हावरटपणाची शिक्षा
एकदा एका कावळोबा आणि कबुतराची मैत्री झाली.या कबुतराने भगवान हलवायच्या स्वयंपाक खोलित घरटं बांधलं होतं.भगवान हलवाई वृध्द होता. तो सर्वांशी प्रेमाने वागायचा.विशेषत: पक्षांवर त्याचे विशेष प्रेम होतं. त्यामुळे त्याने कबुतरला हाकलून लावलं नाही. भगवान त्याला दररोजच्या स्वयंपाकातलं खायला द्यायचा.त्यामुळे कबुतराला दररोज मेजवाणी मिळायची.
आपण आपल्या मित्रालाही मेजवाणी द्यायला हवी,असं एकदा कबुतराला वाटलं. त्यामुळे तो कावळयाला घेउुन हलवायाच्या घरी आला.हलवाई प्रेमळ असल्याने त्याने कावळ्यालाही खायला दिलं.
असं ताजं आणि वेगळं अन्न मिळाल्याने कावळा खूप आनंदी झाला.त्याने कबुतराचे आभार माणले.कबुतर त्याला दररोजच हलवायाच्या घरी येण्याचा आग्रह करु लागला.हा आग्रह कावळ्याच्या मोडवेना.बरेच दिवस तो कबुतरासोबत हलवायाच्या घरी जात राहिला.मात्र एके दिवशी त्याने कबुतराला हलवायाच्या घरी येण्यास नकार दिला.कबुतराला आश्चर्य वाटले.
तेव्हा कावळ्याने आपल्या पूर्वजाच्या हावरटपणाची गोष्ट त्याला सांगितली. खूप खूप वर्षापूर्वी अशाच एका हलवायाच्या घरी राहणाऱ्या कबुतरासोबत कावळयाने मैत्री केली.तेव्हाचा हलवाई सुध्दा प्रेमळ असल्याने तो दोघांनाही खायला द्यायाचा.
एकदा हलवायाने मासोळी शिजवायला आणली.त्याने तिचे तुकडे करुन ते भाजी करण्यासाठी कढईत टाकले.खमंग अशी भाजी तयार झाली.त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला.
ही भाजी तयार झाल्यावर हलवाई काही वेळासाठी विश्रांतीसाठी स्वयंपाकघरातून बाहेर पडला.मासोळीच्या भाजीच्या सुंगधाने वासाने कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं.आपण आत जावं आणि मासोळी गट्टम करावी असं त्याला वाटू लागलं.त्याच्या डोळ्यातले भाव कबुतराने बरोबर हेरले.त्याने कावळ्यास सावध केलं.काही गडबड करु नकोस असं सांगितलं.
कसली गडबड मित्रा?कावळ्यानं विचारलं.
स्पष्टच सांगायचं म्हंटल तर तू तुझ्या मनाला आवर नाही तर तो तुला मासोळीची चोरी करण्यासाठी प्रवृत्त करेल?कबुतर स्पष्टपणे म्हणाला.
छे छे मी आणि चोरी…काहीतरी काय बोलतोस मित्रा?इतक्या दिवसात कधी बघितलस कां मला तसं काही करताना?कावळा कबुतराची नजर चुकवत म्हणाला.
मग छानच आहे की?चल, जरा मग आपण थोडं फिरुन येऊ.तोपर्यंत हलवाई विश्रांती आटोपून येईल नि मग आपल्याला खायला देई.कबुतर म्हणाला.
कावळ्याचं पूर्ण लक्ष मासोळीकडे होतं.कधी आपण खातो असं त्याला झालं होतं.त्यामुळे तो कबुतरास म्हणाला,
मित्रा, मला जरा बरं नाही.माझं पोट दुखतय.थोडावेळ मी इथेच आराम करतो.तुझ्यासोबत आज नाही जमणार मला यायला.
कबुतराने मान हलवली.जाताना त्याने पुन्हा बजावले की काही गडबड करु नकोस म्हणून.कावळ्याने हो म्हंटलं.कबुतर कधी इथून जातो असं त्याला झालं होतं.त्यामुळे कबुतर बाहेर पडताच कावळा आनंदला आणि त्याने मासोळीच्या भांड्याकडे झेप घेतली.तेवढयात विश्रांती संपवून हलवाई तिथे आला.कावळयाला भाजीच्या भांडीजवळ बघून त्याला भयंकर राग आला.त्याने कावळयाला पकडले आणि त्याचे पंखच कापून टाकले.त्याच्या हावरटपणाची, मित्राचा योग्य सल्ला न ऐकण्याची आणि चोरीकरण्याची अशी शिक्षा मिळाली.
०००
बापरे बाप…कबुतरबुवा म्हणाला.
हो ना म्हणून मला भीती वाटते रे?आपल मन हावरटपणा करायला सतत प्रोत्साहन देतं.
मग त्या मनाला तू जरा समजावना,की बाबा,असं काही तू मला करायला लावू नको.त्यामुळे नुकसान होतं.जीवावर बेतू शकतं.कबुतराने त्याला समजावलं.
मात्र कावळोबाने कबुतराचं काही ऐकलं नाही.त्याने त्याच्यासोबत हलवायाच्या घरी जाणं सोडलं.
एकदा भगावाने न राहवून, कावळोबा कां येत नाही हे कबुतरास विचारलसुध्दा!
तेव्हा त्याने खरं ते काय सांगितलं.भगवनासा कावळ्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं.जुन्या चुकांमधून जे शिकतात आणि तसे वागतात ते संकटात सापडत नाही.हलवायी म्हणाला.
जेव्हा जेव्हा मासोळीची भाजी बनवेन तेव्हा तेव्हा कावळोबासाठी खास राखून ठेवेन.त्याला घेऊन येत जा. भगवान हलवाई कबुतरास म्हणाला.हावरटपणा न केल्याने कावळोबास अधूनमधून वेगळी मेजवाणी प्रेमानं मिळू लागली.
सुरेश वांदिले
