(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 

हम होंगे कामयाब

परवा तेजोमयी स्वत:हून सकाळी लवकर उठली. ट्रॅकसूट घालून ती कॉलनीवळच्या मैदानात धावायला गेली. सदैव आळासवलेल्या तेजोमयीमधील हा अचानक झालेला बदल बघून आई-बाबांना आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला.

आई अलेक्झांडरला म्हणाली, ठोंब्या, तू सुध्दा असाच धावायला जा. नुसता माझ्या पाठीमागे फिरत असतो. घरातल्या घरात. अशाने अन्न कसं पचणार नि तब्येत कशी चांगली राहणार तुझी.

आईच्या कानपिचक्या अलेक्झांडरला बरोबर कळत. त्यामुळे त्याने, हो गं आई, मी उद्यापासून तेजोमयीसोबत धावायला जाईल, असं त्याच्या पध्दतीने आईच्या गळयात पडून आणि तिच्याशी लाडीगोडी करत सांगण्याच्या प्रयत्न केला.

तासाभरानंतर तेजोमयी मैदानातून परत आली. चांगलीच घामाघूम झाली होती. आईने तिला आधी आंघोळीला पाठवलं. स्नान करुन आल्यावर बाबांनी उत्सुकतेनं विचारले.

बाळासाहेब, आज सूर्य महाराज वायव्य दिशेनकडून कसे काय उगवले बाँ..

म्हणजे हो काय बाबा.. तेजोयमीनं प्रतिप्रश्न केला.

अगं, यांना थेट विचारलेलं काही आवडतच नाही. त्यांना म्हणायचंय, तू आज सकाळी न आम्ही न उठवता उठलीस. धावायला गेली. हा चमत्कार कसा काय घडला?.

आई-बाबा अहो, आता मी केवळ धावायलाच जाणार नाही तर, जिमला सुध्दा जाणार दररोज.

अरे वा, कुणाशी पंगा-बिंगा घ्यायचाय की काय? बाबांनी विचारलं.

अहो बाबा, पंगा घेण्यासाठीच धावायला आणि जिममध्ये जायला हवं का?

काहीतरीच काय विचारता हो लेकिला. तिचं कौतुक करायचं सोडून भलतेच विचार तुमच्या डोक्यात येताहेत. आई नाराजीच्या सुरात बाबांना म्हणाली.

तेजोमयीच्या बाबतीतला चमत्कार घडला तरी कसा? हे जाणून घेण्यासाठी मात्र तिचीही उत्सुकता ताणली गेली होतीच.

तेजोमयीच्या ते लक्षात आलच होतं. आईबाबांची ही अवस्था बघून तिला हसूही येत होतं. तिने हसत-हसत पेपर बाबांच्या हातात ठेवला.

अगं हा कालचा पेपर. कशाला दिलाय मला. झालाय माझा वाचून. बाबा म्हणाले.

पहिल्या पानावरची पहिली बातमी वाचा बाबा..म्हणजे मग तुमच्या मनात, माझ्या आजच्या सकाळच्या वागणुकीबद्दल उत्सुकता ताणलीय ना, त्याचं उत्तर मिळेल..

हो का, असं म्हणून बाबांनी पेपर उघडला..

आता नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमित म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनित मुलींना प्रवेश.., अशा शीर्षकाची बातमी होती.

ही काय भानगङ. आईनं विचारलं.

म्हणून म्हणतो अधूनमधून पेपर वाचत चल, बाबा म्हणाले.

अहो ज्ञानीपुरुष, तुम्ही सांगाना नेमकं काय ते..

अगं आई, मी सांगते. एनडीए मध्ये १२ वीनंतर सैन्यातील भरतीसाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण दिलं जातं. ते आतापर्यंत केवळ मुलांसाठीच होतं. पण आता आपल्या सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं, असं चालणार नाही. मुलं -मुली असा भेदभाव करु नका. मुलांइतक्याच मुलीही सक्षम आणि समर्थ आहेत. त्यांनाही एनडीएला प्रवेश द्या… काय बाबा बरोबर ना…तेजोमयीनं बाबांकडे बघून विचारलं.

हो हो अगदी बरोबर..तू आख्खी बातमीच तोंडपाठ करुन दाखवली.

मुलींना प्रवेश देणार म्हणजे चांगलचं आहे की.. पण त्याचा आणि तुझा सकाळी धावायला जाण्याचा काय संबंध? आईनं विचारलं..

माझ्या थोडं थोडं लक्षात येतय बर कां, मिस तेजोमयी..

काय लक्षात येतय? मला सुध्दा सांगाना. आई, न राहवून विचारती झाली.

अहो, आपल्या बाईसाहेबांना एनडीए मध्ये जायचय..

काsय आई किंचाळलीच..अगं काहीबाही काय विचार करतेस. तुझा जीव इवलासा. शक्ती कमी..साधं दफ्तर उचालायचा म्हटंल तरी तुला दम लागतो…बंदूक कशी उचलणार तू..आणि इतर मुलींना जाऊ दे ना..तू कशाला हा विचार करते..

अगं,काही काहीतरी काय बोलतेस तू..एनडीएमध्ये प्रवेश मिळेल की नाही माहीत नाही.मात्र प्रयत्न करायला काय हरकत आहे. या परीक्षेमध्ये तुमच्या बुध्दीचीच कसोटी लागत नाही तर शारीरिक क्षमतेची कसोटी लागते. सैन्यात भरती होणारा कोणीही असो, तो कायम युध्दासाठी तयारच असला पाहिजे, असं मी कालच वाचलं. त्यामुळे मुलगा असो वा मुलगी तो कसा दणकट, कणखर असला पाहिजे. त्यासाठी त्याने शारीरिक मेहनत केली पाहिजे. व्यायाम केला पाहिजे..

असं होय, म्हणून तू सकाळी धावायला गेलीस तर..

आणि आता जिममध्ये जाणार आहे आपली पोरगी..

यस्स बाबा..दोन वर्षांनी मी एनडीएची परीक्षा देईन तेव्हा मी शारीरिकदृष्ट्या सक्षम झालेली असेल. म्हणजे लेखी परीक्षेत आणि शारीरिक चाळणी परीक्षेत तुमची कन्या कामयाब होईल बघा..

वा s , बाबा कौतुकाने म्हणाले..

गुणी गं माझी लेक, असं म्हणत आईनं तेजोमयीस प्रेमानं जवळ घेतलं.

तेजोयमयीचं कौतुक चालल्याचं अलेक्झांडरच्या लक्षात आलच होतं. आपला आनंद त्याने खालून सोफ्यावर आणि सोफ्यावरुन खाली उडी मारत व्यक्त केला.

सुरेश वांदिले