोय. दुसरा म्हणाला.

याची चौकशी केली पाहिजे . तिसरा म्हणाला.

खोटं स्वप्न सांगून खाविंदाची फसवणूक करतोय हा बिरबल. चौथा म्हणाला..

दरबाऱ्यांची बडबड ऐकून अकबराला फार राग आला. आपल्या सिंहासनावरुन ताडकन उठत ते गरजले….

खामोश..गप्प बसा..तुम्ही जे स्वप्न सांगितलं ते खरं आणि बिरबलं जे सांगतो ते स्वप्न खोट कसं? बिरबलाच्या स्वप्नाची चौकशी करण्याची मागणी तुम्ही केली तशी मग तुमच्यापण स्वप्नाची पण चौकशी करायला नको का मग..

सर्व दरबाऱ्यांची मान खाली गेली. जो पर्यंत तुम्हा सर्वांच्या स्वप्नाची चौकशी पूर्ण होत नाही, तो पर्यंत आजच्या खेळातला विजेता घोषित केला जाणार नाही. अकबराने घोषित केले.

अकबराने आपल्याला मूर्ख बनवले, हे दरबाऱ्यांच्या लक्षात आले. पण त्याच्या निर्णयाला होकार दर्शवून एक एक दरबारी बाहेर पडू लागला.आता केवळ बिरबल उरला होता.

बिरबला, तुझे स्वप्न खरे असो किंवा खोटे असो, पण आपल्याला फार आवडले बाँ..

म्हणजे खाविंद? बिरबलाने आश्चर्याने विचारले.

अरे तुला माझ्या तलवारीचा म्यान बणण्याचे स्वप्न पडले ना.याचा अर्थ समजतोस ना काय होतो ते..

काय खाविंद?

अरे, तुला कायम माझ्याजवळ राहायचे आहे.वा वा बहोत खूब..

मग खाविंद, माझे स्वप्न तुम्हाला एवढे आवडलं तर मग तुम्ही  मला बक्षीस द्यायला हवं ना.

हा हा हा बिरबल….स्वप्नांच्या भाकड कथांवर विश्वास ठेवायला आम्हास मूर्ख समजालास की काय?

अकबर हास्याचा गडगडात म्हणाले. बिरबल काय ते समजून गेला.

सुरेश वांदिले