(+91) 93249 73947 sureshwandile@gmail.com

 

 १४ पुस्तके

बाबासाहेब कोणतीही पूर्वसूचना न देता तेजोमयीच्या घरी आले. त्यांना बघून सर्वांची धांदल उडाली. आई-बाबांनी त्यांना घाईघाईत दंडवत घातला. तेजोमयीने त्यांच्या डोक्यावर पाय ठेवले. ते बघून अलेक्झांडर (द डॉगी) नेही त्यांच्या पायावर डोके ठेवले. बाबासाहेबांनी अलेक्झांडरला जवळ घेतले. त्याच्या मानेवरुन मायेने हात फिरवला.

आई-बाबा,  त्यांना काहीतरी विचारणार तोच, बाबासाहेब अलेक्झांडरला म्हणाले,

 चल रे घर दाखव मला तुमचं. चल गं तू पण माझ्यासोबत , बाबासाहेब तेजोमयीकडे वळून म्हणाले.

पण, बाबासाहेब तुम्ही आमचं घर कां बघता? साधं आहे हो..बाबा म्हणाले.

अगदी साधं. आमच्यासारखचं..आई म्हणाली.

म्हणूनच बघायचय, बाबासाहेब हसत म्हणाले. अलेक्झांडरकडे बघून पुन्हा म्हणाले, चल रे दाखव घर तुझं..

अलेक्झांडर शेपूट हलवत पुढे निघाला. या खोलितून त्या खोलित. पाच मिनिटाच चार खोल्या बघून झाल्या. बाबासाहेब दिवाणखान्यात येऊन बसले.

आईने त्यांना पाणी दिलं. चहा की कॉफी विचारलं. बाबासाहेबांनी दोघांनाही नकार दिला.

कसं वाटलं घर आमचं? बाबासाहेब, तेजोमयीने बाबासाहेबांकडे बघत विचारलं.

मला नाही आवडलं.

मी म्हंटलं होतं ना बाबासाहेब, आमचं घर खूप साधं आहे म्हणून..आई-बाबा एकाच वेळेस म्हणाले.

साधं की भारी, याचं मला अप्रूप नाही ताई. बाबासाहेब आईकडे बघत म्हणाले.

मग..

अहो, तुमच्याकडे खूप कपाटं आहेत. त्यात खूप कपडे आहेत. भांडे आहेत. खेळणी आहेत.

मग, तुम्हाला कां नाही आवडलं आमचं घर बाबासाहेब? तेजोमयीनं विचारलं. अलेक्झांडरने तशीच मान हलवली. त्याला जवळ घेत बाबासाहेब म्हणाले,

ज्याच्या शोधात मी आलो होतो, ते कपाट काही मला दिसलं नाही..

म्हणजे बाबासाहेब? आई-बाबा-तेजोमयीनं एकाचवेळी आश्चर्यानं विचारलं. त्या एकत्रित आवाजाने अलेक्झांडर दचकला नि आईकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं बघू लागला.

अरे, तुला कळेल असं सांगतो, बाबासाहेब त्याच्याकडे बघत म्हणाले. अलेक्झांडरने मान हलवली.

कशाच्या शोधात होतात बाबासाहेब तुम्ही? तेजोमीयनं विचारलं.

तुमच्या घरी पुस्तकाचं कपाट शोधलं मी. ते काही दिसलं नाही मला. म्हणून मला नाही आवडलं तुमचं घर.

आई-बाबांना यावर काय बोलावं ते कळेना.

बाबासाहेब, इतक्या छोट्या घरात पुस्तकाचं कपाट कसं बरं ठेवणार आम्ही?

कपड्यांचे तीन तीन कपाटं आहेतच की नाही? बाबासाहेबांनी प्रतिप्रश्न केला. आई यावर निरुत्तर झाली

बाबांची मान खाली गेली.

बाबासाहेबांनी त्यांना आपल्या जवळ बोलावलं. जवळ बसवून विचारलं.

तुमचा पगार किती हो? सांगायची इच्छा असल्यसच सांगा हं.

बाबांनी त्यांचा पगार सांगितला.

मग यातली किती रक्कम तुम्ही पुस्तकं घेण्यासाठी खर्च करता. बाबासाहेबांच्या या प्रश्नाने बाबा आणि आई दोघांचाही चेहरा पडला. बाबा काहीच बोलले नाहीत.

काय गं, गेल्या सहा महिन्यात किती पुस्तकं विकत आणली तुझ्या बाबांनी, बाबासाहेबांनी तेजोमयीस विचारलं. तिने एकही नाही म्हणून सांगितलं.

व्वा..शाबास. असंच खरं बोलायचं. काही लपवायचं नाही. हा मोठा सद्गुण आहे बाळ. तेजोमयीचं कौतुक करत बाबासाहेब म्हणाले.

बाबासाहेब, अशी पुस्तकं घेत राहिलो तर ठेवणार कुठे न, म्हणून…बाबा कसेबसे बोलले.

हे बघा, तेजोमयीचे बाबा, पुस्तकासारखं मोठ धन नाही. ते कुठे ठेवायचं हा जर प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर यापेक्षा दुर्देव्य कोणतं बरं? पुस्तकाच्या वाचनानं तुम्ही, तुमची पत्नी आणि ही गोड मुलगी तेजोमयी श्रीमंत व्हाल. गुणवंत व्हाल, हे तुम्हास मान्य नाही वाटतं..

तसं नाही बाबासाहेब..पण..

आता पण बिन काही नाही. उद्या १४ एप्रिल, माझा वाढदिवस. तुम्ही साजरा करताना?

हो हो हो बाबासाहेब..

कसा करता? बाबासाहेबांनी विचारलं. यावर आईबाबांना काही नीट सांगता आलं नाही. बाबासाहेब हसले.

बाबांकडे बघून म्हणाले, अहो घाबरता कशाला?

तसं नाही बाबासाहेब..बाबा त त प प करत म्हणाले.

यंदा माझा वाढदिवस कसा साजरा करायचा हे मीच तुम्हाला सांगितलं तर चालेल ना..बाबासाहेब म्हणाले.

हो हो हो बाबासाहेब, आई-बाबा-तेजोमयी एकत्रच म्हणाले.

तर मग तुम्ही १४ पुस्तकं घ्या. माझ्यावरचं, गौतम बुध्दावरचं, महात्मा फुले, गाडगेबाबा, कर्मवीर भाउुराव पाटील, छत्रपती शिवाजी महाराज, अब्दूल कलाम अशी कोणतीही..हीच घ्या हा माझा आग्रह नाही. ही अशी पुस्तकं तुमच्या ज्ञानात भर घालतीलच पण तुम्हाला, जीवन अधिक समृध्द करण्याचा उत्साह आणि उर्जाही देतील..पटतय का माझं म्हणणं..

हो हो बाबासाहेब..आई बाबा म्हणाले..

मला पण पटलयं बाबासाहेब. या उन्हाळयात जमेल तितकं मी वाचतेच आता. तुम्ही इतके थोर कसे झालात? त्याचं रहस्य काय?हे तुमच्यावरचं पुस्तक वाचल्यावरच कळेल ना मला..तेजोमयी म्हणाली.

बाबासाहेब प्रसन्न हसले. त्यांनी तेजोमयीस जवळ घेऊन तिला आशीर्वाद दिला.

अलेक्झांडला जवळ घेऊन त्याला प्रेमानं थोपटलं आणि आईबाबांचा निरोप घेऊन ते घराबाहेर पडले….

सुरेश वांदिले