मार्गारेट मावशीला झोपच येईना. आता करावं काय बरं? तिला प्रश्न पडला. “प्रश्न पडला की उत्तर असणारच की.” तिने स्वत:ला विचारलं. “करेक्ट”, ती स्वत:शीच पुटपुटली.
“अगं डंगरे काय करेक्ट, फिरेक्ट. आधी उत्तर सांग नि मग, सिंग साँग..डिंग डाँग.” मावशी स्वत:ची मिशी ओढत पुन्हा स्वत:शीच पुटपुटली. मिशी जोरात ओढल्याने वेदना होऊन ती ओरडली, “अ आईग! ”
“मावशे तुला झालं तरी काय?” मावशीच्या ओरडण्याने जागा झालेला रॉबिन्सन मामा तिला कुरवाळत म्हणाला.
“रॉब्या, तू इथे काय करतोस? ”
“काय करतोस म्हणजे? तुझे पाय दाबत होतो.”
“तरीसुध्दा मला झोप कां आली नाही?”
“मुझे क्या पता?”
“रॉब्या, मला झोप कां येत नाही,हे तुला माहीत नाही नि मलाही ठाऊक नाही. गंमतच म्हणायची.”
“यात कसली आलीय गंमत. उलट ज्याला ‘झोप’ नाही, त्याला ‘होप’ नाही असं तुझी आजी नव्हती का म्हणाली.”
“कधी?मला कसं ठाऊक नाही. उगाच फोका ताणू नकोस.”
“मी कशाला फोका ताणू? ती परवा माझ्या स्वप्नत आली होती.”
“स्वप्न?”मावशी जोरात ओरडली.
“मावशे, तू भूत दिसल्यासारखी कां ओरडतेस?”
“माम्या, मला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळालं.”
“तुझं उत्तर स्वप्नात दडलय?”मामाने आश्चर्याने विचारलं.
“एस्स.”
“मग पुन्हा जा की स्वप्नात”
“जातेकी. मला काय कुणाची भीती.” मावशी म्हणाली. तिने डोळे मिटले. मामा तिचे पाय चेपू लागला.स्वप्न पडू दे देवा, अशी प्रार्थना मावशी करु लागली. थोड्याच वेळात तिची प्रार्थना फळली. तिला झोप लागली नि स्वप्न ही पडलं. या स्वप्नात ती आणि रॉबिन्सन थेट जपानलाच गेल्याचं तिला दिसलं. तिने मामाची हळूच पापी घेतली. लव्ह इन टोकियो, मेरा प्यारो जपान, असं म्हणत मामा नाचू लागला. मावशीनेही फेर धरला. दोघेही नाच नाच नाचले. थोड्याच वेळात घामाघूम झाले. दोघांनांही दणकून भूक लागली. मावशीने जिभल्या चाटत मामाकडे बघितलं. मामाच्या लक्षात मावशीचा दुष्ट हेतू आला.
“मावशे माझ्यावर ताव मारशील तर जपानमध्ये एकटी पडशील. येथील एखाद्या नेपोटल्या डॉगोबाच्या तावडीत सापडशील.” मामा डोळे मिचकावत म्हणाला.
“छेरे मामू, तुला उगाच येते माझी शंका. तू तो मेरा फ्रेंड खास. बाकी सारे बकवास.” मावशी हसत म्हणाली.
“बरं बरं मावशे. बकवास तर बकवास. पण आपल्या भुकेचं काय? उपाय सुचला पाहिजे खास.”
“हं” मावशीने दीर्घ श्वास घेतला. ते दोघेही पुढे निघाले. कुठे काही खायला मिळत कां ते बघू लागले. एके ठिकाणी त्यांना पेटशॉप दिसलं. त्यामध्ये डॉगी, मांजरी, उंदीरमामा यांच्यासाठी असलेलं खास खाद्य होतं. ते बघून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. दुकानात शिरण्यासाठी एक फट त्यांना दिसली. त्यातून ते दोघे आत शिरले. आतले पदार्थ बघून त्यांची भूक आणखीनच वाढली. मागचा पुढचा विचार न करता ते दोघेही त्यावर तुटून पडले. त्यांचं खादाडणं सुरु असतानाच त्यांच्या कानावर कुणाचा तरी आवाज पडला.
“थांबा माझ्या दोस्तांनो थांबा. हारा हाची बू…हारा हाची बू.”
“आँ! हे कोण करतय, बू चू फू चू!” मामा घाबरुन मावशीला म्हणाला.
“मामू, कुणीतरी शत्रू आपल्या मागावर दिसतो.पळ आता.”
“दोस्तांनो, मी तुमचा शत्रू नाही. पण, हारा हाची बू केलं नाही तर, तुम्हीच व्हाल तुमचे शत्रू.”
