१२ वीचा निकाल लागला. काही प्रवेश परीक्षांचे निकालही लागले. प्रत्येकाला त्याच्या पसंतीची शाखा आणि महाविद्यालय मिळेल याची शास्वती नसते. मनाजोगत्या शाखेत, महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, म्हणजे, सारं काही संपलं असं होत नाही. एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग खुला होतो, अशा आशयाची एक जुनी म्हण आहे. सध्याच्या परिस्थितीत अशा दुसऱ्या मार्गाचा म्हणजेच दुसऱ्या पर्यायांचा साधकबाधक विचार करायला हरकत नाही. या पर्यायांमुळे करिअर घडवण्याची संधी मिळू शकते.
असे काही पर्याय –
(१) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायंस- बेंगळुरु
या संस्थेने, बी.टेक इन मॅथेमॅटिक्स ॲण्ड कॉम्प्युटिंग हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. याचा कालावधी चार वर्षाचा असून आणखी एक वर्षाचे शिक्षण घेतल्यास एम.टेक ही पदवी प्रदान केली जाते. संशोधन, विकास, भविष्यवेधी नवसंकल्पना, पुढील काळातील तंत्रज्ञान यांच्यासाठी सखोलज्ञान प्राप्त गणितीय, संगणकीय आणि विदा विज्ञानीय क्षेत्रातील नेतृत्व विकसित करण्याचा, मुख्य उद्देश ठेऊन या अभ्यासक्रमाची संरचना करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाला जेइइ- (जॉईंट एंट्रंन्स एक्झामिनेशन) – ॲडव्हान्स्ड, या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जाईल.
संपर्क- btech-ug.iisc.in/MathandComputing
०००
(२) नॅशनल इंस्टिट्यूट फॉर एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स वुइथ मल्टिपल डिसॅबिलिटीज- अभ्यासक्रम-
(१) डी.एड इन स्पेशल एज्युकेशन (मल्टिपल डिसॅबिलिटीज)- कालावधी- दोन वर्षे. अर्हता- १२ वी (खुला संवर्ग- ५० टक्के आणि राखीव संवर्ग- ४५ टक्के गुण), अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२४
(२) डिप्लोमा इन ऑफिस ऑटोमेशन ॲण्ड ॲर्सरटिव्ह टेक्नॉलॉजी/ कालावधी- एक वर्षं. अर्हता – १० वी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमाला केवळ दिव्यांग उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो.
संपर्क- https://www.niepmd.tn.nic.in/
०००
(३) सैन्यदलातील नर्सिंग महाविद्यालय
महिला उमेदवारांना चार वर्षे कालावधीच्या, बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांना कायमस्वरुपी अथवा लघु मुदतीच्या कालावधीसाठी, “आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसमध्ये”, “नर्सिंग सर्व्हिस ऑफिसर”, म्हणून नियुक्ती दिली जाते. या अभ्यासक्रमाच्या निवडीसाठी “नीट (नॅशनल इलिजिबिलीट कम एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रॅज्युएट)- यूजी २०२४, परीक्षा दिलेल्या महिला उमेदवार पात्र ठरु शकतात. अशा इच्छुक उमेदवारांनी या अभ्यासक्रमासाठी अर्ज केल्यास त्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादितील उमेदवारांना संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड) वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी बोलावले जाते. ही परीक्षा सामान्य बुध्दीमत्ता आणि सामान्य इंग्रजीची चाचणी घेणारी असते. एकूण गुण ८०. त्यानंतर मानसशास्त्रीय चाचणी, मुलाखत, वैद्यकीय चाचणी घेतली जाते. अंतिम निवड यादी नीटमधील गुण आणि उपरोक्त नमूद तीनही चाचणीतील गुणांवर आधारित केली जाते. शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आणि तंदुरुस्त असणं आवश्यक.
संपर्क-www.joinindianarmy.nic.in
०००
(४) नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर-
या संस्थेत, बी.टेक इन फायर इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम करता येतो. प्रवेशासाठी जेइइ-मेनचे गुण ग्राह्य धरले जातात.
संपर्क-www.nfscnagpur.nic.in
(५) भारतीय सेना “१०+२, “टेक्निकल एन्ट्री स्किम”- या योजनेंतर्गत कायमस्वरुपी कमिशन दिलं जातं. या योजनेंतर्गत १२ वी विज्ञानशाखेत गणित भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन त्यात सरासरीने ६० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी पात्र ठरतात. उमदेवारांच्या निवडीसाठी जेइइ-मेन २०२४ मधील गुण प्रारंभिक चाळणीसाठी ग्राह्य धरले जातात. वैद्यकीय आणि शारीरिक क्षमता चाचणीमध्ये यशस्वी झालेल्या
उमेदवारांची निवड चार वर्षे कालावधीच्या इंजिनीअरिंग प्रशिक्षणासाठी केली जाते. शिक्षण आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यावर जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दिल्लीमार्फत बीटेक ही पदवी दिली जाते. त्यानंतर उमेदवार लेफ्टनंट म्हणून रुजू होतात.
