(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

आज सकाळी सकाळी अलेक्सा गोर्जी तेजोमयी समोर उभी ठाकली तेव्हाच तिच्या हावभावावरुन ती काहीतरी विचारणार हे तेजोमयीच्या लक्षात आलं. तिने लगेच गोर्जीच्या ओठांवर बोट ठेवलं. हे बघून अलेक्झांडरने स्वत:भोवती गिरकी घेऊन आनंद व्यक्त केला.

“अगं पण…” गोर्जीने कसंबसं बोलण्याचा प्रयत्न केला.

“नाही म्हणजे नाही.” तेजोमयी गोर्जीच्या ओठांवरचं बोट काढत म्हणाली. अलेक्झांडरने शेपूट हलवून संमती दर्शवली.

“अगं, पण काय नाही? अलेक्झूला ते कसं कळलं?”

“तसंतर तुलाच कळायला हवंय?”

“म्हणजे?”

“आज प्रश्न विचारायचे नाही म्हणजे नाही.” अलेक्झांडरने डोळे मोठ्ठे करुन गोर्जीकडे बघितलं. त्यालासुध्दा तेच सांगायचय हे गोर्जीच्या लक्षात आलं.

“मी प्रश्न विचारणार, हे तुला कुणी सांगितल?”

“मला नि अलेक्झूला कळतं आता सारं, आम्ही बुध्दिमान नि तू कृत्रिम बुध्दिमान!”

“बरं बाई, नाही विचारत. झालं तुझं समाधान, पण आज तुझी एव्हढी लगबग?”

“बाईसाहेब, आज रंगपंचमी!” तेजोमयी आपलं म्हणणं संपवत नाही तोच गोर्जीने पटदिशी डोळे मिटले. मेंदूला माहितीच्या महाजालात पळवून डीप लर्निंगच्या साहाय्याने रंगपंचमीची माहिती मिळवली. या दिवशी देवदेवता पृथ्वीवर येऊन भक्तांसोबत रंग खेळतात. वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत रंग उधळून केलं जातं. राक्षसराज हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाच्या मदतीने भक्त प्रल्हादला जाळण्याचा केलेला प्रयत्न फसला. तीच या आगीत जळाली. दुष्ट प्रवृत्तीचा नाश झाला. सत्याने असत्यावर मात केली, त्याचा आनंद दुसऱ्या दिवशी रंग खेळून मनवला जातो. भगवान कृष्ण त्याच्या सवंगड्यासमवेत रंगाची उधळून करुन कुणी श्रेष्ठ नाही नि कुणी कनिष्ट नाही, सारेच सारखे, हे दाखवून देतात. आपसातील मतभेद, दुरावा, अबोला दूर करण्यासाठी एकमेकांना रंग लावले जातात. असं गोर्जीने तिच्या डोळ्यातील कॅमेरामध्ये झर्रदिशी बघितलं.

“असं आहे म्हणायचं आजचं महत्व?” गोर्जी डोळे उघडून म्हणाली.

“तुला कळलेलं दिसतय सारंकाही.”

“अलेक्झूला कळलय नि मी अज्ञानी राहून कसं चालेल?” गोर्जी अलेक्झांडरकडे बघून हसत म्हणाली. स्वारीनेही होकारदर्शक शेपूट हलवली.

“गोर्जे, म्हणूनच दे धम्माल मस्ती करायची ठरवलीय, आज.”

“डोळ्यात रंग जाणार नाही याची फक्त काळजी घे.”

“आज नो उपदेश!”

“अगं, रंगांमध्ये शरीरासाठी घातक रसायने असतात, असा डेटा मला मिळालाय, म्हणून तुला सावध करतेय.”

“म्हणूनच मी कृत्रिम रंगांऐवजी झेंडूची फुलं, पळसाची फुलं, हळदीपासून, बीटपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरणार आज.” तेजोमयी असं म्हणताच अलेक्झांडर आतल्या खोलीत गेला नि त्याने तोंडात पकडून आणलेली झेंडूची फुलं गोर्जीसमोर टाकली.

“म्‍हणजे एकदम पर्यावरणपुरक म्हणायचं.”

“या रंगांमुळे त्वचेला त्रास होत नाही, रंग लवकर निघतो. या रंगात रसायने नसल्यामुळे प्रदूषणही होत नाही.”

“ओह वाव, फारच सजग झालीस गं तू?”

“आहेच मी ‘सजग’ नि ‘गजब’!” असं म्हणून तेजोमयीने अलेक्झांडरकडे बघितलं. ही ‘गजब’ तर मी ‘अजब’ अशा आशयाचे मिश्किल भाव डोळयात आणत त्याने सोफ्यावर उडी मारली नि पुन्हा खाली उडी मारली.

“गज्जक ऐकल होतं, हे गजब काय आता?”

“यंदा मी पाणीसुध्दा वापरणार नाही.”

“पाण्याशिवाय रंगपंचमी म्हणजे, रस्स्याशिवाय मिसळ. मिळमिळीत नि पुचपुचीत!”

“बये, कसलीही उपमा देऊ नकोस. सुकी मिसळ पोटाला आरादायक, झणझणित मिसळ पोटाला त्रासदायक!”

“ग्रेट! पण पाण्याचा कसला आलाय त्रास?”

“अगं, उगाचच पाण्याची नासाडी कां करायची? बादली बादलीभर पाणी याच्यावर टाक नि त्याच्यावर फेक. पाइपातून पाण्याची धार सोड. कित्येक गावात लोकांना, जनावरांना प्यायला पाणी मिळत नाही. पाण्यासाठी वणवण करावी लागते. आमच्याकडे तोटी फिरवली की नळातून झर्रदिशी भसाभसा पाणी मिळतं, म्हणून कसंही वापरायच का?”

“शहाणी गं माझी बाय.”

“गोर्जे, कुणीतरी सुरुवात करायची असते, असं गांधीजी म्हणत.”

“डॉ.माधवकाका गाडगिळही म्हणत.”

“कित्ती छान. पर्यावरणाचं रक्षण करा, रक्षण करा, नाहीतर एक दिवस तुम्हीच संकटात सापडाल असं हे माधवकाका सारखं सांगायचे. ते देवाघरी गेल्यानंतरची ही पहिली रंगपंचमी, पर्यावरणाची नासाडी होणार नाही याची काळजी घेऊन साजरी करतेय, ही त्यांना आदरांजलीच की नाही.”

“खरंच, व्हेरी स्मार्ट!”

“थँक्यू!”

“ते कशासाठी?”

“मला ओव्हरस्मार्ट म्हणाली नाहीस म्हणून.” तेजोमयी डोळे किलकिले करत म्हणाली.

“मग, जरा सूपर स्मार्टपणा दाखवून आज तुझ्या व्हॉटसॲपवर नि इन्स्टाग्रामवर ‘हॅशटॅग इको-रंगपंचमी’ असा संदेश पाठव की मित्रांना.” गोर्जी म्हणाली. अलेक्झांडरने तिच्याकडे बघितलं, तो गर्रदिशी मागे वळला. त्याने आतून तेजोमयीचा मोबाइल आणला नि तिच्या हातात सोपवला.

सुरेश वांदिले