“हे हे हे सांगणारा कोण रे तू?” मावशी घाबरुन म्हणाली. मामाची बोलतीच बंद झाली. त्याचे पाय लटपटू लागले.
“घाबरु नका.”असं म्हणत एक डॉगोबा त्यांच्यासमोर उभा ठाकला.”
मामा आणि मावशी त त प प करु लागले.
‘च छ ज’ तो डॉगी हसत म्हणाला. “अरे,घाबरु नका मी चाव टॉव डॉगी. या दुकानाचा रखवालदार.”
“मग तू आता आमचा ठरणार का घातवार?”मावशी कशीबशी बोलली.
“ना ना दोस्तांनो. मी काही नाही करणार. तुम्ही भरपूर खा प्या, पण, हारा हाची बू लक्षात ठेवा.”
“चॉव टॉव दादा, हे मघापासून तू सारखा हा हा बू काय करतोस?” मामाने धिटाइनं विचारलं.
“माझ्या पिटुकल्या दोस्ता, ते हा हा बू नाही तर हारा हाची बू आहे.”
“पण, हे आहे तरी काय?”मावशीने हिम्मत करुन विचारलं.
“सांगतो ना. मघा तुम्ही कसे बकाबका खादाडत होतात. तसं नसतं करायचं. त्यामुळे आपलं पोट डच्च भरतं.”
“मग काय करायचं?”
“दोस्तांनो आम्ही जपानी म्हणजे मी, माझे मालक,मालकीनबाई,पंतप्रधान सारेच जण स्वत:चं पोट ८० टक्के भरेल एव्हढच खातात. थोडीशी भूक कायम ठेवतो आम्ही.”
“अरे पण, चाव मॉव. त्यामुळे डोकं दुखत नाही का?
”
“छे छे, कमी खाल्ल्यानं डोकं दुखत नाही, तर उपाशी राहिल्याने दुखतं.”
“हो का?”
“हो. आम्ही जपान उपाशी राहत नाही. पण पोटात थोडी जागा शिल्लक ठेवतो. थोडं कमी खाल्लं की हलकं हलकं वाटतं. पोट फुगत नाही. आळस येत नाही. जास्त अन्न पोटात गेलं तर ते पचायला जड जातं. जे पचत नाही ते अंगाला लागत नाही. उलट ते विषासारखच असतं.”
“विष” मावशी जोरात ओरडली. मामाने डोळे विस्फारले.
“हो हो विषच. न पचलेलं अन्न तसच असतं. त्याचा शरीराला त्रास होतो. वेगवेगळया व्याधी पाठिमागे लागतात. गुडघे दुखतात. ह्रदयावर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही गचकूही शकता”
“काय? गचकू शकता?”मावशी घाबरुन ओरडली.
“म्हणूनच, हारा हाची बू ,हारा हाची बू करायचं असतं.”
“याचा अर्थ तरी काय?”
“याचा अर्थ असा की, फक्त ८० टक्के पोट भरेल एव्हढच खा. त्यामुळे होतं छान पचन. वाढत नाही वजन. कायम राहते शरीरातील उर्जा. शंभर वर्षं जगण्याचं मिळतं वरदान. जगू शकतो आनंदात.” असं म्हणत चाव मॉव,शेपूट हलवू लागला. आतापर्यंत प्रेमळ वाटणाऱ्या चावच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. लांब जिभ करुन तो दोघांकडे येऊ लागला. हा आता आपल्यावर ताव मारणार हे दोघांच्याही लक्षात आलं. एक दोन तीन म्हणत मावशी आणि मामाने धूम ठोकली. दुकानाचा दरवाजा बंद असल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नाही. त्यामुळे ते धाडकन दरवाज्याला आदळले नि खाली पडले.
“ओय ओय”मावशी आरडाओरड करत जागी झाली.डोळे चोळत इकडेतिकडे भेदरलेल्या नजरेनं बघत हारा हाची बू हारा हाची बू, असं जोरात म्हणू लागली.
“मावशे मावशे.असं भूत बाधल्यावानी कां बडबडतेस? काय झालं तुला?”मावशी त्याच्याकडे डोळे वटारुन बघू लागली. हिला खरोखरच भूत बाधा तर झाली नाहीना असं वाटून मामाने पळण्याचा पवित्रा घेतला. मावशीने त्याच्यावर उडी मारण्याची पवित्रा घेतला. मामा घाबरुन जोरात ओरडला…
“हारा हाची बू, हारा हाची बू.”
मावशी थबकली. स्वत:शीच हसली. कमी खाण्याचं महत्व इतक्या लवकर कसं बरं विसरली गड्या, असं स्वत:शीच पुटपुटत तिने मस्त ताणून दिली. मामाने सुटकेचा नि:श्वास घेतला. हारा हाची बू मंत्र भलताच पॉवरफूल असल्याचं त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.
सुरेश वांदिले