संपर्क-www.jionindianarmy.nic.in
०००
(६) भारतीय नौदल “१०+२ कॅडेट एन्ट्री स्किम”
या योजनेव्दारे कायम स्वरुपी कमिशन दिलं जातं. १२ वी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्रात सरारसरीने ७० टक्के गुण मिळायला हवेत. १० वी आणि १२ वीमध्ये इंग्रजीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळायला हवेत. निवडीसाठी जेइइ- मेन मधील गुणांचा आधार घेतला जातो. अंतिम निवड ही मुलाखत, वैद्यकीय आणि शारीरिक तंदुरुस्ती चाळणी नंतर केली जाते. या प्रशिक्षणासाठी निवडलेल्या उमेदवारांना इंडियन नॅव्हॅल ॲकॅडेमी एझिमला येथे, नौदलाच्या गरजेनुसार ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग किंवा इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरंगचं शिक्षण दिलं जातं. चार वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर जवाहरलाल नेहरु विद्यापीठामार्फत बी.टेक पदवी प्रदान केली जाते.
संपर्क-joinindainanavy.gov.in
०००
(७) नॅशनल काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग
या संस्थेतंर्गत कार्यरत असणाऱ्या, (अ) रिजनल इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन- भोपाळ येथील बीएस्सी- बीएड आणि बीए-बीएड या चार वर्षे कालावधीच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाला महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
(ब) रिजनल इंस्टिट्यूट ऑफ एज्युकेशन – म्हैसुरु, या संस्थेतील इंटिग्रेटड एम.एस्सी-बीएड या अभ्यासक्रमाला कोणत्याही राज्यातील उमेदवारास प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम सहा वर्षे कालावधीचा आहे.
(क) प्रारंभ स्कूल ऑफ टिचर एज्युकेशन जाझ्झर येथील इंटिग्रेटेड बीएस्सी-बीएड आणि बीए-बीएड या अभ्यासक्रमांना कोणत्याही राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.
अर्हता- इंटिग्रेटेड बीएस्सी- बीएड आणि एमएस्सी- बीएड- १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन सरासरीने ५० टक्के गुण मिळवणं आवश्यक. राखीव संवर्गासाठी ४५ टक्के गुण) आणि इंटिग्रेटेड बीए-बीएड – अर्हता- १२ वीमध्ये कला, वाणिज्य किंवा विज्ञान या पैकी कोणत्याही शाखेत सरासरीने ५० टक्के गुण मिळवणं आवश्यक. राखीव संवर्गासाठी ४५ टक्के गुण.
संपर्क-cee.ncert.gov.in
(८) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सेंकडरी स्टील टेक्नॉलॉजी या संस्थेमार्फत रोजगारासाठी उपयुक्त ठरतील असे कौशल्यप्रदान करणारे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये , (१) ॲडव्हान्स्ड सर्टिफिकेशन इन इंस्पेक्शन इंजिनीरिंग, (२) सर्टिफिकेशन इन क्वांटिटी सर्व्हेयर (सिव्हिल ॲण्ड मेकॅनिकल), (३) सर्टिफिकेशन इन मटेरिअल कंट्रोलर ॲण्ड मॅनेजमेंट, (४) सर्टिफिकेशन इन इंजिनीअरिंग डिझाइन, (४) सर्टिफिकेशन इन प्रॉडक्शन ॲण्ड टोटल क्वालिटी मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांना १० वी १२ वीच्या गुणांवर किंवा चाळणी परीक्षेव्दारे प्रवेश दिला जातो. संपर्क-www.nisst.org/training-programme
ही संस्था भारत सरकारच्या स्टील मंत्रालयाने स्थापन केली आहे.
०००
(९) मेकॅट्रॉनिक्स
सध्या या विषयातील प्रशिक्षित मनुष्यबळाला चांगली मागणी आहे.हा अभ्यासक्रम पुढील शासकीय संस्थांमध्ये करता येतो.
- इंडो डॅनिश टूल रुम, जमशेदपूर-
अभ्यासक्रम- डिप्लोमा इन ॲडव्हान्स्ड मेकॅट्रॉनिक्स आणि इंडस्ट्रिअल ऑटोमशेन. अर्हता – १० वीमध्ये गणित, भौतिकशास्त्र आणि रसायशास्त्र हे विषय घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. खुला आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत संवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळायला हवेत.
संपर्क-www.idtr.gov.in
(ब) इंडोस्वीस ट्रेनिंग सेंटर- ही संस्था सेंट्रल सायंटिफिक इंस्ट्रुमेंटेशन ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत कार्यरत आहे.
अभ्यासक्रम- ॲडव्हान्स्ड डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स ॲण्ड इंडस्ट्रिअल ऑटोमशेन. कालावधी चार वर्षे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ जून २०२४. संपर्क-career.csio.res.in
(क) मायक्रो, स्माल ॲण्ड मिडियम एंटरप्रायझेस टेक्नॉलॉजी सेंटर रोहतक अभ्यासक्रम- डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- १० वी. संपर्क-www.msmetcrohtak.org
(ड) टूल रूम ॲण्ड ट्रेनिंग सेंटर पाटणा- अभ्यासक्रम – डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स.
संपर्क- www.patna.idtr.gov.in
सुरेश वांदिले